लेकी आल्या घरा!

Written by

#लेकी_आल्या_घरा

लेकी आल्या घरा
मायेला दिवाळीदसरा
केला आगीचा गं जाळ
त्यावरी काळंभिन्न भिडं
तेल लावूनी भिड्याला
घातीला पिरेमाचा घावना
येकेबाजू ठेयली चाय
चायला उकळी येई
माय लेकीच्या परतीचे
दिवस गं मोजी
एका डोळ्यात हसू अन्
एका डोळ्यात आसू
माय पदराने डोळे टिपी
थोरल्या पेल्यात चाय ओती
चार घावणे पिरेमाचे
लेकींसमोर गं ठेवी
लेकी खाती आवडीने
मायच्या हातचे घावणे
खाता खाता सांगी
मायेला नवऱ्यांचे
कारनामे
माय हसे आपसूक
लावूनी तोंडाला पदर
हसताहसता आसू
टपकन पडती गं
गालावर✍️

——गीता गजानन गरुड,आंब्रड.
छायाचित्र सौजन्य: पूर्णिमा गावडे मोरजकर

Article Categories:
मनोरंजन

प्रतिक्रिया व्यक्त करा