युरोप डायरी #१

Written by

मागच्या वर्षी एप्रिल-मे महिन्यात आम्ही युरोप टूर केली. हि टूर माझ्यासाठी आत्तापर्यंतचा सर्वात सुंदर अनुभव होता. त्याची माहिती देणारी हि लेखमाला…

पहिलं वहिलं प्रवासवर्णन लिहितेय आणि तेही एकदम युरोपचं…. सगळ्यांच्या मनातल्या ड्रीम डेस्टिनेशनचं…
युरोपचं प्रवास वर्णन असं मोजक्या शब्दात करणं खूप कठिण आहे. तरीही मी युरोपमध्ये काय पाहिलं, अनुभवलं हे टिपण्याचा हा छोटासा प्रयत्न. वाचन कंटाळवाणं होऊ नये म्हणून छोटया छोट्या पॅराग्राफ्स मध्ये लिहितेय. तुमच्या बरोबर हा सगळा प्रवास मला परत एकदा अनुभवता यावा आणि कायम वाचता यावा यासाठी हा सगळा खटाटोप… तर आता युरोपबद्दल ….

२९ एप्रिलला युरोपसाठी सुरू केलेला विमानप्रवास ३० एप्रिलला नेपल्स (इटली) ला येऊन संपला. ६.३० वाजता हॉटेलला पोहोचलो तेव्हा लखलखीत सूर्यप्रकाश आणि ऊन होतं. इथे सूर्यास्त ९ नंतर होतो उन्हाळ्यात आणि दिवस उजाडतोही लवकर. नव्या गोष्टी कळायला सुरुवात झाली … जेटलॅगमुळे अाजचा दिवस आराम केला. १ मे ला सकाळी ‘Capri’ कडे ‘ब्ल्यू ग्रेाटो’ पाहण्यासाठी निघालो . कॅप्री हे छोटंस आयलंड आहे, नेपल्स जवळ. तिथं बरीच छोटी-मोठी सुबकशी घरं-बंगले, हाॅटेल्स आणि शॉप्स आहेत. सुरेख समुद्रकिनारा आहे.
तिथेच ‘ब्लू ग्रेाटो’ म्हणजे साधारण तीन फूट उंच आणि चार फूट रुंद अशी गुहा आहे. त्या गुहेत छोट्या बोटीने जातात .पण ते सौंदर्य पाहायला निसर्ग तुमच्यावर प्रसन्न हवा. दुर्दैवाने त्या दिवशी समुद्रात लाटा ही खूप होत्या आणि हवामानही साजेसं नव्हतं . त्यामुळे आम्हाला ब्लू ग्रेाटो पाहता नाही आलं. त्याऐवजी कॅप्री आयलंडमध्ये साधारण एक तासाची अतिशय अविस्मरणीय अशी बोट राइड आम्ही केली.
निळंशार स्फटिकासारखं चमचमणारं पाणी, थंड वारा, समुद्राच्या लाटांनी तयार केलेल्या असंख्य गुहा आहाहा… कुठ हिरवं तर कुठे निळं असणारं हे स्वच्छ पाणी अगदी तळापर्यंत सगळंकाही दाखवणारं…जादू आहे सगळी.
बोट राइड संपवून परतीच्या प्रवासाला लागलो, रोमकडे जायला निघालो. आता मुक्काम रोमच्या ऐतिहासिक शहरात दोन दिवसांसाठी…

मैत्रेयी दीक्षित- समेळ.

Article Categories:
मनोरंजन

प्रतिक्रिया व्यक्त करा