वाट पाहत रे……

Written by

“बघ ग सावित्री ताई… आजही माझा नवरा डबा न घेता गेला आणि मग सर्वेशला पण तसच वागायला लागत बघ. आता आपला मुलगा आपलंच अनुकरण करतो म्हंटल्यावर आपणच नीट वागावं की नाही. आवडती भाजी केलं तरी असाच वागतो आणि मलाच म्हणतो तू फार चिडकी झालेस आजकाल.
तशी चिडचिड वाढलेच ग माझी. सर्वेश आणि नवरा या दोघांच्याही मागे करता करता जीव दमून जातोय बघ माझा आणि माझा नवरा म्हणतो ती सावित्री ताई बघ नेहमी हसत असते. तिच्याकडे बघून कस प्रसन्न वाटत. शिक जरा काहीतरी तिच्याकडून. खरंच ताई कसं जमत ग तुला नेहमी खुश,आनंदी राहायला. मी नाही कधी तुला हिरमुसलेलं पाहिलं. सांग ना ग काय राज आहे तुझ्या या निखळ हास्यामागचा?”
“अग काहीतरीच तुझं. मी नेहमीच तर अशी असते. काय वेगळं राज वगैरे नाही ग. चिडचिड करून काय मनःस्तापच होतो ना आपल्याला आणि समोरच्याला पण. मग नकोच ना ती गोष्ट.”
“तस तर मी पण ठरवतेच ग पण अंमलात नाही ना आणता येत. म्हणून तर आले तुझ्याकडे. तुझ्याकडे आणि तुझ्या या विविध तऱ्हेच्या फुलांच्या बागेकडे पाहिलं की टेन्शन कुठच्या कुठे पळून जात. तू पण त्या गुलाबसारखी आहेस बघ टवटवीत… मोगऱ्यासारखी सुगंधी हास्य तुझं दरवळत असत बघ सगळीकडे… त्या बकुळीसारखा तुझा सहवास आम्हा सर्वांना हवाहवासा वाटतो बघ.”
“अग बस्स बस्स…कवयित्री च उतरली एकदम. मी पहिल्यापासून अशीच आहे ग, काही विशेष नाही त्यात”
“बरं ताई नको सांगूस राज. पण एक सांगना, तुझा नवरा तुझ्यावर कधीच असा चिडत नसेल ना? तू आहेसच हसरी,प्रसन्न तर तुझ्याकडे बघून तर त्याचा राग पळूनच जात असेल.” माझ्या या प्रश्नानेच ताईचा हसरा चेहरा कोमेजला. सगळे रंग झरकन उडून जातात तसे रंग हरवले चेहऱ्यावरचे तिच्या. डोळ्यात अश्रू वाहत होते…” काय झालं ताई? मी काही चुकीचं बोलले का?”
“नाही ग बाळा, तू काही नाही चुकलीस, मीच जरा भूतकाळात गेले.” मी न राहवून ताईला विचारलं,”काय झालं ताई? तुझा नवरा तुला सुखी ठेवत नाही का?”
“अगं सुखी ठेवायला तो इथे असायला तर हवा ना?”
ताईच हे वाक्य ऐकून मला धक्काच बसला. तिला विचारलं नक्की सांग काय झालं.
ताई म्हणाली,”एकविसाव्या वर्षी बघ माझं लग्न झालं. त्यांचं वय असेल सत्तावीस वगैरे. तेव्हा मुलींना तेवढी मुभा नव्हती ना वय किती अस विचारायची. सून करून ज्या घरात गेले ते घर तस तालेवार होत. सुबत्ता होती. एकत्र तीन कुटुंब आम्ही राहायचो आणि सासू सासरे. लग्न झालं, सुरुवातीचे गुलाबी दिवस कसे सरले कळले नाही. ते खूप प्रेम करायचे माझ्यावर. लाड पण भरपूर करायचे. कमी अशी कोणत्या गोष्टीची त्यांनी मला भासू दिली नाही. हा…आता सासू आणि जावा जरा रागाने कधी द्वेषाने वागायच्या माझ्याशी पण मी कधी नवऱ्याला सांगितलं नाही बघ. ते खूप रागिष्ट होते,तिरसट होते. राग आला की मग माझंही काही चालायचं नाही त्यांच्यासमोर.
घर म्हंटल की भांड्याला भांड लागतच की ग. म्हणून सोडून नाही चालत ना सगळं. हेच त्यांना कळायचं नाही आणि राग आला कधी की घर सोडून जायचे. एकदा लग्न झाल्यावर असेच वाद झालेला घरात आणि हे चक्क घरातून निघून गेले. सासूबाई मला म्हणाल्या “जाऊदे, येईल परत राग शांत झाला की. त्याला सवय आहे अशी”. आणि खरंच ते राग शांत झाल्यावर आले दोन दिवसांनी. पुन्हा सगळं सुरळीत चाललेलं. मी वचनही घेतलं त्यांच्याकडून की ते पुन्हा मला एकटीला सोडून कुठे जाणार नाहीत. काहि दिवसांनी जमिनीवरून भावा भावांची भांडण झाली आणि हे पुन्हा रागात घर सोडून निघून गेले. मी यावेळी फार टेन्शन न घेता वाट बघत बसले आज ना उद्या राग शांत झाला की येतील म्हणून.
पण यावेळी आठवडा झाला ग, ते आलेच नाहीत. मी माहेरी भावाला सांगून शोधाशोध सुरू केली. सासरचे म्हणायचे नेहमीच आहे त्याच, येईल कधीतरी परत. खूप शोधलं, आता महिना होत आला पण ते आले नाहीत. सासरच्यांनी मलाही टोमणे देऊन,घालून पाडून बोलून घर सोडण्यास भाग पाडलं. मी आले माहेरी भावाकडे. आई वडील तर आधीच गेलेले. इकडे येऊनही आम्ही शोध घेतच होतो पण वर्षा मागून वर्षे जाऊनही ते आले नाहीत. आज बावीस वर्षे झाली त्यांची वाट बघते. मला सोडून जाणार नाहीत या वचनापायी तरी त्यांची पावलं माझ्याकडे वळतील अस वाटतं अजूनही. ही फुलांची बाग त्यांना खूप आवडायची म्हणून मी इकडे आल्यावर लावली. इथे मला कोणी काही बोलत नाही. सगळे काळजीच घेतात पण शेवटी आपलं घर,आपला संसार कोणाला नको असतो ग. त्यांच्या सोबतच्या दोन वर्षांच्या संसाराने मला खूप काही दिल. त्या आठवणी वाट बघायची ताकद देतात. या फुलांशी मी रोज बोलते. त्यांनाही सांगत असते हे येतील.
आले की त्यांना ही फुलांची बाग बघून खूप आनंद होईल बघ.”
आजपर्यंत मला वाटायचं ताईचा नवरा बाहेरगावी असतो पण या हसऱ्या चेहऱ्यामागे इतकी मोठी जखम घर करून बसले ते आज कळाल. ताईला म्हणाले,”बावीस वर्ष? खुप झाले ग ताई. त्यांना यायचं असत तर मागेच आले असते. तू दुसऱ्या लग्नाचा विचार का नाही केलास?”
” नाही ग त्यावेळी एकतर दुसऱ्या लग्नाचा विचार बाईने करणे म्हणजे पापच अस होत. आणि माझी कधी इच्छा नाही झाली तशी. हे येणार या आशेवरच जगले. यांची वाट बघणं म्हणजेच आयुष्य झालं माझं. मी नकारार्थी कधी विचार नाही केला आणि आताही करत नाही. येतील ते. म्हणतील मला या फुलांसारखी अजूनही तू टवटवीतच आहेस. सुंदर दिसतेस म्हणतील बघ. तू जस मघाशी माझ्या हास्याच,दिसण्याच वर्णन केलस ना तसेच अगदी ते करायचे.येतील ते बघ. बावीस वर्षांचं माझं वाट बघणं वाया जाऊ देणार नाहीत ते.”
सावित्री ताई हे सगळं हसून बोलत असली तरी आत तीच मन रडत होत. इतकी वर्षे एका माणसाची वाट बघणं, आयुष्याच ध्येयच ते बनवणं फार कठीण आहे असं जगण. आणि ताई कडे बघून तिच्या आयुष्यात दुःखाची अशीही छटा असेल असं जराही जाणवणार नाही. तिची वेडी आशा खोटी ठरू नये एवढंच मनापासून वाटत.
तिथून निघताना ताईसाठी काही ओळींनी जन्म घेतला—
“गुलाबासारखं बहराव लागतं
मोगऱ्यासारखं दरवळाव लागत
चाफ्यासारखं कोमल असावं लागतं
रातराणीसारख काळोखातही उजळाव लागत
पसरून परिजातकासारखं उराशी सगळं
सांभाळाव लागतं
आपलं काट्याच बोचणं आपल्यालाच सहन कराव लागत”

लेख लेखिकेच्या नावासहित शेअर करण्यास काहीच हरकत नाही. आवडला तर नक्की लाईक,कंमेंट्स करा?.
                                  ©सरिता सावंत

Article Categories:
प्रेम

प्रतिक्रिया व्यक्त करा