लग्न घर म्हणजे आनंद सोहळाच

Written by

लग्न घर म्हणजे आनंद सोहळा,…

©स्वप्ना मुळे(मायी)

चला आवरा मंडपवाले आलेत, त्या बाहेरच्या खुर्च्या बाजूला घ्या आणि ए पोरांना चला हॉल मधला सोफा टेबल जाऊ द्या बाहेर,…सगळे भाऊ बहीण गप्पांच टोळकं बसलेलं कोणी एखाद्या बहिणीच्या मांडीवर डोकं ठेवून कोणी उगाच पाय पसरून बसलेलं,मध्य भागी नीट ऐकू न येणारी नातवंडांची आजी आपलं तोंडचं बोळकं उगाच पसरवून कौतुकानं आपलं भरलं गोकुळ बघणारी,….कोणी उगाच घाई करत हिंडणार,…चला उठारे गप्पा नंतर मारा म्हणत उगाच माश्या उठवल्यासारखं हाकलून देणारं,…. ओ काका बसू द्या ना फार दिवसांनी भेटलोय,…चुलत भाऊ बहिणींचे टोळके आत्ये,मामे मावस सगळेच एकमेकांत गप्पात रमलेले,कोणी गाणं म्हणतंय, कोणी उगाच आरडाओरडा करतंय,कोणी मावशी, आत्या भुऊउक म्हणत ओरडतंय, चिवडयाची ताट भरून समोर येतायेत मध्येच करंजी,लाडूचे डबे फिरतायेत,…कोणी पार्लर राहिलं म्हणून पर्स घेऊन पळण्याच्या बेतात तर कोणी जाऊदे आता म्हातारी झाली तू म्हणून चिडवण्याच्या रंगात,..कोणी नेलपेंट म्हाताऱ्या आत्या, मावशींना लावून देण्यात गुंग तर कोणी मामाच्या पोरीकडे चोरून बघण्यात दंग,… एखादी मामाची चिमुकली पकडून तिला सगळे सुनबाई म्हणून भांडावून सोडतायेत,…तर चिमुकले गादयांच्या उतरंडीवर दणादण उड्या मारतायेत,….
कोणी मध्येच सनई मोठ्या आवाजात लावून देतंय आणि चार दिवसांनी डोळ्यात येणार पाणी आताच नवरीच्या आईच्या डोळ्यातून वाहतंय,…
आपल्या माणसाची ऊब अश्या मंगल प्रसंगी जाणवते,…पण हे निर्मळ मन असणारे,आनंद घेऊ आणि देऊ शकणारेच लोकं अनुभवू शकतात,..कारण अश्या टोळक्यात हा आनंद पाहून दुःख वाटणारेही बरेच चेहरे आहेत,जे बळच हसतयेत पण कुठं काही चुकतंय का याची अगदी वाट पहात आहेत,..आणि जरा कुठे खट्ट झालं की आगीत तेल ओतण्याचे काम अगदी तत्परतेने करत आहेत,..एखाद्या कोपऱ्यात उगाच खुसफूस तर एखाद्या कोपऱ्यात मस्त खसखस पिकलीये,…कोणी उगाच बॅगेतल समान चार चारदा काढून दाखवतय तर कोणी देण्यासाठी आणलेला आहेर दाखवून आपला मोठेपणा मिरवतंय,.. कोणी उगाच आपल्या बायकोला कोपऱ्यात नेऊन लुंगी विसरली कशी म्हणून डोळे वटारून दमदाटी करतंय,…मध्येच स्वयंपाकघरातून मसाले वांगे, गरम पोळ्या खमंग वास येतायेत,..लगेच पंगती मांडल्या जातायेत त्यात ही लगबग काम करणाऱ्या बिचाऱ्या वाकता येवो न येवो वाढतायेत आणि कामचुकार पळ काढतायेत,..सगळी नुसती माणसं वाचायला मिळणारी लायब्ररी झाली आहे हे लग्न घर म्हणजे,…मध्येच कोणी तरी भूक सहन होत नाही आणि पंगतीत जागा मिळाली नाही म्हणून नियोजन ढिसाळ असं म्हणून उगाच कोणावर तरी ओरडत आहे,..कोणी आपलं नेमकचं चालू लागणार नातवंड त्या पंगतीत घेऊन मिरवतंय,… एकाच वेळी रंगभूमीवर अनेक कलाकार जमा झालेत आणि एकाच स्टेजवर वेगवेगळे नाटकाचे प्रयोग लागलेत ज्याला जिथे भूमीका वठवायला आवडते तो तिथे शिरतोय,…
पण असं स्टेज फार कमी मिळतं तेंव्हा होता होईल तेवढं पॉझिटिव्ह नाटकाच्या प्रयोगात शिरावं आणि होईल तेवढा आनंद घ्यावा आणि द्यावा हो ना,….

©स्वप्ना मुळे(मायी)औरंगाबाद

Article Tags:
Article Categories:
मनोरंजन

प्रतिक्रिया व्यक्त करा