शांत, सुंदर, नीरव … देवबाग

Written by

नुकताच होळीचा सण झाला होता आणि आम्हाला पिकनिकचे वेध लागले होते. यावेळचं ठिकाण ठरल कोकणातलं तारकर्ली. आम्ही अलिबागकर असल्यामुळे समुद्र आपला जवळचा मित्रच जणु. पण तळकोकणात जाण्याचा हा प्रथमच अनुभव होता. तर हो नाही करता करता आम्ही १४ भावंड टेम्पो ट्रावेलेर घेऊन निघालो तारकर्ली सफरीला. गुरुवारी रात्री आमचा प्रवास सुरू झाला. एवढी मोठी गँग असल्यावर कल्ला करण तर ओघानं आलंच. रात्रीचा प्रवास असल्याने गप्पा गोष्टी करत, मधेच झोप काढत पहाट कधी झाली कळलंच नाही. पहाटे पहाटे आम्ही हातखांब्याला पोहोचलो, तिथे टपरीवर चहा ☕ घेऊन ताजे तवाने झालो. तिथल्या गार वाऱ्यात तो वाफाळलेला चहा म्हणजे बोलायची काही सोय नाही. भारी थंडी होती, हूड हूड करणारी ?.

साधारण सकाळी ८, ९ च्या सुमारास आम्ही नाश्ता करण्यासाठी एका ठिकाणी थांबलो. अपेक्षेपेक्षा ते खरंच छान आणि स्वच्छ होत. सुंदर असा बगीच्या होता. आणि अशी ठिकाणं मिळाली की WRF ला (We R Family) फोटोसेशन करण्यापासून कोणीच रोखू शकत नाही ?. सर्वांचं खाऊन आणि फोटो काढून उरकेपर्यंत १० तिथेच वाजले ?. मनात विचार आला आपण डेस्टिनेशन तारकर्ली ला पोहोचणार तरी कधी ? ? एव्हाना उत्सुकता शिगेला पोचली होती. निमुळत्या रस्त्यांच्या दोन्ही कडेला असलेली गर्द झाडी आणि नारळाच्या बागा यातून वाट काढत आमची फौज पोहीचली एकदाची राहण्याच्या ठिकाणी. तिथूनच खरी गोम चालू झाली. इतकावेळ तारकर्ली तारकर्ली करणारे आम्ही कळून चुकलो की आमच्यातल्या आयोजकांनी आम्हाला तारकर्लीच आमिष दाखवून देवबागला (ज्याची माहिती गुगल वर शोधली नव्हती) आणलं?. मग काय? हीच आपली तारकर्ली म्हणत सगळे फ्रेश होऊन जेवणासाठी तयार झाले.
जेवणं झाल्यावर बघते तर काय, एक एक करून सगळे कॉटेजच्या मागच्या बाजुला जाताना दिसले. म्हटलं आपण पण जाऊन बघू तरी या काय आहे तिकडे ?. तशी पावलं टाकत निघाले आणि समोरच दृश्य पाहून बोट आपोआप तोंडात गेलं आणि डोळे विस्फरले ?. एका क्षणासाठी विसरूनच गेले की आता करू तरी काय काय? ?. खरंतर त्या अफाट पण शांत दिसणाऱ्या सागराला पाहून काहीच सुचत नव्हतं. दूरवर पसरलेला तो समुद्र आणि WRF व्यतिरिक्त इतर कोणाचीही वर्दळ नसलेल्या, निर्जन पण आपलसं वाटणाऱ्या त्या वातावरणाने मनाला चांगलीच भुरळ घातली. मग तिथेच फतकल मारली आणि समोर बघत बसले. तिथे बसून समोरील क्षितिजापर्यंत भिडलेला समुद्र आणि वर असलेलं निरभ्र आकाश दोघांना एकत्र न्याहाळणे आणि बरोबर तिथली नीरव शांतता, ही माझ्यासाठी पर्वणीच होती ☺️. नुसतं समुद्राकडे पहात मन मोकळं करण हा माझा आवडीचा छंद असल्याने मी तो पुरेपूर अनुभवला. तो निशब्द संवाद बराच काही बोलून गेला. ते क्षण फक्त माझे होते. त्यावेळची अनुभूती अजूनही मनात साठून आहे. ते परत होणे नाही.

जसा सूर्य माळतीकडे झुकायला लागला तस दादा (आशिष) आणि अतुल मावळतीच्या सूर्याचे फोटो घेण्यासाठी त्यांचे कॅमेरे आणि ट्रायपॉड घेऊन आले. मीही माझ्या Nikon ? मधून बरेचसे फोटो ही घेतले. त्या मावळतीच्या सूर्याचे फोटो तर किती काढू नी किती नको असं झालं होत. कारण प्रत्येक चित्र आधीच्या चित्रापेक्षा वेगळं दिसत होत, निसर्गाची जादूच तशी आहे. मग पाण्यात थोड डुंबून आणि खूप सारे फोटो काढून झाले. म्हणाल तर तिथून उठवसं अजिबात वाटत नव्हतं पण अंधार पडला आणि आम्ही त्यादिवसापुरता समुद्रावरचा आमचा गाशा गुंडाळला.
रात्री भरपेट कोकणी जेवणाचा आस्वाद घेतल्यावर सुरू झालं आमचं नाईट आऊट. गप्पा गोष्टी आणि त्याबरोबर मधूनच येणारा समुद्राच्या लाटांचा खळखळ आवाज, यादरम्यान कधी झोपलो कळलंच नाही.
अश्या प्रसन्न आणि खेळीमेळीच्या वातावरणात आम्हाला “जाना था तारकर्ली पोहोच गये देवबाग” याचा विसर पडला हे मात्र खरं?.
दुसऱ्यदिवशी रात्रीच्या जागरणामुळे सकाळ थोडी उशिरानेच झाली, उठल्यावर लागलीच समुद्र गाठला ?. सकाळी सकाळी त्या अथांग सागराच दर्शन होण म्हणजे क्या बात है ☺️. सकाळच्या त्या कोवळ्या उन्हामधल समुद्राच लोभसवाण रूपं आणि उगवलेला सूर्य ते नयनरम्य दृश्य तर अगदी नजर न हटवणार होत ?. जोडीला रात्रभर भरतीच्या पाण्याच्या तडाख्याने सुंदरशी वाळूची विवर तयार झाली होती. त्या रेखीव छटा पाहून फोटो काढण्याचा मोह आवरता आला नाही. निसर्गाची किमयाच ती अजून काय. मग पुढे ठरल्याप्रमाणे सकाळचा नाश्ता करून आम्ही मालवणसाठी कूच केली. आम्ही प्रथमच सिंधुदुर्ग किल्ला पाहात होतो. किनाऱ्यावरून किल्ला ? पाहिला आणि शिवाजी महाराजांच्या दूरदृष्टीला अभिवादन करून आम्ही बोटीत चढलो. बोटीत नावाड्यांकडून कळलं की तिथे स्कुबा डायव्हिंग ?करण्याची सोय आहे. मग काय नेहमीप्रमाणेच WRF वेगळं काहीतरी करण्यासाठी तयारच असतात. किल्ल्यात भटकून आल्यावर स्कुबा डायव्हिंग करायचं असं ठरलं. पण बोटी बरोबर माझं मनही हो नाहीमध्ये हेलकावे घेत होत. जेमतेम १५ मिनिटात आम्ही किल्ल्यात पोहोचलो. त्यावेळी किल्ल्याच्या डागडुजीच काम सुरू होत. सद्यस्थिती निराळी असू शकते. ऊन चांगलचं तापल होत. दिलेल्या वेळेत शक्य होईल तेवढा किल्ला पिंजून काढायचा होता. छत्रपतींनी घडवलेली ती कलाकृती एका दिवसात पाहण आम्हा पामराना जमण्यासारख नाहीच. तरी प्रयत्न केला. छत्रपती शिवाजीमहाराजांचं एकमेव असलेलं देऊळ पाहिलं आणि दर्शन घेतल. वेळेअभावी आम्हाला अर्धा अधिक गड पाहता आला नाही ?. पण हेही नसे थोडके या उक्तीनुसार पुढे निघालो.
तर मग शेवटी ती वेळ आलीच.. स्कूबा डायव्हिंगची हो. माझ्या मनाची घालमेल वाढली. ते पाणी बघून तोंडचं पाणी पळालं ?. मग काय नेहमीप्रमाणेच संकटसमयी दादाकडे धावूनी जावे. तो म्हणाला असा चान्स परत कधी मिळेल तुला? हो पुढे. मग काय? जिंदगी मिले ना दोबारा म्हणत पाण्यात उतरले. तिथल्या लोकांनीही पाण्याखालचे नियम चांगले समजावून सांगितले. त्याप्रमाणे मस्त डायव्हिंग झालं, समुद्राच्या तळाशी असलेलं जीवसृष्टी पहिली, अगदी फोटोही काढले. तो अनुभव अप्रतिमच होता. स्कुबा डायव्हिंग करण्याची इच्छा पूर्ण झाली ?. आमच्यापैकी अनेकांचे राज या डूबा डायविंग ने खोलले ??.
मालवणचा पाहुणचार घेऊन आम्ही कॉटेजला परतलो. दिवसभराच्या प्रवासाने सर्वच थकलो होतो, त्यात त्यादिवशी संकष्टी चतुर्थी होती. मग काय उपवास सोडून झाल्यावर गप्पांचा फड रंगला. आणि एक एक करून थकलेले जीव झोपेच्या अधीन झाले.
तिसरा दिवस म्हणजे मुंबईत परतण्याचा, तसा घाई गडबडीत उगवला. छान नाश्ता करून जराही वेळ न दवडता अगदी शिस्तीत फोटो सेशन केलं तेही अगदी भारी ?. आणि मग सरतेशेवटी निघण्याची वेळ आलीच दुसऱ्या दिवशी सर्वांना ऑफीस होतेच की.
देवबाग मधले ते ३ दिवस खरंच खूप छान आणि मनाला हवी असलेली नीरव शांतता देऊन गेले. तिकडून निघताना असं वाटलं की कोकणात परत आपण कधी येऊ सांगता येत नाही. पण योगायोग असा की आता सासर कोकणातलं मिळालं आणि मुंबई – गोवा महामार्ग चांगलाच परिचयाचा झाला ?.
आताही पिकनिकचा विषय निघाला की देवबागच्या आठवणी कायम अग्रस्थानी असतात. आणि नकळत मन देवबागला जाऊन पोहोचत. निसर्गाच्या सानिध्यात घालवलेले ते दिवस अजूनही मनाला तजेला देऊन जातात. आम्ही तर जाऊन आलो, मग तुम्ही कधी करणार देवबागचा दौरा?
©स्नेहा किरण ✍️
मुखपृष्ठ आभार ©अतुल बैकर

Article Categories:
प्रवास

प्रतिक्रिया व्यक्त करा