राजकुमारी अम्बा

Written by
  • 4 महिने ago

राजकुमारी अम्बा

सगळीकडे फुलांची तोरणं, रांगोळ्या, अनेक प्रकारच्या अत्तरांनी सुगंधी आणि धुंद वातावरण. उच्ची वस्त्र, अलंकार, सगळं कसं भरभरून…… काशी राज्यांच्या प्रचंड राजप्रासादात लगबगीचं वातावरण. कारण ही तसंच होतं ना. काशी नरेशांनी त्याच्या तिन्ही राजकन्यांचे स्वयंवर आयोजित केले होते. तिन्ही राजकुमारी त्यांच्या दालनात साजशृंगारात मग्न होत्या. त्यांच्या दास्यां ज्या त्यांच्या जिवाभावाच्या मैत्रिणीही होत्या. स्वयंवरात येणाऱ्या एका एका राजकुमारचं देखणेपण, रुबाब त्यांच्या कानात सांगून हसत होत्या. आणि राजकुमारींच्या गालावर गुलाबी लाली चढत होती. सुवर्ण आणि माणकांनी जडलेल्या आरश्यासमोर बसलेल्या अम्बाने आपल्या प्रिय दासी/ सखीस कर्णफुले चढवत असताना मदतीला आवाज दिला.

अम्बा : गात्री , अगं एवढी कर्णफुले चढवायला मदत कर.

गात्री लगबगीने पुढे आली आणि मदत करू लागली. तेवढ्यात अम्बाने हळू आवाजात तिला विचारलं, ” राजकुमार शाल्व आले का ? ” यावर मंद स्मित देत गात्री उद्गारली , ” नाही राजकुमारी अजून नाही आले, पण येतील इतक्यात .”

अम्बा : ते आले की लगेच मला कळव .

गात्री : जी राजकुमारी . पण किती ही अधीरता ? अहो आज तुमच्या प्रेमाला विवाहाची मोहर लागणारच आहे .

अम्बा : हो गं. पण माहित नाही का आज स्वयंवर असूनही मन फार बेचैन आहे. मी त्यांच्या गळ्यात हार घालणार आणि ते माझे होणार कायमचे. पण मिलन जवळ असतानाही विरहाची भीती घर करून आहे मनात.

गात्री : राजकुमारी , काही क्षणांनी तुम्ही त्यांच्या पत्नी असणार आहात. तेव्हा हे विचार सोडा आणि तयार व्हा लवकर राजकुमार शाल्व यांच्या येण्याची घोषणा झालीये.

हे ऐकून अम्बा अधीरतेने तयारीला लागते.

स्वयंवराचा दरबार भरलेला होता. आमंत्रित सर्व राजे, महाराजे आणि राजकुमार दरबारात उपस्थित होते. काशी नरेशांनी सर्वांचे यथायोग्य स्वागत केलं होतं. तिन्ही राजकुमारींना स्वयंवराच्या विधीसाठी बोलावण्यात आलं. दरबारात पाय ठेवताच अम्बाची नजर राजकुमार शाल्व ला शोधू लागते. आणि त्यांच्यावर नजर पडताच लाजून मान खाली घातली. स्वयंवर विधीला सुरुवात झाली. अम्बा सर्वात थोरली म्हणून ती वरमाला घेऊन पुढे झाली. एक एक राजकुमार, राजे यांना पाहून ती पुढे जाते. राजकुमार शाल्व यांच्याजवळ येऊन थांबते. राजकुमारी अम्बा वरमाला राजकुमार शाल्व ला घालणार तोच दरबारात गगनभेदी आवाज घोमला. हस्तिनापूरचे भीष्म स्वयंवरात आले आणि काशी नरेश यांच्यावर गर्जले. , ” संपूर्ण आर्यवत मध्ये हस्तिनापूरचं काय स्थान आहे हे तुम्हाला माहित नाही का काशी नरेश ? ” ( रागात )

काशी नरेश : क्षमा करा मान्यवर. पण काय झालं / तूम्ही असं का बोलत आहात ?

भीष्म : आर्यवत मध्ये सर्व राज्यांमध्ये विवाहासाठी आमंत्रणे पाठवली तूम्ही पण हस्तिनापूरला नाही असं का ?

काशी नरेश : तूम्ही आजीवन ब्रह्मचर्याचं व्रत घेतलं आहे माहित आहे आम्हाला म्हणून आम्ही आमंत्रण नाही पाठवलं.

भीष्म : ब्रह्मचर्याचं व्रत आम्ही घेतलं आणि माझ्या धाकट्या भावाने विचित्रवर्यने नाही.

हे ऐकून काशी नरेश रागाने लाल होतात. आणि म्हणतात, ” भीष्म काय बोलत आहात तूम्ही ? विचित्रवीर्य मद्यपि आहेत. त्यांचा पराक्रम नावालाही नाही.आणि अहंकार पुरेपूर आहे. ते ही तुमच्या सामर्थ्यामुळे. अश्या अहंकारी, मद्यपि ला आम्ही स्वयंवराचे आमंत्रण पाठवायचे होते ? शक्यच नाही.

काशी नरेशचे ते बोल ऐकून भीष्म क्रोधाची परिसीमा गाठतात. आणि गर्जून म्हणतात, ” मी या स्वयंवरातून तिन्ही राजकुमारींना घेऊन जात आहे ते ही विचित्रवीर्यसाठीच हिंमत असेल त्याने अडवून दाखवावं. ” भीष्म तिन्ही राजकुमारींना घेऊन जाऊ लागतात तोच राजकुमार शाल्व मध्ये पडतात, परंतू त्यांना हरवू भीष्म तिघींना घेऊन निघतात.अम्बा तिच्या परिने हे सर्व थांबण्याचा प्रयन्त करते परंतू कोपलेल्या भीष्माच्या कानांवर रागाचे पटल चढले होते. तिन्ही राजकुमारींना घेऊन हस्तिनापूर मध्ये दाखल झाल्यावर विचित्रवीर्य आणि राजकुमारींच्या विवाहाची तयारी सुरु होते. काही काळाने राग उतरल्यावर अम्बा येऊन भीष्मांना सर्वकाही सांगते आणि राजकुमार शाल्व वर प्रेम असल्यामुळे हा विवाह त्या नाही करू शकत असं स्पष्ट करते. हे सर्व ऐकल्यावर भीष्म अम्बाला “तूम्ही परत जाऊ शकता .” असं सांगतात.

अम्बा हे ऐकून उत्साहाने परत राजकुमार शाल्वकडे येते. परंतू , ” भीष्मांनी भर सभेत मला हरवून तुला नेलं आहे. आता तूझा स्वीकार मी करू शकत नाही. मी तसं केलं तर ते मी भीष्मकडून दान घेतल्यासारखे होईल. ” असं म्हणून अम्बाला परत जाण्यास सांगतात. मनाविरुद्ध घडणाऱ्या या खेळामुळे अम्बा पुरती संतापली होती. भीष्मांना केलेल्या कर्माची कडू फळे अम्बाला चाखावी लागत होती. आपल्या आयुष्यात आता काहीच उरलं नाही. मला भर दरबारातून उचलून नेल्यामुळे मी घरी परत जाऊ शकत नाही. ज्याच्यावर प्रेम केलं त्याने स्वीकारण्यास नकार दिला. काही काळापूर्वी सुखाच्या पखाली वाहणारे नयन आता अश्रू ढाळत होते. आणि या सर्वाना एकमात्र कारण म्हणजे भीष्म.

भीष्मला उध्वस्त करणं, आता हे एकच लक्ष अम्बासमोर होतं. अम्बा हस्तिनापूरला परत येते आणि भीष्मांना ” तूम्ही मला जिंकून आणि उचलून आणलत. त्यामुळे आता तुम्हांलाच माझ्याशी विवाह करावा लागेल.” असे सांगते. भीष्म आपल्या प्रतिज्ञेवर ठाम असल्यामुळे नकार देतात. या सुडाने पेटलेल्या अम्बाला काहीही करून भीष्मांना वाकवायचं होतं, त्यामुळे भीष्मांचे गुरु परशुरामांकडे अम्बा न्याय मागायला जाते. आपल्या शिष्याने केलेल्या कृतीवर संतापलेल्या परशुरामांनी भीष्मांना युद्धसाठी आव्हान दिलं. यानंतर सुरू झालं तुंबळ युद्ध दोन पराक्रमी योद्धे एकमेकांना भिडले होते. या युद्धात एक क्षण असाही आला जेव्हा आता हे थांबलं नाही तर संपूर्ण सृष्टीचा सर्वनाश होईल असं झालं. तेव्हा स्वतः भगवान महादेवांना मध्ये पडून हे युद्ध थांबवावं लागलं. या कृतीनंतर अम्बाने महादेवांना प्रश्न केला, ” मग माझं काय? माझ्यावर झालेल्या अन्यायच काय? मला न्याय मिळणारच नाही का ? ” यावर महादेव म्हणाले , ” तूला न्याय नक्कीच मिळेल, पण अश्या सूडभावनेने नाही. आणि या जन्मीही नाही. मी तूला वरदान देतो. पुढील जन्मात जेव्हा तू एका चांगल्या कामात अशील तेव्हा तुझ्याच हाताने भीष्मचा अंत होईल. ” एवढं बोलून महादेव अंतर्धान पावतात. या घटनेनंतर हळूहळू सर्व पूर्ववत होऊ लागत. अंबिका आणि अंबालिकाचा विचित्रवीर्यशी विवाह होतो.

इकडे पर्वताच्या माथ्यावर गर्द झाडांमध्ये मोठी चिता पेटवून अम्बा त्या चितेसमोर उभी होती. ” या सर्वात माझी चूक काय ? स्वयंवर म्हणजे स्वतःच्या इच्छेने वर निवडणं. भीष्म एवढे विद्वान असून त्यांनी असं करावं ? आर्यवत मध्ये कोणावर अन्याय होऊ न देणारे माझ्यावर अन्याय करतात.? माझं काय? स्त्री म्हणून किती मोठी शिक्षा मिळाली मला. ज्यावर मी जीवापाड प्रेम केलं, त्याला माझ्या आणि एखाद्या वस्तू मध्ये फरक नाही वाटला. भीष्माने केलंलं दान वाटलं. मी वस्तू नाही हे कोणाच्याच कसं लक्षात आलं नाही ? या सर्वांची किंमत भीष्म तुम्हाला फार मोठी चुकवावी लागणार. माझा तळतळाट आणि श्राप आहे. माझी एका स्त्रीची विटंबना केलीत तसंच या कुरुवंशात कुरुस्त्रियांची विटंबना होईल. आणि बलशाली भीष्म काहीही करू शकणार नाहीत. या विटंबनेमुळेच कुरुवंशाचा सर्वनाश होईल आणि हे सर्व घडत असताना मी असेन समोर भीष्माची अवस्था पाहायला, भीष्माचा अंत करायला ………….

असे म्हणून अम्बाने एका दृढनिश्च्याने जिवंत चिता प्रवेश केला ………………………………..

समाप्त …………

Article Categories:
इतिहास

प्रतिक्रिया व्यक्त करा