शापित सौंदर्य 6 © आरती पाटील

Written by
  • 1 महिना ago

शापित सौंदर्य ६

रात्रीच्या फ्लाईटने मिनलचे आई बाबा राजस्थानला यायला निघतात. इकडे हॉटेलवर परत आल्यावर स्वप्नील dr. सानप याची ओळख मिनलशी करून देतात. जेवण झाल्यावर सर्वजण बोलत बसतात. तेव्हा dr. सानप मीनलशी संवाद साधू लागतात. ते विचारतात, ” मीनल तूला नेमकं काय दिसलं? “

मीनल : सर , २ मुली नृत्य करताना दिसल्या. १ बाई बाजूला बसून त्यांना प्रशिक्षण देतेय आणि गिरकी घेताना घुंगरू तुटून मोठा आवाज होताना दिसलं मला . आणि ……. ( ती पुन्हा थोडीशी भांबावते .)

dr. सानप : आणि काय दिसतं मीनल ?

मीनल : मी जेव्हा परत दुसऱ्या दिवशी गेले तेव्हा या सर्व गोष्टींबरोबर मला अजून एक दृश्य दिसलं ते म्हणजे त्यातली एक मुलगी पूर्णपणे रक्ताने भिजली होती आणि काही तरी बोलत होती, पण मला काही कळलं नाही ती नक्की काय बोलत होती ती .

dr. सानप : काही हरकत नाही. बरं तूला या आधी म्हणजे इथे येण्यापूर्वी कधी असे भास झाले होते का ?

मीनल : नाही. मी राजस्थानी culture च्या बाबतीत थोडी आकर्षित नेहमीच होते पण असं कधीच झालं नव्हतं.

dr. सानप : ok, चला आता सर्वजण झोपुयात. उद्या बरीच कामं आहेत.

सर्वजण आपापल्या रूम मध्ये जातात. मीनलला कळतं नव्हतं की तिलाच असे भास का होतायत ? पण स्वप्नील तिच्या सोबत त्याच हॉटेल मध्ये होता त्यामुळे तिला खुप बरं वाटत होत. त्याच्याच विचारामध्ये तिला केव्हातरी झोप लागली. इकडे उद्या नेमकं काय होईल या विचारमध्ये स्वप्नील असतो आणि मध्यरात्री नंतर त्याला झोप लागते.

सकाळी……..

सकाळी जेव्हा मीनलला जाग येते तेव्हा तिचे आई बाबा तिथे पोहचलेले असतात. ती आश्चर्याने विचारते , ” तुम्ही दोघे इथे कसे ?” त्यावर dr. सानप म्हणतात , ” मी बोलावलंय त्यांना मीनल.”

मीनल : का सर असं अचानक बोलावलंत आई बाबांना ?

dr. सानप : मीनल तुला जे भास होतातये ते नक्की का होतातये ? ते तूला नेमकं सांगता येत नाहीये. कसं असतं आपल्याला जे भास होतात ते आपण कधीतरी पाहिलं तरी असतं किंवा त्या गोष्टीचा विचार तरी खूप वेळा केलेला असतो. मग त्या गोष्टी नक्की का तूला दिसतायेत ते कळलं पाहिजे म्हणून तुला संमोहित करून तुझा मेंदू सुप्त अवस्थेतून बाहेर काढून त्या गोष्टी तूला का त्रास देतायेत ते शोधावं लागेल. अर्थातच यासाठी तुझ्या आई वडिलांची परवानगी हवी, म्हणून त्यांना मी इथे बोलावलं आहे . तू उठण्यापूर्वीच त्यांना आधी घडलेल्या सर्व गोष्टींची कल्पना दिलीये. आणि त्यांनी तूला बरं वाटावं आणि यासर्वान मधू बाहेर यावं म्हणून परवानगी दिलीये. आता तू मला सांग तू तयार आहेस का या सर्वाला? मीनल थोडावेळ शांत राहते. मग स्वप्नील तिच्या बाजूला येऊन बसतो आणि तिचा हातात हात घेऊन नजरेने बोलतो आणि ती तयार होते.

थोड्यावेळाने …….

dr. सानप सर्व तयारी करतात आणि मीनलला एका बेड वर झोपवतात. सर्वजण थोड्या दूर अंतरावर उभे राहून पुढचा प्रसंग पाहत असतात .dr. सानप म्हणतात, ” मी मीनलला पूर्णपणे तिथे पाठवणार नाही ती मीनल राहून त्या भासाविषयी आपल्याला सांगेल. त्यामुळे मीनल ही त्या भासाच्या आणि वर्तमानाच्या मधला दुवा असेल. “

dr. सानप: मीनल डोळे बंद कर. तुझ्यासमोर अंधार आहे आणि आता तो अंधार अजून गहिरा होत जाईल. ” अंधार गहिरा होतोय मीनल? “

मीनल : हम्म्म .

dr. सानप: आता तूला अंधुक प्रकाश दिसू लागेल. दिसतोय?

मीनल : हम्म्म .

dr. सानप: आता तो प्रकाश वाढत जातोय.

मीनल : हम्म.

dr. सानप: प्रकाश एकदम जास्त दिसतोय?

मीनल: ह्म्म्म .

dr. सानप: मीनल आता तू तूला जे भास होतात त्याजागेवर, त्या काळात आहेस. बघ तेच आहे का?

मीनल : हम्म्म्म .

dr. सानप: सांग आता नक्की काय काय आहे ते..

मीनल : मला …. मला दिसतंय.

dr. सानप: बोल मीनल काय दिसतंय. तू बोल तुला जे समोर दिसेल ते सांगत जा आम्ही ऐकतोय.

मीनल : मी … मीरा….

( सर्वजण हे ऐकून हैराण होतात. आणि या पुढे सर्वाना एक नवीन सत्य कळणार होतं आणि त्यासाठी ते सज्ज होत होते. )

मी मीरा रंकावत. राजस्थान मधल्या राजपूत घराण्यातला जन्म, सन ११००. माझे वडील भोरी राज्याचे राणा ( राजा ) होते. स्वरमहाल…२०० वर्षांपूर्वी ,इसवी सन ९०० मध्ये हा महाल बांधला होता आमच्या पूर्वजांनी. या महालाला स्वरमहाल नाव ठेवण्यामागचं कारण म्हणजे या महालात नेहमी संगीत घुमत असतं. महालभोवती मोठा बगीचा असल्यामुळे सकाळी पक्षांचे आवाज घुमत, दूपारी मनोरंजनासाठी असलेली राजगायिका भैरवी आपल्या गळ्याच्या मधुर आवाजात ताण छेडी, तर संध्याकाळी आपआपापल्या मुलांना झोपवण्यासाठी त्याच्या आई अंगाई गायच्या,आणि रात्री महालाच्या आत असणाऱ्या मंदिरातील १०१ घंटी हवेमुळे वाजत राहायच्या.

dr. सानप: मीरा, तो महाल आम्ही पहिला पण आम्हाला मंदिर नाही दिसलं. नक्की कुठे आहे ते मंदिर सांगशील ?

मीनल: मी म्हणाले होते कि त्यांनी त्या दिवशी निरीक्षण केलं ते अर्धवट होतं. यांनी पाहिलं समोर मोठी जागा आणि मोठमोठे जिने, आणि वरती काही कक्ष आणि दरबारी जागा. महाल एवढाच असतो का ? तो हि त्या काळचा ? त्यांनी त्या दिवशी जी जागा दरबारची ठरवली होती खरं तर ती आमची खेळण्याची जागा होती. त्या काळचे बांधकाम मजबूत होत त्यामुळे वरती झाडेही लावली होती. आम्ही त्या झाडांवर झोके घायचो. स्त्रिया, मुली आणि लहान मुले यांनाच इथे प्रवेश होता. पुरुषांना तिथे प्रवेश नव्हता. दोन जिन्यांच्या मध्ये दरवाजा आहे. जो ती मंचके सरकावल्यावर उघडतो.

dr. सानप :पण असा दरवाजा बनवायची काय गरज होती?

मीनल : त्यावेळी स्त्रिया लोकांसमोर यायच्या नाहीत. त्यामुळे जेव्हा कोणी विदेशी किंवा दुसऱ्या राज्यातील लोक येत तेव्हा हा दरवाजा बंद असायचा. त्यामुळे महाल नक्की किती मोठा आहे आणि किती लोक आत आहे हे कळायचं नाही. वरच्या कक्षामधून पलीकडे जाण्यासाठीही रस्ता आहे. त्यामुळे स्त्रिया कधीही समोर यायच्या नाहीत आणि महालाचा किती मोठा वगैरे अंदाज न आल्यामुळे कोणी हल्ला ही करू शकत नव्हतं.

दरवाजा उघडल्यावर समोर मोठं महादेवाचं मंदिर आहे. जिथे भल्या पहाटे मी, आई आणि बाबा पूजा करायचो. मंदिराच्या पुढे मोठी ३ मजली इमारत होती. त्या खाली तळघर, तळघरात मोठ्या प्रमाणात शस्त्रे ठेवली जातं. आणि त्यात इमारतीत दरबार लागत असे. माझी आणि आमच्या प्रधानांची मुलगी मोती आमची खुप छान मैत्री होती. अगदी जिवाभावाच्या मैत्रिणी होतो. माझे डोळे मोठे, निळे गहिरे तर ओठ गुलाबपाकळी. गोरा नितळ रंग, लांबसडक केस. माझं नाव मीरा का ठेवला हे माझ्यासाठी कोडंच होत.. माझ्यासाठी आणि इतरांसाठीही. इतर स्त्रिया आईला विचारी माझं नाव मीरा न ठेवता एखाद्या सौंदर्यवतीला शोभेल असं का ठेवलं नाही. त्यावर आई म्हणे, ” राजपुरोहितांनी तिचं नाव मीरा ठेवा असं सांगितलं होतं, म्हणून तिचं नाव मीरा ठेवला.” पण पुढे खरचं मी मीरा होऊन जाईन असं वाटलं नव्हतं.

मला नृत्याची आवड होती. म्हणून मी आईच्या मागे लागले आणि आईने मला शास्त्रीय नृत्य आणि राजस्थानी लोकनृत्य शिकवयला एक नृत्य शिक्षिका नेमली. मी आणि मोती नृत्य शिकू लागलो. नृत्यात निपुण होऊ लागलो.

शेजार राज्याचे राजा बाबाचे खुप चांगले मित्र होते. एकदा ते आणि त्यांचा मुलगा मोहन आमच्या घरी आले. पाहुण्यांचा सत्कार मोठ्या पद्धतीने झाला. खाली प्रवेशद्वाराजवळ सर्व पाहुण्यांची अगवाणी करत होते तर मी वरून झरोख्यातून ते दृश्य पाहत होते. माझी नजर कुवर मोहन वर अडकून पडली. श्वेत रंग, भरदार अंग, रुबाबदार मिश्या पाहतच राहिले मी. आईने त्यांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था मला पहायला सांगितली. सर्व करत असे मी आणि संधी शोधत असे कुवर मोहनना पाहायची. नियमांप्रमाणे मी कधी त्यांच्या समोर नाही गेले. एकदा आमच्या नृत्य शिक्षिका नव्हत्या आल्या मग मी आणि मोतीच रियाज करू लागलो. मी आणि मोती नृत्य करत असताना बाहेरून जाणाऱ्या कुवर मोहनच्या कानावर घुंगरूंचे आवाज गेले आणि उत्सुकता म्हणून आत येऊन पडद्याआडून नृत्य पाहू लागले. नृत्य करत असताना मी गिरक्या घेत पुढे आले आणि समोर कुवर मोहनना पाहून स्तब्ध झाले. त्याच स्तिथीत आम्ही एकमेकांना पाहत होतो. मोतीने आवाज दिला आणि आम्ही भानावर आलो आणि आपापल्या दिशेने गेलो. त्या क्षणा नंतर माझ्या मनात कुवर मोहनचेच विचार फेर धरू लागले आणि त्यांच्या मनात माझ्या विचारांचे.

त्यानंतर आम्ही बऱ्याचदा चोरून भेटलो आणि मनाने खूप जवळ आलो. नावाप्रमाणे मी मोहनची मीरा झाले. मला जळी, स्थळी, काष्ठी , पाषाणी सर्वत्र तेच दिसतं. राजपुरोहितांनी माझं नाव मीरा का सुचवलं असावं ते त्यावेळी कळलं मला. पण एक भीतीही होती जसे कृष्ण मीराचे नाही झाले तसं मी मोहनची नाही झालं तर ……… ह्या फक्त विचाराने जीव शरीर सोडेल असं वाटू लागलं. पण एक दिवस आई माझ्या बाजूला बसली आणि लाड करू लागली खूप खुश होती ती. मी विचारलं काय झालं ? तर ती म्हणाली , ” तुझ्या बाबानी तुझं लग्न ठरवलंय. ” हे ऐकून मी रागात काही बोलणार त्याआधी आई म्हणाली ” कुवर मोहनसोबत.” ते ऐकून मला काय करू नि काय नको असं झालं. कधी एकदा ही गोष्ट मोतीला सांगतेय असं झालं होतं.

रियाजासाठी मी दालनात गेले तिथे मोती आधीच आली होती. मी आनंदात तिला सर्व सांगितलं पण तिचा चेहरा निर्विकार वाटला मला. मी तिला विचारलं , ” अगं लग्न ठरलंय माझं तू खुश नाहीस का? ” ती उसनं हसू आणून म्हणाली.” असं काही नाही खुश आहे मी. ” आमच्या नृत्यशिक्षिका आल्या आणि आमचे नृत्य सुरु झाले. आज नृत्य करताना मोती मला जरा वेगळी भासली. पुढे ताल वाढत गेला आणि मोती धुंद नृत्य करत होती. पुढे मोठ्या गिरक्या घेऊ लागली. तिचे घुंगरू तुटले आणि पायाने भिरकावले गेले. मोठा आवाज झाला आणि ती खाली पडली. तिला नक्की काय झालंय कळत नव्हतं. थोड्या वेळाने तिला जाग आली. तिला मी विचारलं तर म्हणाली तबियत बरी नाहीये. तो विषय तिथेच संपला.

महालात आता माझ्या लग्नाची धामधूम सुरु झाली. मी आणि मोहन एक एक क्षण लग्नाच्या मुहूर्ताची वाट पाहत होतो. त्यांच्या घरचे आले होते. त्याची आई मला पाहून खूप खुश झाली. सर्व आनंदीआनंद होता. स्वर्गसुख बहुतेक असंच आसवं. दागिने , कपडे , फुले , रांगोळ्या , सनई – चौघडे , मी खूप हरखून गेले होते. या सर्वात मोती दिसत नव्हती म्हणून तिला बोलावणं पाठवलं. दासी परत आली आणि सांगू लागली कि त्या दिवशी नृत्य करताना घुंगरू मुळे पायाला लागलं आहे त्यामुळे तूर्तास ती येऊ शकत नाही. मी ही विचार केला तिला आराम करू द्यावा. मी माझ्या कामाला लागले.

लग्न परवावर आलं होतं. मी हातावर मेहंदी काढून बसले होते. तेवढयात एक लहान मुलगा आत आला आणि एक कागद मला देऊन पळाला. मी उघडून पहिला त्यात मला रात्री वर आमच्या खेळायच्या जागी भेटायला बोलावलं होतं. मोहन आता का बोलावतोय २ दिवसांनी लग्न होणारचं आहे ना ? पण त्याने बोलववलंय तर जावं लागेलच ना … पण आज त्याला स्पष्ट सांगायचं आता लग्न होई पर्यंत भेटायचं नाही.

रात्री सर्व झोपल्यावर मी वर त्याला भेटला गेले. तिथे कोणीच नव्हतं आणि प्रकाश अगदी नावाला होता. मी माझ्याच विचारनमध्ये मोहनची वाट पाहत होते. तो आल्यावर त्याला माझ्या हातावरची मेहदी दाखवणार होते. अणि तेवढ्यात कोणीतरी मागून तलवारीने माझ्या पाठात वार केला. तलवार आरपार केली. मला ओरडताही आलं नाही. कशीबशी मागे फिरले आणि धडपडून खाली पडले पाहिलं तर मोती…. हो मोतीच होती. तिच्या अंगावर आणि वस्त्रांवर माझ्या रक्ताचे डाग पडले होते. तिने वार केला माझ्यावर पण का ? माझ्या कंठातून स्वर ही निघेना. माझ्याकडे पाहत तिने कुत्सित हास्य केलं आणि बोलू लागली,” का ? का देवाने सर्व तुला दिलं ? मला का नाही ? प्रत्येकवेळी प्रधानाची मुलगी म्हणून तुझ्यापेक्षा कमी मान, देवाने सौंदर्य ही खुल्या हाताने दिलं तूला. आपण दोघी सोबत असतानाही नेहमी तुझचं कौतुक, तुझ्याच रूपाची चर्चा, तू तू आणि फक्त तूच असायची . मी का नाही ? कारण माझ्याकडे तुझ्यासारखं सौंदर्य नाही? रूप नाही ? तिथं पर्यंत सर्व सहनही केलं मी पण कुवर मोहनही तुलाच ? ज्यावेळी नृत्य करताना कुवर मोहन दालनात आले तेव्हा पाहताच प्रेमात पडले मी त्यांच्या. पण ……. तिथेही तू आणि तुझं सौंदर्य मध्ये आलं. तुझ्याकडे, तुझ्या सौंदर्याकडे पाहिल्यानंतर त्यांनी माझ्याकडे पाहिलं देखील नाही. त्याचवेळी ठरवलं काही झालं तरी तूला कुवर मोहनची होऊ द्यायचं नाही. आणि तिने अजून एक वार माझ्या पाठीत केला. कोणीतरी आल्यासारखं जाणवलं पण तो पर्यंत माझ्या शरीराने माझी साथ सोडायला सुरुवात केली होती. डोळे बंद झाले माझे.

मीनल चाचपडू लागले सगळीकडे. आणि सर्वत्र अंधार दिसतोय असं म्हणू लागते. dr. सानप तिला संमोहनातून बाहेर काढतात आणि शांत बेड वर झोपून राहायला सांगतात. तिला तिथे शांत झोपवून सर्व बाहेर येतात.

dr. सानप: आपल्याला हे कळलं कि तिला दिसत असलेल्या चित्रांचा अर्थ काय आहे. पण पुढे काय झालं हे कसं कळणार? आणि तिला भास झाला किंवा तिथे गेल्यावर तिला सर्व आठवलं हे मान्य करू शकतो पण ती त्या महालात गेल्यावर येणाऱ्या घुंगरांचा आवाज ती नसताना आम्ही गेल्यावर आला नाही का ? घुंगरांचा येणारा आवाज त्यावेळी महाल बनवण्याच्या पद्धतीचा इफेक्ट असेल तर ती आपल्यासोबत नसतानाही आवाज यायला हवा होता. पण तो आवाज नाही आला. शोधून काढायला हवं हे. सर्वाना त्यांचं बोलणं पटत. मीनल बाहेर येते. तिने त्यांचं सर्व बोलणं ऐकलं असतं.

मीनल : सर तुम्ही बोलताय ते बरोबर आहे. हे नक्की का होतंय ते कळच पाहिजे. मला आता बऱ्यापैकी सर्व आठवतेय. आपण उद्या त्या महालात जाऊन search करू काही ना काही नक्कीच मिळेल.सोक्षमोक्ष लावायलाच हवा.

(स्वप्नील तिचा हात हातात घेतो आणि मानेनेच संमती दर्शवतो. इकडे तिचे आई बाबा मुलीला मिळालेली भक्कम साथ पाहून भारावतात. )

आता तिला तिच्या प्रश्नाची उत्तरं हवी होती आणि ती तिला उद्या मिळणार होती. ती असतानाच येणारे घुंगराचे आवाज,तिच्या समोर ते चित्रपट उभे राहणे,भास .. सर्व तिला खुणावत होतं. उद्याच्या सकाळी अजून काही रहस्य तिला कळणार होती.

क्रमश ……..

Article Categories:
रोमांचक

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत