या सुखांनो या सुखांनो 😊

Written by

सुख प्रत्येकाला हवंसं वाटणार…. सुख आपल्या दोन हातांच्या ओंजळीत कधीही न मावणारं……….. सुख फुलपाखरांसारखं……… सुंदर खुणावणारं…….. नकळत आसपास घुटमळणारं अन् आपण आवेगानं मुठीत पकडताच हुलकावणी देणारं…….. कसं असतं हे सुख! कुठे असतं! खरंतर सुखाचा चेहरा आजवर कोणीही पाहिलेला नाही. तरी प्रत्येकजण आपल्यापरीनं त्याच्या शोधात असतो. जगाच्या पाठीवर कुणी असा माणूस नाही जो म्हणेल मी पूर्णतः सुखी आहे. प्रत्येकाला पदोपदी काही ना काही हवं असतं. जे पदरात असतं ते अपुरं वाटतं. जे पाहिजे असतं ते मिळत नसतं. एकुणच काय जे जे आपणापाशी नाही ते ते मिळवण्याचा हा प्रवास. या प्रवासात आपण बर्‍याचवेळा आत्मकेंद्री बनतो, स्वार्थी बनतो. हे सुख मिळवताना काही माणसं दुखावली जातायत का ? नाती पणाला लागतायत का ? कुणाच्या तरी भावनांचा खेळ आपण मांडलाय का ? याकडे सोयीस्कररित्या दुर्लक्ष केलं जातं. आपण इतके आत्ममग्न होतो की, आजूबाजूचे आवाज मग कानापाशी पोहोचणंच बंद होतं.
आता हे सुख साधारणतः पैसा, उच्चपद, प्रतिष्ठा, सुखसोयी यात सामावलेलं असतं. मात्र आम्ही पैश्यामागे पळणारे नव्हे,इतकेही स्वार्थी नव्हे आम्ही असं म्हणून आपण स्वतःच्या मनाची फसवणूक करतो. या सगळ्या गोष्टीतलं सुख प्रत्येकाला हवं असतं. किंबहुना कोणीच ते नाकारू शकत नाही. पण या सुखापलिकडेही एक सुख आहे ज्याच्याशिवाय आपण जगू शकतं नाही. सकाळी घरातून बाहेर पडलेली माणसं जेव्हा रात्री गप्पागोष्टी करत एका डायनिंग टेबलवरती एकत्र जेवण करतात. हेच ते एकत्रित असण्याचं, एकत्रित जगण्यातलं सुख. घरची मुलं जेव्हा आपला पहिला पगार मोलमजुरी करून बापाच्या खड्डे पडलेल्या हातावर ठेवतात,तेव्हा त्या देण्यातलं अन् घेण्यातलं सुख अवीट असतं.
एखादं ध्येय साध्य करण्यासाठी प्रवासात कितीही खाचखळगे येवोत. नव्या उमेदीनं लढणं, धडपडणं, पुन्हा उठुन जुन्या ध्यासानं नव्या अडथळ्यांना सामोरं जाणं आणि शेवटी ध्येय साध्य झाल्याचं समाधान ! अशावेळी ढगांना बिलगल्याचा आनंद मनाला मिळतो. हे खरं मौल्यवान सुख. कष्टानंतर जे सुख मिळतं ते सगळ्यांच्या नजरा दीपवून टाकतं. आयुष्यात हे इंद्रधनुष्य फुलवण्यासाठी जगलं पाहिजे.

आवडल्यास नक्की लाईक करा,शेअर करा आणि येणारे ब्लॉग वाचा 😊🤗

Article Categories:
मनोरंजन

Comments are closed.