‘राज’कारणी ती ….

Written by

मुलीला बघण्याचा कार्यक्रम सुरू होता, होणाऱ्या सासरेबुवांनी विचारले,

“ पोरी, तू केसांची जी वेणी घातली आहेस त्याला एकूण किती वेढे आहेत??”

इतर मंडळी चक्रावून गेली, असा काय प्रश्न विचारला?

पण शीला अजिबात गोंधळली नाही ….

शीलाने सडेतोड उत्तर दिले, “ तुमच्या धोतराला जेवढ्या मिऱ्या आहेत ना तेवढेच वेढे माझ्या वेणीला आहे”

बस्स… त्या एका उत्तराने मुलीला पसंत केलं दिला..

कारणही तसंच होतं.. मुलाकडचे घर म्हणजे अट्टल राजकारणी घर…त्यांना अशीच राजकारणी स्वभावाची मुलगी हवी होती. शिलाच्या उत्तराने त्याला खात्री पटली की आपल्या राजकारणी घराण्याला ही मुलगी शोभून दिसेल.

शीला ही काही कमी नव्हती. तिने शाळेपासून ते अगदी कॉलेज पर्यंत निवडणुका गाजवल्या होत्या, राजकारण तिच्या नसानसात भरलेलं होतं… आणि स्थळही तिने असच बघायला सांगितलं की जे राजकारणात सक्रिय असेल…

मग काय… तोडीस तोड भेटल्यानंतर थाटामाटात लग्न झाले…

लग्न आटोपलं…तिला अपेक्षा होती की लग्नानंतरआपल्यालाही या घरात राजकारणात सक्रिय राहता येईल…राजकारणात भाग घेता येईल. पण घरात मात्र वातावरण वेगळे होते. त्यांना जरी राजकारणी मुलगी हवी असली तरी ती फक्त स्वभावाने .. प्रत्यक्षात कृती करणारी मात्र त्यांना नको होती… त्या घरामध्ये स्त्रियांना दिवाणखान्यात येण्याची मनाई होती आणि अशा इतर अनेक गोष्टींवर घरातील महिलांना बंधनं होती… शीलाने कधीच अशी अपेक्षा केली नव्हती. तिने जी स्वप्न पाहिली होती त्याचा सर्व उलटे झाले. पण शीला ने या गोष्टीला फसवणूक न समजता त्याला एक संधी म्हणून स्वीकारायचे ठरवले.

सासरेबुवा समोर होते … त्यांच्यासमोर ती आईशी फोनवर बोलायला लागली, “ आई तू किती काटकसरीने संसार केलास गं. अगदी पै-पै जमा करून तू तुझा संसार चालवला आणि आज इतका पैसा असूनही तुझा काटकसरी स्वभाव काही गेला नाही.. आजही तू उधळपट्टी न करता पै पै जमवून ठेवतेस आणि वेळेला तेच उपयोगात येतात” सासरेबुवा ते ऐकून जरा विचारात पडले …

काही दिवसांनी सासरेबुवा आणि सासू यांच्यामध्ये वाद व्हायला लागले, सासरेबुवा आधी सासुजवळ पैसे देत होते ते आता द्यायला ते टाळाटाळ करत होते..सासूला समजत नव्हतं की हे अचानक असे का वागताय .. आणि मग सासूच्या लक्षात आले की आपण किती परावलंबी आहोत… आपल्याला कुठलंही आर्थिक स्वातंत्र्य नाही.. नवरा पैसे देतोय त्याच्यावरच आपण मजा करतोय पण आपल्याला एक रुपया कमवायची अक्कल नाही.. आणि मग अशावेळेस आपण स्वतः हातपाय हलवावे…. नवऱ्याकडे पैशांचा तगादा न लावता चार पैसे कमवून दाखवावे.. घरात कितीही पैसा असला तरी स्वतःच्या आत्मसन्मानासाठी तिच्या सासूने आता हातपाय हलवायला सुरुवात केली होती…

कशी शक्य झाली ही गोष्ट? तर शीलाने केलेल्या राजकारणाने.. मुद्दाम सासऱ्यांसमोर फोन केला , सासर्यांनी नकळत आपल्या बायकोची तुलना केली …. शीला
ने घरात राजकारण केलं …पण एक सात्विक राजकारण… की ज्याच्यामुळे सासूचा आत्मसन्मान जागा झाला होता… कसे केले हे राजकारण? सर्व प्रथम तिने निरीक्षण केले सासूच्या स्वभावाचे, सासर्‍यांच्या स्वभावाचे आणि घरातल्या एकंदर परिस्थितीचे..

तिने ठरवलं आता राजकारण करायचे ते या घरात … पण माणसं तोडण्यासाठी नाही … तर माणसं जोडण्यासाठी आणि एक सात्विक राजकारण जेणेकरून या घरांमध्ये तिला राजकारणात सक्रियतेने भाग घेता येईल आणि इतर अशा अनेक गोष्टी होत्या ज्याच्या मध्ये तिला बदल घडवून आणायचा.

घरातही तिच्या अनेक गोष्टी लक्षात आल्या. सासूबाई केवळ नवऱ्याच्या कामावर अत्यंत खुश होत्या, स्वतःची कुठलीही कर्तबगारी न गाजवता केवळ नवऱ्याच्या कमाईवर खूश राहणाऱ्या अशा त्या होत्या आणि त्यामुळे शीला ने सुद्धा तेच करावं असं त्यांना वाटलं…नवरा कर्तबगार आहे, पैसे आणून देतोय मग त्याचावरच खुश राहायचं असं सासूला वाटायचं आणि सुनेनेही तेच करावं ही त्यांची अपेक्षा.

मग अशा परिस्थितीत पहिली गोष्ट साध्य करायची होती ती म्हणजे तिच्या सासूचं मन वळवायचं… घरातल्या स्त्रियांना बाहेर पडता यावे… त्यांनाही स्वतःचं अस्तित्व दाखवण्याची एक संधी दिली जावी आणि स्त्रीच्या अस्तित्वाची जाणीव तिच्या सासूला करून द्यायची होती. आणि म्हणूनच शिलाने हे राजकारण केले आणि ते यशस्वी सुद्धा करून दाखवले… मुद्दाम आईला फोन करून सासरेबुवांच्या मनात सासू बद्दल राग निर्माण केला आणि सासूचा आत्मसन्मान जागा केला… सासूचा आत्मसन्मान आता जागा झाला होता आणि आता सासूने शीला ला सुद्धा धडे दिले… तिला सांगितले की आपण स्वतःच्या पायावर उभे राहिले… पाहिजे स्वतः काहीतरी करून दाखवलं पाहिजे…परावलंबी राहता कामा नये नये. शीला हेच हवं होतं… तिला काहीतरी कर्तृत्व दाखवण्याची संधी मिळणं गरजेचं होतं.

शीला च्या सासूला लोणची पापड अत्यंत उत्तम बनवता येत असत… असं त्यांनी ठरवलं की या त्याचा व्यवसाय चालू करायचा.. पण आता मात्र सासरेबुवांनी अडचण उभी केली.. त्यांनी सांगितले हे असले काही उद्योग आपल्या राजकारणी घराला शोभतील का?? तुला हवं तर पैसे मी देतो… मागे मी तुला पैसे देणे कमी केलं होतं पण वाटल्यास आता तुला हवे तेवढे पैसे घे पण असले उद्योग काही करू नका… पण सासूने हट्ट केला.. त्यांनी ठरवलं होतं की आता जे करायचं ते स्वतःच्या पायावर उभे राहून करायचं… मात्र सासऱ्यांच्या परवानगी शिवाय काहीही करता येणे शक्य नव्हते..

मग आता इथे सुरु झाली शीला ची खेळी.. तिने सासरेबुवांना बोलावले आणि सांगितले की सासरेबुवा आईंना हे काम करू द्या. याचा फायदा असा होईल ही लोकांना जेव्हा कळेल ही एका अट्टल राजकारण्याची बायको असूनही लोणची पापड करून चार पैसे कमावते.. त्यावेळेस लोकांच्या लक्षात येईल की यांच्या घरात आर्थिक चणचण आहे…कुठलाही भ्रष्टाचार ही लोक करत नाही आणि त्याच्या मुळे यांच्या घरात वारेमाप पैसाही नाही आणि त्यामुळे उदरनिर्वाहासाठी आई लोणची पापड याचे व्यवसाय करत आहेत…यामुळे आपलीच इमेज लोकांमध्ये चांगली होईल..आणि येत्या निवडणुकीत आपल्यालाच फायदा होईल…

आता या गोष्टीचा राजकारणात आपल्याला फायदा होत असेल तर ही गोष्ट करायला काही हरकत नाही हे सासरेबुवांना पटले… त्यांनी लगेच परवानगी दिली आणि त्याच्या मुळे घरात एक नवीन व्यवसाय सुरु झाला…सासूला सुद्धा काटकसरीची सवय लागली… त्यांच्यातला आत्मसन्मान जागृत झाला आणि सासरेबुवांना सुद्धा आपल्या बायकोच्या डोळ्यात एक नवीन चमक दिसू लागली होती आणि या गोष्टीचा आपल्याला राजकारणात कधी ना कधी फायदा होईल अशा आशेवर ते होते..

शीला ने पहिली खेळी केली होती आणि त्यात ती यशस्वी झाली…या घरातल्या महिलेला तिचा आत्मसन्मान परत मिळवून देण्याचा हेतू होता त्यामुळे घरातल्या मुख्य महिलेला म्हणजेच तिच्या सासूबाईंना तिने घरात एक वेगळा दर्जा प्राप्त करून दिला होता आणि आणि त्यांना बंधनातून मुक्त केले … आणि त्यामुळे तिच्यावरही कुठल्याही प्रकारचे बंधनं येणार नव्हती …

नंतर निवडणुकीचे वारे वाहायला लागले …

सासरेबुवा म्हणजेच अप्पासाहेबांचा राजकारणातील एक कट्टर शत्रू म्हणजे ‘प्रतापराव’… त्यांना काहीही करून या निवडणुकीत जिंकू द्यायचे नव्हते… सासरेबुवा स्वतः निवडणुकीला उभे राहणार होते पण त्यांना पक्षाचे तिकीट काही मिळाले नाही… मग शीलाने सासरेबुवांना बोलून दाखवलं की ती स्वतः अपक्ष म्हणून लढायला तयार आहे ..

ते म्हणाले “इथे मला पक्षाचे तिकीट मिळाले नाही म्हणून मला उभे उभे राहता आले नाही पण तू जर निवडणूक हरलीस तर घराण्याची इज्जत जाईल … आणि मी हि रिस्क घेऊ शकत नाही … “

“हे बघा आप्पा , प्रतापरावांचा मोठा समाज हा माझ्या वडिलांच्या बाजूने आहे … मी जर निवडणुकीला उभे राहिले तर प्रतापरावांना मिळणारी मतं फुटतील आणि त्याचा फायदा आपल्याला येणाऱ्या निवडणुकीला होईल… प्रतापराव काहीही करून निवडून येणार नाही..”

प्रतापराव जिंकणार नाहीत हे ऐकल्यानंतर सासरेबुवा मात्र एका पायावर तयार झाले….

येथे राजकारणातला दुसरा डाव शीला ने जिंकला …

अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला वेळ लागणार होता आणि मधल्या काळात शीला च्या नणंदेचे लग्न ठरते… तिलाही असाच राजकारणी सासर शोधलं होतं … त्या मुलाला सारिका म्हणजेच शीला ची नणंद खूप आवडली होती.. तसं पाहिलं तर तिच्या नणंदेला आणि तिच्या होणार्‍या नवर्‍याला राजकारणात मुळीच रस नव्हता त्या दोघांना परदेशांमध्ये नोकरी करण्याची स्वप्न होते…

लग्नाची सर्व तयारी चालू होती आणि आणि लग्नाच्या दिवशी अचानक मुलाच्या आजीच्या डोक्यात काय आले कुणास ठाऊक… त्यांनी सांगितले की हे लग्न होणार नाही कारण विचारले तर समजले की त्यांनी सारिका ची कुंडली पाहिली होती आणि त्यात त्यांना मंगळ होता…

आता अप्पासाहेबांना पत्रिकेवर विश्वास नव्हता त्यामुळे त्यांनी सारिका ची पत्रिका वगैरे काही काढली नव्हती… पण आता मात्र मोठा पेचप्रसंग उभा राहिला होता…

सारिका तर रडायलाच लागली कारण तिला मोहन आवडला होता आणि दोघांना लग्न करून आपले स्वप्न पूर्ण करायचे होते.. एका क्षुल्लक गोष्टीमुळे ऐन लग्नाच्या दिवशी हे घडत होते ..

आप्पासाहेब घामेघुम झाले …

लग्नाची सगळी तयारी झालेली असताना मोठमोठे राजकारणी पक्षातले नेते मंडळी आणि कार्यकर्ते आलेली असताना अशांमध्ये अपमान होईल या धाकाने अप्पासाहेब अक्षरश रडकुंडीला आले होते …

मग अशा वेळेस शीला पुढे आली आणि ती तडक वर पक्षाच्या खोलीत गेली…

आप्पा साहेबांना सांगितले तुम्ही बाहेर उभा राहा मी दोन मिनिटात आले…

शीला मध्ये जाऊन काहीतरी बोलली आणि बाहेर आली….

आणि बघतो तर काय मुलाकडच्यांनी माफी मागितली आणि लग्न करण्यास होकार दर्शवला… अप्पासाहेब खुश झाले त्यांनी सुटकेचा निश्वास सोडला.. शीला असं काय बोलली होती त्यांना कि त्यांनी डायरेक्ट माफी मागितली ???

लग्न वगैरे आटोपून सर्वजण आपापल्या घरी गेले आणि मग आप्पासाहेबांनी शीलाला विचारलं की तू तिथे असं काय बोलली होती?

शीला ने सांगितलं की मी त्यांना असं सांगितलं की

“तुम्ही जर हे लग्न मोडलं तर आगामी निवडणुकांमध्ये तुम्हाला यामुळे फार मोठे नुकसान होईल .. कारण तुम्ही पत्रिकेसारख्या क्षुल्लक गोष्टीमुळे लग्न मोडलंत तर तुमचाच समाजात अपमान होईल…
समाजामध्ये तुमची प्रतिमा वाईट होईल… सोशल मीडियावर तुमच्या धिक्कार केला जाईल आणि आयुष्यभर तुम्हाला याची किंमत मोजावी लागेल आणि राहिला प्रश्न मंगळाचा तर एक शांती करून ही समस्या सहज सुटेल ती काही फारशी मोठी समस्या नाही जर तुम्ही लग्न मोडलं तर लोक म्हणतील .. “बघा अंधश्रद्धांवर विश्वास ठेवणारा हा नेता… एका मुलीला लग्न मांडवात नकार देणारा हा काय जनता सांभाळणार? काय समोरच्या व्यक्तीच्या मनाचा विचार करेल? असं लोक म्हणतील आणि राजकारणात तुम्हाला फार मोठ्या अनर्थाला सामोरे जावे लागेल … “

आणि ते ऐकताच समोरच्या पक्षाने पटकन आपले शब्द मागे घेतला आणि लग्नाला होकार दर्शवला…

आप्पासाहेबांनी शीलाची पाठ थोपटली… आणि म्हणाले राजकारणी सून केल्याचा फायदा झाला म्हणायचा …

आता शीला ने निवडणुकीत अपक्ष म्हणून आपला अर्ज दिला… तिने सांगितले होते की तिला प्रतापरावांना मिळणारी मदत फोडायची होती पण तशातला काहीही भाग नव्हता….

तिला निवडणूक जिंकायची होती. आता निवडणूक म्हटली की प्रचार आला … पण तिला प्रचाराला बाहेर निघता येत नव्हतं … अप्पासाहेबांच्या मते केवळ अर्ज भरला म्हणजे काम झाले … प्रचार वगैरे काहीही गरज नाही. कारण प्रतापरावांची मतही आपसूकच तिला मिळणार होती आणि जिंकायचा वगैरे भाग नव्ह्ताच… त्याच्यामुळे प्रचाराची काही गरज नव्हती… मग प्रचाराला बाहेर पडायचं पण नाही आणि निवडणूकही जिंकायची … हे कसे शीला ला कसं शक्य होणार होतं?

एकदा अप्पासाहेब आणि सासूबाई दुपारच्या जेवणानंतर गप्पा मारत होते , त्यांनी शीला ला आवाज दिला पण तिकडून काही उत्तर आले नाही..

सासुबाई म्हणाल्या अहो शीलाला दुपारी तीन तास झोपायची सवय आहे त्यामुळे दार खोलीचं दार लावून की शांतपणे झोपत असते … तिला काही डिस्टर्ब् करू नका… आप्पासाहेब हसले आणी म्हणाले बर बर … झोपू द्या सुनबाईला … काम करून थकते ना बिचारी … असं म्हणत दोघेही हसायला लागले …

निवडणूक झाली…

निकाल लागले …

आणि बघतो तर काय शीलाचा अत्यंत बहुमताने निवडून येऊन विजय झाला… अप्पासाहेबांना चक्कर यायचेच बाकी होते… कशी काय आली होती शीला निवडून ?

निवडणूक जिंकण्याचे गूढ म्हणजे “शीलाची दुपारची झोप”…
ती रोज दुपारी तीन तास खोलीत दार लावून झोपत नसे… तर तिचा प्रचार चालू खोलीच्या चार भिंतीत… तिच्याकडे लॅपटॉप होता इंटरनेट होते… तीने सोशल मीडियावर स्वतःचा प्रचार करायला सुरुवात केली होती स्वतःचे फेसबुक पेज चालू केले व्हाट्सअप ग्रुप बनवला आणि घरातल्या महिलांना पर्यंत ती पोहोचायची … कारण दाराशी कोणी प्रचाराला आलं कि त्याला विचित्र वागणूक आजकाल लोकं देतात हे तिला माहित होतं … त्यामुळे घरबसल्या आपल्याला त्रास न देता आपल्या मोबाईलवर कोणी आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर तेही लोकांना आवडायला लागलं… शीला ने लोकांना पटवून दिलं होतं की नगराचा विकास ती कशी चांगल्या पद्धतीने करू शकते …

एखाद्या नवीन जोमाच्या तरुणीच्या हातात नगराचं भविष्य अवलंबून आहे … स्त्रियांना आणि तरुणांना तिने सोबत घेतलं …. त्यांना जे आवडतं त्याच माध्यमातून तिने स्वतःचा प्रचार केला होता… अर्थात आप्पासाहेबांना मोबाईलचं जास्त समजत नसल्याने त्यांना काही या गोष्टीचा सुगावा लागला नव्हता…

अप्पासाहेबांना कळून चुकले की आपण एक राजकारणी मुलगी घरात आणली आहे त्यामुळे प्रत्येक गोष्टीत तिचा राजकारणी स्वभाव हा डोकावणारच … तिने केलेले सर्व डाव त्यांच्या लक्षात आले पण त्यांना या गोष्टीचा राग न येता त्यांना अभिमान वाटला… ते आनंदाने म्हणाले … “पोरी … तू घरात जरी माझी सून असलीस तरी राजकारणात तू बाप आहेस … “

https://www.facebook.com/irablogs/
like this page to read similar stories
Article Categories:
मनोरंजन

Comments

प्रतिक्रिया व्यक्त करा