या प्रेमाला उपमा नाही…….!!

Written by
महेश काका गावाला आमच्या घराजवळ राहणारा. आमचा शेजारी.
अगदी घरच्यासारखाच.पहिल्यापासूनच एकदम सरळ नाकासमोर चालणारा आणि शांत. दिसायला एकदम रुबाबदार, उंचापुरा, कोणालाही भुरळ पाडेल असं त्याचं व्यक्तिमत्त्व होतं.
शेजारीच असल्याने लहानपणापासून त्याचं सगळं जीवन नजरेसमोरून बघितलेलं.
आई-वडील, तो आणि त्याची बहीण हा त्याचा परिवार.
बँकेतली नोकरी होती. बहिणीचं लग्न लागलं, तशी याच्याही लग्नाची खटपट सुरू झाली.
आणि लवकरच एका सुस्थळी याचीही गाठ बांधली गेली.
रोहिणी त्याला अगदी साजेशीच मिळाली. दिसायलाही आणि स्वभावालाही. दोघांचं अगदी छान सूत जमलं. जो तो म्हणे लक्ष्मी-नारायणासारखा जोडा शोभतोय अगदी!!
महेश काकाच्या घरचेही सर्व खूष होते तिच्यावर. दुपारी जेव्हा त्याची आई आमच्याकडे यायची, तेव्हा सुनेविषयी अगदी भरभरून बोलायची. असं चांगलं बोलणारी तेव्हा ती एकच होती. बाकी येऊन कुचाकळ्या करत बसायच्या.
आम्ही पोरंही तिच्या मागे असायचो, ती आवडायची आम्हालाही खूप. बरेचदा आमच्याशी खेळायचीही.
काही दिवसांतच त्यांच्याकडे गोड बातमी आली. मग काय विचारता, महेश काकाचं आम्हा पोरांवर प्रेम जास्तच ओसंडून जाऊ लागलं. रोज कामावरून येताना तो आमच्यासाठी काही ना काही खाऊ आणायचाच.
आमच्यासाठी पण आणि रोहिणी काकुसाठी पण.
बाळ त्यांच्या घरी जरी येणार होतं, तरी सगळा शेजार आनंदून गेला होता.
सगळ्यांना आतुरता होती, एवढ्या गोड जोडप्याचं बाळ किती गोड असेल!! आम्ही मुलं तर अगोदरच भांडायचो, त्याला कोण जास्त खेळवणार यावरून!
महेश काका, त्याच्या घरचे सगळेच खूप काळजी घेत होते, रोहिणी काकूची. इतकंच काय तिला वडील नव्हते, आईला एकटीला भार नको, म्हणून रोहिणी काकुला माहेरी न पाठवता, तिच्या आईलाच आठव्या महिन्यापासून बोलावून घेतलेलं.
सर्वकाही व्यवस्थित सुरू होतं. नववा महिना भरताना एक दिवस कळा सुरू झाल्या, अन् तिला ऍडमिट केलं. आता बाळ येणार, सर्वजण अगदी उत्सुकतेने वाट बघत होते, त्या क्षणाची.
कधी त्याच्या आगमनाची वार्ता येतीये.
वार्ता आली, बाळाच्या आगमनाची वार्ता आली, पण त्याबरोबर दुसरी वार्ता आली, ती रोहिणी काकूच्या जाण्याची.
हे तर कुणाच्याही ध्यानीमनी नव्हतं. ऐनवेळी डिलिव्हरीमध्ये अडथळा निर्माण झाला, खूप प्रयत्न केले डॉक्टरांनी वाचवायचे, अगदी शेवटच्या क्षणापर्यंत, पण सारं व्यर्थ ठरलं. ती गेली, जाताना स्वतःचं प्रतिरूप महेश काकाच्या कुशीत सोडून गेली.
सगळे सुन्न झालेले. काय चित्र बघितलेलं आणि काय सामोरी आलं!!
महेश काकाकडे तर बघणं बंदच केललं आम्ही काही दिवस. बघितलं की रडायलाच यायचं त्या वयातही.
बाळ जसंजसं वाढू लागलं, तसातसा तो माणसात येऊ लागला.
आता आम्हीही त्याच्या घरी बाळाला खेळवायला जाऊ लागलो.
अगदी बाहुली होती त्याची मुलगी. इतकी गोड दिसायची की तिला जवळ घेऊन लाड केल्याशिवाय कोणालाही राहताच यायचं नाही. प्रत्येकजण तिला उचलून फिरवत बसायचा.
‘रुही’ नाव ठेवलं होतं तिचं. रुहीच्या हसण्याखेळण्यात महेश काका सावरताना दिसत होता.
रुहीला आईचं प्रेम नाही, असा विचार करून सर्वांना खूप वाईट वाटायचं. पण तिची आजी, महेशची आई अगदी जीवापाड जपायची तिला. तिचा श्वास होती रुही. रुही आजीलाच आई म्हणायची. आजीच प्रेम द्यायची ना तिला आईचं, आई नसताना जीव लावणारा कोणीही आईचं दुसरं रूपच नाही का?
आता रोहिणीला जाऊन दोन वर्ष झाली होती, आणि शेजारी-पाजारी मंडळींना, नातेवाईकांना, अगदी बहिणीच्या सासरकडच्यानंही महेश काकाची जास्तच चिंता सतावू लागली.
तिशीतलाच होता तो. एवढं सारं आयुष्य घालवायचय. मुलीला आई हवीच. त्यालाही सोबत हवीच. अनेक स्थळं, सल्ले आडून आडून महेश काकाच्या आईवडिलांच्या कानावर येणं सुरू झालं.
आईलाही वाटू लागलं, आपल्याकडून किती होणार, आपलंही वय झालं.
तिने धीर करून विचारलंच, तेव्हा काही क्षण तर महेश काकाला झिणझिण्या आल्यासारखंच झालं. त्याने अशी काही कल्पनाच केली नव्हती.
तो रोहिणी काकूच्या आठवणींमधून बाहेर पडायला तयारच नव्हता. त्याचं अपार प्रेम होतं तिच्यावर, तिच्या जागी कोणी दुसरी कल्पनेतही नको होती त्याला.
आईला वाटलं, होईल अजून एक दोन वर्षात तयार. उगीच जबरदस्ती नको त्याच्यावर.
लोक मात्र तिला विचारून हैराण करत होते. जणू घरच्यांपेक्षा यांनाच काळजी जास्त, त्याचं कसं होईल, आणि पोरीचं कसं होईल म्हणून?
एक-दोन काय पुढे चार वर्षे सरली, रुही आता सहा वर्षाची झाली. तरी महेश काका लग्नाचं नाव काढेना.
इकडे लोकांचा काळजीने जीव जायला लागला, शेजारीपाजाऱ्यांचा, नातेवाईकांचा, इतकंच काय त्याचा बँकेतल्या सहकाऱ्यांचा पण.
काहींनी तर आम्ही इतकं सांगूनही, आमचा मान ठेवला नाही, म्हणून यांच्याशी संबंध देखील तोडले.
महेश काकाच्या आईवडिलांनाही आता काळजी सतावू लागली.
या पोराच्या मनात नेमकं आहे तरी काय?
शेवटी एकदा दोघांनी त्याला सरळ विचारलं, काय ते सांग बाबा एकदा. तुझी आणि रुहीची काळजी लागून राहिलीये आमच्या जीवाला. तुझा संसार सुरू झाला की आम्ही सुखाने मारायला मोकळे.
त्या दिवशी महेश काकाने त्यांना मनातलं सगळं सांगितलं आणि त्यांना समजावलही.
मला रुहीची आई म्हणून दुसऱ्या कोणाला बघण्याची अजिबात इच्छा नाही. मी रोहिणीच्या जागी दुसऱ्या कोणाला कधी बघूच शकत नाही. ती नाही म्हणून माझं तिच्यावरचं प्रेम तसूभरही कमी झालेलं नाही. ती तुमच्यासाठी नाही, पण माझ्याबरोबर सदैव आहे. शरीराने गेलीये जरी, तरी माझ्यात पूर्ण भिनली आहे. असं समजा ती माझ्या शरीरात, मनात सामावली आहे. ती सतत रुहीच्या रुपात माझ्या डोळ्यासमोर नाचतेय. ती माझ्यासाठी अजूनही आहेच.
आणि रुहीला मी कोणाच्याही हातात नाही सोपवू शकत. तिला कोणत्याही प्रकारे त्रास झालेला नाही पाहू शकत मी!!
मी तिच्यासाठी जगतोय फक्त………
दुसऱ्या आईचा रुहीला त्रास होईलच असं नाही, आणि होणार नाहीच असही काही सांगता येत नाही. आणि तिला कुणाचा त्रास झाला तर मी स्वतःला कधीच माफ करू शकणार नाही. माझा हा जन्म त्या दोघींसाठीच फक्त.
आईवडील काय समजायचं ते समजून गेले. पुन्हा कधीही त्यांच्या घरात हा विषय निघाला नाही.
मात्र बाकीचे अजूनही आशा लावून होते. त्यांना महेश काकाच भलं झालेलं पहायचं होतं.
पण आमचा महेश काका सर्वसाधारण नव्हताच. स्वतःच्या निस्पृह प्रेमाची ज्योत त्याला निरंतर तेवत ठेवायची होती.
आजही गावाला गेल्यावर मी महेशकाकाला आवर्जून भेटायला जाते . जसा होता तसाच आहे तो अजूनही .
रुही आता मोठी झालीये, लग्नाला आलीये. अगदी तिच्या आईसारखचं अप्रतिम सौदर्य उतरलंय तिच्यात. पहिल्यांदा पाहिलं तर झटकन काकूच की काय असा भास झाला मलाही.
आमच्या महेशकाकाने आपल्या प्रेमासाठी आणि पोरीसाठी सगळे मोह बाजूला सारले. स्वतःचा विचार केलाच नाही कधी.
अशी माणसं दुर्मिळच!!
मी तर भेटायला गेले की पायाच पडते त्याच्या, तो म्हणतो, अगं पाया कशाला पडते ग?
आता काय सांगू त्याला. आजच्या दुनियेत तुझ्यासारखी माणसं सापडणं खूप कठीण रे! पुरुषच काय आतातर बायकाही खूप वर्षाच्या सहवासानंतर सुद्धा जोडीदार गमवल्यावर बरेचदा वर्षभरही न थांबता लग्नासाठी उभ्या राहीलेल्या बघितल्यात मी. त्यात काही वावगं आहे असं नाही. ज्याला जसं पटत तसं. साथीची गरज असतेच प्रत्येकाला.
पण महेश काकाकडे बघून मात्र मला प्रश्न पडतो, इतक्या वर्षात याला कसं कुठल्या साथीनं भुलवलं नाही कधी? एवढा संयम याने नक्की कुठून मिळवला??
एकपत्नीव्रती, मर्यादापुरुषोत्तम राम ऐकला, वाचला होता, पण महेश काकाच्या रूपाने तो मला या कलियुगात पहायला देखील मिळाला!!
खरंच त्याच्या प्रेमाला, संयमाला याहून दुसरी कोणती उपमाच नाही!!
©️स्नेहल अखिला अन्वित
फोटो साभार: गुगल
कथा आवडल्यास लाईक, कमेंट आणि फॉलो नक्की करा. शेअर करताना मात्र नावासकटच करा
Article Categories:
मनोरंजन

प्रतिक्रिया व्यक्त करा