वडापाव

Written by

वडापाव

वडापाव हा माझा अत्यंत लाडका पदार्थ आहे.
शाळेत असताना शाळेबाहेर वडापावची गाडी उभी असायची.तिथेच बाजूला त्या काकांच घर होतं.शाळा लवकर सुटली तर स्कुलबसमध्ये खिडकीत बसून मी
त्या काकांची भाजीची तयारी पहायचे.भल्यामोठ्या टोपात बटाटे उकडलेले असायचे.काकू ते बटाटे सोलायच्या.भरपूर आलं,लसूण,मिरची ठेचून त्या बटाट्याच्या हाताने केलेल्या लगद्यात घालायच्या.मग त्यावर खमंग फोडणी घालून चांगलं परतायच्या व एका परातीत भरुन त्यावर भरपूर बारीक चिरलेली कोथिंबीर घालून गाडीवर न्यायच्या.

काका तिथे भजीच्या पीठाप्रमाणे पीठ तयार करायचे व भल्या मोठ्या कढईत तेल तापायला ठेवायचे.शाळेची घंटा वाजली की चपटे पिवळे गोळेपीठात बुडवून तेलात सोडायचे.तेलात ते वडे पोहताना पाहणे म्हणजे पर्वणीच.मग मिरच्या तळायचे.त्यांवर मीठ शिंपडायचे. काकू कंबरेला नेपकीन लावून उभ्या असायच्या.पावाला मधोमध कापून त्यावर घरगुती लसणाची चटणी घालायच्या,थोडासा कांदा व मधोमध गरमागरम वडापाव.मुलं पैसे हातात घेऊन उभीच असायची. वडापाव एका कागदावर ठेवून प्रत्येकाला फटाफट द्यायच्या.तेंव्हा फक्त दिड रुपयाला मिळायचा.त्यांच ते मेनेजमेंट खरंच वाखाणण्याजोगं होतं.आम्हाला आई शाळेत कधी पैसे न्यायला द्यायची नाही.पण आई पालक सभेला आली की कधीकधी वडापाव द्यायची.

शाळेच्या कँटीनमध्ये फक्त वडे मिळायचे.आधी लाईन लावून कुपन घ्यावं लागे मग काऊंटरवर ते कुपन दाखवलं की वडे एका खाकी थैलीत घालून देत.ज्या मुलींच्या आई नोकरी करत त्या बरेचदा असे वडे घेऊन येत व चपातीसोबत खात.आम्हाला नेहमीच डबा मिळायचा.त्यामुळे शाळेतला वडा कधी खाल्लेला आठवत नाही.

आमच्या चाळीत थंडीच्या दिवसांत मैदानावर कब्बडीचे सामने व्हायचे.तिथे एक वडापाववाला असायचा.आम्हीही कधीकधी त्याच्याकडून वडापाव घ्यायचो.लेडीजची कब्बडी बघायला खूप मजा यायची.कब्बडी बघत त्या थंडीत गरमगरम वडापाव खायला खूप मस्त वाटे.

सकाळी क्लासला जाताना,साधारण सात वाजता मी व बाबा श्रीक्रुष्ण होटेलात जायचो.तिथे एका खोलगट प्लेटमध्ये ताकाची कढी व त्यात पोहत असलेले मोठेमोठे बटाटेवडे..चमच्याने वड्याचा तुकडा पाडून तो कढीत पुर्ण भिजवायचा.त्याला कढीने न्हाऊमाखू घालायचं व असा कढीत बुडालेला वड्याचा तुकडा म्हणजे थोडी भाजी,वरचं आवरण व कढी असं जीभेवर ठेवायचं व त्याचा मनमुराद आनंद लुटायचा.काय भन्नाट चव लागायची सांगू.तेवढं संपवून मग बसस्टॉपवर जायचे.

तर कधी बसस्टोपच्या समोर,म्हणजे भारतमाता टोकीजच्या थोडं पुढे हा बसस्टोप होता.त्याच्यासमोर एक मिल होती.तिथेही होटेल होतं.तिथे बाबा मला घेऊन जायचे.तिथे एका खोलगट डिशमध्ये खोबरं,हिरवी मिरची,लसूण याची पातळ चटणी असायची.त्यातून वड्यांना पेश केलं जायचं.चटणीत न्हाऊमाखू घातलेले ते वडेही अप्रतिम लागायचे.

बर्याचदा बाबा मला आयडीयल बुकडेपोजवळ न्यायचे.तिथला गरमगरम वडा उभं राहून खाण्यातही मजा यायची.

आमच्या गावी सुकळवाडला शनिवारचा बाजार असायचा.कधीकधी आम्ही तिथला वडापाव खायचो.गावचा पाव थोडा गोडूस लागतो,त्यामुळे वडापावची वरीजनल टेस्ट गावी लागत नाही.पण..तिथली कांदाभजी अप्रतिम लागतात.शनिवारची प्रत्येकाला एकेक कांदाभजीची पुडी व ओल्या नारळाचं पांढरशुभ्र काप मिळे.

बदलापूरलाही आमचा रुची वडापाववाला ठरलेला होता.आई भाजीला गेली की प्रत्येकाला वडापाव आणायची.सांबारातूनही बटाटावडा छान लागतो.काहीजण उसळीतून वडा खातात.
दिवागाडीतला वडापाव प्रवाश्यांची भुक भागवतो पण त्याला चवीशी जरा वावडेच.प्रत्येक स्टेशनवर वडापाव,वडापाव ओरडत वडापाववाले गाडीत येतात.

जम्बोवडापाव आजकाल प्रचलित झाला आहे.पण मशीनने बारीक केलेल्या बटाट्यांना हाताने कुसकरलेल्या बटाट्यांची चव येत नाही.

डोंबिवली पुर्व स्टेशनलाही काही महिला एकत्र येऊन वडापाव,भजीपाव बनवतात.त्यांचे सामुहिक कार्य वाखाणण्याजोगं आहे.चार महिला एकत्र आल्यावर फक्त गप्पाटप्पा होतात असं म्हणणार्यानी एकदा खरंच पाच दहा मिनटं यांच्या दुकानाजवळ उभं रहावं.सगळं काम आपल्या डोळ्यांसमोर करतात.एक भज्यांच पीठ तयार करते.एक समोस्यासाठी पाती तयार करते.एक भल्यामोठ्या कढईतून वडापाव,भजी,समोसे तळत असते.एकदोघी काऊंटरपाशी उभ्या असतात.चिंचेची आंबटगोड चटणी,पुदीना चटणी,सुकी चटणी अशी व्हरायटीही मिळते.अवघ्या दहा रुपयात वडापाव मिळतो तिथे,शिवाय स्वच्छतेची हमी.

पुण्याला प्रतिबालाजी मंदिराच्या आवारात दोन ब्रेडमध्ये बटाटावडा घालून देतात.तोही छान लागतो.

आजतागायत एवढे वडे खाऊनही माझं वड्यावरचं प्रेम तसूभरही कमी झालेलं नाही.वरच आवरण मात्र पातळ हवं.मिठाईवाल्यांच्या दुकानातला वडापावही अजीब लागतो. साऊथ इंडियन दुकानात सहसा वडापाव घेऊ नये.हवीतशी चव मिळत नाही.हल्ली चटणीतही पावाचा चुराच जास्त घालतात.त्यामुळे चटणी पहिल्यासारखी खुमासदार लागत नाही.

बर्याच नोकरी नसणार्या युवकांचे संसार या वडापावच्या गाडीवर चालतात.वडापावच्या गाडीवर नफा मिळवून काहींनी होटेल्सही काढली आहेत.

संध्याकाळी वडापाव आणायला गेले की तिथे शाळेतून येणारी मुलं,कोलेजवरुन येणारी मुलं,थकूनभागून हाफिसातून येणारी माणसं,ज्येष्ठ नागरिक.. सगळे वडापावच्या गाडीजवळ एकत्र दिसतात.सर्व वयोगटातल्या माणसांना एकत्र जोडणारा,गरीबश्रीमंत असा भेदभाव मोडीत काढणार्या माझ्या लाडक्या वडापावचा मला रास्त अभिमान वाटतो.

घरीपण कधीकधी वडे करतो पण काही वस्तू बाहेरुन खात्रीच्या दुकानातून घेऊनच खाव्यात.
तर असं हे माझं गरमागरम बटाटेवडेपुराण??
———////गीता गजानन गरुड.

Article Categories:
मनोरंजन

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत