…रावसाहेब (भाग 2 )

Written by

भाग २

पूजाचे ते रूप बघून साऱ्यांना  धास्ती भरली गेली .  रावसाहेब , रमण काका , आशा आत्या एकमेकांकडे पाहू लागले . करणी झाली होती .  नथू त्वरित त्या झोपडीच्या दिशेने पळाला आणि झोपडीतील साधुमहाराजला   घेऊन आला . महाराजांनी  कसलीतरी राख आणि मोराची पिसे तिच्या डोक्यावरती फिरवली ! ” दूर हो , हिला  मुक्त  कर .ही  निष्पाप आहे ” असं मोठमोठ्याने म्हणू लागला . काही वेळानी पूजा शांत झाली आणि झोपी गेली . सारा वाडा जागाच होता . शीतलची  हौस  भागली होती . तिला  हा प्रकार नवीनच होता . पूजाला या घटनेबद्दल काहीही सांगू नका असा महाराजाने  सल्ला दिला. ”  करणी पुन्हा सुरु झाली आहे रावसाहेब , सावध राहा ” असं सांगून तेथून तो निघून गेला . महाराजांचं  विचित्र हास्य रमणकाकानी हेरलं . त्यांना महाराजांवर  आधीपासून संशय होता. परंतु रावसाहेबांचा त्यांच्यावर  असलेला विश्वास त्यांना काहीच करू देत नव्हता . याला कारणही तसेच होते . १० वर्षांपूर्वी गावामध्ये एक विचित्र वातावरण निर्माण झाले होते . भीतीचे ! ज्या घरात १५ ते २० वयोगटातील मुलं होती त्या घरावर संकटे येणे सुरु झाले होते . विचित्र आजाराने ते आजारी पडू लागली . त्यांच्याकडे असलेली गायी , म्हशी , कोंबड्या मृत पावल्या . गिधाड आकाशात  घिरट्या मारत होते . हि महामारी नव्हती तर कुणाची तरी करणी झाली होती . अशाचवेळी त्या महाराजांचा   गावात प्रवेश झाला . गावासाठी साक्षात देव अवतरला होता . महाराजांना  झालेली घटना समजली त्याने दुसऱ्याच दिवशी मोठा हवन आयोजित केला . आणि गावातले अरिष्ट दूर झाले . असे असले तरीही रावसाहेबांचा पोरगा मात्र या मरण्याच्या दाढेतून वाचू शकला नाही .

हे संकट पुन्हा येईल असा महाराजांनी  सांगितले . गावाची हि दशा बघून रावसाहेब दुखावले गेले होते . त्यांनी महाराजांना  गावातच थांबण्याची विनवणी केली . एकूणच गावातील मंडळी आणि रावसाहेबांचा आग्रह याला महाराज  नाही म्हणून शकले नाही . परंतु त्यांच्या काही अटी होत्या . रावसाहेबांच्या शेतातल्या मध्यवर्ती भागात असलेल्या मोठ्या झाडाखाली त्यांना  एक झोपडी बांधून द्यायची आणि  रात्री ९ नन्तर कुणीही त्या झोपडीच्या आवारात फिरकायचे नाही . काही संकट आले तरच प्रवेशाला परवानगी होती . महाराज  स्थायिक झाल्यांनतर मात्र गावात पुन्हा असा प्रकार झाला नाही . त्यामुळे रावसाहेबांचा महाराजवर  खूप विश्वास होता . त्यांना  ते देवाचा अवतार मानू लागले होते .

सकाळ झाली . डोकं खूप जड झाल्यासारखं वाटतंय अशी पूजाने तक्रार केली . शीतलला यांचं   कारण माहिती होतं परंतु महाराजांच्या  सल्ल्यामुळे ती हे सांगू शकली नाही . दोघीही गावात  फेरफटका मारू लागल्या . गावातील प्राचीन मंदिरे , ग्रामपंचायत , बाजारपेठ सगळं सगळं यांनी बघून काढलं . आज ग्राम सभा होती . रावसाहेब आवर्जून उपस्थित होते . पूजा आणि शीतल यांच्यासाठी खुर्च्या ठेवलेल्या होत्या पण त्यांनी गावकऱ्यांबरोबर खाली बसणे पसंद केले . चर्चा चालू असताना एक तरुण भरसभेत उठून रावसाहेबांना रस्त्याच्या बांधकामासाठी आलेला पैसे कुठे गेला म्हणून जाब विचारू लागला . सारं गाव त्याच्याकडं बघू लागला  . रावसाहेबांना जाब विचारणं म्हणजे खूप मोठा गुन्हा. २५-३० मधला तरुण , संतोष !! राजकारणाची प्रचंड आवड असलेला तरुण गडी . रावसाहेबांची एकाधिकारशाही मोडली गेली पाहिजे असं त्याच ठाम मत परंतु सोबतचे काही पोरं सोडले  तर कुणीही त्याच्या मागे खंबीरपणे उभे राहीना .  असं असलं तरीही रावसाहेबांना विरोध संतोषच्या माध्यमातून सुरु झाला होता.  रावसाहेबांनी उत्तर न देता सभा स्थगित केली . पोरीच्या काळजीचे त्यांच्या मनात विचार चालू असल्याने संतोषकडे त्यांनी लक्ष दिले नाही . ” तुमची खुर्ची खाली केल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही ” संतोषने सज्जड दम दिला होता . रावसाहेबांच   लक्ष नव्हतं . त्याच्या डोळ्यातील तो राग शीतलने हेरला .

क्रमश ….

Article Tags:
·
Article Categories:
भयपट

Comments

  • carry on!!मस्त!!

    Pratap rajnor 13th सप्टेंबर 2019 11:24 am उत्तर

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत