#लांबलेली मकरसंक्रांत#

Written by

#लांबलेली मकरसंक्रांत#
✍️©स्नेहा किरण नवाळे (पाटील)
रिया आणि राघवची मैत्री अगदी बालपणापासून होती. वयापरत्वे दोघांच्या मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं. आणि बालवयातील सवंगडी रिया, राघवची आयुष्यभराची सहचारिणी बनली. नुकतंच महिन्याभरापूर्वी दोघांचं लग्न झालं होतं. रिया आणि राघव आजच्या पिढीतील नव्या विचारांची जोडी., रिया जितकी अवखळ तितकाच राघवचा स्वभाव शांत होता. रिया एक मॉडर्न मुलगी होती. पण सणासुदीला अगदी मनभरेपर्यंत तयार व्हायची. त्यासाठी तिची पूर्वतयारीही जोशात असायची. त्यांच्या लग्नानंतरचा येणारा पहिला सण होता मकरसंक्रांत. जेमतेम आठवडा उरला होता संक्रातीला, मग काय रियाच्या ऑफिसमधल्या मैत्रिणींची यंदा काय काय करायचे यावर चर्चा सुरू झाली. लगेच रिया राघवच्या मागे लागून त्याला साडी खरेदीसाठी घेऊन गेली व तिने मनात ठरवल्याप्रमाणे खास संक्रांतीकरता काळी चंद्रकळा साडी पसंत करून खरेदी केली. रात्री आनंदाने दोघे घरी परतले. रिया तिच्या सासूबाई, मीनाताईंना उत्साहाने साडी खरेदी प्रकरण सांगू लागली. तिचं बोलणं मीनाताईंच्या सासूबाई, सुलोचनाबाईही अगदी कान देऊन ऐकत होत्या. सुनेमध्ये संचारलेला उत्साह पाहून मीनाताईंनीही हलव्याचे दागिने कुठे मिळतील याची त्यांच्या ओळखीत चौकशी सुरू केली.
दोनच दिवसांनी रिया ऑफिसमधून घरी आली ती पॉलिश केलेली काळी चंद्रकळा घेऊनच. आल्या आल्या रियाने मीनाताई आणि सुलोचनाबाईंना तिची नवी साडी दाखवली. आणि म्हणाली “आई, आज्जी किती छान आहे न ही साडी”.. मीनाताईंनी साडी हातात घेतली आणि ती साडी त्या निरखून पाहू लागल्या. रियाला काही कळले नाही परंतु मीनाताईंच्या ओल्या झालेल्या डोळ्यांच्या कडा सुलोचनाबाईंच्या चाणाक्ष नजरेतून मात्र सुटल्या नाही.
मीनाताई त्यांच्यावेळेच्या उच्चशिक्षित, सरकारी नोकरी करून घरही सांभाळणाऱ्या गृहिणी होत्या. त्यांनीही थोडं घाबरतचं सुलोचनाबाईंकडे मकरसंक्रांत साजरी करण्याबाबत विचारणा केली होती, तेव्हा सुलोचनाबाईंनी मीनाताईंना आपल्याकडे अशी पद्धत नाही असे सांगून स्पष्ट नकार दिला होता. मीनाताईंनीही त्यावर अवाक्षरही काढला नव्हता. खरंतर सुलोचनाबाईंनाही सुनेचे मन मोडवत नव्हतं, पण यशवंतराव म्हणजे सुलोचनाबाईंचे यजमान, त्यांचा घरात धाकच इतका असे की इतर सगळेच सदस्य त्यांना दबकून असत. मौज मजा, हौस पुरवणं हे यशवंतरावांच्या तत्वांत बसत नसे. सुलोचनाबाईंना मीनाताईंचे काहीच कोडकौतुक करता आले नव्हते. यशवंतरावांचा मुलगा शिरीषही याला अपवाद नसे. कालांतराने मीनाताईंनाही घरातल्या माणसांचे स्वभाव कळत गेले, आणि त्या त्यातच रुळल्या. “आज्जी हा हे हाराच डिझाईन कसं दिसतंय” या रियाच्या प्रश्नाने सुलोचनाबाईंची तंद्री भंग पावली. मोबाइल मधला फोटो दाखवत रिया त्यांना त्यांचं मत विचारत होती. त्या दोघींचं बरेच फोटो पाहणं चालूच होत. इतक्यात मीनाताई दिवाणखान्यात नसण्याची खात्री करून सुलोचनाबाईंनी रियाला “मला एक मदत करशील का ग पोरी?” असं दबक्या आवाजात विचारलं. “बोला न आज्जी काय करायचं आहे मी सगळं करते”. रिया उत्साहात म्हणाली. मग आज्जीनी तिच्या कानात काहीतरी सांगितले नेमकी त्यांची कुजबुज इतका वेळ वर्तमानपत्र वाचत बसलेल्या यशवंतरावांच्या कानावर आली. तसेच ते सुलोचनाबाईंसमोर आले आणि हळू आवाजात म्हणाले “मग सुनेसाठी कुठली साडी घ्यायची ठरवलं आहे, आम्हालाही पाहायला आवडेल”. यशवंतरावांचा हा वेगळा तसेच कुटुंबवत्सल अवतार सुलोचनाबाई पाहतच राहिल्या. मग रियाने त्यांना ऑनलाइन खरेदी केलेली साडी दाखवली.
पलीकडे मीनताई तीळाचे लाडू आणि इतर साहित्याची यादी करण्यासाठी पेन आणि वही घेऊन सरसावल्या होत्या. सुलोचनाबाईंनी सुचवल्याप्रमाणे रियाने साडी ऑफीसच्या पत्त्यावर मागवली होती. चार दिवसातच ती मिळाली.
अश्यातच भोगीचा दिवस आला, मीनताईंची स्वयंपाक घरात लगबग चालली होती. तीळाचे लाडू वळून झाले होते. आज त्यांना भोगीचा साग्रसंगीत नैवेद्य करायचा होता, तसेच उद्याच्या संक्रांतीसाठी पुरणा वरणाचा बेत करायचा होता. रियासाठी त्यांनी आणलेले हलव्याचे दागिने त्या कौतुकाने पाहत होत्या. रियाच्या माहेरचे आणि इतर नातेवाईकही येणार होते, त्यामुळे कार्यक्रम खास होणारचं होता. ऑफिस मधून आल्यावर रियाचंही घरात बागडणं सुरूच होतं. दुसरा दिवस मकरसंक्रांतीचा उजाडला. सून, सासू आणि आजेसासू तिघींनी सुगड पुजून देवाची पूजा केली. मग राघव रियाने देवाचे दर्शन घेतले आणि घरातल्या मोठ्यांनी दोघांना भरभरून आशिर्वाद दिले.
दुपारची जेवणं आटोपली तशी संध्याकाळच्या कार्यक्रमाच्या तयारीला वेग येऊ लागला. एव्हाना रियाची आई, बहीण आणि वहिनी घरी आल्या होत्या. मीनताईं त्यांच्या पाहुणचारात गुंतल्या होत्या. तेवढ्यात सुलोचनाबाईंची “मुलींनो इकडे या जरा दिवाणखान्यात” ही हाक ऐकू आली. सुलोचनाबाईंनी मीनाताईंना समोर बोलावले तसे मीनाताई रियाला हाक देण्यासाठी मागे वळल्या, तश्या थरथरत्या हातांनी सुलोचनाबाईंनी मीनाताईंना थांबवले आणि समोर येऊन त्यांच्या हातावर काळी चंद्रकळा ठेवली. क्षणभर काय चालले आहे हे मीनाताईंना कळलंच नाही. सुलोचनाबाई आणि मीनाताई दोघींचे डोळे पाण्याने भरले होते. तोच यशवंतराव म्हणाले, “सुलोचनाबाई, सूनबाईंसाठी हौसेनं घेतलेले हलव्याचे दागिनेही दया बरं त्यांना.” लगेच रियाने दागिने सुलोचनाबाईंकडे सुपूर्द केले. सुलोचनाबाईंनी दागिने दिल्यावर मीनाताईंनाही गहिवरून आलं व त्या आपल्या सासूबाईंच्या गळ्यात पडल्या. आता त्यांच्या संवादात शब्द नाही फक्त अश्रूच बोलत होते जणू. सुलोचनाबाईंनी मीनाताईंना थोपटून म्हंटल, “मला माझ्या सुनेची लांबलेली मकरसंक्रांत आज करायचीय बरं”. मागोमाग रिया आली आणि निरागस चेहरा करून म्हणाली आणि माझी संक्रांत??. तसा एकच हश्या पिकला. तेव्हा सुलोचनाबाई म्हणाल्या “अगं पोरी तुझ्यामुळेचं तर हे शक्य झालं. यासर्वांचं सगळं श्रेय तुझचं आहे बरं”. मग मीनाताईंमध्ये काकणभर जास्तच उत्साह आला. त्यांनीही रियाला तिच्या आवडीची चंद्रकळा साडी आणि हलव्याचे दागिने आणि त्यांचा पारंपरिक हार भेट म्हणून दिला.
दोघी सासू आणि सुना एकत्र शृंगार करत होत्या. रियाची आई, वहिनी आणि बहीणीने त्यांना तयार केलं. आपल्या सुनेच्या चेहऱ्यावरचा ओसंडून वाहणारा आनंद पाहून सुलोचनाबाई धन्य झाल्या होत्या. यथावकाश मकरसंक्रांतीचा कार्यक्रम छान पार पडला. आज घरातील तीनही पिढ्या खऱ्या अर्थाने तृप्त झाल्या होत्या.
✍️©स्नेहा किरण नवाळे (पाटील)
तळटीप: संपूर्ण कथा काल्पनिक आहे. याचा माझ्या किंवा इतर कोणाच्या जीवनातील घडामोडींशी संबंध नाही. तरीही साधर्म्य आढळल्यास निव्वळ योगायोग समजावा.
कथा आवडल्यास नावासहित शेअर अथवा कॉपी पेस्ट करावी ही विनंती.

Article Categories:
प्रेम

Comments are closed.