व्यक्ती तितक्या प्रकृती….

Written by

व्यक्ती तितक्या प्रकृती….

© स्नेहा किरण नवाळे (पाटील) ✍️
आज जवळपास तीन वर्षांनी मैथिली बँकेत तिचं बचत खाते कायमच बंद करण्यासाठी गेली होती. मधला वार असल्याने बँकेमध्ये तशी तुरळक लोकं होती. मग तिने तिथल्या कर्मचाऱ्यांकडे खाते बंद करण्याविषयी चौकशी केली. तुलनेने नवीन नियुक्त झालेले आणि वयोवृध्द असे, पासबुक छापणारी एक व्यक्ती तिथे होती, त्या सद्गृहस्थांनी अर्ज  लिहा आणि शाखा व्यवस्थापकांना भेटा असे तिला सुचवले. त्यानुसार मैथिली शाखा व्यवस्थापकांकडे पोहोचली आणि त्यांना खाते बंद करण्यासाठी विनंती केली. व्यवस्थापक बाईंनी अर्ज करावा लागेल असं सांगितलं. आधी ठरवल्याप्रमाणे मैथिलीने विनंती अर्ज बरोबर नेला होताच, तिने तो अर्ज व्यवस्थापक बाईंपुढे सादर केला. काम तस खाते बंद करण्याबाबत असल्याने आणि पूर्वानुभवाला अनुसरून तिथल्या कर्मचाऱ्यांकडून फारसा चांगला प्रतिसाद मिळेल असं मैथिलीने अपेक्षित केल नव्हतच, झालेही तसेच. शाखा व्यवस्थापक बाईंनी अर्जाकडे पाहिलं आणि आवश्यक असलेली कागदपत्रांची मागणी केली. मैथिलीने त्याप्रमाणे कागद काढून दिले, बाईंनी कागदपत्रांची शाहनिशा केली आणि एक रुक्ष कटाक्ष टाकून आठवडयाने उरलेल्या पैश्यांचा धनादेश घ्यायला स्वतः या असे सांगितले. मैथिलीला स्वतः हजर राहणे शक्य नव्हते म्हणून तिने तशी विनंती केली. पण बाईंनी कारण न विचारता ती पार धुडकावून दिली. मैथिलीने त्यांना अडचण सांगण्याचा अयशस्वी प्रयत्न करून पाहिला. पण बाई ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हत्या. नियमानुसार ते बरोबरच होत. पण तिचीही अडचण खरी होती. मैथिलीच अर्ध लक्ष तिच्या बाळाकडे आणि त्याला घेऊन सांभाळत असलेल्या वहिनिकडे होत. मनात जीवाची घालमेल सुरू होती. तिच्या मनात आल की त्यांना सांगावं, की मॅडम कृपया परिस्थिती समजून घ्या. पण त्याचा काही उपयोग झाला नसता. त्यामुळे तिनेही वाद घातला नाही. आणि ती बँकेतून खट्टू होऊन बाहेर पडली.
२ आठवड्यानंतर ती धनादेश घेण्यासाठी बँकेमध्ये गेली आणि तडक व्यवस्थापक बाईंच्या टेबालापशी जाऊन उभी राहिली. व्यवस्थापक बाई इतर कामात व्यस्त होत्या. त्यांनी हसून मैथिलीला समोरच्या खुर्चीवर बसण्याची खूण केली. “आता काही आपण बँकेचे ग्राहक राहीलो नाही, मग ह्या धनादेश दयायला टंगळ मंगळ करतील” असा विचार मनातल्या मनात करत मैथिली निर्विकारपणे खुर्चीवर बसून राहिली. थोड्याच वेळात मैथिलीचा नंबर आला. व्यवस्थापक बाईंनी तिला येण्याचं कारण विचारलं तिनं सांगितलं. तर अनपेक्षितपणे बाईंनी तिला २ मिनिट बसायला सांगितले आणि मिनिटभरात धनादेश काढून दिला आणि कागदपत्रांची पूर्तता केली. लगोलग मैथिलीची सही घेतली आणि धनादेश तिला सुपूर्द केला. त्याहून पुढे जाऊन बाईंनी तिची खाजगी विचारपूस केली. मैथिलीने मग धन्यवाद देऊन त्यांचा निरोप घेतला. हे सगळं इतक्या भराभर घडल की मैथिली भांबावून गेली. अर्थातच त्यात आनंद होता.
बँकेतून निघताना ती हाच विचार करत होती की त्या बाईंच्या पहिल्या आणि आजच्या शेवटच्या भेटीत असलेल्या वागणुकीत आणि वर्तवणुकीत फारच अंतर होत. खरंच म्हणतात न “व्यक्ती तितक्या प्रकृती” याचा प्रत्यक्ष प्रत्यय तिला आज आला होता. एका भेटीत माणसाची पारख करू नये हा सकारात्मक दृष्टीकोन तिला नव्याने उमगला होता. मनोमन हसत मैथिली आज पहिल्यांदा समाधानाने त्या बँकेच्या बाहेर पडली होती.
©स्नेहा किरण नवाळे (पाटील)✍️
मुखपृष्ठ आभार : गुगल

Article Categories:
इतर

प्रतिक्रिया व्यक्त करा