रिटायरमेंट फक्त पुरुषांच होतं , स्त्रियांचं नाही !!

Written by

©️सौ.योगिता विजय टवलारे ✍️

त्याला ती नटलेली फार आवडते.. नखांना लावलेला नेलपॉलिशचा रंग , ओठांवर लावलेलं लिपस्टिक , कपाळावर लावलेली रंगीत टिकली ,कानातले डुल आणि हलकासा मेकअप त्याला पार वेडावून सोडतो..

साडीच्या पदराचा टोक कंबरेवर खोचून ती कामाला लागली की तो तिच्याकडे एकटक बघत राहतो..कणीक मळवतांना कणकेच्या हाताने जेव्हा समोर आलेली बट कानामागे सारते तेव्हा ती त्याला जगातली सर्वांत सुंदर स्त्री वाटते..

पावसाची चाहूल लागताच ती जेव्हा अंगणात वाळत घातलेले कपडे काढून आणायला धावते आणि अचानक पावसाच्या सरी येऊन तीला चिंब भिजवून जातात तेव्हा तो खट्याळ हसून नजरेनेच तिला घायाळ करतो..

त्याला तिच्या लटक्या रागाचेही फार कौतुक !! तो कायम तिच्यात हरवलेला असतो… तो ऑफिस मधून आला की घर टाप टीप तर हवंच पण ती ही त्याला अगदी फ्रेश हवी असते कारण तो दमून आला की त्याचं मन प्रसन्न व्हायला हवं , एवढीच त्यांची माफक अपेक्षा असते..

मग तिला बरं असेल , नसेल..काम करून दमलेली जरी असेल तरीही त्याला हवी तशीच ती त्याच्या समोर जाते..कारण त्याला आनंदी ठेवणे हे तिचे कर्तव्य नाही का ??

जस जसं तिचं वय वाढतय तस तसं तो तिच्यात आणखी गुंतत जातोय .. मुले झाली नाहीत..ते दोघेच एकमेकांसाठी पण त्याचे प्रेम कणभरही कमी झालेले नाही..

आज १० वर्ष झालीत त्याचं रिटायरमेंट होऊन.. हल्ली तब्बेतीच्या कुरबुरी सुरू झाल्याय ..सुरकुत्यांच जाळं हल्ली त्याच्या चेहऱ्यावर पसरतय ..शुगर , बीपी सुद्धा आहे..त्याची हवी तशी काळजी घेतेय..

आधीपासूनच सवय असल्याकारणाने आताही त्याला पाण्याच्या ग्लासासहित हातात लागतं..तेव्हा  नाही पण मग आत्ता तर त्याचं वय झालंय , का म्हणून त्याला दुखवायचे ??

का म्हणून त्याच्या सवई मोडायच्या ??? कारण त्याचं वय झालंय..रिटायरमेंट झालंय..वयाने आणि आजारानं पार दमवून सोडलाय त्याला..

पण ती मात्र त्याला  घरात लग्न करून पहिले पाऊल टाकले तेव्हा जशी होती तशीच आताही हवीय..म्हणजे तरुण नाही तर घर टाप टीप ,जिथल्या वस्तू तिथे ,कायम त्याच्या दिमतीला तयार !

चेहऱ्यावर आलेल्या सुरुकुत्यासहित … कारण त्याचं वय नी रिटायरमेंट झालंय , तिचे नाही  !!

#रिटायरमेंट_फक्त_पुरुषांच_होतं_स्त्रियांचं_नाही

हा ब्लॉग म्हणजे माझे वैयक्तीत मत , वाचक माझ्या मताशी सहमत असायलाच हवेत , अशी माझी मुळीच अपेक्षा नाही..

आवडल्यास माझ्या नावासकट शेअर करा , तसे न आढळल्यास योग्य ती कार्यवाही करण्यात येईल..

? योगिता विजय ?
७/८/१९

Article Categories:
मनोरंजन

प्रतिक्रिया व्यक्त करा