राजकारण

Written by

#राजकारण

चिंगी म्हणते टिंग्याला चल रे भाऊ भातुकली खेळू
टिंग्या म्हणे चिंगीला त्यापरीस ‘राजकारण’ खेळू
हा रे कसला खेळ? अगं बाई जुनाच आहे खेळ
विषाम्रुत खेळतो तसं तसंच असतं खेळायचं
बाद होतोय वाटलं की अम्रुत मागत फिरायचं
होते थोडीशी बोलाचाली पैशाची देणीघेणी
अम्रुत मग देते त्याले काडीचा आधार
बुडता मात्र आपसूक इसरुन जातो उपकार
बसून नी बसून नी बसून. ढुंगणाला येते रग
तरीबी उठायचं न्हाई नाव पैशे खाऊन खाऊन
होई पोटाचं डबोलं आक्शी ढोलकीसारखं
गाडी,बंगले नोकरचाकर ऐशोराम,आलिशान जीवन
पण पाच वर्ष सरताच मग संगीत खुर्चीचं थांबतं संगीत
खुर्चीतले उठतात खडबडून पळू लागतात खूर्चीसाठी
मागत फिरतात भीक मतांची दोनच महिन्यांसाठी मग
मतदार होतो राजा,शहेनशहा राजकारणी घालती त्याचे
पायाशी मऊ रेशमी पायघड्या हा पक्ष अन् तो पक्ष
कमळ,इंजिन,पंजा,धनुष्य निरनिराळी असती चिन्हं
रंग घेती आपसात वाटून कुणा निळा कुणा भगवा
कुणा धवल कुणा हिरवा सरकारी नोकर रात्रंदिस कामा दोन महिने अहोरात्र काम हाडाची काडं नी बोच्याचं तुणतुणं,पार उसाचं चिपाड ना सणवार ना घरदार
दीन बिचारे कार्यकर्ते पक्षासाठी झटणारे
एकमेकांची डोकी फोडत्यात गरीब बिचारे विचारवंत
घनघोर शाब्दिक चकमकींच्या झाडतात तुफानी फैरी
धरतात भयाण वैर कायमचं मैत्री जाते वैरात विरुन
अहो कुणाच्या गाईम्हशी कुणाला उठाबशी
काऊंटडाऊन होते सुरु मतमोजणीची प्रक्रिया
कुणी पुढे अन् कुणी मागे कुणाला मिळते खुर्ची
तर कुणी होतं बाद विजेत्यांच्या पक्षालयात
ढोलताशांचा आवाज फटाक्यांचा गडगडाट
कुणी होतं सत्ताधारी कुणी विरोधी..
कुणाचा होतो पत्ता कट कसला विरोधी अन्
कसला सत्ताधारी सगळेच असतात
दाखवायचे दात हळूच डोकावून पाहिलं तर..तर..तर एकमेकांच असतं गुळपीठ
मतदार राजा पुनश्च होतो दीन.. बापुडा,कर्तव्यापुरता चिंगी म्हणे टिल्ल्याला
शी बाई हा रे कसला खेळ टिंग्या म्हणे चिंगीला
लोकशाहीच्या नावाखाली खेळावाच लागतो हा खेळ
इच्छा असो वा नसो वहावचं लागतं प्रवाहात✍️
——————गीता गजानन गरुड,आंब्रड मोगरणेवाडी.

Article Categories:
कविता

प्रतिक्रिया व्यक्त करा