वेडावणारे सौंदर्य#कथालेखन

Written by

“आशा सगळे सामान नीट घेतलस का मुख्य तर तुझे औषध घे आणि एटीएम कार्ड या दोन महत्त्वाच्या गोष्टी सोबत असल्या की बाकी काही नसलं तरी मॅनेज करता येते” पतिराज बोलत होते.
“हो हो सगळं घेतलंय चालत तुम्ही माझ्या अकाउंटला पैसे ट्रान्सफर केले आहेत हेही मला माहीत आहे”
मी त्यांना आश्वासक स्वरात ,सर्व तयारी नीट झाल्याचं सांगितलं.आता फक्त पाण्याच्या बाटल्या आणि संध्याकाळच्या जेवणाचा डबा टाकला की मी जायला तयार होते. दुपारी दोन वाजता बस निघणार होती. मी निघाले होते, मध्यप्रदेशातल्या ,जैन तीर्थस्थाने आणि इतर प्रेक्षणीय स्थळे बघण्याच्या यात्रेला.
दरवर्षी मी अगदी डोळ्यात तेल घालून,या यात्रेची वाट बघत असते. घरीही मुलगा आणि अर्थातच नवरोबा यांची ,या यात्रेला जाण्याला पूर्ण परवानगी असते ,कारण तिथे काळजी घेणारे बरेच लोक सोबत असतात, काही माझे बहीण-भावंडे ही या यात्रेत सहभागी असतात. त्यामुळे माझी काहीच काळजी नसते.या दोघांनाही विशेष आवड नाही म्हणा किंवा असा सामूहिक प्रवास जमत नाही म्हणून म्हणा, पण हे दोघांनाही माझ्यासोबत येण्यात काहीच रस नसतो, पण मला मात्र हे दहा-बारा दिवस पूर्णपणे घरकाम आणि इतर गोष्टींपासून छानशी सुटका असते आणि म्हणतात ,तसं ‘केल्याने पर्यटन मनुष्य चातुर्य येतसे फार.
अर्थातच लिखाणाचे बरेच विषय या प्रवासात मिळतात, वेगवेगळी माणसे भेटतात आणि खरोखरच प्रत्येक प्रवासागणिक मी समृद्ध होत जाते.
यावेळी माझ्या सोबत बस मध्ये माझी सहप्रवासीनी होती सुरेखा. तिचं नाव वाचून ,मनामध्ये एक प्रतिमा तयार झाली होती. तिला बघून मात्र मन खट्टू झाले. मी स्वतः दिसायला फारशी सुंदर नसले तरी ठीक आहे. चारचौघीत यापैकी उठून दिसणारी आहे आणि ही सुरेखा मात्र आपल्या नावाच्या अगदी विरुद्धार्थी होती. काळा सावळा रंग, थोडीशी जाडजूड प्रकाराकडे झुकणारी शरीरयष्टी. फारसा आकर्षक नसलेला चेहरा आणि त्याच्यावरती चष्मा. आता तिच्यासोबत दहा दिवस बस मध्ये बाजूला बसावे लागणार. वेळ पडली तर रूममध्ये ही शेअरिंग करावे लागणार. या विचाराने मी खरंतर बरीच खट्टू झाले, पण करणार काय ,माझ्याकडे काही सहप्रवासी नि बदलवण्याचा चाॅइस नव्हता.
मी काही “रंग माझा वेगळा’ मधल्या सौंदर्यासारखी काळ्या रंगाच्या माणसांचाद्वेष करणारी नव्हते, त्यामुळे मला फार फरक पडणार नव्हता.
तीस-पस्तीस दरम्यान सुरेखाचं वय असावं ,असा मी अंदाज बांधला. अर्थातच गप्प बसून प्रवास तर शक्यच नव्हता. हाय-हॅलो केले. तिच्याशी बोलताना लक्षात आले की सुरेखा दिसायला जरी सुरेख नसली ,तरी आवाज मात्र खरोखरच गोड आणि सुरेख होता. मला स्वतःला थोडसं फ्रस्ट्रेशन आलं .माझ्या जाड्याभरड्या आणि बुलंद मोठ्या आवाजाबद्दल, पण करणार काय आता देवाने नाही दिला चांगलं गाणं म्हणण्यासारखा आवाज! चालवून घ्यायचं.
अर्थातच बस सुरू झाली आणि मग सुरू झाला परिचय.आमच्या बसचे कॅप्टन फारच उत्साही, त्यामुळे ‘एकेकाने आपापला परिचय करून द्यावा, म्हणजे पुढचे दहा दिवस प्रवास करताना आपल्याला एकमेकांची अजून जास्त ओळख होत जाईल’असे म्हणून ,त्यांनी सूरवात केली.
मी आपली साधीसुधी गृहिणी ,काय मोठी ओळख करून देणार? पण माझ्याकडे असणाऱ्या लिखाण कौशल्य बसमधल्या काही जणांना माहितीच होतं ,त्यामुळे मी त्याविषयी बोलले. त्यानंतर उभी राहिली सुरेखा तिची ओळख करून द्यायला.
“मी सुरेखा जैन. धुळ्याला राहते. तिथे नायब तहसीलदार म्हणून काम करते आणि आकाशवाणीवर गाणी म्हणते. मला स्वयंपाकाची खूप आवड आहे. माझ्या दिसण्यामुळे,. माझं लग्न नाही झालं, पण वयाची तिशी ओलांडल्यानंतर, मी एक सहा वर्षाची मुलगी दत्तक घेतली आणि आता त्या मुलीसोबत माझं एकल पालकत्व,आणि आयुष्य मजेत चालू आहे.
माझ्या लग्नाचा माझ्या आई-वडिलांनी प्रयत्न केला नाही, असं नाही पण माझ्या दिसण्यामुळे आणि लोकांना,विशेषतः पुरुषवर्गाला असणाऱ्या सौंदर्याच्या वेडामुळे ,माझं लग्न जमलं नाही. पण त्याचा बाऊ न करता. मी लग्न न करण्याचा निर्णय घेतला, आणि नोकरी करायला सुरुवात केली. हळूहळू नायब तहसीलदार पदावर पोचले आणि आता लवकरच तहसीलदार पदावर माझं प्रमोशन होणार आहे.
केवळ दिसण्याला सौंदर्य मांनणाऱ्या माझ्यासारख्या अनेकांसाठी सुरेखाची ओळख, मनाचं सौंदर्य वेडावणारे असतं, हे जाणवून देणारी होती.
आपलं लग्न झालं नाही म्हणून .रडत भेकत न बसता, स्वतःच्या पायावर उभा राहून .एका अनाथ मुलीला दत्तक घेऊन ,तिची जबाबदारी घेणाऱ्या सुरेखा बद्दल माझं मन आदराने भरून आलं. मला मनाच्या सौंदर्याचं वेड लावणार्‍या, या सुरेखा सोबत 10 दिवसात खूप काही शिकले.वेगवेगळे विचार ,तिने वाचलेली वेगवेगळे पुस्तक, तिच्या काही भन्नाट रेसिपी आणि तिच्या मुलीचे किस्से. खरोखरच तिच्यासोबत माझा प्रवास, अविस्मरणीय झाला, सौंदर्याची नवीन व्याख्या दाखवून देणारा ठरला.

भाग्यश्री मुधोळकर

Article Categories:
मनोरंजन

Comments are closed.