शापित सौंदर्य ( संपूर्ण )

Written by
  • 2 महिने ago

शापित सौंदर्य ( संपूर्ण )

मीनल एक सरळ, हसतमुख,पण सुंदर या शब्दालाही लाजवेल इतकी सौंदर्यवती जणू एखादी सुंदर परीच .निळे गहिरे डोळे,गोरा रंग, मखमली काया, सुडोल बांधा, डाळींबी ओठ पाहताच कोणीही सहज मोहीत होईल अशी.तिच्यामागे बरेच जण होते पण तिला मनात बसणारा मिळाला नाही ,म्हणून कदाचित अजून कोणाच्या प्रेमात पडली नव्हती. घरची परिस्थिती उत्तम वडील एका multinational कंपनी मध्ये चीफ इंजिनीर आणि आई बँकिंग सेक्टर मध्ये उच्च पदावर आणि अश्या आई वडिलांची मीनल एकुलती एक लेक. या व्यतिरिक्त खूप फ्रेंड्स पण, नेहमी जवळ असणारी स्वरा जिवलग मैत्रीण. 12 वी नंतर सर्वजण इंजिनीरिंग आणि मेडिकल कडे धाव घेत होते. मीनल ला पण चांगले मार्क्स होते, पण तिला ना इंजिनीरिंग मध्ये जायचं होत आणि ना मेडिकल ला . तिला वेड होत पौराणिक गोष्टींचा, इतिहासाच. तिला इतिहासतज्ञ होण्याचं होत.आईवडिलांना वाटत होत तिने इंजिनीर किंवा डॉक्टर बनव, पण तिच्या इच्छाना मान देत तिला तिच्या इच्छे प्रमाणे करिअर करण्याची परवानगी दिली. आधीपासून जणू नियतीने सर्व ठरवून ठेवल होत. आणि नियतीने ठरवलेल्या गोष्टींची आता सुरुवात होणार होती.

मीनल आता एक इतिहासतज्ञ झाली होती. तिला वेगवेगळे प्रोजेक्ट करायला मिळत होते आणि त्यात ती खूप खुश होती. त्यात काम करताना ती हरवून जायची. हे सर्व प्रोजेक्ट करताना तिला खूप वेळ घरापासून लांब राहावं लागायचं. कृष्णाची द्वारका समुद्रात असल्याची चाहूल लागल्यापासून तिला त्यावर काम करण्याचे वेध लागले होते. कृष्णकथा एवढे वर्ष फक्त ऐकल्या होत्या. त्या सर्व गोष्टींवर आता काम करता येणार म्हणून मीनल फार उत्साही होती. ती ऑफिस ला पोहचली तेव्हा उत्साहात नवीन द्वारका प्रोजेक्ट हाती घ्यायचं म्हणून सरांच्या कॅबिन मध्ये आली तेव्हा तिथे तिचे ३ सहकारी ( चेतना , मनीष & मानव ) आधीपासून हजार होते. आता यांच्यासोबत हा प्रोजेक्ट हाती घ्यायचा आणि झोकून द्यायचं कामाला. पण……….

नियती हसत होती तिच्या या विचारांवर …

मीनल या विचारांमध्ये असतानाच सरांनी तिच्या विचारांची तंद्री भंगली ,

सर: आज मी तुम्हाला एक नवीन प्रोजेक्ट देणार आहे. तुम्हाला पण काहीतरी ऍडव्हरचेर करतोय याचा फील नक्की येईल.

चेतना: हो सर आम्ही पण उत्सुक आहोत या न्यू प्रोजेक्टसाठी.

मानव: आता समुद्र जवळ करावा लागेल आणि समुद्राशी पण एक नवीन ओळख होईल. स्विमिंग शिकावं लागेल . ( हसत )

मीनल : आणि मी पॅकिंग करूनच ठेवलीय, आता फक्त निघायचं…

मनीष : सर आता फक्त परमिशन द्या, लगेच निघतो आम्ही. द्वारका आता कधी जवळ करतोय आणि हजारो वर्ष जुने रहस्य उलगडण्याचा प्रयत्न करतोय असं झालंय.

सर : wait wait wait … कोण म्हणालं तुम्हाला की तुम्ही द्वारका प्रोजेक्टसाठी जातंय किंवा हि मिटिंग त्या प्रोजेक्टसाठी आहे?

सर्व एकमेकांकडे आश्चर्याने पाहतात.

मीनल : सर आता एक नव्याने द्वारकाचा विषय निघायलाय आणि सर्वांचे डोळे तिकडे लागले आहेत मग अश्यात तुम्ही आम्हाला याच प्रोजेक्टवर पाठवणार असाच वाटलं आम्हाला.

मानव: हो म्हणून मी स्विमिंग क्लास पण ठरवून आलो.

सर: मी तुम्हाला बोलावलं कारण मला तुम्हाला एक नवीन प्रोजेक्ट द्यायचा आहे राजस्थानचा.

चेतना: व्हॉट ?

मनीष :सर आम्हाला समजेल असा सांगा सर.

सर : राजस्थान मध्ये जयपूर पासून ८० km लांब एक पडका महाल सापडलाय. तिथे फार कोणाचा वावर नसल्यामुळे तिथे असा कोणता महाल आहे हे माहीतच नव्हतं. आता ते जगासमोर येतंय, तो महाल कोणी बांधला ? कधी बांधला ? कोणती पद्धत वापरली त्यासाठी ? ते माहित नाही. द्वारका आता सर्वाना माहित झालाय आणि त्यावर रिसर्च साठी जगभरातून लोक येतील, येतील नाहीतर यायला सुरुवात झालीये आणि त्यावर अभ्यासाला सुद्धा.त्यातून आपल्याला किती प्रसिद्धी मिळेल माहित नाही, राजस्थान प्रोजेक्ट नवीन आहे आणि यावर आपलं काम आधी झालं तर प्रसिद्धी फक्त आपली.

मीनल: सर पण हे फक्त प्रसिद्धीसाठी नाही करत आम्ही.

मनीष : हो सर बरोबर बोलतेय मीनल.

सर : ठीक आहे . मी तुम्हाला द्वारका प्रोजेक्टवर पाठवेन पण राजस्थान प्रोजेक्ट पूर्ण झाल्यावर.

सर्व एकमेकांकडे निराशपणे पाहतात आणि मानेनेच होकार कळवतात, कारण त्यांना माहित होतं, त्यांना तेच करावं लागेल अर्ग्युमेण्ट करण्यात काहीच पॉईंट नव्हता. 2 दिवसांनी राजस्थानला निघायचं होत म्हणून सर्वजण तयारीला लागले. ( त्यांची मशीनरी / मटेरियल / रसायन जे या प्रोजेक्टसाठी त्यांना लागणार होत.)

मीनल ला मात्र एक हुरहूर लागली होती राजस्थान प्रोजेक्ट बद्दल कळ्यापासून, का ? ते माहित नव्हतं.

२ दिवसानंतर …..

ट्रेनने जायचं ठरलं होत. गप्पा मारत आणि निसर्ग डोळ्यात साठवत. मीनल आपली सीट शोधत आली आणि एका सुंदर तरुणाला धडकली. ( दोघांनाही काहीतरी जाणवला पण कळलं मात्र नाही. )

मीनल : आई गं ………

तरुण : सॉरी … मी तुम्हाला पाहिलं नाही. ( तिच्याकडे पाहतो आणि पाहतच राहतो )

मीनल : मग समोर बघून चालावं एवढं कळत नाही का ?

तरुण : ( स्वतःला सावरून ) सॉरी.. रिअली सॉरी ..

चेतना : ( मिनलच्या कानाजवळ जाऊन बोलते) अगं तू धडकलीस त्याला आणि त्यालाच काय ओरडतेय?

मीनलला तिची चूक लक्षात येते आणि त शांत होते, पण सॉरी काही बोलत नाही.
तेवढ्यात तिथे मनीष येतो आणि, तो तरुण आणि मनीष एकमेकांना पाहून खूप खुश होतात आणि मिठी मारतात. मीनल आणि चेतना हे पाहून हैराण होतात.

मनीष : हा माझा शाळेतला मित्र स्वप्नील….सॉरी सॉरी आता डॉक्टर स्वप्नील देसाई. मानसशास्त्र मध्ये पदवी घेतली आहे याने.

स्वप्नील : हो आणि याने इतिहासामध्ये. काय मिळत काय माहित जुन्यापुराण्या गोष्टींमध्ये?  माणसाने कसं science मधून जग बघावं आणि पुढचा विचार करावा.

मीनल : काय म्हणालात?  म्हणजे आम्ही जी काम करतो त्याचा  काही उपयोग नाही? वेळ जात नाही म्हणून करतो का आम्ही??

स्वप्नील : अहो तस नव्हतं म्हणायचं मला. मी फक्त त्याची खेचत होतो.

मीनल काही न बोलता सीट वर जाऊन बसते, आणि  स्वप्नील  तिच्या समोरच्या सीटवर बसतो. मीनल त्याच्याकडे रागाने बघत असते. तेव्हा स्वप्नील तिकीट काढून मीनल समोर धरतो आणि मिश्किलपणे म्हणतो अहो मॅडम हाच सीट नंबर आहे माझा. सर्वाना हसू येत होत पण हसू शकत नव्हते.

संध्याकाळ झाली आणि छान वारा सुटला. त्या चालू ट्रेन मधून गार वारा अंगावर येत होता.  स्वप्नील मात्र आपल्या डोळ्यात मीनल ला साठवत होता.  सुंदर बांधणीचा चुडीदार, पांढरा ड्रेस आणि त्यावर लाल ओढणी, तिचे वाऱ्यासोबत उडणारे केस… तो घायाळ होत होता. तो क्षण तिथेच थांबावा   आणि तिला असंच पाहत राहावं असा त्याला वाटत होतं. हे असं चालू होतं आणि मनीषने त्याच्या चेहऱ्यासमोर टिचकी वाजवली. स्वप्नील थोडा बावरला जणू चोरी पकडली गेली होती त्याची. मनीष फक्त गालातल्यागालात हसत होता.

गाडी स्टेशनला थांबली आणि सर्वजण जेवणासाठी स्टेशनलगतच्या ढाब्यावर बसले. जेवण करताना बोलण्यात कळत स्वप्नील राजस्थानला एका कॉन्फरेन्स साठी आलाय. सर्व जेवण करून परत गाडीत येऊन बसतात. स्वप्निलच्या बाजूला बसलेल्या मनीषला काय हुक्की येते माहित नाही, तो मीनलला म्हणतो ” तू सकाळपासून विंडो सीट जवळ बसलीयेस, मला पण विंडो सीट जवळ बसून एन्जॉय करू दे. ” नाईलाजाने मीनल आपली सीट मनीषला देते आणि मनीषच्या सीटवर म्हणजेच स्वप्निलच्या बाजूला जाऊन बसते. मनीष स्वप्नीलकडे पाहून डोळा मारतो आणि मनीषची करमत स्वप्निलच्या लक्षात येते.

रात्र गहिरी होत होती आणि झोपेत असलेल्या मीनलकडे पाहताना स्वप्नीलला ती रात्र अजून सुंदर भासत होती. अचानक झोपेत असलेल्या मीनलच डोक स्वप्निलच्या खांद्यावर येतं. स्वप्नीलला काहीतरी जाणवू लागतं. एक ओढ, एक जिव्हाळा, एक नातं जे जणू वर्षानुवर्षे त्यांच्यात आहे. तो स्पर्श खूप जवळचा वाटला त्याला. त्याला तो क्षण, ती वेळ तिथेच थांबावी असं वाटू लागलं. या विचारांमध्येच त्याला केव्हातरी झोप लागली.

भल्या पहाटे मीनलला जाग येते आणि तिच्या लक्षात येतं की ती रात्रभर स्वप्निलच्या खांद्यावरच डोक ठेवून झोपली होती. ती विचार करू लागली आपण याच्यावर किती चिढलो, किती रागावलो तरी त्याची चूक नसताना तो आपल्याला सॉरी म्हणाला. तिला स्वतःच्या वागण्याचं वाईट वाटतं. आजवर अनेकांनी तिला प्रपोज केलं होतं पण आज जे स्वप्नीलबद्दल वाटत होतं ते तिला याआधी कधीच जाणवलं नव्हतं. ती त्याच्याकडे एकटक पाहत राहते. स्वप्नीलला जाग येते आणि त्याचं लक्ष मीनलकडे जात तरी ती भारावल्यासारखी त्याच्याकडेच पाहत असते. स्वप्नील तिच्यासमोर टिचकी वाजवतो आणि ती भानावर येते. सर्वजण अजून झोपेतच असतात तेव्हा स्वप्नील कान पकडतो आणि लाडात पण खोडकरपणे म्हणतो ” सॉरी ना.” त्याचं हे वागणं पाहून मीनलला हसू येतं आणि ती म्हणते ” डॉक्टर्स पण इतके गोड असतात का? मला वाटलं होत मेडिसिन आणि इंजेकशन्स मध्ये राहून गोडवा निघून जातो त्यांचा.”
स्वप्नील : पण आता झाली ना खात्री? आहे ना मी गोड?
मीनल : ( लाजत ) हो…
अश्याप्रकारे स्वप्नील आणि मीनल याची गाडी रुळावर येते. पुढचा प्रवास छान होतो आणि या प्रवासादरम्यान स्वप्नील आणि मीनल च्या वागण्यातला बदल सर्वांच्या लक्षात येतो.

गाडी राजस्थान स्टेशनला लागते आणि मार्ग वेगळे होण्याची वेळ येते. स्वप्नीलची कॉन्फरेन्स 2 दिवसांनी संपणार होती म्हणून त्यानंतर भेटायचं त्यांनी ठरवलं. मनीष स्वप्नीलला ऍड्रेस देतो. ( ते उतरणार असलेल्या हॉटेलचा आणि त्या महालाचा डिटेल ऍड्रेस.) जाताना मीनल आणि स्वप्नील एकमेकांना वळून वळून पाहत होते. स्वप्नीलला मिनलच्या डोळ्यात त्याच्यासाठी प्रेम दिसतं.

सर्वजण हॉटेलवर पोहचतात. सर्व फ्रेश होऊन ब्रेकफास्टला खाली भेटतील आणि तिथेच पुढचं प्लँनिंग होईल असं ठरतं. ब्रेकफास्ट टेबलवर :
मानव : सर्वाना वेगवेगळ्या ठिकाणी फिरायची आणि राहायची सवय आहे त्यामुळे काही वेगळं सांगायला नको तरी एकदा बेसिक गोष्टी क्लिअर करूयात.
चेतना : बोला साहेब बोला. ( मिश्कीलपणे )
मानव: राजस्थानमध्ये पाण्याची कमतरता आहे त्यामुळे पाणी जपून वापरा आणि एक्सट्रा पाणी जवळ ठेवा.
मनीष : तो महाल ज्या एरिया मध्ये आहे तिथे आसपास वस्ती सुद्धा नाही त्यामुळे जर आपल्याला काही मदत हवी असेल तर मिळणार नाही. त्यासाठी सर्व गोष्टी सोबत घेतल्या आहे त्याची खात्री करा.
चेतना : मी जयपूर ते त्या महालाच्या 20 km पुढं पर्यंतचा मॅप रेसेन्ट satellite images वरून घेतला आहे आणि या त्याच्या प्रिंट्स. ( प्रिंट्स पुढे करत.)
मीनल : Ok, मग लागा आता तयारीला.
मनीष : मी जाऊन गाडी rent ने घेऊन येतो. सर्व थोड्या वेळात गेटजवळ भेटा.
सर्वजण आपापल्या कामाला लागतात.

मनीष गाडी घेऊन येतो आणि सर्वजण निघतात त्या अनामिक रहस्याकडे. गाडी जसजशी महालाकडे जात होती तसतशी मिनलची हुरहूर वाढत होती. तिने बरेच प्रोजेक्ट या पूर्वी केले होते पण असं तिला पहिल्यांदा जाणवत होतं. ती कोणाला याबद्दल काही बोलली नाही.

गाडी त्या महालासमोर येते. मीनलला तो महाल या आधीही पहिल्यासारखा वाटतो. ते खाली उतरून महालाकडे चालत येतात आणि पाहतात की महाल जवळजवळ 20% जमिनीखाली गेलाय. महालात प्रवेश करण्यासाठी ते दरवाजा शोधू लागतात, संपूर्ण महालाला फेरी होते पण दरवाजा काही सापडत नाही. अचानक मीनल म्हणते, “मला माहित आहे दरवाजा चला माझ्यामागे.” सर्वजण एकमेकांना कडे पाहतात आणि तिच्यामागे चालू लागतात. मीनल महालाच्या दिशेने जाते आणि खाली उतरते. तिथे एक थोडी मोडकी पण प्रशस्त खिडकी दिसते. ते पाहून चेतना म्हणते, ” खिडकीतून गेलो तर कदाचित आपण एखाद्या खोलीमध्ये अडकू शकतो, त्यापेक्षा आपण दरवाजा शोधू, सापडेल आपल्याला. ”
मनीष : She is right.
मीनल : अरे पण ही खिडकी नाहीये, दरवाजा आहे. जमिनीखाली असल्यामुळे पूर्ण दिसत नाहीये, माती बाजूला केली की दिसेल बघ.
असं म्हणून ती माती बाजूला करू लागली आणि त्याच्या समाधानासाठी सर्व तिला मदत करू लागले. काही वेळाने खरंच तिथे दरवाजा दिसू लागला. सर्व त्या दरवाजाला उघडण्याचा प्रयत्न करू लागले पण दरवाजा काही उघडेना. सर्व विचार करू लागले की खूप वर्ष बंद असल्यामुळे किंवा माती असल्यामुळे दरवाजा घट्ट बसला असावा. तेवढ्यात मीनल दरवाज्याच्या बाजूला जाते आणि बाजूला असलेली कडी सरकवते आणि दरवाजा उघडला जातो. सर्वाना आश्चर्य वाटतं. चेतना मीनलला विचारते ” तुला कसं माहित दरवाजा हाच आहे तेही तो अर्धाधिक जमिनीखाली असताना? आणि तो या कडीने उघडतो? ”
मीनल : माहित नाही पण असं वाटलं मला आणि ते बरोबर निघालं.
विषय थांबतो. सर्वजण महालात प्रवेश करतात आणि खूप मोठा घुंगरांचा आवाज येतो जणू कोणीतरी असंख्य घुंगरू खूप उंचावरून खाली सोडलेत. ( सर्वजण काही वेळ भांबवतात.) काही वेळाने शांत झाल्यावर सर्वजण पुढे येतात आणि सर्वत्र पाहू लागतात. जिन्यालगतच्या उंच मंचकाखाली मनीषला काही घुंगरू दिसतात. तो सर्वाना ते दाखतो. मानव म्हणतो,”जरी मानलं की हे घुंगरू वरून पडले तरी प्रश्न हा आहे की, एवढ्याश्या घुंगरांचा एवढा आवाज कसा? आणि मुळात ते खाली पडलेच कसे?
सर्वजण विचार करत असतात, तेव्हढ्यात चेतना म्हणते,” आपल्याला यासाठीच इथे पाठवलंय, हा महाल नक्की कोणी बांधला? कधी बांधला? कोणत्या पद्धतीने बांधला? हेच आपल्याला शोधायचं आहे. May be ज्या पद्धतीने हा महाल बांधला गेलाय त्याच्या इफेक्ट मुळे हा आवाज एवढा मोठा आला असेल. आता आपण काम सुरु करतोय तर कळेलच नक्की काय आहे ते.”
सर्वाना ते पटत.

इकडे घुंगरांची एक विशिष्ट हालचाल होते आणि मग ते शांत होतात. हे कोणाच्याही लक्षात येतं नाही.

नियतीने तिचा खेळ सुरु केलेला होता….

महाल खूपच भव्य होता. सुरुवातीला मोठा पॅसेज पुढे त्याला लागून वर जाण्यासाठी २ मोठमोठे जिने. जिन्यावरून वर जाताना भिंतींवर जुन्याकाळातल्या तसबिरी लावल्या होत्या. जिन्याबाजूला दोन्ही कडे दोन उंच मंचके आणि त्यावर धातूच्या फुलदाण्या होत्या. महालाच्या मधोमध वर मोठा असा झुंबर त्या महालाची शान वाढवणारा ठरत होता. या सर्व वैभवावर खूप धूळ आणि जळमटे झाली होती. त्या तसबिरी आणि त्या महालाच्या भव्यतेवरून त्या काळातल्या संपन्नतेची आणि वैभवतेची कल्पना येत होती. सर्वजण उत्सुकतेने महालाची पाहणी करू लागले. सर्वजण हळूहळू पाऊल टाकत एक एक गोष्ट निहाळत होते पण मीनल मात्र महालाच्या मधोमध उभी राहून महालाकडे एकटक पाहत राहिली. मानवाच्या हि गोष्ट लक्षात आली, तो मिनलजवळ जाऊन विचारतो, ” काय झालं नेहमी अश्या एखाद्या ठिकाणी आलो की किती उत्साही असतेस तू .आज शांत आहेस. are you ok? ” तशी मीनल भानावर येते. मीनल : yes, yes i am ok. महालाची भव्यता पाहत होते. ( असं ती बोलते खरं पण तिला नक्की काय झालंय तेच तिला कळत नसतं. तिला हा महाल ओळखीचा वाटत होता. पण कोणाला सांगितलं तर मघाशी जसं आपण दरवाजा दाखवला आणि उघडला त्यानंतर त्यांनी प्रश्नांची सरबत्ती केली तसेच आता होईल, आणि अजून मलाच काही कळत नाहीये तर याना काय सांगणार ? म्हणून ती शांत बसते.)

चेतना : wow , यार काय मस्त महाल आहे. काय मस्त नक्षीकाम आहे. ( खांबांकडे पाहत )

मनीष : हो ना ज्या कोणी हा महाल बांधलाय तो कलाप्रेमी असावा.

मानव : हो, वाटतय तरी असच.

चेतना : मान्य की आपल्याला द्वारका प्रोजेक्ट नाही मिळाला पण हा प्रोजेक्ट पण चांगला वाटतोय.

मानव : हो ना खूप वर्ष हा महाल कोणालाच माहित नव्हता म्हणजे खूपच जुना असणार हा महाल. ( महाल निहाळत ).

चेतना : हो आणि नक्की किती जुना आहे हे कार्बन डेटिंग केल्यावर कळेलच.

मनीष : काहीही म्हणा पण त्यावेळी या महालात राहणं खूप सुखद असणार. बघा ना खिडक्या किती मोठ्या आणि प्रशस्त आहेत, दरवाजा किती प्रचंड आहे. हॉल मध्ये उंच मंचाकांवर त्या फुलदाण्या आणि त्या काळात प्रदूषण पण नव्हतं तर किती मोहक वातावरण असेल. ( तंद्रीत )

चेतना : ( मानवच्या कानात बोलते ) अरे या मीनलला काय झालंय? काहीच बोलतं नाहीये ती. ( मिनलकडे पाहत )

मानव : काय झालयं मीनल ?

मिनल बावरते. आणि म्हणते, ” नाही, नाही काही नाही.असच पाहतेय महाल.” सर्वजणांना नवल वाटत पण कोणी काही बोलत नाही.

मनीष : चला मग आता कामाला लागूया. सर्वजण वेगवेगळे होतील आणि आपापल्यापरीने निरीक्षण करून रात्री discussion करून उद्याच काम ठरवू.

सर्वजण वेगवेगळे होतात आणि महाल निरीक्षण करायला सुरुवात करतात. दोन -तीन तास निरक्षण करून सर्वजण पुन्हा हॉल मध्ये येतात जिथे मीनल आधी उभी होती. ( घामाने चिंब झालेली होती. ) मीनल तिथून हललीच नसल्याचं मानवाच्या लक्षात येतं आणि तो मीनलला विचारतो ,” काय झालं मीनल ? बरी आहेस ना ? सर्वजण फिरून आले तरी तू इथेच ? ” मीनलला यावर काय उत्तर द्यावं तेच कळत नाही. ती भांबावते आणि म्हणते, ” आपण खूप प्रवास करू आलो आणि आराम न करता लगेच इथे आलो म्हणून मला खुप दमल्यासारखं झालंय आणि डोकं पण खूप दुखतंय. आपण निघुयात का ? उद्या येऊन पुढचं काम पाहू ?” चेतनला काहीतरी मिनलच्या वागण्यात वेगळ वाटत पण तरी ती विषय न वाढवता म्हणते, ” हो बरोबर आहे आणि तशीही भूक पण लागलीये. आता निघुयात आणि उद्या पुढचं काम करूयात.” चेतनाच बोलणं ऐकून मीनलला बरं वाटतं.

सर्वजण निघतात आणि गाडी सुरु होते. मागे बसलेली मीनल अगदी तो महाल नजरेआड होई पर्यंत पाहत राहते. इकडे महालात थंडगार वारा घुमू लागतो, घुंगरांचा आवाज पुन्हा वेग धरतो आणि त्या महालाच्या भोवती एक क्रूर हास्य पसरत, जणू त्या हास्याला मीनल पुन्हा तिथे येणार याची खात्री होती.

हॉटेलवर …………

हॉटेलवर आल्यावर सुद्धा मीनल खूप अस्वस्थ असते आणि तिच्या चेहऱ्यावरून ते स्पष्ट दिसत असत. तिला ती मलाहात असतानाचं सर्व आठवत असतं. ( फ्लॅशबॅक- सर्वजण महाल पाहण्यासाठी जातात आणि मीनल पाऊल टाकणार तोच तिला सर्व अंधुक दिसू लागतं. पूर्वी फोटो काढल्यावर निगेटिव्ह मिळायची तशी तिला तिच्या डोळ्यासमोर चित्र दिसू लागली, हलणारी चित्रे. तिने दोन किशोरवयीन मुली पहिल्या, त्या हसत होत्या, बागडत होत्या आणि घुंगरू बांधून नृत्य करत होत्या. एक महिला बाजूला बसून निर्देशन करत होती. मोठा फेर धरला आणि त्या मुली गिरकी घेऊ लागल्या आणि गिरकी घेत असताना एकीचे घुंगरू तुटतात आणि तिच्या गिरकीच्या गतीमुळे भिरकावले जातात, त्याबरोबर घुंगरांचा मोठा आवाज होतो. तो आवाज तसाच असतो जसा तिने महालात प्रवेश करताना ऐकला होता. मानवाने आवाज दिल्याने तिच्या समोरची चित्रे अदृश्य होतात. )

जेवणानंतर सर्वजण एकत्र बसतात त्यांना उद्याच्या कामाचं डिस्कशन करायचं असतं. मानव बोलायला सुरुवात करतो.

मानव : आता आपापली निरीक्षणे सांगा म्हणजे आपल्याला उद्या नक्की काय करायचंय ते ठरवता येईल.

मनीष : मी जिन्यापासून काही अंतरावर असलेल्या रूम्स मध्ये गेलो होतो. आत गेल्यावर बऱ्याच रूम्स दिसल्या तिथे. तिथे सामान काही नास्त्यामुळे फक्त त्या रूमच्या रचनेवरून असा अंदाज आहे कि तिथं दासदासींचे रूम आणि किचन असावं कारण त्या रूम्सची रचना फारच सामान्य होती. एक रूम खूप मोठी होती आणि एका बाजूची भिंत बरीच काळसर होती. आणि मोठमोठे भांडे ठेवण्यासाठी मांडणी असते तशी रचना त्या रूमच्या एका भिंतीमध्ये होती. आणि अजून एक त्या रूमच्या बाहेर एक विहीर आहे. जेवण बनवताना लागणाऱ्या पाण्याची सोय जवळ असावी म्हणून असेल कदाचित.

चेतना : मी जिना चढून वर उजव्या बाजूला गेले. तिथे कदाचित राजस्त्रियाची दालन असावीत कारण तिथे दालनाची रचना खूपच सुंदर आहेत, नक्षी काम, संगमरवरी दगडांचाही वापर आहे. खांबांवर पडदे अडकवण्यासाठी खुंटी आहेत आणि तिथे प्रत्येक दालनात सुंदर आरशे आहेत.

मानव : आणि मी जिन्याच्या डाव्या बाजूला गेलो होतो. तिथे एक खूपच मोठी रूम होती म्हणजे आता लग्नासाठी हॉल्स असतात त्यापेक्षाही बरीच मोठी. त्यामुळे असा वाटत कि तिथे दरबार असावा कारण त्याकाळी सभेसाठीच एवढे मोठे हॉलच लागत असणार.

मनीष : गुड , म्हणजे आता आपल्याला आता mostly कॉर्बन डेटिंग करावं लागेल म्हणजे त्या वस्तूंचं वय कळेल आपल्याला त्यामुळे त्यासाठी लागणारं सामान नेऊ सर्व नेण्याची गरज नाही.

मीनल : नाही आपण उत्कखननासाठी लागणार सामानही नेऊ म्हणजे तिथे ऐन वेळी लागलं तर नाही असं होयला नको. ( सर्व मान्य करतात )

मनीषच्या लक्षात येते की मिनलच वागणं बदलय आणि ती पुन्हा नॉर्मल व्हावी म्हणून आणि तिला त्यातून बाहेर काढण्यासाठी म्हणून तो तिला बाजूला घेऊन स्वप्नीलचा विषय काढतो.

मनीष : काय गं, स्वप्निलच्या विचारातून बाहेर पडायचंच नाही असा ठरवलंयस का ? ( तिची खेचतो आणि हसतो )

स्वप्निलच नाव ऐकताच मिनलच्या चेहर्यावर स्मितहसू येतं. ती आधीचा प्रसंग विसरून स्वप्नीलचा विचार करू लागते. आणि मनीषला लटक्या रागाने म्हणते , ” मी का त्याचा विचार करू ?”

मनीष: हो का ? मग स्वप्नील येणार आहे इथे तर त्याला सांगतो नको येउस. इथे कोण त्याची वाट पाहतेय ,तो इथे यायला?

मीनल: मी कुठे म्हणाले नको बोलावूस म्हणून ? तुझा मित्र तू बोलावू शकतोस मी का नाही म्हणेन.

मनीष : अच्छा … माझा मित्र का फक्त ? ( तिला चिडवत )

ती लाजून हसली आणि तिला आधीसारखा हसताना पाहून मनीषला बरं वाटलं. सर्वजण उद्याची तयारी करतात आणि आपापल्या रूम्स मध्ये निघून जातात. मिनलही स्वप्नीलचा विचार करत झोपी जाते.

मध्यरात्री झोपेत तिला दरदरून घाम फुटतो, आणि घाबरून जागी होते. महालात पाहिलेला चित्रपट पुन्हा तिच्या समोर दिसला होता. तिला असं सगळं का होतंय तेच कळत नव्हतं. तिच्याशिवाय कोणालाच असे भास होत नव्हते म्हणून की कोणाला काही सांगू ही शकत नव्हती. सांगितलं असतं तर तिला हसले असते, म्हणाले असते या काळात पण भुतांवर विश्वास ठेवतेस कि काय म्हणून चिडवलं असतं. ती पुन्हा झोपण्याचा प्रयत्न करते खूप उशिराने कधीतरी तिला झोप लागते.

सकाळी सर्वजण ब्रेकफास्ट करून निघतात. या वेळी मीनल शांत असते आणि हे नक्की काय आहे याचा छडा लावूच असं ठरवते. ती एका मोठया निर्धाराने महालाकडे निघाली असते. या गोष्टीची त्या हास्याला आधीच कल्पना होती आणि यावेळी तिला या पेक्षा मोठा धक्का बसणार होता…

गाडी महालाजवळ पोहचते आणि सर्वजण उतरून महालाच्या दिशेने निघतात. मिनलच्या मनातली हुरहूर खूप वाढलेली असते पण आज जे आहे त्याला सामोरं जायचं हे तिने पक्कं केलं होतं. कालसारखंच आजही तिने महालात पाऊल ठेवताच कोणीतरी खूप उंचावरून घुंगरू खाली सोडून दिल्यासारखा आवाज आला. यावेळी मात्र सर्वजण विचारात पडले कि काल घुंगरू मंचकावरून पडले असं आपण मानलं पाहिलं कोणीच नाही पण आज पण तसंच कसं घडू शकतं ? मीनलची हुरहूर आणि अस्वस्थता वाढली होती. तर इतरांना ह्या आवाजाचं कुतूहल आता जाणून घ्यायचं होतं. ( सर्वानाच माहित होत कि जुन्याकाळात अशाप्रकारचं बांधकाम करून घेत जेणेकरून अश्या आवाजांमुळे शत्रू किंवा इतर कोणी आत आला तरी आवाजामुळे घाबरेल ) मानवने काल जिथे मंचकाखाली घुंगरू पहिले होते तिथे येऊन घुंगरू उचले आणि त्यावर कॉर्बन डेटिंग सुरु केली. सर्वजण त्याच्या बाजूलाच होते आणि त्या घुंगरांचं वय जाणून घेण्यासाठी उत्सुक होते. कॉर्बन डेटिंग झाल्यावर….

मानव : ९०० वर्ष … या घुंगरांचं वय आहे मित्रानो.

चेतना : म्हणजे हा महाल ९०० वर्ष जुना आहे ? ( आश्र्चर्याने )

मीनल : (मीनल भारावल्यासारखी बोलू लागली ) नाही हा महाल आणि स्वयंपाक घराच्या बाहेरची विहिर ११०० वर्ष जुने आहे. फक्त घुंगरू ९०० वर्ष जुने आहेत.

सर्वजण एकमेकांकडे पाहू लागले.

मनीष : काय यार मीनल आता या वेळी पण भंकस ? ( मिस्कीलपणे )

मीनल : भंकस नाही. खरं बोलतेय. खोटं वाटत असेल तर चेक करून घ्या. ( ती संमोहित केल्यासारखी बोलत होती. )

मानव : हो , चेक तर करणारच. ( मानव महालाच्या भिंतीवर आणि चेतना आणि मनीष विहिरीवर कॉर्बन डेटिंग सुरु करतात आणि result ११०० वर्ष )

चेतना : मीनल तू हे कॉर्बन डेटिंग करण्याआधीच कसं सांगितलंस ?

मीनल : या महालात खूप काही आहे जे तुम्ही काल एवढं निरीक्षण करूनही नाही दिसलं.

मनीष : अगं पण हे सर्व तुला कसं माहिती ?

मीनल : जिन्यावरून वर जाताना तसबिरी दिसतात त्या तसबिरीच्या मागे महत्वाच्या वस्तू आणि कागदपत्रे असायची.

ती कोणाच्या प्रश्नाची उत्तरे देत नव्हती फक्त तिला जे सुचेल ते बोलत होती.

मिनलच्या डोळ्यासमोर कालसारखे चित्र उभे राहतात. त्या दोन मुली, बाजूला बसून शिकवणारी ती स्त्री, घुंगरांचा आवाज, मोठा फेर, जोरदार गिरक्या, घुंगरू तुटून ते वेगाने फेकले गेल्याचा आवाज. बाकी सर्वजण तिला विचारात होते पण ती संमोहित केल्यासारखी स्वतःच्याच जगात होती. तिला अजून काही चित्र दिसू लागतात. ती घामाघूम होते आणि पाठीत थोडी मागच्याबाजूला बँड होते आणि जोरात कळवळून खाली कोसळते. ती तापाने फणफणते आणि त्याच ग्लानीत ती बोलू लागते ” तू का केलंस असं ?” ” तू का केलंस असं ?”. एवढं बोलून ती बेशुद्ध होते. कोणालाच काही सुचत नाही तिला गाडीत बसून सर्वजण हॉटेलवर घेऊन येतात, आणि डॉक्टरला बोलावतात. डॉक्टर तिला चेक करून काही मेडिसिन देऊन निघून जातात.

संध्याकाळ होते पण मीनल अजून शुद्धीत येत नव्हती. थोड्या वेळाने रूमचा इंटरकॉम वाजतो आणि खाली स्वप्नील आल्याचं कळतं. मनीष त्याला वर पाठवायला सांगतो. स्वप्नील रूममध्ये येतो आणि मीनलची अवस्था पाहून टेन्शन मध्ये येतो. सर्वजण कालपासून जे झालं ते सर्व सांगितलं. स्वप्नीलला वाटतं मानसिक तणावामुळे असं होऊ शकतं पण २ दिवसांपूर्वीची मीनल आठवल्यावर त्याला वाटतं यात आपले सर आपल्याला चांगली मदत करू शकतील. स्वप्नील dr. सानपना फोन करून परिस्तिथी सांगतो आणि येण्यासाठी विनवतो. ते येणार असल्याचं कळवतात आणि स्वप्नील फोन ठेवतो.

dr. सानप हे प्रसिद्ध मानसतज्ञ ( मनोविकार तज्ज्ञ )होते. ते या कॉन्फरन्ससाठीच राजस्थानला आले होते ज्यासाठी स्वप्नील आला होता, आणि स्वप्नील त्यांच्या हाताखाली शिकलेला , त्याचा स्टुडन्ट म्हणून होता. त्यामुळे ते स्वप्निलच्या विनंतीला मान देत हॉटेलवर येतात. ते आल्यावर मनीष त्यांना सर्व डिटेल मध्ये सांगतो.

dr. सानप : तिने सांगितलेलं सर्व बरोबर होतं ?

मानव : हो सर .

dr. सानप : मग तुम्ही सांगितलंत कि मिनलने तुम्हाला सांगितलं त्या तसबिरी मागे काही वस्तू आणि कागदपत्रे असतात, ते तुम्ही चेक केलात का?

चेतना : नाही सर, ती बेशुद्ध झाली आणि आम्ही तिला घेऊन लगेच निघालो. त्यामुळे आम्हाला चेक नाही करता आलं.

dr. सानप : ठीक आहे उद्या जाऊन चेक करा. ( dr. सानप स्वप्नीलला घेऊन बाजूला येतात आणि त्याच्याशी बोलू लागतात . )

” स्वप्नील मीनलला सकाळपर्यंत शुद्ध येईल. तिला ताप खूप जास्त असल्यामुळे ती अजून शुद्धीवर आली नाहीय. “

स्वप्नील : पण सर मी २ दिवसांपूर्वी तीला भेटलो ती मीनल आणि ही मीनल फार वेगळी आहे, आणि २ दिवसात मानसिक आजार कसा होईल. ते ही ती या सर्व गोष्टींशी निगडीतच काम करत असतानाच.

dr. सानप : स्वप्नील सर्वच व्यक्ती जे जगावेगळं बोलतात ते मानसिक रोगी असतातच असं नसतं. मीनल बरोबर पण असू शकते.

स्वप्नील : सर तुम्ही भुतांवर विश्वास ठेवता कि काय ?

dr. सानप : मी कुठे असं म्हणालो ?

स्वप्नील : मग सर तुम्हाला नक्की काय म्हणायचं आहे ?

dr. सानप : मी sure नाही पण हा पुनर्जन्म चा प्रकार असू शकतो.

स्वप्नील : सर काय बोलताय तुम्ही ? या विज्ञानाच्या जगात आपण या सर्व गोष्टींवर कसा विश्वास ठेवू शकतो.

dr. सानप : स्वप्नील अश्या खुपसाऱ्या गोष्टी आहेत ज्या अजून विज्ञानाला ही सांगता येत नाही किंवा कळत नाही, याचा अर्थ असा नाही ना की त्या गोष्टी नसतातच. अश्या खूप गोष्टी आहेत ज्या विज्ञानही मानतं. आता हेच बघ ना योग किंवा विपश्यना केल्याने मनुष्य रिलॅक्स होतो , desicion घेण्याची क्षमता वाढते. मोठ्या पोस्ट वर असणाऱ्या , ias वगैरे लोकांना तर सक्तीचं केलंय. कारण मेंदूला आराम आणि आणि वेळ मिळतो. मनुष्याच्या मेंदूवर अजून रिसर्च चालू आहे तरी फारशी प्रगती नाही. जगभरात अश्या खुपसाऱ्या cases आहेत पुनर्जन्माच्या कि लहान मुलांना बोलता येऊ लागल्यावर त्यांनी त्याच्या आधीच्या जन्माबद्दल सांगितलं आहे आणि शोध घेतल्यावर ते खरं निघालंय. परदेशातील एक महिलाला तिच्या आधीच्या जन्माविषयी सर्व आठवत होत. इजिप्त मध्ये ( फेरो च्या काळात ) तिचा आधीचा जन्म झाला होता असं तिचं म्हणणं होतं. आधी कधीही इजिप्तला न गेलेल्या महिलेने त्या काळातल्या बऱ्याच गोष्टी सांगितल्या आणि जागेविषयी सांगितलं आणि त्यावर रिसर्च केल्यावर सर्व गोष्टी तिथे मिळाल्या. तिला नंतर इतिहासतज्ज्ञाच्या टीम मध्ये सामील करून घेतलं आणि तिच्या मुळे इजिप्तच्या रिसर्च मध्ये खूप मदत झाली.

स्वप्नील : सर मिनलच्या बाबतीत असं काही नाहीये. मनीषशी ने मला तिच्या विषयी बरीच माहिती दिलीये पण तिला असे भास कधी नव्हते होत किंवा तीला असं काही आठवतंय असं कधीच नाही म्हणाली ती.

dr. सानप : असं पण होऊ शकत कि त्या जागी गेल्यानंतर तिला सर्व आठवू लागलं, तिच्या मेंदूमधल्या सुप्त पेशींना ताण मिळाल्यामुळे तिला आधीच आठवू लागलं. आता हेच बघ ना पहिल्यादा ती तिथे गेली होती तरी दरवाजा नक्की कुठे आहे, तो कसा ओपन होतो, त्या महालाच, विहिरीचं, त्या घुंगरांचं वय अगदी परफेक्ट कसं सांगितलं ? आता जर तिने सांगितल्याप्रमाणे उद्या त्या तसबिरी मागे काही मिळालं तर या गोष्टीमधलं लक्ष नक्की घालावं लागेल.

स्वप्नील आणि dr. सानप त्याच हॉटेल मध्ये रूम घेतात आणि थांबतात.

दुसऱ्या दिवशी …..

मीनलला उशिरा जाग येते. सर्वजण तयार झालेले असतात आणि निघण्याच्या तयारीत असतात. ते पाहून मीनल म्हणते , ” मला का नाही उठावलंत ?” तेव्हा मानव म्हणतो ,” तुला बरं नाहीय तू इथेच आराम कर .”

मीनल : मी एकटी नाही बसणार इथे . कंटाळेन मी .

मनीष : तू कंटाळणार नाहीस याची व्यवस्था केलीय आम्ही. ( हसत )

मीनल : म्हणजे ? नक्की काय केलाय तुम्हीलोकानी ?

मनीष दरवाजा उघडतो समोर स्वप्नील उभा असतो. त्याला बघून मीनल खूप खुश होते. मनीष तिची खेचत विचारतो.” मग थांबणार आहेस कि येतेयस ?”

मीनल : मी आजारी असताना असं कसं विचारू शकता येतेयस का म्हणून ? ( गालात हसत )

मनीस : हो का .

सर्वजण हसतात .

सर्वजण बाहेर येतात आणि बाहेर dr. सानप तिथे त्यांचा wait करत असतात. काही गोष्टी ठरवून सर्वजण निघतात. इकडे स्वप्नील मिनलची काळजी घेत असतो. तिथे महालात पोहचल्यावर २ दिवस येणारा तो घुंगरांचा आवाज आज आला नव्हता , ते मनीष नोटीस करतो आणि dr. सानप ना सांगतो. मिनलने तिथे आल्यावर सांगितलेल्या सर्व गोष्टी एक एक करत सांगत आणि दाखवत येतात आणि शेवटी त्या तसबिरी जवळ येतात. dr. सानप ती तसबीर हलवण्याचा प्रयत्न करतात. खुप प्रयत्नानंतर त्या तसबिरी निघतात आणि तसबिरी मागे काही कागदपत्र, काही वस्तू , आणि एक चावीचा जुडगा मिळतो, त्यात एक चावी जुडग्यात नसून वेगळी असते. मिनलने सांगितलेली ही गोष्टही खरी ठरली होती . आता या पुढे dr. सानप आणि dr. स्वप्नील यांची जबाबदारी वाढली होती.

हॉटेलवर गेल्यानंतर dr. सानप मीनलला संमोहित करून काही माहिती मिळतेय का ? किंवा या गोष्टीच्या मुळापर्यंत जाता येईल का ? हे पाहणार होते. त्यासाठी त्यांना त्याच्या आई वडिलांची परवानगी लागणार होती. त्यामुळे ते मनीष करवी त्यांना तातडीने बोलावून घेतात.

पुढच्या काळात तिच्या मागच्या जीवनाविषयी उकल होणार होती. तिच्या जीवनातलं रहस्य तिला ही आता कळणार होतं. नियती तिला जुन्या गोष्टी परत करणार होती….

रात्रीच्या फ्लाईटने मिनलचे आई बाबा राजस्थानला यायला निघतात. इकडे हॉटेलवर परत आल्यावर स्वप्नील dr. सानप याची ओळख मिनलशी करून देतात. जेवण झाल्यावर सर्वजण बोलत बसतात. तेव्हा dr. सानप मीनलशी संवाद साधू लागतात. ते विचारतात, ” मीनल तूला नेमकं काय दिसलं? “

मीनल : सर , २ मुली नृत्य करताना दिसल्या. १ बाई बाजूला बसून त्यांना प्रशिक्षण देतेय आणि गिरकी घेताना घुंगरू तुटून मोठा आवाज होताना दिसलं मला . आणि ……. ( ती पुन्हा थोडीशी भांबावते .)

dr. सानप : आणि काय दिसतं मीनल ?

मीनल : मी जेव्हा परत दुसऱ्या दिवशी गेले तेव्हा या सर्व गोष्टींबरोबर मला अजून एक दृश्य दिसलं ते म्हणजे त्यातली एक मुलगी पूर्णपणे रक्ताने भिजली होती आणि काही तरी बोलत होती, पण मला काही कळलं नाही ती नक्की काय बोलत होती ती .

dr. सानप : काही हरकत नाही. बरं तूला या आधी म्हणजे इथे येण्यापूर्वी कधी असे भास झाले होते का ?

मीनल : नाही. मी राजस्थानी culture च्या बाबतीत थोडी आकर्षित नेहमीच होते पण असं कधीच झालं नव्हतं.

dr. सानप : ok, चला आता सर्वजण झोपुयात. उद्या बरीच कामं आहेत.

सर्वजण आपापल्या रूम मध्ये जातात. मीनलला कळतं नव्हतं की तिलाच असे भास का होतायत ? पण स्वप्नील तिच्या सोबत त्याच हॉटेल मध्ये होता त्यामुळे तिला खुप बरं वाटत होत. त्याच्याच विचारामध्ये तिला केव्हातरी झोप लागली. इकडे उद्या नेमकं काय होईल या विचारमध्ये स्वप्नील असतो आणि मध्यरात्री नंतर त्याला झोप लागते.

सकाळी……..

सकाळी जेव्हा मीनलला जाग येते तेव्हा तिचे आई बाबा तिथे पोहचलेले असतात. ती आश्चर्याने विचारते , ” तुम्ही दोघे इथे कसे ?” त्यावर dr. सानप म्हणतात , ” मी बोलावलंय त्यांना मीनल.”

मीनल : का सर असं अचानक बोलावलंत आई बाबांना ?

dr. सानप : मीनल तुला जे भास होतातये ते नक्की का होतातये ? ते तूला नेमकं सांगता येत नाहीये. कसं असतं आपल्याला जे भास होतात ते आपण कधीतरी पाहिलं तरी असतं किंवा त्या गोष्टीचा विचार तरी खूप वेळा केलेला असतो. मग त्या गोष्टी नक्की का तूला दिसतायेत ते कळलं पाहिजे म्हणून तुला संमोहित करून तुझा मेंदू सुप्त अवस्थेतून बाहेर काढून त्या गोष्टी तूला का त्रास देतायेत ते शोधावं लागेल. अर्थातच यासाठी तुझ्या आई वडिलांची परवानगी हवी, म्हणून त्यांना मी इथे बोलावलं आहे . तू उठण्यापूर्वीच त्यांना आधी घडलेल्या सर्व गोष्टींची कल्पना दिलीये. आणि त्यांनी तूला बरं वाटावं आणि यासर्वान मधू बाहेर यावं म्हणून परवानगी दिलीये. आता तू मला सांग तू तयार आहेस का या सर्वाला? मीनल थोडावेळ शांत राहते. मग स्वप्नील तिच्या बाजूला येऊन बसतो आणि तिचा हातात हात घेऊन नजरेने बोलतो आणि ती तयार होते.

थोड्यावेळाने …….

dr. सानप सर्व तयारी करतात आणि मीनलला एका बेड वर झोपवतात. सर्वजण थोड्या दूर अंतरावर उभे राहून पुढचा प्रसंग पाहत असतात .dr. सानप म्हणतात, ” मी मीनलला पूर्णपणे तिथे पाठवणार नाही ती मीनल राहून त्या भासाविषयी आपल्याला सांगेल. त्यामुळे मीनल ही त्या भासाच्या आणि वर्तमानाच्या मधला दुवा असेल. “

dr. सानप: मीनल डोळे बंद कर. तुझ्यासमोर अंधार आहे आणि आता तो अंधार अजून गहिरा होत जाईल. ” अंधार गहिरा होतोय मीनल? “

मीनल : हम्म्म .

dr. सानप: आता तूला अंधुक प्रकाश दिसू लागेल. दिसतोय?

मीनल : हम्म्म .

dr. सानप: आता तो प्रकाश वाढत जातोय.

मीनल : हम्म.

dr. सानप: प्रकाश एकदम जास्त दिसतोय?

मीनल: ह्म्म्म .

dr. सानप: मीनल आता तू तूला जे भास होतात त्याजागेवर, त्या काळात आहेस. बघ तेच आहे का?

मीनल : हम्म्म्म .

dr. सानप: सांग आता नक्की काय काय आहे ते..

मीनल : मला …. मला दिसतंय.

dr. सानप: बोल मीनल काय दिसतंय. तू बोल तुला जे समोर दिसेल ते सांगत जा आम्ही ऐकतोय.

मीनल : मी … मीरा….

( सर्वजण हे ऐकून हैराण होतात. आणि या पुढे सर्वाना एक नवीन सत्य कळणार होतं आणि त्यासाठी ते सज्ज होत होते. )

मी मीरा रंकावत. राजस्थान मधल्या राजपूत घराण्यातला जन्म, सन ११००. माझे वडील भोरी राज्याचे राणा ( राजा ) होते. स्वरमहाल…२०० वर्षांपूर्वी ,इसवी सन ९०० मध्ये हा महाल बांधला होता आमच्या पूर्वजांनी. या महालाला स्वरमहाल नाव ठेवण्यामागचं कारण म्हणजे या महालात नेहमी संगीत घुमत असतं. महालभोवती मोठा बगीचा असल्यामुळे सकाळी पक्षांचे आवाज घुमत, दूपारी मनोरंजनासाठी असलेली राजगायिका भैरवी आपल्या गळ्याच्या मधुर आवाजात ताण छेडी, तर संध्याकाळी आपआपापल्या मुलांना झोपवण्यासाठी त्याच्या आई अंगाई गायच्या,आणि रात्री महालाच्या आत असणाऱ्या मंदिरातील १०१ घंटी हवेमुळे वाजत राहायच्या.

dr. सानप: मीरा, तो महाल आम्ही पहिला पण आम्हाला मंदिर नाही दिसलं. नक्की कुठे आहे ते मंदिर सांगशील ?

मीनल: मी म्हणाले होते कि त्यांनी त्या दिवशी निरीक्षण केलं ते अर्धवट होतं. यांनी पाहिलं समोर मोठी जागा आणि मोठमोठे जिने, आणि वरती काही कक्ष आणि दरबारी जागा. महाल एवढाच असतो का ? तो हि त्या काळचा ? त्यांनी त्या दिवशी जी जागा दरबारची ठरवली होती खरं तर ती आमची खेळण्याची जागा होती. त्या काळचे बांधकाम मजबूत होत त्यामुळे वरती झाडेही लावली होती. आम्ही त्या झाडांवर झोके घायचो. स्त्रिया, मुली आणि लहान मुले यांनाच इथे प्रवेश होता. पुरुषांना तिथे प्रवेश नव्हता. दोन जिन्यांच्या मध्ये दरवाजा आहे. जो ती मंचके सरकावल्यावर उघडतो.

dr. सानप :पण असा दरवाजा बनवायची काय गरज होती?

मीनल : त्यावेळी स्त्रिया लोकांसमोर यायच्या नाहीत. त्यामुळे जेव्हा कोणी विदेशी किंवा दुसऱ्या राज्यातील लोक येत तेव्हा हा दरवाजा बंद असायचा. त्यामुळे महाल नक्की किती मोठा आहे आणि किती लोक आत आहे हे कळायचं नाही. वरच्या कक्षामधून पलीकडे जाण्यासाठीही रस्ता आहे. त्यामुळे स्त्रिया कधीही समोर यायच्या नाहीत आणि महालाचा किती मोठा वगैरे अंदाज न आल्यामुळे कोणी हल्ला ही करू शकत नव्हतं.

दरवाजा उघडल्यावर समोर मोठं महादेवाचं मंदिर आहे. जिथे भल्या पहाटे मी, आई आणि बाबा पूजा करायचो. मंदिराच्या पुढे मोठी ३ मजली इमारत होती. त्या खाली तळघर, तळघरात मोठ्या प्रमाणात शस्त्रे ठेवली जातं. आणि त्यात इमारतीत दरबार लागत असे. माझी आणि आमच्या प्रधानांची मुलगी मोती आमची खुप छान मैत्री होती. अगदी जिवाभावाच्या मैत्रिणी होतो. माझे डोळे मोठे, निळे गहिरे तर ओठ गुलाबपाकळी. गोरा नितळ रंग, लांबसडक केस. माझं नाव मीरा का ठेवला हे माझ्यासाठी कोडंच होत.. माझ्यासाठी आणि इतरांसाठीही. इतर स्त्रिया आईला विचारी माझं नाव मीरा न ठेवता एखाद्या सौंदर्यवतीला शोभेल असं का ठेवलं नाही. त्यावर आई म्हणे, ” राजपुरोहितांनी तिचं नाव मीरा ठेवा असं सांगितलं होतं, म्हणून तिचं नाव मीरा ठेवला.” पण पुढे खरचं मी मीरा होऊन जाईन असं वाटलं नव्हतं.

मला नृत्याची आवड होती. म्हणून मी आईच्या मागे लागले आणि आईने मला शास्त्रीय नृत्य आणि राजस्थानी लोकनृत्य शिकवयला एक नृत्य शिक्षिका नेमली. मी आणि मोती नृत्य शिकू लागलो. नृत्यात निपुण होऊ लागलो.

शेजार राज्याचे राजा बाबाचे खुप चांगले मित्र होते. एकदा ते आणि त्यांचा मुलगा मोहन आमच्या घरी आले. पाहुण्यांचा सत्कार मोठ्या पद्धतीने झाला. खाली प्रवेशद्वाराजवळ सर्व पाहुण्यांची अगवाणी करत होते तर मी वरून झरोख्यातून ते दृश्य पाहत होते. माझी नजर कुवर मोहन वर अडकून पडली. श्वेत रंग, भरदार अंग, रुबाबदार मिश्या पाहतच राहिले मी. आईने त्यांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था मला पहायला सांगितली. सर्व करत असे मी आणि संधी शोधत असे कुवर मोहनना पाहायची. नियमांप्रमाणे मी कधी त्यांच्या समोर नाही गेले. एकदा आमच्या नृत्य शिक्षिका नव्हत्या आल्या मग मी आणि मोतीच रियाज करू लागलो. मी आणि मोती नृत्य करत असताना बाहेरून जाणाऱ्या कुवर मोहनच्या कानावर घुंगरूंचे आवाज गेले आणि उत्सुकता म्हणून आत येऊन पडद्याआडून नृत्य पाहू लागले. नृत्य करत असताना मी गिरक्या घेत पुढे आले आणि समोर कुवर मोहनना पाहून स्तब्ध झाले. त्याच स्तिथीत आम्ही एकमेकांना पाहत होतो. मोतीने आवाज दिला आणि आम्ही भानावर आलो आणि आपापल्या दिशेने गेलो. त्या क्षणा नंतर माझ्या मनात कुवर मोहनचेच विचार फेर धरू लागले आणि त्यांच्या मनात माझ्या विचारांचे.

त्यानंतर आम्ही बऱ्याचदा चोरून भेटलो आणि मनाने खूप जवळ आलो. नावाप्रमाणे मी मोहनची मीरा झाले. मला जळी, स्थळी, काष्ठी , पाषाणी सर्वत्र तेच दिसतं. राजपुरोहितांनी माझं नाव मीरा का सुचवलं असावं ते त्यावेळी कळलं मला. पण एक भीतीही होती जसे कृष्ण मीराचे नाही झाले तसं मी मोहनची नाही झालं तर ……… ह्या फक्त विचाराने जीव शरीर सोडेल असं वाटू लागलं. पण एक दिवस आई माझ्या बाजूला बसली आणि लाड करू लागली खूप खुश होती ती. मी विचारलं काय झालं ? तर ती म्हणाली , ” तुझ्या बाबानी तुझं लग्न ठरवलंय. ” हे ऐकून मी रागात काही बोलणार त्याआधी आई म्हणाली ” कुवर मोहनसोबत.” ते ऐकून मला काय करू नि काय नको असं झालं. कधी एकदा ही गोष्ट मोतीला सांगतेय असं झालं होतं.

रियाजासाठी मी दालनात गेले तिथे मोती आधीच आली होती. मी आनंदात तिला सर्व सांगितलं पण तिचा चेहरा निर्विकार वाटला मला. मी तिला विचारलं , ” अगं लग्न ठरलंय माझं तू खुश नाहीस का? ” ती उसनं हसू आणून म्हणाली.” असं काही नाही खुश आहे मी. ” आमच्या नृत्यशिक्षिका आल्या आणि आमचे नृत्य सुरु झाले. आज नृत्य करताना मोती मला जरा वेगळी भासली. पुढे ताल वाढत गेला आणि मोती धुंद नृत्य करत होती. पुढे मोठ्या गिरक्या घेऊ लागली. तिचे घुंगरू तुटले आणि पायाने भिरकावले गेले. मोठा आवाज झाला आणि ती खाली पडली. तिला नक्की काय झालंय कळत नव्हतं. थोड्या वेळाने तिला जाग आली. तिला मी विचारलं तर म्हणाली तबियत बरी नाहीये. तो विषय तिथेच संपला.

महालात आता माझ्या लग्नाची धामधूम सुरु झाली. मी आणि मोहन एक एक क्षण लग्नाच्या मुहूर्ताची वाट पाहत होतो. त्यांच्या घरचे आले होते. त्याची आई मला पाहून खूप खुश झाली. सर्व आनंदीआनंद होता. स्वर्गसुख बहुतेक असंच आसवं. दागिने , कपडे , फुले , रांगोळ्या , सनई – चौघडे , मी खूप हरखून गेले होते. या सर्वात मोती दिसत नव्हती म्हणून तिला बोलावणं पाठवलं. दासी परत आली आणि सांगू लागली कि त्या दिवशी नृत्य करताना घुंगरू मुळे पायाला लागलं आहे त्यामुळे तूर्तास ती येऊ शकत नाही. मी ही विचार केला तिला आराम करू द्यावा. मी माझ्या कामाला लागले.

लग्न परवावर आलं होतं. मी हातावर मेहंदी काढून बसले होते. तेवढयात एक लहान मुलगा आत आला आणि एक कागद मला देऊन पळाला. मी उघडून पहिला त्यात मला रात्री वर आमच्या खेळायच्या जागी भेटायला बोलावलं होतं. मोहन आता का बोलावतोय २ दिवसांनी लग्न होणारचं आहे ना ? पण त्याने बोलववलंय तर जावं लागेलच ना … पण आज त्याला स्पष्ट सांगायचं आता लग्न होई पर्यंत भेटायचं नाही.

रात्री सर्व झोपल्यावर मी वर त्याला भेटला गेले. तिथे कोणीच नव्हतं आणि प्रकाश अगदी नावाला होता. मी माझ्याच विचारनमध्ये मोहनची वाट पाहत होते. तो आल्यावर त्याला माझ्या हातावरची मेहदी दाखवणार होते. अणि तेवढ्यात कोणीतरी मागून तलवारीने माझ्या पाठात वार केला. तलवार आरपार केली. मला ओरडताही आलं नाही. कशीबशी मागे फिरले आणि धडपडून खाली पडले पाहिलं तर मोती…. हो मोतीच होती. तिच्या अंगावर आणि वस्त्रांवर माझ्या रक्ताचे डाग पडले होते. तिने वार केला माझ्यावर पण का ? माझ्या कंठातून स्वर ही निघेना. माझ्याकडे पाहत तिने कुत्सित हास्य केलं आणि बोलू लागली,” का ? का देवाने सर्व तुला दिलं ? मला का नाही ? प्रत्येकवेळी प्रधानाची मुलगी म्हणून तुझ्यापेक्षा कमी मान, देवाने सौंदर्य ही खुल्या हाताने दिलं तूला. आपण दोघी सोबत असतानाही नेहमी तुझचं कौतुक, तुझ्याच रूपाची चर्चा, तू तू आणि फक्त तूच असायची . मी का नाही ? कारण माझ्याकडे तुझ्यासारखं सौंदर्य नाही? रूप नाही ? तिथं पर्यंत सर्व सहनही केलं मी पण कुवर मोहनही तुलाच ? ज्यावेळी नृत्य करताना कुवर मोहन दालनात आले तेव्हा पाहताच प्रेमात पडले मी त्यांच्या. पण ……. तिथेही तू आणि तुझं सौंदर्य मध्ये आलं. तुझ्याकडे, तुझ्या सौंदर्याकडे पाहिल्यानंतर त्यांनी माझ्याकडे पाहिलं देखील नाही. त्याचवेळी ठरवलं काही झालं तरी तूला कुवर मोहनची होऊ द्यायचं नाही. आणि तिने अजून एक वार माझ्या पाठीत केला. कोणीतरी आल्यासारखं जाणवलं पण तो पर्यंत माझ्या शरीराने माझी साथ सोडायला सुरुवात केली होती. डोळे बंद झाले माझे.

मीनल चाचपडू लागले सगळीकडे. आणि सर्वत्र अंधार दिसतोय असं म्हणू लागते. dr. सानप तिला संमोहनातून बाहेर काढतात आणि शांत बेड वर झोपून राहायला सांगतात. तिला तिथे शांत झोपवून सर्व बाहेर येतात.

dr. सानप: आपल्याला हे कळलं कि तिला दिसत असलेल्या चित्रांचा अर्थ काय आहे. पण पुढे काय झालं हे कसं कळणार? आणि तिला भास झाला किंवा तिथे गेल्यावर तिला सर्व आठवलं हे मान्य करू शकतो पण ती त्या महालात गेल्यावर येणाऱ्या घुंगरांचा आवाज ती नसताना आम्ही गेल्यावर आला नाही का ? घुंगरांचा येणारा आवाज त्यावेळी महाल बनवण्याच्या पद्धतीचा इफेक्ट असेल तर ती आपल्यासोबत नसतानाही आवाज यायला हवा होता. पण तो आवाज नाही आला. शोधून काढायला हवं हे. सर्वाना त्यांचं बोलणं पटत. मीनल बाहेर येते. तिने त्यांचं सर्व बोलणं ऐकलं असतं.

मीनल : सर तुम्ही बोलताय ते बरोबर आहे. हे नक्की का होतंय ते कळच पाहिजे. मला आता बऱ्यापैकी सर्व आठवतेय. आपण उद्या त्या महालात जाऊन search करू काही ना काही नक्कीच मिळेल.सोक्षमोक्ष लावायलाच हवा.

(स्वप्नील तिचा हात हातात घेतो आणि मानेनेच संमती दर्शवतो. इकडे तिचे आई बाबा मुलीला मिळालेली भक्कम साथ पाहून भारावतात. )

आता तिला तिच्या प्रश्नाची उत्तरं हवी होती आणि ती तिला उद्या मिळणार होती. ती असतानाच येणारे घुंगराचे आवाज,तिच्या समोर ते चित्रपट उभे राहणे,भास .. सर्व तिला खुणावत होतं. उद्याच्या सकाळी अजून काही रहस्य तिला कळणार होती.

पहाटे सर्वजण ब्रेकफास्ट करून महालाच्या दिशेने निघाले. काहीही करून आज सर्व गोष्टींचा सोक्षमोक्ष लावायचा असं ठरवून महालाच्या दिशेने गाडी येत होती. गाडी महालासमोर येऊन थांबली आणि सर्वजण महालात प्रवेश करताच घुंगरांचा आवाज होतो आणि वारा नेहमीपेक्षा जास्त वेगाने वाहू लागतो. मीनल प्रत्येक गोष्ट निहाळत असते. ती मंचका जवळ येते आणि मंचक एका विशिष्ट पद्धतीने फिरवते. त्याबरोबर दोन जिन्यांच्या मध्ये असलेला दरवाजा उघडतो. सर्वजण आत येतात. खूप धूळ आणि जळमट असतात पण तरीही महालाची भव्यता पाहून सर्वच दंग होतात. मिनलने सांगितल्याप्रमाणे समोर मोठं महादेवाचं मंदिर होतं. सर्वजण मंदिरात प्रवेश करतात. मंदिरात १०१ घंटी बांधलेल्या असतात. मानव ला त्या घंटींकडे पाहून अनुभवावरून कळतं या सामान्य तांब्या-पितळेच्या घंटी नाहीत आणि तो मीनलला विचारतो. त्यावर मीनल म्हणते, ” बरोबर आहे तुझं मानव, या १०१ घंटी सोन्याच्या आहेत. आमच्या घराण्यात ६ पिढ्यांमध्ये मुलगी झाली नव्हती. ६ मुलं झाल्यावर मुलींसाठी माझ्या बाबानी नवस केला होता. मुलगी झाली तर १०१ सोन्याच्या घंटी या मंदिरात बांधीन म्हणून आणि माझ्या जन्म झाला, त्यानंतर माझ्या बारशाला बाबानी मंदिरात या सोन्याच्या घंटी बांधल्या. मी बाबांची खूप लाडकी होते.” एरवी सर्वजण अंदाज बांधत असतं, असं असू शकत वगैरे पण या वेळी मिनलमुळे सर्व खरं कळत होतं. अजून थोडं पुढे मिनलने सांगितल्याप्रमाणे ३ मजली महाल ही दिसतो. सर्वजण महालाची पाहणी करत असताना dr. सानप ना आठवतं ते मागच्या वेळी आले होते तेव्हा त्यांना तसबिरी मागे काही वस्तू सापडल्या होत्या. ते मीनल जवळ जातात आणि बोलू लागतात, ” मीनल त्या दिवशी तुला बरं नव्हतं म्हणून आम्ही आलो होतो या महालात काही मिळतंय का पाहायला. त्यावेळी तू सांगितल्याप्रमाणे आम्ही तसबिरी मागे पाहिलं तर त्यात आम्हाला काही कागदपत्र आणि चाव्या मिळल्या, त्यात एक चावी वेगळी होती म्हणजे जुडग्यात नव्हती. ह्या बघ त्या वस्तू ( सर्व वस्तू तिला दाखवत ). त्या चाव्या तिने नीट पहिल्या आणि म्हणाली, ” सर या चाव्या आमच्या तळघरच्या आहेत. पण जी चावी जुडग्यात नाही त्याबद्दल मला माहित नाही. “

dr. सानप : ok , चला मग आपण सर्व तळघरात जाऊ पाहूया तिथे काही मिळतंय का ? ( सर्वजण ३ मजली महालाकडे वळतात , तेवढ्यात मीनल सर्वाना रोखते.)

मीनल : सर त्या तळघरात नाही. तिथे फक्त शस्त्र आणि दारुगोळा ठेवला जायचा. चला मी दाखवते तळघर. ( तिच्यामागे सर्वजण निघतात . ती स्वयंपाक घराबाहेरच्या विहिरीजवळ येते. )

dr. सानप : मीनल तू आम्हाला इथे का घेऊन आलीस ? तू तर तळघर दाखवणार होतीस ना ?

मीनल : हो सर तेच दाखवतेय. ही पायऱ्यांची विहीर जेव्हा आमच्या पूर्वजांनी बांधली तेव्हा त्यामधून या

महालाबाहेर जवळजवळ ५ किलोमीटर बाहेर पडणार भुयार/ गुप्त मार्गही बांधला होता. शत्रू जर अधिक बलशाली असेल किंवा काही कारणाने जर महाल शत्रूच्या ताब्यात जाताना दिसत असेल तर राजस्त्रियांना आणि बालकांना सुरक्षित बाहेर पाडण्यासाठी हा मार्ग होता जो फक्त काही निवडक लोकांनाच माहित होता. शिवाय या भुयारामध्ये एक गुप्त दालनही आहे जेणे करून संकटकाळी त्यात संपत्ती लपवता यावी.

मानव : वाह … काय डोकं लावलाय मस्तच .

मिनल हळूहळू चालत पायऱ्यांवरून खाली विहिरीत उतरते. तिच्यामागे सर्वजण उतरतात. ती खाली उतरून एक पायरी जवळ जाते आणि ती पायरी जोर लावून ढकलते त्याबरोबर विहिरीतला दरवाजा उघडतो. सगळ्यांच्या मनात कुतूहल असतो आणि पुढे अजून काय येणार याची उत्सुकता. सर्वजन आत प्रवेश करतात. वर्षानुवर्षे बंद असल्यामुळे कोंदट वातावरण होतं. थोड्यावेळाने हवा खेळती झाल्याने सर्वाना बरं वाटत. मीनल पुढे जाऊन एका जागी इशारा करते अर्थात तिथेच ते गुप्त दालन होतं. तिने तिथलं एक कळ दाबून दरवाजा उघडला. आत गेल्यावर तिथे काही लाकडी तर काही लोखंडी पेटारे दिसले. पूर्ण टीम आपल्या पद्धतीने काम करू लागली.त्यांना तसबिरीमागे चाव्याचा जुडगा मिळाला होता तो याच पेटाऱ्यांचा होता. एक पेटारा उघडला आणि पाहू लागले तो कसला तरी नकाशा वाटत होता. dr. सानप मिनलकडे पाहतात.

मीनल : हो सर हा नकाशाच आहे. या महालचा नकाशा आहे. जो आमच्या पूर्वजांनी हा महाल बांधताना बनवला होता. एकदा मला बाबा हा मार्ग सांगण्यासाठी घेऊन आले तेव्हा दाखवला होता.

इतर ही पेटारे उघडण्यात आले. काही मध्ये दागिने, तर काही मध्ये सोन्याच्या, तांब्याच्या आणि चांदीच्या मोहरा मिळाल्या. काही खलिते तर काही मध्ये दस्तावेज. एक पेटी इतर पेटाऱ्यांपेक्षा लहान होती. तिच्याकडे पाहून मीनल म्हणाली या पेटी बद्दल मला नाही माहित कदाचित नंतर कोणी इथे ठेवली असेल. जुडग्यातील एकही चावी त्या पेटीला लागेना. dr. सानप ना काहीतरी आठवलं आणि त्यांनी जुडग्यापासून वेगळी सापडलेली चावी दिली आणि त्याने पेटी उघडली. त्यात एक कागद होता आणि त्यावर राजस्थानी भाषेत त्या लिपीप्रमाणे लिहिलं होतं. तो कागद मिनलकडे दिला आणि ती तो कागद वाचू लागली.

कुवर मीराबाईस प्रणाम,

हो कुवर मीराबाईच….. कारण या महालात इथपर्यंत येऊन हे पत्र वाचू शकलात तर त्या तुम्हीच असणार.काही गोष्टीनचा त्रास तुम्हाला होत असेल आणि नक्की का होत आहे हे जाणूनघेण्यासाठी तुम्ही इथं पर्यंत आलात.मी तुम्हाला या सर्व गोष्टींनचा उलगडा करेनच पण त्याआधी मी आपली माफी मागतो. मी आपल्या राज्याचा प्रधान भीमसेन. बाईसा माझ्या मुलीने तुमच्या सोबत जे केलं ते चुकीचं होत नाहीतर गुन्हा होता. त्या रात्री मी झोपेत असताना एका दासाने मला उठवलं आणि मला बातमी दिली की महालामध्ये मोठा गोंधळ झाला आहे. त्यावेळी नेमकं काय ते कळलं नाही. मी लगबगीने महालात दाखल झालो. समोर पाहतो तर स्वराला, माझ्या मुलीला बेड्या मध्ये बांधलं होतं. राणा जी खूप संतापले होते. मला पाहताच ते रागाने थरथरू लागले. आणि दुसरीकडे महाराणी हंबरडा फोडून रडत होत्या. बाजूला तुम्हाला रक्ताच्या थारोळ्यात पाहिलं आणि रक्ताचे डाग स्वराच्या वर्स्त्रांवर. मला वाटलं कि तुमच्यावर प्राणघातक हमला झाला आणि तिथे स्वरा असेल. ती स्वतः असं करेल असं चुकूनही माझ्या मनात आलं नाही बाईसा. माझी गुणी मुलगी असं कसं वागेल ना ? तेव्हा राणा जी रागात बोलू लागले,” मी तुमच्यावर तुमच्या घरावर एवढा विश्वास ठेवला, आपलं मानलं, मान – सन्मान दिला. माझ्या मुलीची आणि तुझ्या मुलीची कधी बरोबरी होऊच शकत नाही तरी माझ्या मुलीने तिला एवढं प्रेम, सन्मान आणि जीवापाड मैत्री दिली आणि तिनेच आज असं करावं ? ” हे ऐकून मी अगदी बधिर झालो. कळतच नव्हतं नक्की असं कसं होऊ शकत? ते पुढे बोलले,” माझ्या समोर एक स्त्री ( स्वरा ) उभी आहे म्हणून नाहीतर माझी तलवार कधीच तिच्या रक्ताने भिजली असती.” मी जागीच थिजून गेलो. स्वराच्या चेहऱ्याकडे पाहिलं तर तो निर्विकार वाटला मला. मला शांत आणि काही न बोलताना पाहून राणा जी अजूनच चवताळले आणि माझ्या अंगावर धावून आले. ते पाहून स्वरा ओरडून म्हणाली, ” थांबा, जे केलाय ते मी केलंय. त्यात बाबांचा काहीच दोष नाही. त्यांना तर याबद्दल काहीच माहित नाही.” आणि तिने असं का आणि कसं केलं ते सांगितलं. तुमच्यावर दुसरा वर करताना तिला एका शिपायाने पाहिलं आणि त्याबरोबर त्याने स्वराला पकडलं ही गोष्ट आगीसारखी महालात पसरली. जिथे २ दिवसात लग्न कार्य होणार होतं, तिथे आता अर्थी सजली होती तुमची. ६ पिढ्यानंतर आणि ६ भावानंतर चा तुमचा नवसाने जन्म. वाळवंटात कमळाप्रमाणे होतं. या सर्व प्रकारामुळे सर्वच संपलं होतं. एवढा गोंधळ झाला तरी अजून कुवर मोहन का नाही आले हे पाहायला त्यांचे वडील त्यांच्या कक्षात गेले. समोर पाहतात तर तिथे कुवर मोहनचा प्राणहीन देह होता. तुमच्या श्वास सोबत त्यांनीही देह सोडला होता. तुम्ही दोघे २ देह पण १ प्राण झाला होतात त्यामुळे स्वराने तुमच्या वर वार केल्यामुळे त्यांचाही जीव गेला. ही गोष्ट जेव्हा स्वराला कळली तेव्हा तिला अजून राग आला आणि तिने तिथेच गर्जून शपथ घेतली. काहीही झालं तरी तुम्हाला कधीच एक होऊ देणार नाही. मग त्यासाठी काहीही करावं लागलं तरी चालेल. हे ऐकून मी माझी मान राणाजीं समोर झुकवली आणि म्हणालो,” ही स्त्री म्हणून तुम्ही तिला मारू शकत नाही पण तुम्ही मला मर शकता. मला मारा तुम्ही. अश्या मुलीला जन्म देण्याची शिक्षा तर मला मिळालीच पाहीजे ना ? त्यावर राणाजी म्हणले आम्ही कितीही दुःखी किंवा रागात असलो तरी एका निर्दोषाचा जीव नाही घेऊ शकत. एवढं सर्व होऊनही राणाजी त्यांच्या तत्वांवर ठाम होते. ते ऐकून मला अजून अपराधी वाटू लागलं. मी त्यावेळी शपथ घेतली,” आजपासून मी अन्न त्याग करतो जीव सोडेपर्यंत.”

हे ऐकून स्वराने तीच तलवार उचलली आणि स्वतःच्या पोटात खुपसली. आणि मारतानाही ती तुम्हाला एक होऊ देणार नाही हेच म्हणत होती. मी अन्न त्याग केला आणि दुसऱ्या दिवशीपासून सर्वाना त्रास सुरु झाला. कोणाला महालात घुंगरूंचे आवाज येई तर कोणाला तिने मारताना घेतलेल्या शपथीचे. अंत्यविधी नंतरची कार्य पूर्णपणे संपलेही नव्हते तोच एक बातमी आली की शत्रू राष्ट्राने आपल्या राज्यावर हल्ला केलाय. नवल वाटलं आम्हाला कारण महालावर हल्ला करण्यासाठी महाल पूर्ण माहित असावा लागतो आणि ज्याप्रकारे महाल बांधला होता बाहेरच्या कोणाला माहित असणे शक्य नव्हते. मग हल्ला कसा झाला तेच कळत नव्हते. कार्य अर्धवट सोडून आम्ही सैन्य एकत्र केलं आणि लढाईसाठी तयार झालो. तेवढ्यात गुप्तहेराने बातमी आणली त्याने सांगितले स्वराने तुम्हाला मारायला रात्री येण्यापूर्वीच संध्याकाळी महालाची पूर्ण माहिती असलेला खलिता शत्रुंना पाठवला होता. फक्त या विहिरीबद्दल नाही लिहिलं कारण तिला याबद्दल माहीतच नव्हतं. अगदी मोजक्या लोकांना माहित होतं. महालात आवराआवर सुरु झाली. विहिरीच्या या गुप्त मार्गाने निघायचं निश्चित झालं आणि पाऊल बाहेर ठेवणार तोच पुन्हा स्वराचा स्वर घुमला,” कुठेही जा पण हा महाल आता पुन्हा बहरणार नाही. मी याला बहरू देणार नाही. मी वाट बघेन मोहनची इथंच आणि जर पुन्हा मीरा आणि तिचं सौंदर्य मध्ये आलं तर तेच करेन जे आज केलं .” महाल शहारला. मीरा बाईसा मला माहित आहे कि आता मी या लढाईवर जातोय तिथून परत येणार नाहीये म्हणून हे पत्र तुमच्या नावे लिहिलं आहे. हे मी या छोटया पेटीमध्ये बंद करून चावी तसबिरीमागे ठेवतो कारण तुम्हाला माहित आहे कि महत्वाच्या गोष्टी आपण कुठे ठेवतो. आणि जरी या चाव्या दुसऱ्या कोणाच्या हाती लागल्या असत्या तरी ते इथं पर्यंत पोहचू शकले नसते. बाईसा अजून एक ज्या तलवारीने स्वराने तुम्हाला मारलं आणि नंतर स्वतःला, तुम्हाला ती तलवार नष्ट केल्याशिवाय ती तुमच्या आयुष्यातून जाणार नाही. ती तलवार नष्ट करा आणि सुखी व्हा. मी पुन्हा एकदा माफी मागतो.

आपला सेवक,

भीमसेन ( प्रधान )

पत्र ऐकून सर्वजण शांत झाले. स्वार्थासाठी हत्या करणारी स्वरा, स्वतःच्या मुलीचा जिने खून केला तिच्यावर ती स्त्री म्हणून तलवार न उचलणारे आणि आपल्या तत्वांशी एकनिष्ठ राहणारे राणा ( राजा ) आणि मुलीच्या गुन्ह्यासाठी मरेपर्यंत अन्न सोडणारे प्रधान. स्वार्थ , तत्व आणि अपराधबोध या सर्व गोष्टी आल्या. तेवढ्यात तिथे स्वराचा आवाज घुमू लागला,” मीरा कसं वाटलं सर्व कळल्यावर ? मी तुला या महालात येता क्षणी मारू शकले असते ,पण तुला सर्व माहित झाल्याशिवाय तूला आणि मोहनला वेगळं करण्यात मज्जा आली नसती.” सर्वाना भीती वाटू लागली आणि आता अजून कोणता रक्तरंजित खेळ पाहावा लागेल याचा विचार करू लागले. स्वप्नील मीनल जवळ गेला आणि त्याने तिचा हात घट्ट धरला. त्यावर पुन्हा स्वराचा स्वर उमटला,” मोहन कितीही हात तिचा पकडून ठेवलास तरी तुम्हाला वेगळं व्हावं लागेलच.” हे ऐकून सर्वच चक्रावून गेले, म्हणजे मीनल मीराचा तर स्वप्नील मोहनचा पुनःर्जन्म होता. त्याच्या लक्षात येत की कधीही कोणाच्या प्रेमात न पडनारे लगेच एकमेकांच्या प्रेमात का पडले आणि स्वप्नील आणि मीनलला एकमेकांबद्दल असलेल्या ओढीचं रहस्य कळलं.आता जोरदार वारा वाहू लागला. स्वप्नील सर्वाना तिथून बाहेर पडायला सांगतो. सर्वजण विहिरीच्या वर येतात आणि महालाच्या बाहेर निघण्यासाठी पाळतात. पण अचानक मुख्य दरवाजा बंद होतो आणि सर्वजण अडकतात. सर्वजण खूप घाबरतात. तेवढ्यात घुंगरांचा मोठा आवाज होतो एवढा मोठा की सर्वजण कान झाकून घेतात. मीनलला पुन्हा वेदना सुरु होतात. तेव्हा स्वराने मीरावर तलवारीचा वार केला होता तश्याच वेदना. कोणाला काहीच सुचत नव्हतं आणि मीनल वेदनेने कळवळत होती. स्वप्नीलला त्रास होत असतो कारण शेवटी दोघांचा जीव एकच असतो. मानवाला आठवत कि प्रधानांच्या पत्रात लिहिल्याप्रमाणे आपण सरळ स्वराला हरवू शकत नाही पण जर ती तलवार मिळाली तर आपण काहीतरी कर शकतो. मानव मनीष, सर आणि चेतनाला जवळ बोलावून हा सर्व सांगतो. सर्वजण ती तलवार शोधू लागतात. अचानक चेतनच्या लक्षात येतं स्वराने मीराला वर त्यांच्या खेळण्याच्या दालनात बोलावून मारलं आणि सर्व घटना ही तिथेच झाल्या एवढं नाही तर तिने स्वतःलाही तिथेच संपवलं . याचा अर्थ तलवारही तिथेच कुठे तरी असायला हवी. चेतना मानवाला इशारा देते आणि वर बोलावते. वर दालन शोधात असताना झाडाखालच्या मातीत काहीतरी छोटीशी गोष्ट चमकताना दिसली. माती बाजूला केल्यावर ती तलवार हाती लागली. त्या तलवारीवर सुकलेलं रक्त होतं. ती तलवार घेऊन मन आणि चेतना खाली येतात. ते आगीने ते नष्ट करणार तोच मानव जोरात फुकून दिल्यासारखा भिंतीवर जाऊन आपटतो. चेतना हि ढकलली जाते. स्वरा बोलू लागते,” चुकूनही विचार करू नका की तुम्ही मला थांबवू शकता. जीव प्रिय असेल तर मध्ये पडू नका.” मानव आणि चेतना पुन्हा उभे राहतात अणि तलवारी जवळ जातात पुन्हा तेच होतं. मीनल आणि स्वप्नील एकमेकांकडे पाहतात आणि चेतना अन मानवाला समजावतात.

स्वप्नील : मानव नको करुस मदत. तुमच्या मृत्यूचं कारण नाही बनायचं आम्हाला.

मीनल : हो. आणि आता आम्हाला पुन्हा मरण आलं तरी आम्ही खुश आहोत. कारण या मुळे एक कळलं प्रेम किती अतूट असतं. आम्ही मेलो तरी आम्ही जिंकू.

स्वप्नील : बघ स्वरा.. तू जिवंत असताना सुद्धा आणि आता या अवस्थेत सुद्धा आम्हाला वेगळं नाही करू शकतं. एकत्र राहणं म्हणजे सोबत नसते. आम्ही मनाने घट्ट जोडले गेलोत त्यामुळे जगू तर एकत्र आणि मरू तरी एकत्र. तू आम्हाला फक्त शरीराने वेगळा करू शकतेस मनाने कधीच नाहीस.

मीनल: तू वर्षानुवर्षे अशीच राहशील पण आम्ही नाही आमच्याकडे नेहमी आमचं प्रेम असेलच.

स्वप्नील : ये संपव हे सर्व आम्ही तयार आहोत.

मानव: स्वरा…. तूला तुझं प्रेम नाही मिळालं मी समजू शकतो पण याना वेगळा करूनही तूला ते मिळणार नाहीच. मग का हा हट्टहास ? प्रेम जबरदस्तीने कधीच मिळत नसतं. तू कितीही वर्ष अजून इथे राहिलीस तरी साध्य काहीच होणार नाहीये.

मीनल : स्वरा एकदा मला सांगायचंस तरी तुझ्या मनात जे होत ते, मी बाजूला झाले असते ग आधीच लग्नापर्यंत जाऊच दिलं नसतं मी. पण तू मला काहीच बोलली नाहीस आणि आमचं प्रेम गहिरं होत गेलं.

स्वराच्या एव्हाना लक्षात आलं होतं की जरी तिने त्यांना मारलं असतं तरी ती त्यांना मनाने वेगळ नाही करू शकतं. मिनलच्या बोलण्याने ( मी बाजूला झाले असते ) स्वराला आतून त्रास होऊ लागला. सर्व संपवण्याचा ती निश्चय करते .

स्वरा : “एकदा मी प्रयन्त केला तुम्हाला वेगळं करायचा केलंही, पण जर तुम्ही वेगळे होऊनही वेगळे होत नसाल तर तुम्हाला मारून मी तुमच्या प्रेमाची किंमत वाढवणार नाही. आणि हो अजून एक मी बाजूला झाले असते असं बोलून तू महान आहेस हे दाखवू नकोस मीरा. तुम्हाला दोघांनाही आता महान बन्याची संधी मी देणार नाही आणि तुमचं प्रेम अमर करण्याचीही नाही. जो पर्यंत मी आहे तो पर्यंत तुम्ही महान आणि तुमचं प्रेम अमर राहील म्हणून मी जातेय कायमची. ” असं म्हणताच बाजूला पडलेल्या तलवारीला आग लागते. आधी थोडा कुजट वास आणि नंतर एक सुगंध येऊ लागतो जणू आसपास हजारो फुले असावीत. एक अध्याय संपला होता. सर्व प्रश्नाची उत्तरं मिळाली होती.

मीनल आणि टीम आपलं काम महिनाभरात संपवतात आणि रिपोर्ट तयार करतात. मिनलच्या आई वडिलांना स्वप्नील पसंद असतोच. मुंबईला आल्यानंतर रिपोर्ट सबमिट करतात. बॉस त्यांच्या कामावर खुश होतात. स्वप्नील आणि मिनलच लग्न मराठी तर रेसेप्सिन राजस्थानी पद्धतीने होतं. लग्नात सगळ्यांची जमावळ असते पण त्यांच्या प्रेमाचं वय फक्त काही जणांनाच माहित असतं.

समाप्त ……

Article Categories:
रोमांचक

प्रतिक्रिया व्यक्त करा