लग्नानंतर तिच्या निर्णयांची दोरी कोणाच्या होतो??

Written by

©सरिता सावंत भोसले

खूप दिवसांनी म्हणजे जवळ जवळ सहा महिन्यांनी मैत्रीण माहेरी आलेली…मी तिथे जवळच राहते म्हणून माझ्या मुलीला घेऊन वेळ काढून तिला भेटायला गेले. किती तो आंनद…शब्दांत नाही व्यक्त करता येत. कितीतरी भरभरून बोलायचं होत  आम्हा दोघींना. लग्न झालं,संसार सुरू झाला तशी मैत्री मागेच पडली. भेटायलाही वेळ मिळणं मुश्किल झालेलं त्यात ती माहेरी अगदी सहा सात महिन्यांनी यायची तेही दोन चार दिवसांची सुट्टी घेऊनच. नेहमीच आमची धावती भेट व्हायची.पोट भरून गप्पा मारल्या अस कधी झालंच नाही… संसाराची ओढाताण प्रत्येकाला असते त्यातून मैत्रिणीच्या वाटेला वेळ फार कमी येतो.

आमच्या दोघींच्या मुलींना खेळण्यात गुंतवून दोघी मनसोक्त गप्पा मारायला लागलो.  यावेळी तरी जास्त दिवस आहेस ना ग..घाई नाही ना काही जायची?? मी विचारलं.

ती : अग आठच दिवस आहे…जाणार आहे चार पाच दिवसांनी.

मी कपाळावर हात मारतच, “अग काय हे…एकतर येतेस सहा सहा महिन्यांनी त्यातही हे असे सात आठ दिवसच घेऊन. माहेरपण तरी जगून होत का ग या दिवसांत…तिकडे राबून केलेल्या कामाचा क्षीण जायलाच आठ दिवस लागत असतील”.

“हो गं पण काय करणार आठ दिवसच राहून परत ये सांगितल्यावर?? पुढे काही बोललं की मग तिकडेच राहा कायमची हे वाक्य ठरलेलंच…मग काय बोलणार अजून. आठ दिवस स्वतःच्या आई वडिलांकडे जाऊन ये म्हणतात हेच खूप आहे माझ्यासाठी”- ती

बारा तेरा वर्षाच्या माझ्या मुलीने मैत्रीणीच बोलणं ऐकलं आणि म्हणाली “आई लग्न झाल्यावर आपल्याच मम्मी पप्पांना किती दिवस, कधी, कसं भेटायचं हे पण आपल्याला बोलता येत नाही का ग?? मला तर नकोच ते लग्न फग्न.. मी नाही जाणार मग तुला सोडून”.

तिला अस काही नसतं म्हणून दोघींनी कसतरी समजावलं पण तिच्या प्रश्नाने विचार करायला भाग पाडलं.. खरंच मुलीचं लग्न झालं की तिच्याच आई वडिलांना,कुटुंबाला भेटण्यासाठीही सासरच्यांची परवानगी आधी घ्यावी लागते…परवानगी मिळाली की मग कोणत्या दिवशी जायचं आणि कोणत्या दिवशी यायचं हे ही सांगितलं जातं..एकही दिवस जास्तीचं राहिलं की संसार टिकतोय की मोडतोय याची भीती. आजही एकविसाव्या शतकात ती स्वावलंबी, स्वतंत्र झाली असली तरी ही परिस्थिती मात्र बऱ्यापैकी जैसे थे च.

हे झालं माहेरी जाण्याचं पण लग्नानंतर तिच्या बाबतीतले प्रत्येक निर्णय तिने एकटीने घेण्याचं स्वातंत्र्य उरत तिच्याकडे?

तिने पुढे शिकावं की नाही, नोकरी करावी की नाही…करावी तर कुठे करावी…कोणता पेहराव करावा कोणता नको…नोकरीच्या ठिकाणी मनमोकळं कोणाशी बोलावं की नाही की फक्त मुलींशीच बोलावं…सुट्टी कधी घ्यावी..तिला वाटलं पिकनिकला जावं ऑफिस ग्रुप सोबत तर तिने जावं की नाही…कधी वाटलं मैत्रिणीला भेटावं.. पण मी जाते..भेटून येते अस सांगून बाहेर पडता येत??

बाहेर पडायच्या आधीही घरातील कामच तिला नको जाऊ सांगत असतात. कधी मन उदास होत…उगाच ते कुठेतरी हरवत..काहीच नको करायला अस वाटतं.. पण वागता येत का तिला  तस?? बोलायची इच्छाही कधी नसते तरी मौन धारण करून बसता येत?? बसलीच तर कशी भरल्या घरात तोंड पाडून बसले बघ या बोलण्याकडे दुर्लक्ष करता येत का तिला?? बऱ्याच ठिकाणी मुलगा हवा की मुलगी…किंवा किती मुलं हवी याचे निर्णयही तिच्या हातात नसतात. मुलं झाल्यावर तर त्याच्याबाबतीतले निर्णयही ती घेऊ शकत नसते…त्याला कोणते कपडे घालावे,काय खायला द्यावं इथपासून ते कोणत्या शाळेत घालावं हे निर्णयही घ्यायला तज्ञ मंडळी असतात. तिला काय ओ फक्त मुलाला जन्म देण्याचाच अधिकार.

लग्नाआधीही काही मुलींचे सगळेच निर्णय तिचे आई वडील घेतात…काही बाबतीत ती सुज्ञ नसते,अनुभवी नसते तेव्हा घेतलेच पाहिजेत याला आक्षेप नाही पण ती सुद्धा स्वतंत्र माणूस आहे म्हणून  तिची काही मतं असू शकतात… त्याचा मान राखला गेलाच पाहिजे.

लग्नानंतरही कोणाच्या हाताखालची बाहुली असल्यासारखं तिला फक्त नाचावं लागतं. मी हे करू की नको,ते करू की नको अस साध्या साध्या गोष्टींत इतरांना विचारावं लागतं… छोट्यातली छोटी गोष्ट म्हणजेअगदी  स्वयंपाक घरातही हे सामान आता वापरू की नको असंही विचारूनच करावं लागतं. शब्दांत मांडता येणार नाहीत अशा बऱ्याच गोष्टी आहेत जिथे तिच मत ग्राह्य धरलंच जात नाही. तिचे निर्णय तिला घेता येत नाहीत. कित्येकजणी तर फक्त एकाच दिवसात माहेरची धावती भेट घेऊन परत येतात..तिला वाटलंच राहावं एक दिवस अजुन आईजवळ..माराव्या मनसोक्त गप्पा..द्यावा आठवणींना उजाळा..पुरवून घ्यावे आईकडून लाड.  पण मनात किती अशा इच्छा असल्या तरी ‘लवकर जाऊन लवकर परत ये’ असे सांगणारे शब्द कानात सतत घुमत असतात आणि तिच्या इच्छा मनातच घुसमटत राहतात.

इतकं का बदलत लग्न झाल्यावर?? लक्ष्मी तर असते त्या घराची ती…पण तिच्याच आयुष्याच्या निर्णयांची दोरी इतरांच्या हाती का??? आणि समजा नोकरी, शिक्षण ,बाहेर फिरणं याला परवानगी दिलीच तर “आम्ही तिला सगळं करु देतो..कोणत्या गोष्टीसाठी नाही म्हणत नाही..पूर्ण स्वातंत्र्य असत तिला इथे.” अशा दवंडीची गरज कशाला??

तो तिचा अधिकारच आहे…तिचा हक्कच आहे त्याच श्रेय घेण्यात काय आला मोठेपणा?? तिच्या बुद्धीच्या जोरावर कमावलेलं कर्तृत्व असतं ते तिचं..त्यावरही हक्क गाजवणार???

आता मुली खूप शिकतात…नोकरी करतात..स्वतःच्या पायावर उभ्या आहेत…काही प्रमाणात अन्यायाविरोधात बंड करताना दिसतात पण तरीही अजूनही बऱ्याच ठिकाणी पुरुषप्रधान संस्कृती आणि स्त्री म्हणजे स्वतःच्या हातातील बाहुली अशी विचारसरणीच असल्याने माझ्या मैत्रिणी सारख्या कितीतरी असतील ज्या आपल्याच आईवडिलांकडे जाण्याचा निर्णयही घेऊ शकत नाहीत.

लग्न तर पुरुषाचही होतं पण त्याचे निर्णय,त्याचे अधिकार तो स्वतःकडे अबाधित ठेवतो मग स्त्रियांच्या निर्णयांची जबाबदारी का तिच्यावर नसते??? छोट्या छोट्या गोष्टींमधलं तिचं स्वातंत्र्य का हिरावून घेतलं जातं?? आहे का याचं उत्तर कोणाकडे???

माझ्या या मताशी सगळेच सहमत असतील किंवा असावेत असं माझं बिलकुल म्हणणं नाही…परिस्थिती सगळीकडे सारखीच असेल असेच नाही पण अशीच काही उदाहरणं डोळ्यासमोर आली आणि या लेखाचा जन्म झाला.

तुमच्याही बघण्यात अशा मैत्रिणी असतील..अशी कुटुंब असतील…तुमचं मत काय यावर?? काय करावं तिने?? नक्की सांगा कॉमेंट्स मध्ये😊🙏.

लेख आवडल्यास नक्की लाईक,कंमेंट्स करा आणि शेअर करा फक्त नावासहितच🙏😊.

©सरिता सावंत भोसले

 

Article Categories:
नारीवादी

Comments are closed.