लग्न,प्रेम.. धोका ( अंतिम भाग)

Written by

आता अमृताने लग्न मोडायचा निर्णय घेतलेला तसं तिने आरवला कळवलं. आरवसाठी हा मोठा धक्का होता..काहीही झालं तरी हे प्रकरण निवळेल आणि अमृताशीच लग्न होईल याच गोड गैरमजुतीत तो होता. मुलगी आणि मुलीच्या घरचे समाजात स्वतःची प्रतिष्ठा जपण्यासाठी, मुलीची इज्जत जपण्यासाठी असा काही निर्णय घेतील याचा विचार आरव आणि त्याच्या कुटुंबानेही स्वप्नात सुद्धा केला नव्हता. पण स्वतःच्या मुलीच भवितव्य अंधारात ढकलून इज्जत,प्रतिष्ठा जपावी इतक्या कोत्या विचारांचं अमृताचं कुटुंब नव्हतं. पूर्ण कुटुंब अमृतासोबत या निर्णयात पाठीशी राहिलं.. तिला मानसिक आधार दिला. तिनेही बऱ्यापैकी स्वतःला सावरलेलं..ज्याच्यासोबत भविष्याची स्वप्नं रंगवली त्यानेच मोठा धोका तिला होता. तरीही ती रडत,कुढत,नशिबाला दोष देत नाही बसली..अशा मुलांना धडा तर शिकवायचाच हे तिने ठरवलं होतं.

 

अमृता आणि आरवच कोर्ट मॅरेज झाल्यामुळे लगन मोडलं अस बोलून फक्त ते मोडणार नव्हतं. नावाला का होईना पण अमृता विवाहीत झाली होती..भविष्यात दुसऱ्या कोणत्याही मुलाशी लग्न जे तिला करायचं असेल तर तिला रीतसर आरवकडून घटस्फोट घेणे भाग होत. मनाने तर सगळी नाती तुटलेली…आता कागदोपत्री हे नातं तुटायचं बाकी होत आणि हीच मोठी लढाई अमृताला जिंकायची होती. अशा पद्धतीने मुलींकडून नकार मिळाल्यावर आरवच्या कुटुंबियांचा अहंकार दुखावला गेला होता.

 

अमृताने घटस्फोट घ्यायचा निर्णय घेतला. यावर आरवशी कोणतीही चर्चा न करता तिने डायरेक्ट घटस्फोटाची नोटीस पाठवली. आता आरवच कुटुंब अजूनच चवताळलं. आरवलाही हे अनपेक्षित होतं..त्याने आणि त्याच्या कुटुंबाने कधी गोड बोलून,कधी समजावून तर कधी धमकीची भाषा करून घटस्फोट मागे घेण्यासाठी अमृताला प्रवृत्त केले पण अमृता यात फसणारच नव्हती. तिच्या योग्यतेचा तो मुलगा आणि कुटंबही नव्हतं… ती तिच्या निर्णयावर ठाम होती. घटस्फोट देण्यासाठी आधी तर आरव तयार नव्हता. कोणत्या ना कोणत्या नातेवाईकाला गाठून हे लग्न होण्यातच कस सगळ्यांच भलं आहे हे अमृताच्या घरी सांगण्याचे प्रयत्न आरवकडून चालू झाले. अमृता कोणत्याच बोलण्याला फसत नव्हती…हे लक्षात आल्यावर तो घटस्फोट द्यायला तयार झाला.

 

 

 

 

Nestle` Ceregrow Organics

 

 

पण तिच्यासाठी हे काही खूप सहज घडत नव्हतं. कधी कोर्टात न येणे, कधी वकिलच गैरहजर,कधी चुकीची माहिती देणे….असे प्रकार करून मानसिक त्रास कसा देता येईल हेच प्रयत्न आरवच्या कुटुंबाकडून चालू होते. एक वर्ष झालं अमृता ही घटस्फोटाची लढाई लढते…आता अंतिम टप्प्यात सगळं येऊन पोहचललंय.

 

अमृताला या प्रकरणात त्रास खूप झाला पण तिने हार मानली नाही. तिच्या कुटुंबानेही तिला वेळोवेळी सावरलं.. भविष्यात कोण लग्न करेल या प्रश्नापेक्षा पुढे सगळं चांगलंच होईल म्हणत पाठिंबा दिला. त्यामुळे अमृताने अर्धी लढाई तिथेच जिंकली होती.अमृताजागी कदाचित दुसरी मुलगी असती तर हताश,उदास होऊन बसली असती..समाजाने मांडून ठेवलेल्या या बुरसटलेल्या विचारांत अडकली असती पण अमृता धीराने या परिस्थितीला सामोरी गेली.

 

अमृताच्या व्यक्तिगत आयुष्यात गेल्या दोन वर्षात खूप उलथापालथ झाली पण त्याचा परिणाम तिने करिअरवर,तिच्या स्वप्नांवर होऊन दिला नाही. एकीकडे लग्न ठरण, प्रेमाचे रंग आयुष्यात रंगत असतानाच झालेली मोठी फसवणूक,धोका तर दुसरीकडे स्वतःच्या स्वप्नांची पूर्ती या दोन लढाया ती यशस्वीपणे लढत होती.

 

अमृताचं स्वप्न होत स्वतःचा बिझनेस असावा. स्वतःची कंपनी काढावी त्यादिशेने तिने वाटचाल याच काळात चालू ठेवली. आता अमृताने स्वतःची आयटी फर्म सुरू केले…त्याची घौडदौड चालू आहे…लवकरच तिला घटस्फोट मिळेल आणि तिच्या मागचं ग्रहण सुटेल.

कथा पूर्णतः सत्य घटनेवर आधारित आहे. पालक खूपदा मुलगा परदेशी नोकरी करतो, त्याच्याकडे गाडी,बंगला आहे या भौतिक सुखवस्तूंवर भाळून मुलगी चांगल्या घरात जाते असं समजून मुलांकडून होणाऱ्या अवाजवी मागण्या मान्य करतात. त्यात त्यांच्या मुलींचं सुख हाच एकमेव उद्देश असतो त्यामुळे दोष देता येत नाही पण याच भावनांना आपलं हत्यार बनवून आरवसारखी कुटुंबं मुलीच्या आईवडिलांना,मुलीला धोका देतात.

 

इथे अमृता जेवढ्या धडाडीने लढली तशी प्रत्येक मुलगी लढेलच अस नाही. आजही अमृताला बघून मला अभिमान वाटतो..तिचं कौतुक वाटतं पण खुप जणी अशा घटनेत  डिप्रेशन मध्ये जातात,लग्नाचा विचारच सोडून देतात किंवा त्या फसवणुकीत येऊन कायमचं स्वतःला फसवत राहतात. अमृताच्या सोबत पूर्ण कुटुंब होत म्हणून तिने निडरतेने परिस्थितीला तोंड दिलं…स्वतःच्या मुलीला अशावेळी आधार देणं खूप गरजेचं असतं… या पाठिंब्याशिवाय ती यातुन बाहेर पडू शकत नाही.

 

लग्न जुळवताना,नाती जोडताना जागरूक राहणं जितकं महत्वाचं तितकंच समाजाच्या आधी आपल्या मुलीसोबत खंबीर उभं राहणं त्याहून महत्वाचं.  तेव्हा प्रत्येक क नातं जोडताना जागरूक राहा आणि वाईट परिस्थिती आलीच तर सामना करण्यासाठी सक्षम राहा.

काही घटना, काही धोके तुमच्याही जवळपास घडले असतील, तुम्हीही पाहिल्या असतील..तेव्हा व्यक्त व्हायला विसरू नका😊.

कथा आवडल्यास नक्की लाईक करा, कॉमेंट्स करा आणि शेअर करा फक्त नावासहितच😊🙏.

©सरिता सावंत भोसले

 

Article Categories:
सामाजिक

Comments are closed.