ये दिल माँगे मोअर

Written by

2019 साल माझ्यासाठी बऱ्यापैकी संस्मरणीय ठरलेले आहे.
मागे वळुन बघितले तरी ,कितीतरी गोष्टी ज्या छान-छान घडल्या त्याच आठवत आहेत.यंदा घडलेली सर्वात मोठी गोष्ट म्हणजे माझ्या लेखन कौशल्याला फेसबूक आणि विविध ब्लॉगच्या माध्यमातून मिळालेला भरघोस प्रतिसाद माझ्या लेखनाच्या क्षेत्रातील सेकंड इनिंगला झालेली दमदार सुरुवात.
अनेक लेखक मित्र-मैत्रिणींनी माझ्या लेखनाला भरघोस प्रतिसाद दिला आणि प्रोत्साहन दिले. त्याचाच परिणाम म्हणून नवनवीन विषय सुचणे आणि त्यावर लिहिणे हातून घडले.
ईरा च्या माध्यमातून दर वेळेला कोणता नवीन विषय येणार आणि आपण त्यावर काय नाविन्यपूर्ण आणि चांगले लिहू शकतो ह्याची मी वाट पाहायला लागले.
विषय पाहून आपसूकच सुचते. त्याप्रमाणे त्यावर लिहिणे सुरू व्हायचे. कधी बक्षीसपात्र लेखन ठरले ,तर कधी छानशी वाचक वर्गाची दाद मिळाली. आणि लेखनाचा उत्साह वाढला.
कधीतरी असं वाटतं ना ,की हा आलेला क्षण असाच थांबून राहावा, त्याचप्रमाणे मला यंदाचं वर्ष असंच चालू राहावं, संपूच नये असं वाटत आहे.पण प्रत्येक गोष्टीला शेवट असतोच ,त्याप्रमाणे या वर्षाला ही निरोप देण्याची वेळ आता जवळ आलेली आहे. पण या वर्षाला निरोप देता देता ,नवीन वर्षात आणखीन चांगले काहीतरी नाविन्यपूर्ण आणि वेगळे करायला मिळणार आहे, याविषयी आता अंतर्मन खात्री देत आहे.
यंदाच्या वर्षात मला प्रवासही भरपूर करायला मिळाला. कर्नाटकात फिरलो ,अगदी पार दुसऱ्या टोकाला अंदमानला जाऊन समुद्राचे भव्य रूप, सावरकरांना जिथे ठेवले होते ती सेल्युलर जेल, तिथले म्युझियम्स पाहून आलो आणि मन अभिमानाने भरून आले.
बाकी छोटे-मोठे प्रवास किती केले, याला तर गणतीच नाही. स्टॅच्यू ऑफ युनिटी पाहून आले. आपल्या देशात किती वेगाने, भव्य निर्माण कार्य चालू आहेत याविषयी अभिमान वाटायला लागला.

नाटक, चित्रपट आणि विविध कार्यक्रम प्रदर्शन यंदा भरपूर बघितले. वर्षाच्या सुरुवातीचा ,’व्यक्ती आणि वल्ली’ चित्रपट असो नाही तर अगदी शेवटी शेवटी बघितलेला ‘हिरकणी ‘असो प्रत्येकाने मनामध्ये आपला वेगळा ठसा उमटवलेला आहेच .

सरत्या वर्षाला निरोप देताना मन जडावत आहे खरे. पण त्याच वेळेला नवीन वर्षामध्ये खूप काही नवीन घडणार आहे, याविषयी खात्री वाटत आहे. असेच नवनवीन विषय लिहायला मिळणार आहेत. कार्यक्रम बघायला मिळणार आहेत, काही प्रवास पुढच्या वर्षी करण्याचे मनात आहे ,तेही संकल्प सिद्धी ला जाणार आहेत याविषयी खात्री वाटते आहे .
.
यंदाच्या वर्षी आणखी ने खूप चांगली गोष्ट मी केलेली आहे .त्याचा उल्लेख केल्याशिवाय ,या वर्षाला अखेरचा निरोप देणं योग्य ठरणार नाही .स्वतःचे आरोग्य आणि मनाचे आरोग्य या दोन्हीकडे मी यंदा खूप छान लक्ष दिलेले आहे. रोज योगासने करणे आणि चालायला जाणे यामध्ये मी 75 टक्के यंदा यशस्वी झालेली आहे .पुढच्या वर्षी शंभर टक्के यशस्वी होण्याचा माझा मानस आहे .रोज सकाळ संध्याकाळ माझ्याकडे असणाऱ्या चांगल्या गोष्टीविषयी मी निसर्गाचे, देवाचे आभार म्हणायला विसरत नाही. माझ्या आयुष्यात खूप चांगल्या सकारात्मक गोष्टी घडणार आहेत ,आणि घडत आहेत, याविषयी सातत्याने चिंतन करत राहते. या सर्वांचे फळ यंदा तर मला भरभरून मिळालेच आहे आणि या वर्षाला अखेरचा निरोप देताना पुढच्या वर्षी यापेक्षाही जास्तच मिळणार आहे, याची मला खात्री आहे.

भाग्यश्री मुधोळकर

Article Categories:
मनोरंजन

Comments are closed.