लेका, झाडाचं बी हो # भाग 4

Written by

” पहिली स्टेप ? म्हणजे आबा?”
” जसं बी त्याच्या गाभ्यात असतं, आणि त्याला त्या ‘संरक्षित’ वातावरणातून बाहेर पडायच् असतं.. तसचं ‘तू ही तुझ्या ‘कम्फर्ट झोन’ मधून बाहेर पडायला तयार हो’, असा त्या पहिल्या स्टेप चा अर्थ आहे. कारण ‘कम्फर्ट झोन’ मधे राहून काम करणाऱ्याची प्रगती होत नसते, असं तो आशीर्वाद सुचवतो.”
“Wow.” नकळत मी बोलून गेलो.” आबा दुसरी स्टेप काय?”

” सांगतो.” माझ्या उतावीळ पणाला हसत आबा पुढे सांगू लागले.
” आता ते बी एक तर आपण रुजवतो किंवा ते आपण स्वतः होऊन रुजतं, जस् जंगलात किंवा रानात रुजतं तसं.”
” म्हणजे रुजण्याची स्टेप ही दुसरी स्टेप. पण आबा जरा विस्तारुन सांगा ना.”
” सांगतो. बी रुजतं ते मातीत, जमिनीत. आता बी रुजतं म्हणजे काय, तर ते स्वतः ला अक्षरक्ष: गाडून घेतं..गाभ्यातून बाहेर पडून जमिनीच्या गर्भात.”
“तसच तुही तुझी जी कर्म’भूमी’आहे , त्यात स्वतः ला गाडून घे.. स्वतः ला त्यात रुजव.”

” आबा.. खरचं.. छान अर्थ आहे हो आशीर्वादाचा.. आता तीसरी स्टेप कोणती?”
“आता जमिनीत गाडून घेतल्यावर त्या ‘बी’च्या आजुबाजुला काय असतं?”
” माती असते, आबा.” मी सांगितलं.
” आता ही माती त्याचा चार चार ही बाजूंनी व्यापून असते. त्याच्या आजुबाजुला सगळा अंधार असतो. बरोबर?”
” हो ,बरोबर.”
” पण ‘बी’ चं काम काय असतं? तर रोप तयार करणं, हो नं?”
“हो”. मी म्हणालो.

“आता ही जी आजुबाजूची माती असते, त्या मातीचाचं उपयोग करून ‘बी’ हे रोपट् तयार करत.. आणि त्यासाठी त्याला मदत करतं ते पाणी..”
“पण आबा, आशीर्वादाच्या भाषेत ह्याचा अर्थ काय?”
“सांगतो. पण आपण इथे थोडावेळ थांबूयात. ती रसवंती आहे ना समोर, तिथे रस घेऊयात उसाचा.”

खर तर मला लगेच स्पष्टीकरण हवं होतं आबांकडून.. पण ते मला ‘उतावीळ’ म्हणतील म्हणून मी शांत राहिलो.

रस्त्याच्या बाजूला गाडी थांबवून आम्ही रसाची ऑर्डर दिली.

“बरं, सूरज.. रस येईपर्यन्त तू एक काम कर.”
“काय आबा?”
” फार अवघड नाहीये.. फक्त बोटांनी खालच्या जमिनीत एक छोटस् छिद्र कर.”

मी आश्चर्याने आबांकडे पाहत छिद्र करायला सुरुवात केली. पण जमीन फारचं कडक होती. म्हणून मी दुसरीकडे प्रयत्न केला.. पण फक्त वरवरची माती बाजूला झाली.

” आबा, नाही जमतं. उलट माझी बोट् सोलटुन निघाली.”
“बरं बरं.. तो रस घे आधी.”
” आबा, आता सांगाना पुढचा अर्थ..” मला घाई झाली होती.

क्रमशः

Article Categories:
मनोरंजन

Comments are closed.