वीज

Written by

गीता गजानन गरुड.
आंब्रड.

#वीज

प्रिया व परेष प्रेमपाखरं.एक वर्ष होत आलं लग्नाला तरी नव्याची नव्हाळी सरत नव्हती.परेश अगदी राणीसारखी ठेवायचा प्रियाला.घरकामाला माई होती.तीची दोन मुलं होती.इथे आडगावात परेशची बदली झालेली.माईचं बाजूलाचं झोपडीवजा घर होतं.पोरंही गुणी होती. प्रियाचं व माईचं छान पटायचं.

माईकडून प्रियाने पुरणपोळी,घारगे,उकडीचे मोदक असं बरंच शिकून घेतलं होतं.माईच्या हातचे मांडे प्रियाला व परेशला खूप आवडायचे.पावसाळ्याच्या दिवसांत माई भातलावणीसाठी वगैरे सुट्टी घ्यायची.प्रियाही तिला हसतमुखाने सुट्टी द्यायची.इतकंच नाही तर तिच्या शेतात थोडसं कामही करायची.मग माईला अगदी भरुन येई.एवढी मोठी साहेबाची बायको पण गर्व काय तो नाही म्हणायची.दुपारची प्रिया बरेचदा माईबरोबरच पिठलंभाकरी खायची.माईचा धनी मजुरीला जायचा.

या वर्षी पाऊस काही केल्या थांबायचं नाव घेत नव्हता.पीक तर जोमाने आलेलं पण सुर्यदेव डोळा उघडत नव्हता.गेले दोन दिवस तर पावसाने हाहाकार केला होता.नदीने रौद्र रुप धारण केलं होतं.सकाळीच माईने धन्याला सांगितलं,”आज काय बाय पावसाचा खरा दिसत नाय तवा आज शेतातलाच काय ता करा.भायर पडा नको.”

तिच्या धन्याने काय तिचं ऐकलं नाही.तो गेला.पावसामुळे शेतात भात कापायला जाता येत नव्हतं.पीकं पाण्यात वाकली होती.अजून थोडे दिवस तशीच परिस्थिती राहिली तर भाताला अंकुर फुटण्याची भिती होती.पोरांना शाळेने सुट्टी दिली होती.

माईने सकाळीच प्रियाच्या घरी जाऊन सगळं आवरलं.आताशा प्रियाच्या पोटात अन्नाचा कण टिकत नव्हता.उलट्या करुन हैराण झाली होती.माईने तिच्यासाठी गरमगरम आठवल बनवलं व मेतकुट घालून तिला दोन घास बळेबळेच भरवले.परेशची ऑफिसात जरुरी मिटींग होती.माई प्रियाकडंचं सगळं आवरुन आपल्या घरी गेली.पोरांना अंड्याची पोळी व भाकऱ्या करुन दिल्या.पोरं पटापटा जेवली मग खेळून खेळून निजली.

सहा वाजले तसा परत काळोख भरुन आला.माईने धन्यासाठी न्हाणीत पाणी तापत ठेवलं.कुळदाचं मोडवणी,तिच्या धन्याच्या आवडीचं..ते बनवलं..चुलीवर भाताला आदण घातलं व अंगणात वाळलेले कपडे काढायला गेली.टपाटपा गारा पडायला लागल्या.सोसाट्याचा वारा सुटला.सगळीकडे धुळीचं साम्राज्य झालं.रोरो करणारा तो वारा अभद्राची चाहूल देत होता जणू.पोरं उठली तशी माईने दोघांनाही चहा,बटर दिले.प्रियाकडे जाता येत नव्हतं प्रियाबाय काय करत असेल..धनी केंव्हा येतील..माईच्या मनात हजार शंकाकुशंकांनी गारुड केलं.तिन्हीसांज होत आली तसा माईने देवाला दिवा लावला.

परेश मिटींगहून परतताना त्याला माईचा धनी दिसला बसडेपोजवळ.परेशने त्याला आग्रहाने गाडीत बसायला लावले.तोही बिचारा अंग चोरून बसला.वारा जोरात वहात होता.पुढचं काही दिसायला मार्ग नव्हता.त्या रस्त्यावर चिटपाखरुही नव्हतं.

आज परेश खूश होता.आज त्यांच्या लग्नाचा पहिला वाढदिवस होता.त्याने प्रियासाठी हिऱ्याचे इअररिंग्स घेतले होते.त्याला त्याच्या पियुला सरप्राईज द्यायचं होतं.तिला आत्ता खूश ठेवायचं होतं.येताना त्याने तिच्या आवडीचा पायनेपल फ्लेवरचा केक घेतला होता.मस्त केंडल लाईट डिनर करायचा विचार होता म्हणून जेवणही होटेलमधून पेक करुन घेतलेलं.तिच्या आवडीची चिकन तंदुरी व बटर चिकन.आताशा ती काही खातच नव्हती पण एखादा घासतरी खाईल म्हणून घेतलेलं त्याने.ऑफिसच्या पाठीमागच्या झाडाचे रानआवळेही शिपायाकडून काढून घेतलेले प्रियासाठी.

आणि..आणि..विजा कडाडू लागल्या.प्रिया घरात फार घाबरली होती.एक आवाज तर कानठळ्या बसवणारा होता..तोच विनाशकारी ठरला..आकाश भेदून बाहेर पडलेल्या त्या वीजेने क्षणभरात होत्याचं नव्हतं केलं.परेशच्या गाडीवर वीज पडली.क्षणार्धात गाडीने पेट घेतला..दोघेही त्यात होरपळले..काहीचं उरलं नव्हतं.वीजेचा गडगडाट थांबला तसं लोकांनी जाऊन ते द्रुश्य पाहिलं.पोलीसपाटलाला कळवण्यात आलं.पोलीसपाटलाने माईच्या व प्रियाच्या घरी ही बातमी दिली.कसली गरिबी अन् कसली श्रीमंती..त्या विद्युल्लतेला दोघीही सारख्याच होत्या.तिने दोन घरं पोरकी केली होती.दोघींचंही कपाळ पांढरं केलं होतं..

Article Categories:
मनोरंजन

प्रतिक्रिया व्यक्त करा