लंगडा संसार #कथालेखन(एका चाकावर चालणारा संसार)

Written by

© सुनीता मधुकर पाटील.

लंगडा संसार.

श्रीपती आणि रखमा आयुष्यभर काबाडकष्ट करून नेटानं संसाराचा गाडा रेटत होते. अजय आणि संजय त्यांच्या संसाराच्या वेलीवर उमललेली दोन फुलं. पोटाला चिमटे काढुन, एकाच्या जागी अर्धी भाकरी खाऊन त्या दोघांनी दिवस काढले पण दोन्ही मुलांना काही कमी पडू दिले नाही. घरात अठरा विश्व दारिद्र्य असताना देखील मुलांना योग्य शिक्षण मिळावं या साठी ते दोघे धडपडायचे. संपुर्ण आयुष्य जरी उन्हाळा अनुभवला असला तरी आयुष्याची संध्याकाळ तरी सुखात जाईल ही भाबडी आस होती. आभ्यासात दोन्ही मुलं हुशार. हळूहळू त्यांची शिक्षण पूर्ण झाली आणि धाकटा मुलगा संजय पुण्यातील एका चांगल्या कंपनीत नोकरीला लागला. अजय ही नोकरीच्या शोधत होताच. अजयला ही नोकरी लागली की आपल्या गरीबीच्या फाटक्या संसाराला ठिगळ लागेल ही आशा होती श्रीपतीला. पण दैवाने त्याच्या ताटात काहीतरी वेगळंच वाढुन ठेवलं होतं.
अजय नोकरी मिळत नाही म्हणुन तणावात राहू लागला. आणि वाईट संगतीला लागला. त्याला दारूचं व्यसन जडलं. ऐन बहराच्या वेळी दारूच्या व्यसनाची कीड श्रीपतीच्या संसाराला लागली. अजय दिवस रात्र दारूच्या नशेत राहू लागला. श्रीपतीने त्याला या व्यसनाच्या विळख्यातून बाहेर काढण्याचा खुप प्रयत्न केला, पण व्यर्थ!!!
कोणीतरी श्रीपतीला सल्ला दिला. त्याच लग्न करून दे म्हणजे तो सुधारेल. जवाबदारीच ओझं खांद्यावर पडलं की तो आपोआप वठणीवर येईल.
श्रीपतीने लगेच लग्नासाठी स्थळं पहायला सुरवात केली. दोन चार स्थळ धुंडाळता त्यांना शांत, सोज्वळ, सुंदर मंगल पसंद पाडली. मंगलच दहावी पर्यंत शिक्षण झालं होतं. श्रीपतीने आमचा अजय पुण्यात एका चांगल्या कंपनीत नोकरीला असुन त्याला चांगला पगार देखील आहे अस खोटंच पाहुण्यांना सांगितलं. मंगलच्या ही घरची परिस्थिती बेताचीच असल्यामुळे तिच्या घरच्यांनी देखील अधिक चौकशी न करता होकार देऊन टाकला.
चांगल्या शुभ मुहूर्तावर मंगल सुखी संसाराची स्वप्ने रंगवत माप ओलांडुन अजयच्या आयुष्यात आली. श्रीपती आणि राखमाला आशा होती की मंगलच्या येण्याने अजय नक्कीच सुधारेल आणि सारं मंगल होईल.
काही दिवसांतच मंगलच्या सगळं लक्षात आलं की आपला नवरा हा कुठे ही नोकरीला नसुन दिवसभर दारूच्या नशेत पडलेला असतो. तिला हे सगळं आपल्या आईबाबांना सांगावं अस वाटलं पण माहेरची परिस्थितीही तिला ठाऊक होती. तरीही एकदा आईबाबांच्या कानावर ही गोष्ट घालावी म्हणुन ती माहेरी आली. तिने सगळा प्रकार आईवडिलांना सांगितला, आपल्याला फसवलं गेलं असुन मी सासरी जाणार नाही असं तिने त्यांना निक्षुन सांगितलं.
” अगं !!! ठीक आहे, आज नोकरी नसली तर काय झालं, उद्या लागेलंच कि आणि दारुचं काय तु त्याला सोडायला भाग पाड, आता लग्न झालंय ना, एखादं लेकरू झालं की सुधारेल तो.” असं बोलुन तिची समजुत काढुन तिला आल्या पावली परत पाठवण्यात आलं आणि तिची उरलीसुरली आशा ही मावळली. आईवडिलांनी तरी आपल्याला समजुन घ्यायला हवं होतं अस तिला राहुन राहुन वाटतं होतं. तिने त्यांना समजावण्याचा खुप प्रयत्न केला होता. पण तुझ्या माहेरी येण्याने घरादाराची इज्जत मातीत मिसळले, बाकीच्या भावंडांच्या लग्नात अडथळा निर्माण होईल. अशा सबबी तिला सांगितल्या गेल्या आणि तिला परत अजयकडे पाठवलं गेलं. आपलं नशीब समजून तिने सुद्धा आहे ती परिस्थिती स्वीकारली.
काही दिवस उलटले, ती अजयला समजावण्याचा खुप प्रयत्न करीत होती पण पालथ्या घड्यावर पाणी!!! अजय मध्ये काहीच फरक पडत नव्हता. उलट दिवसेंदिवस त्याच दारूचं प्रमाण वाढतच होतं. नवरा काही कामधंदा करत नाही म्हणुन मंगलने शेजापाजाऱ्यांच्या शेतात रोजगाराने रोजंदारीवर कामाला जायला सुरवात केली. चार पैसे मिळु लागले, पण अजय मध्ये काही सुधारणा होत नव्हती. तो रोज मंगलकडे दारुसाठी पैशाची मागणी करू लागला. नाही दिले तर तिच्यावर हात उगारायचा. तिला मारहाण करायचा. ती सगळं सहन करत होती. एक चाक निखळलेल्या लंगड्या संसाराचा गाडा ती एकटी ओढण्याचा प्रयत्न करत होती.
दिवसांमागून दिवस जात होते आणि दरम्यान मंगलच्या आयुष्यात नवे अंकुर फुटले. ती एका छान गोंडस मुलाची आई बनली. बाळाकडे बघुन ती एक एक दिवस ढकलत होती. आता बाळासाठी तरी अजय नक्कीच बदलेल याची तिला वेडी आशा वाटू लागली. पण अजय मध्ये काहीच फरक पडत नव्हता. त्याचे रोजचे रहाटगाडगे चालूच होते.
आई बापाला, बायकोला शिव्या देणे, मंगलला मारणे, शेजाऱ्या पाजाऱ्याकडे दारूसाठी पैशाची मागणी करणे हे सगळं कमी होत की काय म्हणून तो आता मंगलच्या चारित्र्यावर संशय घेऊ लागला होता.
ती बिचारी बाळाकडे बघत नशिबाला दोष देत एक एक दिवस काढत होती. एक दिवस ती बाळाला भरवत बसली होती इतक्यात अजय आला आणि तिच्याकडे दारुसाठी पैसे मागू लागला. तिने पैसे द्यायचं नाकारताच त्याने तिला मारहाण करायला सुरवात केली, श्रीपती मंगलचा सासरा मध्ये पडला असता त्याला अजयने ढकलून दिले आणि मंगलचे केस पकडुन तिला मारू लागला.
” तुझ्याकडे बाळाच्या खाऊसाठी पैसे आहे, घरखर्चासाठी पैसे आहेत. सगळ्या गोष्टी साठी पैसे आहेत आणि मला देण्यासाठीच पैसे नाहीत का ?” असे म्हणत त्याने तिला जोरात ढकलुन दिले.
तिचे केस पकडुन तिला जोरात भिंतीवर आपटलं. तिचं बाळ घाबरलं ते रडू लागलं, ती बाळाला घेण्यासाठी धडपडत उठताच त्याने बाजूलाच असलेला वरवंटा उचलुन तिच्या डोक्यात घातला. घाव वर्मी बसला होता. तिच्या डोक्यातुन रक्त वाहू लागलं आणि ती रक्ताच्या थारोळ्यात खाली कोसळली. रक्त पाहताच तो चांगलाच शुद्धीवर आला पण आता काहीही उपयोग नव्हता. मंगल हे जग कायमचं सोडून गेली होती.
अजयच्या दारूला वैतागलेल्या श्रीपतीने पोलिसात जाऊन स्वतःच मुलाविरोधात तक्रार नोंदवली. अजय विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. श्रीपती आणि रखमाने मुलाविरोधात कोर्टात साक्ष दिली. संजयने ही या सगळ्याला दुजोरा दिला आणि अजयला जन्मठेपेची शिक्षा झाली.
श्रीपतीने लग्‍न केल्यावर जवाबदरीच ओझं खांद्यावर आलं की आपला मुलगा सुधारेल म्हणुन एका निष्पाप आणि निरागस पोरीचा हात आपल्या दारूड्या पोराच्या हातात दिला. अजय सुधारला तर नाही; पण बिचार्‍या मंगलच्या आयुष्याची त्यानं सगळी राखरांगोळी करून टाकली, तिच्या पोटच्या गोळ्यालाही अनाथ करून टाकले. जबरदस्तीच्या मारून मुटकून केलेल्या संसाराचा शेवट हा असा भयानक झाला. त्यामुळे लग्नासारख्या पवित्र नात्यांच्या गाठी बांधताना संसाररूपी रथाची दोन्ही चाके एक मेकांना अनुरूप आहेत की नाही हे पाहणे खुप गरजेचं आहे, नाहीतर अजय आणि मंगलच्या एक चाक निखळलेल्या लंगड्या संसाराची दशा काय होते हे आपण बघतच आहात.
संसाराचा रथ दोन चकांवर चालतो, त्यासाठी दोघांनाही समतोल सांभाळावा लागतो…!
एक चाक जरी डगमगल तर एका चाकावर सारा भार पेलणं खुप अवघड होतं.

© सुनीता मधुकर पाटील.

Copy right

All right reserved.

( कथा पूर्णपणे काल्पनिक आहे, आवडल्यास नक्की लाइक, शेअर आणि कमेंट करा. )

Article Categories:
इतर

Comments are closed.