विठू माऊली

Written by

पंढरपूरचे ‘विठ्ठल मंदीर’ म्हणजे अवघ्या महाराष्ट्रातील वैष्णव पंथियांचे आराध्य दैवत आहे .या मंदिरातील विठुराया म्हणजे गरीब, सामान्य, वारकरी, जनतेची माऊली आहे. दरवर्षी लाखो भाविक आषाढ आणि कार्तिक महिन्यातील एकादशीला या मंदिराला भेट देतात.

वारकरी संप्रदायातील लोक आषाढी  एकादशीपूर्वी पंधरा दिवस अगोदरच आपल्या मूळ गावाहून निघतात, दिंडीतून पायी चालत तहान भूक हरपून, टाळ मृदुंगाच्या गजरात , मुखाने “विठ्ठल” नाम घेत, भजन, किर्तन करत तल्लीन होऊन आपल्या आराध्य भगवंताच्या भेटीची आस घेऊन निघतात. आषाढी एकादशीला माऊलीचे दर्शन घेऊन धन्य होतात .
पंढरपुरातील ‘विठ्ठल मंदिर “एक हजार वर्षांपासून येथे आहे.तेथे कर कटेवर घेऊन तो वर्षानुवर्षे येथे उभा आहे  पण याला अपवाद म्हणजे, ही मंदिरातील विठ्ठल मूर्ती चार महिने या मंदिरात नव्हती.पंधराव्या शतकातील कर्नाटक, हंपी येथील विजयनगरचा राजा,’राजा कृष्णदेवराय’ पंढरपूरला विठ्ठलदर्शनासाठी येत असे, तो विठ्ठलाचा निस्सीम भक्त होता. एकदा राजाने विचार केला की हा देवच आपल्या बरोबर न्यावा.या साध्यासुध्या मंदिरापेक्षा आपल्या मंदिरात तो जास्त शोभून दिसेल. विजय नगरला येताना तो विठ्ठल मूर्ती सोबत घेऊन आला व ही मूर्ती ‘विजय विठ्ठल’ मंदिरात स्थापन केली. हिऱ्यांचा हार मूर्तीच्या गळ्यात घालून तो भजन व किर्तन करून उत्सव साजरे करू लागला.
आषाढ महिना सुरु झाला तसे वैष्णव पंथीय भक्त चंद्रभागेच्या वाळवंटात जमू लागले. ज्याच्या भेटीच्या ओढीने आपण येथे आलो, तो देवच देवळात  नाही हे पाहून भक्त व्याकूळ झाले .
” देव नाही देवळात ,
देव चोरोनियां नेई ,
अशी कोणाची पुण्याई”
भक्त कासावीस झाले, लोकांना काही सुचेनासे झाले तेव्हा त्यांनी संत एकनाथ महाराजांचे पणजोबा भानुदास महाराज यांना   देवाला  परत घेऊन येण्याची विनंती केली. भानुदास महाराज  कर्नाटकला गेले व मोठ्या कल्पकतेने विठ्ठलाला परत घेऊन पंढरपुरात आले .
कर्नाटकातील हंपी येथे गेल्यावर भानुदास महाराज सर्वप्रथम विजय विठ्ठल मंदिरात देवाला भेटण्यास गेले व आपल्याबरोबर परत पंढरपुरात येण्यास विनंती केली. विठ्ठलाने गळ्यातला रत्नहार भानुदासाच्या गळ्यात घातला. राजाने चोरीचा आरोप त्यांच्यावर ठेवला व त्यांना फाशी देण्याची शिक्षा केली. फाशी देण्याच्या वेळी शुष्क काष्ठ असलेल्या सुळाला पालवी फुटली. राजाला आपली चूक लक्षात आली. तो देवाची क्षमा मागू लागला, देवाला परत पंढरपुरात नेण्याची त्याने परवानगी दिली. विठ्ठलाने राजाचे गर्वहरण केले व भानुदास विठ्ठलाला आपल्या बरोबर घेऊन परत पंढरपूरला आले तो दिवस कार्तिक एकादशीचा होता. अशा पद्धतीने मराठी विठ्ठल कानडी व परत कानडी विठ्ठल मराठी झाला.
संत ज्ञानेश्वर माऊलीचा हा अभंग आहे,
“कानडाऊ विठ्ठलु..     कर्नाटकु….
तेणे मज लावियला  वेडु…….”।
जणू देवाला ‘विजय विठ्ठल’मंदिरात राजा कृष्णदेवराय यांनी घातलेला रत्नजडीत हिऱ्यांचा हार टोचत होता . देव सामान्य, गरीब, कष्टकरी, वारकरी, संतजन यांच्या भक्ती भावाचा भुकेला होता त्यांची माऊली होता. त्याला भक्तांची गाऱ्हाणी ऐकायची होती, त्यांच्या समस्यांचं निराकरण करायचं होतं , त्यांना मदत करायची होती म्हणून देवाला पंढरपूर नगरीच प्रिय होती.विजयनगरच्या वैभवशाली महालात राहण्याऐवजी लोकांच्या हृदयात वास्तव्य करायचे होते, त्यांच्या ओठांवर राहायचे होते, तुळसीच्या माळा घालायच्या  होत्या, चंदनाचा लेप लावायचा होता म्हणून देव भक्तांच्या भेटीसाठी, प्रेमापोटी, भक्तांच्या ओढीने देव  संत भानुदासांचा बरोबर पंढरपुरात परत आला व युगानुयुगे तो भक्तांसाठी विटेवर उभा आहे……

सौ.सुप्रिया रामचंद्र जाधव

Comments

प्रतिक्रिया व्यक्त करा