रवी बापटले:अनाथांचा नाथ

Written by

जे का रंजले गांजले

त्यासि म्हणे जो आपुलें

तो चि साधु ओळखावा

देव तेथें चि जाणावा

संत तुकारामांच्या या ओळी किती अर्थपूर्ण आहेत. जो रंजल्या,गांजल्याना, समाजातल्या सर्व स्तरातल्या लोकांना आपलंसं करतो तोच साधू आणि तोच देव. सध्याच्या जगात आपल्या माणसांना कोणी आपलं करत नाही, पैश्याच्या मागे धावणाऱ्या दुनियेत “आपलेपणाच” हरवून गेलाय अस आतापर्यंत मला वाटायचं. पण माझं हे मत साफ खोटं ठरवलंय एका “अवलिया” ने. हा अवलिया आपण कधी विचारही करू शकत नाही अशा अनाथांचा नाथ झाला. जीवनाचा लांब पल्ला पुढे दिसत असताना जगायला कोणीही शिकवतं पण समोर मरण उभं असताना खऱ्या अर्थाने जगणं म्हणजे काय ते हा अवलिया शिकवतो.

या अवलियाच नाव आहे “रवी बापटले”. रवी बापटले हे पत्रकारितेची पदवी घेऊन लातूर मध्ये एका महाविद्यालयात अध्यापनाचे काम करत होते. समाजसेवेचा त्यांचा पिंडच असल्यामुळे मित्रांना हाताशी घेऊन “आम्ही सेवक” या संस्थेमधून स्वछता मोहीम त्यांनी सुरू केली. त्यांच्याच गावात एका एचआयव्ही ग्रस्त जोडप्याच निधन झाल्यानंतर त्यांच्या एचआयव्ही ग्रस्त बालकाकडे नातेवाईकांकडून, समाजाकडून दुर्लक्ष केल जातं आणि त्या बालकाचा मृत्यू होतो. एचआयव्ही ग्रस्त म्हणून त्याला कचऱ्यात फेकून दिलं जातं. ही गोष्ट रवी सरांच्या निदर्शनास आल्यावर ते तिथे जाऊन मित्राला सोबत घेऊन त्या बालकाचा अंत्यविधी करतात. त्या एका घटनेने रवी सरांच्या मनावर खूप विपरीत परिणाम केला. त्यांना कळल की अशा एड्सग्रस्त अनाथ मुलांचं जगणं किती खडतर आहे. चूक नसताना त्यांना मृत्यूशी सामना तर करावाच लागतो पण समाजाच्या या अशा क्रूर वागणुकीमुळे जिवंतपणी रोज मरणयातना भोगाव्या लागतात. त्या क्षणी रवी सरांनी या अनाथ मुलांसाठी जगायचा,त्यांना जगवायचा निर्धार केला आणि अंगावर असलेल्या कपड्यानिशी घर सोडलं. आईवडील, नातेवाईक सगळ्या नात्यातून स्वतःला मुक्त केलं आणि तेव्हाच लग्न न करण्याचा पणही केला. त्यांना स्वतःला कोणत्याच प्रकारच्या नात्यात,मोहात अडकून ठेवायचं नव्हतं. या समाजकार्यात कोणताही अडथळा येऊ नये म्हणून एकट्याने मार्ग चालू केला आणि आज या मार्गावर बरेच सहकारी त्यांच्यासोबत काम करतायत.

रवी सरांनी एड्सग्रस्त अनाथ मुलांसाठी काम करायचं ठरवल्यावर कडाडून विरोध झाला. ग्रामस्थांनी जागा द्यायला नकार दिली, नानाप्रकारे त्रास दिला,प्रसंगी मारही खाल्ला  तरी ते मागे हटले नाहीत. ग्रामस्थांना समजावत राहिले की एड्स हा स्पर्शातून पसरत नाही. या मुलांना आपली गरज आहे, मायेची गरज आहे. त्यांच्या या प्रयत्नांना आज बऱ्यापैकी यश आलंय. विरोधात असणारेच आज मदतीचा हात पुढे करत आहेत हेच रवी सरांचं यश आहे.

सुरुवातीला दोन एड्सग्रस्त अनाथ मुलांना घेऊन एका छोट्या खोलीत सरांनी काम सुरू केले. काही दिवसांनी रवी सरांच्या मित्राने साडे सहा एकर जमीन या कामासाठी दिली. त्यातूनच लातूरमध्ये औसा,हासेगाव येथे  “सेवालय”चा जन्म झाला. सेवालयात आज ८० च्या वर मुलं, मुली आहेत. सेवालयात यायच्या आधी यापैकी बऱ्याच जणांनी स्वतःचे जीवन संपवण्याचा प्रयत्नही केलेला आहे पण सेवालय मध्ये येऊन त्यांच्यात अमूलाग्र बदल झालेत. स्वतःसाठी जगायला शिकलेत,लढायला शिकलेत. आयुष्याकडे सकारात्मकतेने बघायचा दृष्टिकोन रवी सरांनी त्यांना बहाल केलाय. ६ पासून २६ वयापर्यंतची मुले तिथे आहेत. १०वी पर्यंत मुलांना जिल्हा परिषदेच्या शाळेत  प्रवेश मिळवून दिलेला आहे. पुढील शिक्षण घ्यायला ते महाविद्यालयात जातात. मुलांचं निवास,भोजन, पुस्तके, औषधोपचार हे सगळं देणगी दारांच्या देणगीतून होत.

१८ वर्षांपर्यंतच्या मुलांना सेवालयात ठेवलं जातं. सरकारी नियमामुळे १८ वर्षावरील मुलांना तिथे ठेऊ शकत नाहीत. यातूनच “HIV- हॅपी इंडियन व्हीलेज” उदयास आले.

इथे १८ वर्षावरील मूल राहतात. त्यांना रवी सरांनी स्वावलंबी

बनवले आहे. अजून काही एकर जमीन मिळाली त्यात सरांनी मुलांना शेती करायला शिकवले. आंब्याची झाड लावली जेणेकरून आंबे विकून मुलं उदरनिर्वाह करू शकतील. राख्या बनवून त्याही विकल्या जातात. आपल्यालाही जमत नसतील अशा बऱ्याच कलागुणांचा विकास रवी सरांनी या मुलांमध्ये घडवून आणलाय. “हॅपी म्युझिक शो” या कार्यक्रमातून सेवालयाची मुलं एड्स बदल जनजागृती करतात. आज  सेवालयातील काही मुलांची, मुलींची लग्न झाली आहेत तेही एड्सग्रस्त जोडीदारासोबतच. काहींना मुलं झाली आहेत ज्यांना एड्स नाही. रवी सरांच्या औषधोपचारामुळे आणि प्रेमामुळे येथील मुलांच आयुष्य वाढतंय आणि सावरतयही. स्वतःच मूल आपल्यासारखा आजार घेऊन जन्माला आलं नाही हे बघून त्या आई वडिलांना खूप आनंद होतो. जेवढं आयुष्य मिळालंय तेवढं आनंदाने भरभरून जगायचा अधिकार प्रत्येकालाच असतो आणि तो अधिकार रवी सरांनी या एड्सग्रस्त अनाथ      मुलांचं आयुष्य बहरवणारे रवी सर कोणाला भाऊ म्हणून आवडणार नाहीत. अनोखी देशसेवा करून , रक्षा करून समाजासमोर वेगळा आदर्श ठेवतायत रवी सर.

रवी सरांचं आणि येथील मुलांचं एकच सांगणं आहे समाजाला की, एड्स हा स्पर्शातून, हवेतून पसरत नाही. आम्हाला दुर्लक्षित किंवा वाळीत टाकल्यासारखं जगवू नका.

हाडामांसाची माणसच आहोत माणूस म्हणूनच जगवा.

 

“हीच अमुची प्रार्थना अन् हेच अमुचे मागणे

माणसाने माणसाशी माणसासम वागणे”.

©सरिता सावंत

 

 

Article Categories:
सामाजिक

प्रतिक्रिया व्यक्त करा