व्यक्त – अव्यक्त

Written by

अगदी सहज व्यक्त होता येणं सुद्धा मला कला वाटते. सगळ्यांनाच नाही होता येत व्यक्त . बऱ्याच वेळा मी खूप इमोशनल झाले, काही सुचेनासं झालं , खूप राग आला की काय बोलायचं मला कधीच सुचत नाही, व्यक्त होता येत नाही आणि अव्यक्त राहिलं की समोरच्यापर्यंत काहीच पोहोचत नाही मग… मग अजून चिडचिड वाढते, अजून भावनांची गर्दी – गडबड होते आणि त्याचा त्रास होतो मग आपल्यालाच… पण कधी कधी काही सिच्युएशन्स अचानक तयार होतात आणि बोलायचं काय ते सुचतच नाही. कधी समोरच्या माणसासमोर काही व्यक्त करण्यात अर्थच नाही असं वाटतं.
आणि फक्त रागच नाही बर का समजावणं, समज देणं, शाबासकी देणं, कौतुक करणं, प्रेम, आपुलकी, जिव्हाळा, आपल्या माणसांबद्दल वाटणार्या भावना असं सगळंच योग्य वेळी व्यक्त करायचं राहून जातं…नंतर विचार करताना मग वाटत राहतं हे बोलले असते तर बरं झालं असतं, उगाच गप्प राहिले… काहीवेळा फासे उलटे पण पडतात, बोलून डोक्याला नसता ताप होतो आणि वाटतं बोललो नसतो तर बरं झालं असतं..
ह्या प्रॉब्लेमवर मी माझं स्वतःचं सोल्युशन शोधून काढलंय. जे काही मला बोलायचंय, व्यक्त करायचंय ते माझ्या डायरीत लिहिते. डायरी नसेल आणि प्रचंड राग आला असेल तर मोबाईलच्या नोट्समध्ये सुद्धा लिहिते. कुणाहीबद्दल जे काही बडबडायचंय ते सगळं लिहून काढते. गंमत वाटेल कुणालाही, पण खरंच लिहून झालं की शांत वाटतं मला. आणि कधीतरी या लिखाणातून माझं मला उमजत जातं की उगाचच चिडलो का आपण? इतकं चिडायचं कारण होतं का? ज्या व्यक्ती बद्दल मी लिहितेय किंवा फार विचार करतेय त्याची गरज आहे का? इतकं महत्त्व खरंच द्यायला हवं का या गोष्टींना…एकदा माझंच मला कळलं, उत्तर मिळालं की बऱ्याच वेळा ती लिहिलेली पाने फाडून टाकते, नोट्स डिलीट करून टाकते आणि तो चॅप्टर कायमचा संपवते सुद्धा.
अगदी शाळा, हॉस्टेल पासून मला ही डायरी किंवा पत्र लिहायची सवय आहे. हास्यास्पद वाटेल कदाचित… पण लग्न झाल्यानंतर घरातल्या घरात मी माझ्या नवऱ्यालासुद्धा खूप पत्र लिहिली आहेत . (फक्त मतभेदाची नाही बर का प्रेमाची पण😉) आत्ताही लिहिते कधीतरी. कारण बऱ्याच वेळा बोलताना शब्द धारदार होतात, नको ते बोललं जातं आणि जे बोलायला हवं ते राहून जातं. त्यापेक्षा लिहिताना किमान थोडा विचार करून जरा बर्या प्रकारे व्यक्त होता येतं आणि पत्रांच्या रूपाने कायमच्या आठवणी राहतात, गोड-कडू प्रसंगांच्या…
काहीजणांचं व्यक्त होणं वेगळेही असू शकतं बरंका.. अव्यक्त राहुन फक्त स्वतःपुरतं व्यक्त होणं.. मग त्या व्यक्तीच्या, प्रसंगाच्या आठवणींत एखादं गाणं ऐकलं जातं.. कविता वाचली जाते किंवा मग त्या आठवणींचीच कविता होते… वाटलंच कधी तर एखाद्या तिसर्‍या माणसा समोर मन भरून बोललं जातं…
खरं तर व्यक्त होणं किंवा न होणं किंवा कसं व्यक्त होणं हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. पण आज काल सोशल मीडियाच्या माध्यमातून, अति वापरातून बरेच जण बऱ्याच प्रसंगांवर, पोस्टवर, कधीकधी उगाच आणि चुकीच्या पद्धतीने व्यक्त होतात, irrelevant comments करणं किंवा दुसऱ्यांच्या भावना उगीच दुखावणं खरंच गरजेचं असतं का दरवेळी… पटलं नाही, उमजलं नाही तर नका वाचू पोस्ट, नका करू फॉलो.. काही गोष्टी सोडूनही देता आल्या पाहिजेत… अव्यक्त राहता आलं पाहिजे..
कुठे, कसं ,केव्हा, कधी, कोणासमोर बोलायचं, की बोलायचं नाही, योग्य की अयोग्य हे सगळं आपलं आपण ठरवायचं. पण व्यक्त किंवा अव्यक्त काहीही असो भावना प्रामाणिक हवी. एकदम दिलसे…

थोडक्यात काय तर ह्या सगळ्या लिहिण्याच्या प्रपंचानंतर आज पुरतं माझं व्यक्त होऊन झालंय…😜 😜

मैत्रेयी दीक्षित-समेळ.

Article Categories:
मनोरंजन

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत