विघ्नहर्ता आणि विटाळ अंधश्रद्धा

Written by

©सरिता सावंत भोसले

नलिनीच्या घरी दहा दिवसांचा गणपती. पेशाने वकील असली तरी सगळे सणवार अगदी आवडीने साजरे करते.आणि गणपतीवर तिची खूप श्रद्धा. विघ्नहर्ता तिच्यासाठी खूप खास आहे आणि ती त्याच स्वागत खूप उत्साहात आणि मनापासून करते.  घरी नवरा,सासूबाई त्याही आता थकलेल्या आणि तिचा कॉलेजात जाणारा मुलगा एवढं चौकोनी कुटुंब ती छान सांभाळते. यावर्षीही तिने गणपतीला सुट्टी घेऊन पूजाअर्चा, पाहुण्यांच स्वागत सगळं नीट पार पडलेलं. आज अनंत चतुर्दशी…सकाळपासूनच तिची तयारी चालू होती. सासूबाई बसून जितकं जमेल तशी मदत करायच्या पण नलिनीला सणवार असो किंवा पाहुण्यांचा पाहुणचार… स्वतःहून सगळं करण्यात वेगळाच आनंद मिळायचा त्यामुळे ती ते आनंदाने करायची.

आज पण नलिनीने उत्साहाने गोड जेवण, मोदकाचा घाट घातलेला. पण नेहमीच स्त्रिया सणावाराला जे होऊदे नको अशी प्रार्थना करतात नेमकं तेच नलिनी सोबत घडलं. मासिक पाळी. सासूबाईंनी डोक्याला हातच लावला. याच दिवशी पण यायचं होत का हिला? एक दिवस थांबता आलं नाही?आजवर अस विघ्न आलं नाही आणि यावर्षीच काय झालं? आता कोण करेल मोदक,कोण करेल गणपतीची पूजा जाताना?विघ्नहर्ताला असल काही चालत नाही. तो कोपेल असा त्यांनी तगादाच लावलेला नलिनीमागे.

नलिनीला हे विटाळ,शिवाशिवी न करणे,एका कोपऱ्यात जाऊन बसणे अस वाळीत टाकल्यासारख्या  प्रथा पटत नव्हत्या. आजही तिने सासूबाईंना सरळ सांगितलं मी सगळं करते. तुम्ही काही काळजी करू नका. सासूबाईंनी नन्नाचा पाढा सुरू केला त्यावर नलिनी म्हणाली, “स्त्री पुरुष जस देवाने बनवलं तसच मासिक पाळीही देवानेच स्त्रीला दिलीये. ही नसली तरी कांगावा आणि आली तरी कांगावा? आई होण्यासाठी हीच किती महत्वाची आहे माहितीये ना. मग जी गोष्ट नवीन जन्म या जगात आणते, जिच्यामुळे भविष्य घडत तीच गोष्ट अशुभ कशी असू शकते सांगा. मूल होणं इतकं पवित्र मानलं जातं आपल्याकडे मग ज्याच्यामुळे मूल होत ते अपवित्र कस ठरेल? यात देवपूजा केल्याने पावित्र्य राखलं जात नाही असं का? स्त्रियांना या काळात शारीरिक आणि मानसिक त्रास होतो म्हणून खर तर तिला आरामासाठी पाच दिवस सगळ्यापासून दूर ठेवल जात. देवाला चालत नाही किंवा त्याने काहीतरी अनिष्टच घडत वगैरे अस देवाने कुठे लिहून ठेवले आहे का? काळजी करू नका तुम्ही. विघ्नहर्ता कधी कोपत नाही. मी करेन सर्व काही.”

आधीच सून वकील त्यात स्त्रियांसाठी समाजसेवाही करायची, तिच्यासमोर सासूबाई शांतच बसल्या पण मनात मात्र धाकधूक होतीच. नलिनीने स्वच्छ मनाने,पूर्ण श्रद्धेने आणि मनोभावे गणपतीसाठी नैवेद्य केला, मोदक केले. गणपतीची पूजा आणि आरती केली. गणपतीचं विसर्जनही केले.

जी क्रिया नैसर्गिक आहे तिला अडचण न मानता नलिनीने तिला नैसर्गिक पणेच हाताळल. सासूबाईंचं मन मात्र अजूनही खात होत. काहीतरी वाईट घडेल की काय आता? विघ्नहर्ता कोपेल की काय या भीतीने त्यांच्या मनात घर केलं होतं.

दोनच दिवसांनी नलिनी हातात पेढ्यांचा पुडा घेऊन आली आणि आधी एक पेढा  देवासमोर ठेवून एक सासूबाईंच्या हातात तिला. बलात्काराची जी केस ती लढत होती ती आज जिंकलेली आणि आरोपीला फाशीची शिक्षा जाहीर झालेली म्हणून ती खुप खुश होती.

सासूबाईंना म्हणाली विघ्नहर्ताने सगळं चांगलंच केलं. तुम्हाला भीती होती काहीतरी विपरीत घडेल याची पण झालं नेमकं उलटच. विघ्नहर्ता विघ्न दूर करतो. तो कोणतंच संकट त्याच्या भक्तावर येऊ देत नाही आणि आलच तर त्यातून योग्य मार्ग नक्की दाखवतो. खरतर विटाळ म्हणजेच एक अंधश्रद्धा आहे. निसर्गनिर्मित असणाऱ्या गोष्टीवर परमेश्वर नक्कीच आक्षेप घेत नसतो.  या  प्रथा मानवनिर्मित आहेत. यात स्त्रीला शारीरिक त्रासाला समोर जावंच लागत पण तिला अशी वेगळी वागणूक दिल्याने तिला अजून त्रास होतो. विटाळ पाळण्यापेक्षा देवावर खरी श्रद्धा ठेवावी, शुद्ध मनाने त्याची पूजा करावी म्हणजे अशक्य गोष्टीही शक्य होतात. अंधश्रद्धेपेक्षा मनापासून केलेली श्रद्धाच जिंकली हे आज विघ्नहर्ताने सिद्ध केलं.

सासूबाईंच्याही पोटात दोन दिवसांपासून जो भीतीचा गोळा फिरत होता तोही बसला लगेच. त्याही म्हणाल्या की “तुझ्या सारख प्रत्येक बाईला वाटत असते ग ही गोष्ट नैसर्गिकच आहे, त्याचा संबंध या देवपूजेशी वगैरे का असेल? पण लहानपणापासून मनावर एवढं बिंबवलेलं असत की त्या पाच दिवसात अलिप्त राहणं अगदीच अंगवळणी पडून जात आणि मग मनही धास्तावत या प्रथेविरोधी वागायला. पण तू आज सिद्ध केलंस विघ्नहर्ता श्रद्धेचा आणि आपल्या मनोभावे भक्तीचा भुकेला आहे. नैसर्गिक प्रक्रियेला तो कसा अमान्य करेल.

खरच  आपला विघ्नहर्ता संकटांवर मात करायची बुद्धी देतो. त्याने तुलाही यावेळी बुद्धी दिली.. विटाळ ही अंधश्रद्धा आहे हे सिद्ध करण्यासाठी. असंच विघ्नहर्ता सर्वांना योग्य बुद्धी देवो आणि सर्वांचं विघ्न दूर होवो.”

दोघी सासू सुना विघ्नहर्ता समोर हात जोडून त्याचे आभार मानतात आणि शक्य होईल तितकं विटाळासारखं विघ्न बाईच्या आयुष्यातून दूर करण्याचा प्रयत्न करू असा संकल्प सोडतात.

लेखाचा विषय नाजूक आणि वादाचा आहे(काहीजणासाठी). या विषयावर कथित लेख लिहिणं मला नक्कीच जमलं नसत. जे लिहिलंय तो खरा अनुभव आहे. प्रत्येक स्त्रीला मनोमन मासिक पाळी ही नैसर्गिक प्रक्रिया आहे त्यात देवपूजा किंवा सणवार आल्यावर एवढी बंधन नसावी अस वाटत असत पण मन कचरत असत पाउल उचलायला. पण हे मानवनिर्मित समज आहेत हे माझं वैयक्तिक मत आहे. यावर मतमतांतर खूप आहेत पण स्त्री जीवनाचा अविभाज्य घटक असतो हा आणि त्यावर योग्य ते प्रबोधन होणं गरजेचं आहे अस मला वाटत?. कोणाच्याही भावना दुखावल्या असतील तर क्षमस्व?.

लेख आवडल्यास किंवा तुमची मत काही वेगळी असल्यास नक्की कंमेंट्स करा. लाईक करा आणि मला फॉलो करा. लेख नावासहितच शेअर करावा ही विंनती??.

©सरिता सावंत भोसले

 

Article Categories:
सामाजिक

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत