याला कशी सहन करते ते मलाच ठावूक…

Written by

रजनी जोरजोरात जयाचे दार वाजवत होती. “अरे हो आली, उघडते ना दार, का तोडून टाकायचा विचार आहे?”, रागाने असं बोलतच जयाने दार उघडले. बघते तर काय समोर रजनी, तिची मैत्रिण उभी होती. तिचा रडून लाल झालेला चेहरा, घरातलेच कपडे आणि अस्ताव्यस्त झालेला अवतार बघून जया घाबरूनच गेली. तिला पटकन आत घेवून सोफ्यावर बसवून प्यायला पाणी दिले. पाच मिनिटाने रजनीचा श्वास ठिकाण्यावर आला. मग जयाने तिला थोडं घाबरतचं विचारले, “काय झाले गं सगळं ठीक तर आहे ना”?
“कसलं ठीक आणि काय, इथे तर सगळंच बिघडलयं… कशी जगतेयं या माणसाबरोबर ते फक्त मलाच ठावूक”. रजनी उसळून बोलली. जयाला मामला काय आहे याचा थोडासा अंदाज येवू लागला.
रजनी आणि राजेश एक सुखवस्तू जोडपं, राजेश एका चांगल्या कंपनीत कामाला होता. पगारही चांगला होता तर रजनी गृहिणी होती. मनाने खूप चांगली होती पण थोडी बालिश याउलट राजेश समजुतदार होता, सगळ्या गोष्टींचा सारासार विचार करून निर्णय घ्यायचा. आणि इथेच सारे घोडे अडले होते.
रजनी सांगू लागली, “काय सांगू ताई माझे तर नशीबच फुटकं, कुठुन दुर्बुद्धी सूचली आणि याच्यासोबत लग्न केलं असं वाटतयं मला”.
“अगं मागच्या आठवड्यात तर तुम्ही मॅरेज अॅनीवर्सरी किती धूमधडाक्यात साजरी केलीस, तेव्हा तर तू राजेशच जगातला सगळ्यात चांगला नवरा आहे अशा अर्थाची स्वतः लिहिलेली कविता पण वाचून दाखवली होतीस ना ?” आपलं हसू लपवत जयाने विचारले.
“ते सोड, माझी रामकहाणी ऐक.” रजनीचे हुंदके, रडणं मधूनच आपल्या मॅक्सीनं नाक पुसणं यातून जी तुटकं तुटकं हकीकत कळली ती अशी…
रजनीला एका ऑनलाइन शॉपिंग साईटवर एक छान वनपीस आवडला होता. तिने मनाशी ठरवलं होतं यावर्षी सोसायटीच्या नवीन वर्षाच्या पार्टीसाठी ती तोच घालेल, तो ड्रेस विकत घेण्यासाठी तिने राजेशला गळ घातली. तिने त्याला सांगितले, “ तू माझा सीक्रेट सांता बन आणि मला ख्रिसमसला तो ड्रेस गिफ्ट दे.” सीक्रेट सांता आणि गिफ्ट काय हवे ते ही आधीच सांगुन!!! असो… तर राजेशने साफ नाही म्हणून सांगितलं आणि तेवढ्यावरून बाईसाहेबांचा पापड मोडला आणि रडारड सुरू झाली तिने त्याला प्रेमाने रागाने हरप्रकारे समजावून पाहिले पण तो ऐकत नव्हता. हे सांगताना पण तिला रडू आवरत नव्हते म्हणून थांबून थांबून ती सांगत होती.
एव्हाना तिला जयाकडे येवून दोन तास झाले होते. राजेशने जयाला फोन करून रजनी आहे का विचारले. रजनी मागे उभी राहुन नाही सांग म्हणत होती. राजेशने तिचा आवाज ऐकून फोन बंद केला आणि तो जयाकडे आला. त्याने रजनीला घरी चलायला सांगितले पण तिने स्पष्ट नकार दिला. ते दोघे तिथेच परत भांडू लागले. त्यांना तसेच सोडून जया चहा बनवायला किचनमध्ये गेली.
“रजु चल ना घरी काय हे लहान मुलांसारखं करते?”
“राजेश मी तेव्हाच घरी येणार जेव्हा तू मला हवं ते घेवून देशील.”
“ तुला सांगितलं ना मी या महिन्यात माझ्याकडे पैसे नाहीत, मी पुढच्या महिन्यात घेईन ना तो ड्रेस तुला.”
“तुझ्याकडे तर मला काही घ्यायला कधीच पैसे नसतात.”
आता मात्र राजेशची सहनशक्ती संपली. “हे बघ तुला घरी यायचे तर ये नाहीतर नको येवू, माझ्याकडे पैसे नाहीत कारण मला या महिन्यात तुझ्या स्कूटर चे हफ्ते भरायचे आहेत. आणि तुला मी आत्तापर्यंत कोणत्या गोष्टीला नाही म्हटलंय का, मागच्याच आठवडयात मी तुला अॅनीवर्सरीला डायमंड नेकलेस दिला होता, त्याच्या मागच्या महिन्यात दिवाळीला महागडी साडी.”
“आता तू तर यादीच काढू लागलास”…
“हो कारण तुला समजत नाही आहे माझे म्हणणे, बघ अगं आताही मी नाही घेणार म्हणतच नाहीये फक्त इतकंच म्हणतोय पुढच्या महिन्यात घेवू, रजनी तुला काय हवं ते मी सगळं देईन, तुझी प्रत्येक ईच्छा मी पुर्ण करेन पण तुही जरा समजून घेतले पाहिजे ना, कसा परवडणार आहे आपल्याला दर महिन्याला असा खर्च.”
रजनीच्या लक्षात आले तो जो काय सांगतोय ते बरोबरच आहे, आपली खरचं चूक झाली. तेव्हड्यात जया चहा घेवून आली. म्हणाली आता जर तुमचं मिटलं असेल तर आपण गरमागरम चहा घेवूया का?
चहाचा कप उचलताना रजनी बोलली, “पण राजेश ते पुढच्या महिन्यात नक्की ना !” तिचे बोलणे ऐकून जया आणि राजेशने डोक्याला हात लावला तर ती हसून म्हणाली, अरे मी तर मस्करी केली, चल लवकर घरी तुझ्या आवडीचं पिठलंभात बनवते…

Article Categories:
मनोरंजन

Comments are closed.