युरोप डायरी (Day- 2)

Written by

रोम चा इतिहास नावाप्रमाणेच रोमहर्षक आहे. साधारण २३०० वर्षांपेक्षा मोठा इतिहास असलेले हे शहर इटलीची राजधानी आहे. रोमन सम्राट रोम्युलस यानं वसवलेले हे शहर. त्याच्या बांधकामात आणि केलेल्या सोयी सुविधांतून त्यांची दूरदृष्टी दिसून येते.
आज सर्वप्रथम ‘Trevi fountain’ (फाऊंटन ऑफ विशेस) पाहयला गेलो. हे भव्य कारंजं साधारण ४०० वर्षांपूर्वी बांधलं गेलंय. २२ कि.मी. लांब अंडरग्राऊंड कॅनॉल्स मधून याला पाणी पुरवले जातं. ४०० वर्षांपूर्वी हे बांधकाम कशाप्रकारे केलं असेल असा प्रश्न साहजिकच पडतो. रोमन आर्किटेक्चरची हि एक अतिशय सुंदर रचना आहे.
रोम ची सिटी टूर घेताना त्यांचं नॅशनल मॉन्युमेंट पाहिलं सैनिकांच्या स्मृतीसाठी बनवलेलं, रोमची अनेक वैशिष्टय़पूर्ण चर्चेस पाहिली . आणि सर्वात शेवटी आलो रोमच्या महत्त्वाच्या इमारतीकडे, जगातल्या सात आश्चर्यांपैकी एक ‘कोलोसियम (colosseum).’
४ मजली भव्य इमारतीतले काही भाग आता ढासळले आहेत. हे कोलोसियम म्हणजे त्या काळचे अॅम्फी थिएटर, ज्याची क्षमता साठ हजार लोक एकावेळी बसून कार्यक्रम पाहू शकतील इतकी प्रचंड होती. पूर्ण संगमरवरात बनवलेली ही इमारत त्या काळी मेकॅनिकल पुली, अंडरग्राउंड वॉटर टँक्स, बसण्यासाठी केलेली व्यवस्था यांनी सुसज्ज होती. येथे राजा आणि प्रजेसाठी मनोरंजनाचे कार्यक्रम व्हायचे. ग्लॅडिएटर आणि हिंस्त्र प्राण्यांच्या लढाया असे भयानक खेळ खेळले जायचे. २००० वर्षांपूर्वी कमीत कमी साधनं असताना ही इतकी मोठी इमारत कशी बरं बांधलेली असेल याचं राहून राहून आश्चर्य वाटतं.
तिथून मग वॅटिकन सिटी (Vatican city) या सर्वात छोट्या राज्याला भेट दिली. याची लोकसंख्या फक्त ९०० आणि क्षेत्रफळ ११० एकर आहे. या देशात ख्रिश्चनीटी हा एकच धर्म पाळला जातो आणि पोप या देशाचे सर्वेसर्वा आहेत. पोपच्या अधिपत्याखाली राज्याचा कारभार चालतो. ख्रिश्चन धर्माचा प्रचार आणि प्रसार हे काम प्रामुख्यानं पोप करतात. या कामांसाठी जगभरातून पैशाचा ओघ येथे कायम असतो.
‘सेंट पीटर्स बॅसिलिका’ हे इथलं चर्च, हे चर्च करारा ह्या सर्वात महागड्या मार्बलने हे बनवले गेलंय. चर्च बांधायला १२० वर्षे लागली. पूर्ण संगमरवरात पोप, सेंट यांच्या कोरलेल्या मूर्ती, छतावर केलेली अप्रतिम चित्रकला आणि या सर्वांवर कळस करणारी मायकल एंजेलोची कलाकृती..मदर मेरीने जिझस क्राइस्ट चा मृतदेह आपल्या मांडीवर घेतलाय असं दाखवणारं हे अप्रतिम भावपूर्ण शिल्प… ही कलाकृती मायकल एंजेलोने वयाच्या अवघ्या २३ व्या वर्षी साधलीयं. काही गोष्टींच वर्णन करुच शकत नाही, त्यातलंच एक हे शिल्प . हे सगळं डोळ्यात आणि कॅमेऱ्यात टिपून घेतलं कायम लक्षात राहण्यासाठी ….
रोमन साम्राज्याचं हे भव्य दिव्य रूप पाहून थक्क झालो. त्याचा इतिहास, मायकल एंजेलो ची कलाकृती, कोलोसियम, चर्चेस आणि इतरही बऱ्याच महत्त्वपूर्ण गोष्टींची माहिती मिळाली आता उद्या ‘पिसाचा झुलता मनोरा’ अजून एक रोमहर्षक ठिकाण ….

मैत्रेयी दीक्षित-समेळ.

प्रतिक्रिया व्यक्त करा