“वेळ सांगून येत नसते”

Written by

“वेळ सांगून येत नसते”… 

एक वर्षांपूर्वीची गोष्ट. 22 जानेवारी 2018 सकाळचे नऊ वाजले होते. मालती ताई शाळेत जायची तयारी करीत होत्या, त्यांना नुकतीच बढती मिळाली होती. जिल्हापरिषदेच्या शाळेमध्ये मुख्याध्यापिका म्हणून त्या नुकत्याच रुजू झाल्या होत्या. मालतीताईंचे मिस्टर दोन वर्षांपूर्वी एक छोट्याशा आजाराचे निमित्त होऊन हे जग सोडून गेले होते. तेव्हापासून अभी हा एकमेव त्यांचा आधार होता.

अभीही खूप हुशार होता, इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षाला शिकत होता. कॉलेज कॅम्पस थ्रू एका कंपनीत त्याचे सिलेक्शन झाले होते. आता या वर्षानंतर पुन्हा कधी भेट होईल माहीत नाही म्हणून सर्व मित्रांनी पिकनिकला जायचे ठरवले होते. अभी खूप खुश होता, या खुशीतच तो बाहेर पडला.

अभी : “आई, मी गेलो गं! रात्री जेवायला वाट बघू नको, यायला उशीर होईल… जेवूनच येईन” असे म्हणत त्याने गाडी स्टार्ट केली.

आई : “अरे, खूप उशीर करू नका आणि गाडी सावकाश चालव बरं, फोन घेतलास का ?”

अभी : “हो ग आई, घेतलाय. चल निघतो मी, उशीर झालाय, सगळे वाट बघत असतील” असे म्हणत तो गेला ही.

आई : “अरे, हेल्मेट घातलेस का…? … कसा हा मुलगा वेंधळा, हेल्मेट इथेच विसरला.”

मालतीताई हताश होत स्वतःची आवराआवर करून शाळेत गेल्या पण का कोण जाणे त्यांना एक अनामिक हुरहूर लागून राहिली. त्यांना खूप अस्वस्थ वाटत होते. सारखे वाटत होते, ‘अभिला फोन करावा का .. ?’, ‘नाही, नकोच’. ‘उगाच अभिला काळजी लागून रहायची’. दुपारचे 2 वाजत आले होते, त्यांचे कामात लक्ष लागत नव्हते.

इतक्यात फोन वाजला, त्यांनी घाईतच उचलला. अभिच्या मित्राचा फोन होता. क्षणभर काय झाले कळलेच नाही, त्यांच्या हातून मोबाईल खाली पडला आणि त्या मटकन खुर्चीत बसल्या. मालतीताईंच्या पायाखालची जमीनच सरकली. उपमुख्याध्यापक तिथेच होते, त्यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून शिपायाला सांगून स्टाफरूममधील शिक्षकांना बोलावनं पाठवलं. मालतीताईंना पाणी पिण्यास दिले आणि त्यांचा फोन उचलला.

पलीकडून अभिच्या मित्राने अभिचा ऍक्सिडेंट झाल्याचे सांगितले. त्याला सिटी हॉस्पिटल मध्ये ऍडमिट केले आहे आणि परिस्थिती गंभीर असल्याचे सांगितले. थोड्याच वेळात मालतीताईंना घेऊन उपमुख्याध्यापक आणि दोन शिक्षक हॉस्पिटलला पोहोचले.

अभी आय. सी. यु. मध्ये होता, त्याच्या डोक्याला प्रचंड मार बसला होता. मेंदूमध्ये झालेल्या रक्तस्त्रवामुळे डोळ्यांकडे जाणाऱ्या नसा विक झाल्या होत्या आणि त्यामुळे आता त्याला कधीही काहीही दिसणार नव्हते. हे ऐकून मालती ताईंच्या डोळ्यासमोर अंधार दाटला आणि त्या ओक्साबोक्षी रडू लागल्या. त्यांना कसे समजावे हे सोबत आलेल्या शिक्षकांना कळत नव्हते कारण अभी पूर्ण दृष्टिहीन झाला होता.

एक छोटीशी चूक किती महागात पडली होती, तेव्हाच हेल्मेट घालून घराबाहेर पडला असता तर आज ही वेळ आली नसती. पण प्रारब्ध, नशिबाचे भोग दुसरे काय. असे घडणार होते बहुतेक म्हणून त्याला हेल्मेट न घालण्याची बुद्धी झाली असावी नाहीतर अभी सारखा स्वतः बरोबर इतरांचीही काळजी घेणारा मुलगा, त्याच्या हातून अशी चूक होणे अशक्य होते.

दहा दिवसातच अभी घरी आला. सोबत काठी होती, तीच आता आयुष्याची सोबती बनली होती. म्हणून ‘सर्वांनी हेल्मेट जरूर वापरा’, ‘थोडा वेळ जरूर लागेल कारण वेळ सांगून येत नसते.’ अभिच्या ऍक्सिडेंटनंतर बरोबर एक वर्ष आणि पंधरा दिवसांनी हॉस्पिटल मधून फोन आला. अभिला चेकिंग साठी बोलावले होते.

अमेरिकेत अभ्यासासाठी गेलेली डॉक्टरांची टीम मुंबईत परत आली होती आणि ऍक्सिडेंटमध्ये रक्तस्रावामुळे विक झालेल्या नसांना पुनर्जीवित करणे शक्य झाले होते आणि म्हणूनच अभिला बोलावले होते. हे ऐकून मालतीताईंना कधी एकदा डॉक्टरांना भेटते असे झाले.

त्या अभिला घेऊन लगेचच हॉस्पिटलला पोहोचल्या. अभिची तपासणी झाली त्यासाठी काही टेस्ट करणे गरजेचे होते, त्या टेस्टच्या रिपोर्टवर अभिचे ऑपरेशन होणार की नाही हे ठरणार होते म्हणजे अजून टांगती तलवार अभी आणि मालतीताईंच्या डोक्यावर होती.

त्या अखंड देवाचा धाव करीत होत्या पण त्यांना आतून कुठेतरी खात्री वाटत होती की अभीचे ऑपरेशन होणार आणि तसेच झाले. अभिच्या ऑपरेशनचा दिवस निश्चित झाला. निष्णात डॉक्टरांची टीम अभिच्या ब्रेनचे आणि डोळ्यांचे ऑपरेशन करणार होती.

हा प्रयोग होता आणि तो सक्सेस झाला तर अभिला त्याची दृष्टी कायमची परत मिळणार होती आणि नाही सक्सेस झाले तर अभिला कायमचं अंधत्व घेऊन जगावे लागणार होते. पण अभी आणि मालती ताईंनी आशा सोडली नाही, असेही अंधत्वाचा सामना करत आहोतच; दृष्टी पुन्हा मिळवण्याची एक संधी देवानेच आपल्याला दिली आहे, आता काहीही होवो सामोरे जायचे हे मनाशी पक्के ठरवून अभी ऑपरेशनथिएटर मध्ये रवाना झाला.

बाहेर मालतीताई, अभिचे मित्र आणि मालतीताईंच्या शाळेतील त्यांचे सहकारी शिक्षक उपस्थित होते. सगळे एकदम शांत होते पण प्रत्येकाच्या मनात काही न काही विचार चालू होते. ऑपरेशन जवळ जवळ तीन तास चालू होते.

या तीन तासात मालतीताईंच्या डोळ्यासमोरून अख्खं वर्ष गेलं. या वर्षात अभिला आलेल्या अडचणी, त्याची झालेली चिडचिड, अभिची अवस्था पाहून त्यांचं हेलावणारं मन, अभिच्या मित्रांनी वेळोवेळी केलेली मदत, सावलीसारखी त्यांनी अभीची केलेली सोबत,वेळोवेळी अभिला दिलेला धीर. सारं सारं… नजरेसमोरून गेले.

अभिचे ऑपरेशन झाले. दहा दिवसांनी त्याच्या डोळ्यांवरील पट्टी निघणार होती. आज तो दिवस आला.. मालती ताई देवाची पूजा करून शांत मनाने हॉस्पिटलला पोहोचल्या. सोबत अभिचे मित्रही होते, तरीही थोडी धाकधूक होतीच.

डॉक्टरांनी सर्वांना आत बोलावले तशा मालतीताई आणि अभीचे मित्र पोटात गोळा आल्यासारखे एकमेकांकडे बघत रूममध्ये गेले. अभी एका खुर्चीवर बसला होता. डॉक्टरांची टीम बाजूलाच उभी होती. हळू हळू डॉक्टर अभिच्या डोळ्यांवरील पट्टी काढू लागले, शेवटची पट्टी ही काढली आणि अभिला हळू हळू डोळे उघडायला सांगितले.

मालती ताई अगदी जीव मुठीत घेऊन उभ्या होत्या. डॉक्टरांनाही खूप उत्सुकता होती. अभिने हलकेसे डोळे उघडले आणि पुन्हा घट्ट मिटून घेतले, मालतीताईंना धस्स झालं. डॉक्टरांनी अभिला धीर दिला आणि हळू हळू पुन्हा डोळे उघडायला सांगितले. अभिने डोळे उघडले, तो मख्ख चेहऱ्याने समोर पहात होता; जणूकाही त्याला काहीच दिसत नव्हते. डॉक्टर अभिला विचारत होते पण अभी काहीच रियाक्शन देत नव्हता.

अभिच्या समोर मालतीताई उभ्या होत्या, अभिची हि अवस्था पाहून मालतीताईंना राहवले नाही; आवाज न करता त्यांनी आपल्या आश्रुला वाट मोकळी करून दिली. त्यांचे डोळे वाहू लागले आणि अचानक अभिच्या तोंडून शब्द बाहेर पडले, ‘आई, तू रडतेस … ?’ आणि सर्वानाच… अगदी अभिलाही आश्चर्य वाटले कारण अभिला दिसत होते.

डॉक्टरांची टीम प्रचंड खुश झाली कारण त्यांच्या प्रयत्नांना यश आलं होतं. अभि गेले वर्षभर आईचा चेहरा डोळ्यासमोर आणून वावरत होता, त्यामुळे आताही त्याला तीच आई दिसते आहे असे वाटले होते. पण जेव्हा आईचे डोळे वाहताना बघितले तेव्हा त्याची खात्री झाली की आपण पुन्हा पाहू शकतोय. सर्वांनाच खूप आनंद झाला.

आज अभिची खऱ्या अर्थाने जीवनाची नव्याने सुरुवात झाली होती. त्याने मनाशी ठरवलं आणि सांगितलंही कि इथून पुढचे तो त्याचे आयुष्य अंधांचे जीवन सुखकर करण्याच्या कार्यात स्वत:ला वाहून घेणार. मालती ताईंनी समाधानाने मान डोलवली.

मालती ताईंच्या मनावरचं मोठ्ठ दडपण कमी झालं होतं, त्यांनी अगदी मनसोक्त रडून घेतलं कारण गेले वर्षभर त्या अभिला काय वाटेल म्हणून रडूही शकल्या नव्हत्या. मालती ताईंनी देवाचे आभार मानले आणि सर्वजण आनंदाने घरी आले.

© सौ. सुचिता वाडेकर…✍

● विनंती – ‘थोडा वेळ जरूर लागेल… पण सर्वांनी हेल्मेट जरूर वापरा’….. कारण ‘वेळ सांगून येत नसते.’ धन्यवाद! 🙏

Article Categories:
इतर

Comments are closed.