विश्वास

Written by

विश्वास:-

चारही बाजूंनी आलेली संकट पाहून तिला वाटले, आपण मरून जावे, काय ठेवलं आहे जगण्यात?
काहीच चांगले होत नव्हते तिच्या आयुष्यात!
चार महिन्या पूर्वी तिचा बिझिनेस मध्ये अफाट लॉस झाला होता. देणेकरांची देणी देता देता तिच्या नाकी नऊ आले होते. त्यातून ती कुठे सावरतेय तर तिची 19 वर्षाची मुलगी कोणा मुलाबरोबर पळून गेली होती.
हा धक्का ती पचवत असताना तिचे वडील जे तिचे सगळ्यात मोठे श्रद्धास्थान होते ते अचानक कारर्डीक अरेस्ट ने कायमचे निघून गेले होते.
या सगळ्यात ती अतिशय त्रासली असतानाच काल रस्ता क्रॉस करताना एक मोटर सायकल वाला तिला उडवून गेला होता आणि तिच्या गळ्यात तिचा हात पुढच्या 3 आठवड्या साठी बांधला गेला होता.
प्लॅस्टर नावाचा दागिना तयार झाला होता ना तिच्यासाठी!
अश्या चारही बाजूने अडचणी आलेल्या पाहून तिच्या खंबीर मनाने कच खाल्ली.
असे आयुष्य जगायचे कशाला त्यापेक्षा जीव देऊन मोकळे व्हावे या विचारांनी ती आज कुणालाही न सांगता बाहेर निघाली होती.
टॅक्सी करुन शहराच्या दुसऱ्या बाजूला जी ओसाड टेकडी होती तिथे ती आली होती. ओसाड टेकडी वर एकच मंदिर होते जिथे कोणीच यायचे नाही हे तिला माहिती होते.
ओसाड टेकडी च्या पुढे मोठी दरी होती तिथेच तिचा जीव द्यायचा विचार नक्की झाला होता.
चालत चालत ती दरीकडे निघाली होती.
“पोरी अडचणीत दिसतीये”
तिने मागे वळून पाहिले तर एक जटाधारी साधू तिला दिसला.
चेहऱ्यावर तेज, गळ्यात रुद्राक्षा च्या माळा आणि कपाळाला लावलेले भस्म असा तो साधू तिला एवढा वेळ दिसलाच नव्हता.
“का हो तुम्हाला असे वाटले?”
“तुझा चेहरा सांगतो आहे ते”
“तुम्ही चेहरा वाचता का”
“हाहाहा….असे म्हणले तर चालेल पोरी”
“अनोळखी लोकांना काही सांगणे मला योग्य नाही वाटत”
“कधी कधी अनोळखी लोकं योग्य सल्ला देऊ शकतात पोरी”
“नको साधू बाबा, माझी संकटे मलाच दूर करायची आहेत.”
“संकटे दूर करायची म्हणतेस आणि मग जीव द्यायला का चालली आहे”
आता मात्र अनघा चपापली.
“जीव कोण देतंय बाबा, मी आपली सहज दरी किती खोल आहे हे बघायला चालली होते”
“पोरी माणूस सगळ्यांना फसवू शकतो स्वतःच्या मनाला नाही”
साधू ने असे म्हणाल्यावर, अनघा च्या डोळ्यात झटकन पाणी आले.
“चल तिथे, मंदिरा पाशी. आपण सावलीत जाऊन बोलू”
ती त्या साधूला नाही म्हणू शकली नाही. मंदिराच्या अलिकडे एका पडवीवर साधूचे एक पांघरूण ठेवले होते. ते त्याने उलगडले आणि अनघा ला बसायला दिले.
तिला पाणी दिल्यावर तो म्हणाला,”माझ्या कडे फक्त पाणीच आहे तुला द्यायला बर का!”
ती थोडीशी हसली आणि तिने पाणी पिले.
पाणी थंडगार होते आणि त्याची चव पण वेगळीच होती.
थोडे बरं वाटलं तिला.
“काय, कंटाळलीस का जगण्याला?”
“हो बाबा, खरंच कंटाळले. नको वाटते हे जीवन. एका पाठोपाठ एक संकटे येत आहेत जी मला कमकुवत बनवत आहेत. असे वाटतंय मी नाही झेलू शकणार. खरंच हरले मी “
साधू मोठ्याने हसला आणि म्हणाला,
“मला एक सांग, तुला तुझ्या आई वडिलांनी जन्म दिला. त्यानंतर त्यांनी बालपणी तुझे लाड केले असतील तेव्हा तुला मरावसे वाटले का ग?”
“नाही”
” जेव्हा तुझ्या आयुष्यात चांगले घडत होते, तेव्हा तुला मरावसे वाटले का?
“नाही”
“तुझ्या लग्नाच्या दिवशी? तुला मूल झाले त्या दिवशी?”
“नाही”
“तुझा बिझनेस जेव्हा उत्तम चालत होता तेव्हा का नाही मारायचा विचार केला?”
“बाबा, चांगल्या क्षणी माणूस हा आनंदाचा विचार करतो, मरायचा नाही”
“आणि मग मला सांग, जेव्हा त्याची वाईट वेळ येते, तेव्हा तो त्याला चांगल्या वेळे प्रमाणे का नाही स्वीकारत? तेव्हा का त्याला जगायचे नसते?”
“………..”
“जसे सुख माणसाला हवे असते तसे त्याला दुःख स्वीकारता येत नाही पोरी, आणि हेच माणसाला त्रास देते.
जो भक्कम आहे तो त्यातून बाहेर पडू शकतो, कमकुवत माणूस मरणाला शरण जातो. तू आत्ता कमकुवत झाली आहेस म्हणून हे टोकाचे पाऊल उचलत आहेस”
” बाबा, मी काय करू? मी थकलेय! खरोखरच थकलेय! एकटीच लढत आहे, झुंजत आहे आणि त्यातून मार्ग काढायचा प्रयत्न करीत आहे. आणि आता तो ही दिसत नाही म्हणून वैतागली आहे!”
“मार्ग तुला दिसत नाही कारण तू मार्ग शोधत नाही आहेस!
तू संकटांना एवढे मोठे आणि स्वतःला एवढे छोटे केले आहेस की तुला फक्त त्रास दिसत आहे”
“….……..”
” मला सांग, तुझा बिझिनेस मधला तोटा कधीच भरून निघणार नाही असे होईल का?”
“नाही, असे नाही. प्रयत्न केला तर एका वर्षात मी परत पूर्वीच्याच स्थानावर येऊ शकते”
“छान, मला सांग! तुझ्या मुलीने तिच्या आवडीच्या मुलाला पसंत केले तर यात तुझा अहंकार का दुखावला? तुझ्या मर्जीने तिने लग्न केले असते तर तुला आनंद झाला असता आणि ती पळून गेली तर तुला त्रास होतोय. पण पोरी मला सांग ती तिच्या आयुष्यात जर स्वतःच्या निर्णयाने सुखी राहणार असेल तर तुला तिच्या आनंदात स्वतःचा आनंद शोधणे अवघड आहे का?”
“नाही बाबा, मी असा विचार करून आनंदी राहू शकते”
“तुझे वडील हे तुझे श्रद्धास्थान होते. पण त्यांचे वय आता 78 झाले होते.पिकलेले पान कधीतरी गळणार हे तुला माहिती नाही का पोरी?”
“नाही बाबा, पण आपला माणूस गेला की वाईट वाटते ना!”
“वाटते, पण तुझे जग तर चालू होतेच ना! तुझा बिझिनेस, तुझा दिनक्रम हे थांबले नाही, हो ना”
“मान्य आहे बाबा”
” आणि काल जर तुला एका बाईक वाल्या च्या ऐवजी एका गाडी वाल्याने उडवले असते तर काय काय तुटले असते?”
अनघा हसत म्हणाली, “हात पाय गुडघे अजून काय काय, नाही माहिती”
“म्हणजेच तू हा विश्वास ठेवला पाहिजे की ‘जे होते ते चांगल्या करिता च!’ जर हा विश्वास असेल तर तुला घडणाऱ्या नकारत्मक गोष्टींचा कधीच त्रास होणार नाही”
अनघा खूपच प्रभावित झाली होती.
इथल्या वातावरणात आणि साधूच्या सानिध्यात ती स्वतःला खूपच नॉर्मल फील करून देत होती.
” बाबा, माझे विचार तुम्ही पूर्णपणे बदलले आहेत. मी अजून जोमाने सगळ्या कामाला लागेन”
“शाब्बास मुली…जा आता सुखी राहा! आणि लक्षात ठेव “स्वतःवरचा विश्वास कधीच कमी होऊन द्यायचा नाही, सगळे चांगले होईल”
ती साधूला नमस्कार करायला गेली तर तो म्हणाला, “आम्हाला नाही आत जो देव आहे त्याला नमस्कार कर”
ती बरं म्हणून उठली.
मंदिरात प्रवेश केला आणि तिथली घंटी वाजवली.
घंटी वाजवल्या वर तिथे बाजूला पुजारी झोपला होता तो उठला. त्याने गाभाऱ्यात जाऊन अनघा ला तीर्थ आणि प्रसाद दिले.
तिने पुजाऱ्याला विचारले, “हे बाहेरील साधू बाबा जे आहेत, यांचे नाव काय आहे हो?”
“कोण साधू बाबा?”
” ते बाहेरील पडवी ला जे बसलेत ना ते”
“बाळा, इथे कोणीच साधू नाही आहे”
“अहो असे काय करता, चला मी दाखवते”
ती पुजाऱ्याला घेऊन तिथे आली तर तिथे कोणीच नव्हते.
ना साधू-ना ते पांघरूण!
ती इकडे तिकडे बघायला लागली तर तिथे कोणीच दिसले नाही
पुजारी तिच्याकडेच बघत होता.
तो म्हणाला, “इथे कोणी साधू वगैरे येत नाही बाळा. मीच पूर्णवेळ इथेच असतो”
अनघा ला लक्षात आले की त्या साधू ने आपण न सांगता आपल्या सगळ्या प्रॉब्लेम्स ला ओळखले होते आणि त्याची उत्तरे सुध्दा दिली होती.
तिला कळले, की साक्षात ‘भगवंत’ साधूच्या रुपात येऊन तिला सांगून गेला होता.
ती धावतपळत आत गाभाऱ्यात गेली,
“देवा, तुझी महिमा अपरंपार आहे. तू कधी कुठल्या रुपात येऊन काय आशीर्वाद देऊन जाशील काहीच सांगता येत नाही.
मी आत्महत्या करायला निघाले तर देवा तू मला साक्षात येऊन वाचविलेस! देवा तूच मार्ग दाखवतो हे खरंच आहे ! खरंच सगळी तुझी महिमा!”
तिला साधूचे शेवटचे वाक्य आठवले, ” पोरी स्वतःवर विश्वास ठेव ,सगळे चांगले होईल”
ती पुढे म्हणाली, ” देवा, आजपासून मी माझ्यावरचा माझा विश्वास कधीच कमी होऊन देणार नाही”
तिच्या या वाक्याने तिला त्या मूर्तीचा चेहरा क्षणभर हसरा वाटला.
त्याच क्षणाला तिचा देवा वरचा आणि स्वतःवर चा ‘विश्वास’ अनेक पटींनी वाढला होता.
©अमित मेढेकर

Article Categories:
मनोरंजन

Comments are closed.