शेवटी तिने स्वतःसाठी जगायचे ठरवले..

Written by

अहो उद्या आईंचा वाढदिवस आहे, काहीतरी प्लॅन करूया ना…”

“मला खरंच वेळ नाहीये, तू सुचवून ठेव काहीतरी…चल निघतो..”

सासूबाईंच्या वाढदिवसाला काय करावं या विचारात सई पडली…केक कोणता आणावा, गिफ्ट काय द्यावं, सरप्राईज काय द्यावं हे तिने ठरवून ठेवलं.. वर्षभरात काटकसर करून बाजूला काढलेल्या पैशातून तिने एक हिऱ्यांचा हार सासूबाईंना घेतला..स्वतःच्या हातानें केक बनवला…संध्याकाळी रोहितही आला…त्याने आईला शुभेच्छा दिल्या, सासूबाईंच्या जवळच्या मैत्रिणींना सई ने बोलावून घेतले…वाढदिवस पार पडला…सासूबाई खुश झाल्या…

“पहा माझ्या मुलाचा किती जीव आहे माझ्यावर”

सासूबाई आपल्या मैत्रिणींना सांगू लागल्या…

रोहित म्हणाला,

“अगं आई, हे सगळं सई ने केलं आहे…”

“काहीही हा…मला कळत नाही का…तू स्वतः करशील सगळं पण नाव मात्र सई च घेशील…”

रोहित गप बसला…नशीब हे सर्व ऐकायला सई तिथे नव्हती…

एवढं करूनही सई ला कौतुकाचे किंवा आभाराचे 2 शब्द बोलले गेले नाहीत…

पण सई ने कधी अपेक्षाच केली नव्हती…वाढदिवस चांगला पार पडला यातच तिला समाधान होतं…

सई चा आधीपासूनच असा स्वभाव होता…दुसऱ्यासाठी किती करू आणि किती नाही…लग्न झालं तसं आपल्या सासरच्या लोकांसाठी काय करू अन काय नको असं तिला झालेलं…मोठ्या जाउबाई दुसऱ्या शहरात, त्यांना वेळोवेळी वाळवण पाठव, भाऊजींची नेहमी विचारपूस कर, नणंदेला भारी भारी वस्तू घे, तिच्या मुलांना खेळणी घे, अगदी शेजारचे सुद्धा काही मदत लागली तर आधी सई ला हाक मारत…सासर्यांचे जेव्हा ऑपरेशन झाले तेव्हा सर्वांच्या आधी पुढे येऊन आपले दागिने गहाण ठेवून पैशांची व्यवस्था केली…नातेवाईकाच्या घरी लग्न असलं की सई 4 दिवस आधी जाऊन अगदी मोलकरणीसारखं त्या घरात राबे पण तेही आनंदाने…दुसऱ्यासाठी असं तिने आपलं आयुष्य झोकूनच दिलं होतं…

सासर आणि माहेर यात कधीच दुजाभाव केला नाही, आपल्या आई वडीलांसाठीही ती जमेल तितकं करायची..

स्वतःसाठी साडी घ्यायला गेली की आधी सासू आणि नणंदेसाठी घेई, बाहेर फिरायचे झाल्यास सासू सासऱ्यांना सोबत नेई, घरात कोणी पाहुणा आल्यास पंचपक्वान्नसोबत 4 प्रकार डब्यात घालून देई…

सई काही दिवस माहेरी गेली, तिथे एका नातेवाईकाने सांगितले

“तुझी सासू तुझ्या बद्दल फार वाईट साईट सांगत होती…अमुक तमुक…”

सई ने ते साफ धुडकावून लावलं…

माझ्या घरात भांडण लावायचे असतील यांना म्हणून तिने दुर्लक्ष केलं आणि असं तिसऱ्याच्या सांगण्यावर घरातलं वातावरण गढूळ करायला तिला आवडणार नव्हतं…..

एकदा रोहित च्या मित्राच्या मुलाच्या वाढदिवसाचं निमंत्रण त्यांना आलं, घरात सर्वांचा स्वयंपाक सई ने केला आणि मग दोघे जायला निघाली इतक्यात मावस सासू घरी आल्या, तिने आनंदाने स्वागत केलं, चहा पाणी दिलं…

“सई चल आपल्याला उशीर होतोय…”

रोहित म्हणाला,

सई मावस सासूचा निरोप घेऊन निघाली…

ती दोघे थोडी पुढे गेली इतक्यात त्यांच्या लक्षात आलं की बर्थडे गिफ्ट घरीच राहीलं… त्यांनी गाडी फिरवली..रोहित बाहेरच थांबला आणि सई ला आतून गिफ्ट आणायला सांगितलं…

सई आत गेली…दार उघडचं होतं… सासू आणि मावस सासू बेडरूम मध्ये बसून गप्पा मारीत होत्या, तिच्या कानावर काही शब्द पडले…

“नशीबच फुटकं …आपल्याच वाट्याला ही सई आली… लोकांच्या सुना पहिल्या की वाईट वाटतं… आपल्यालाही त्यांच्यासारखी सून मिळाली असती तर किती बरं झालं असतं… तिच्या माहेरी तीच्या आईला 1000 रुपयांची साडी घेतली…लग्न झाल्यावर माहेर तोडावं लागतं हे कळत नाही आजकालच्या पोरींना…माझ्या वाढदिवसाला एक साडी सुद्धा घेतली नाही पहा ना…”

सई आता चक्कर येऊन पडायचीच बाकी होती…तिने हॉल मध्ये ठेवलेले गिफ्ट उचलले…गाडीत बसली…गाडीत तिचे विचारचक्र सुरू होते…

सासूला मी 1000 रुपयांच्या साडी पेक्षाही महाग असा 30000 चा हिऱ्यांचा हार दिला त्याचं काहीच नाही? आजवर इतकं केलं..सर्वांसाठी केलं…स्वतःसाठी म्हणून कधीच काही केलं नाही…आणि इतकं करून यांचे माझ्याबद्दल असे मत?? 

आता सई ने बदलायचं ठरवलं…बस्स झालं आता…आता स्वतःसाठी जगायचं..

मावस सासूच्या पुतण्याची पत्रिका द्यायलाच त्या आल्या होत्या, सासूने फर्मान सोडले, “सई, लग्नासाठी जा तू 4 दिवस आधी.. माझ्या बहिणीने बोलावलंय तुला…”

“कामं करण्यासाठी? राबवून घेण्यासाठी? आणि एवढं करून आपल्या बद्दल वाईटसाईट ऐकून घेण्यासाठी?” ती स्वतःशीच बोलली…

“मला जायला जमणार नाही…” सई म्हणाली…

तिच्या या उत्तराची सासूला सवयच नव्हती, सांगितले ते सई ऐकते अशीच सवय त्यांना…त्या गडबडल्या..

रविवारचा दिवस होता…सई ने रोहित ला शॉपिंग ला घेऊन जायला सांगीतले…सई कायम घरातच बुडाली असल्याने दोघांना क्वालिटी टाइम मिळत नव्हता…रोहित खुश झाला, खूप दिवसांनी दोघांना एकमेकांसोबत वेळ घालवायला मिळणार होता…

दोघेही बाहेर फिरली, सई ने यावेळी फक्त स्वतःसाठी 3 साड्या घेतल्या, दागिने घेतले…दोघांनी मनसोक्त गप्पा मारल्या…पाणीपुरी खाल्ली आणि घरी आले…

दोघे घरी आले, सासू नणंदे सोबत फोन वर बोलत होती, सई आणि रोहित ला आत येतांना आणि सई च्या हातात पिशवी बघत म्हणायला लागल्या…”तुला साडी आणली वाटतं…”

“यावेळी नाही आणली आई..”

सई म्हणाली, नंदेनेही फोनवर ऐकलं…ती हळूच फोन वर म्हणाली, “मला कसली घेतेय ती साडी..”

दर वर्षी 4-5 साड्या न चुकता सई ननंदेला घेत असे, त्याचं तिला कौतूक नव्हतं…आणि आज आणली नाही त्याची सल किती दिवस त्या दोघींना पुरली…

सई च्या वागण्यात सासूला बदल जाणवला… सई आता पूर्वीसारखी वागत नव्हती, उत्साही नव्हती. 

सई ने मात्र आता ठरवले, की आता फक्त स्वतःसाठी जगायचं..मी आपली मेहनत आपला वेळ घालवून दुसऱ्यासाठी जे करते त्याचं कौतुक तर नाहीच, वर आपल्याबद्दल इतका द्वेष लोकांना वाटत असेल तर का मी माझा वेळ आणि माझी energy घालवावी????
तिच्या अश्या वागण्याची सवय सासूला नसल्याने त्यांना आता सई ची किंमत कळू लागली.. काहीतरी बिनसलंय सई चं, त्याशिवाय ती अशी वागू शकत नाही…त्यांनी रोहित ला याबद्दल विचारलं…

“आई, अगं सई ने या घरासाठी, या घरातल्या माणसांसाठी किती काय काय केलं, पण कुणीही कौतुकाचे 2 शब्दही काढले नाही ग…पण तरीही तिने कौतुकाची अपेक्षा न ठेवता तिच्या स्वभावानुसार सगळ्यांच करत गेली… मला नक्की माहीत नाही तिला काय झालंय, पण तिच्याबद्दल कोणीतरी वाईट बोललं असणार आणि तिला ते समजलं असणार, नाहीतर अशी ती कधी वागलीये का??”

सासूला आपली चूक समजली…खरंच सई ने खूप केलं घरासाठी, पण आपण मात्र तिच्या शंभर चांगल्या गोष्टी न बघता एखाद्या वाईट गोष्टीवर बोट ठेवत गेलो…

सई ने स्वतःसाठी वेळ काढला, पण तिच्या लक्षात आलं की स्वतःसाठी करण्यात इतका आनंद नाही जितका दुसर्यासाठी करण्यात आहे…

एक दिवशी घरी पाहुणे आले .. पाहुणचार झाला…पाहुणे जायला निघाले इतक्यात सई सगळ्यांची नजर चुकवत बाहेर आली आणि पाहुण्यांच्या हातात 2 डबे टेकवले…

“असं रिकाम्या हाताने जाणार का?? नागलीचे पापड आणि नवीन बनवलेलं लोणचं आहे यात…खुशी ला आवडतं ना खूप लोणचं…?..”

कितीही प्रयत्न केला तरी सई चा स्वभाव काही बदलणारा नव्हता….

सासूने सई चं कौतुक सुरू केलं…तिच्याबद्दल दुसऱ्याकडे चुगल्या करणं बंद केलं आणि उलट तिचं कौतूक सुरू केलं..

या ना त्या मार्गाने सई च्या कानावर ते आलं…

आणि आता गाडी पूर्वपदावर आली..


Article Categories:
मनोरंजन

प्रतिक्रिया व्यक्त करा