शोधीसी मानवा राऊळी मंदिरी …..

Written by

काय ग् लक्षे गावात माऊलीचा गजर सुरू झालाय एकादस जवळच येऊन ठेपलीये का?

“व्हय धनी तिन दिवसांनी वारकरी पोचतील पंढरपूरला अन् एकादशीचा सोहळा होईल तिकडं , म्हणत लक्षीचे लकाकलेले डोळे गन्याच्या नजरेतून सुटले नाही”.

हो अन् तो सोहळा आपल्याला नाय बगता येनार म्हणत गन्या जोरजोरात रडायला लागला. लक्षे काय ग् चूक घडली हातून की, हे असले भोग नशिबाला आले. कसला विटाळ आलाय माझ्या अंगात की ज्यामुळं इतक्या दिसांची माझी सेवा धुळीला गेली. पांडुरंगाने कसला हा शाप दिला ग् मला लक्षे कसला ग् शाप दिला? …..म्हणत गन्या आता उर बडवून घेत होता.

“अव् धनी असं ओ काय करायलाय? तुमची काय बी चूक न्हाय तो वरतून बघतोय करेल तो सगळं निट”…. तुम्ही गपा बरं उगी …..नका असा जीवाला तरास करून घेऊ म्हणत लक्षीने नवरयाचं सांत्वन तर केलं पण तिचंही काळीज घडाघडा रडत होतं पण आपल्या रडण्याने आपला नवरा खचेल म्हणून ती वरवर शांतच होती.

लक्षीला आपल्या  नव-याच्या मनातली घालमेल समजत होती. पंधरा वर्षापूर्वी लक्ष्मी लग्न होऊन गन्याच्या घरात आली होती. आणि तसं तिने पाहिलं होतं की, गन्या प्रत्येक वर्षी स्वतःची सगळी कामं सोडून वारक-यांच्या सेवेत रहायचा. त्यांचं दुखणं, खुपणं काढत तो त्यांच्याबरोबर पंढरपूरला जायचा अन् तिथला तो आनंदमय सोहळा बघत वेड्यासारखा व्हायचा.

“लक्षे अग् असलं सुख कुटच न्हाई म्हणत तो बेभान व्हायचा”.

अरे ! पण एकाएकी हे काय झालं. कसला हा महारोग जडला गन्याला अन् इतके दिवस प्रेमाने वागणारे गावकरी अचानक कसे त्याच्या जिवावर उठले?….

वांझोटेपणाचं दु:ख कमी होतं की, काय म्हणून गन्याला हा महारोग जडला’.

पोलीस वगैरे गावात पोचायचे नाहीत अन् सगळे निर्णय अजूनही गावचे पंचच घेत होते.

बैठक झाली आणि गावाने गन्याला वाळीत टाकलं. त्याचा चेहरा कोणालाच दिसणार नाही अशा ठिकाणी त्यांना फेकलं गेलं.

‘धनी सोडू हे गाव जाऊ दुसरीकडे’ म्हणत, असतानाही गन्या गाव सोडायला तयार नव्हता त्याला वाटायचं की, त्याचा पांडुरंग तिकडे वस्ती करुन होता अन् त्याला सोडून जावं तरी कसं?…म्हणत ती दोघं अजूनही तिथंच होते.

गन्याची श्रध्दा म्हणा की अजून काय…. वाळीत टाकूनही गन्या अन् लक्ष्मी दोघांचा संसार बरा चालू होता. झालेला महारोग गावक-यांशी चोरून आणलेल्या वैद्याकडूनच्या औषधांनी आता कमी होत होता ..पण आषाढी एकादशीला पांडुरंगाचे दर्शन न होणे आणि आपल्या हातून लोकांची सेवा न घडणे ह्याची सल गन्याला खोलवर रुतत होती. आता अशी सेवा नाय करुन घेत म्हणून चार पैसे काढून चोरून दानपेटीत टाकावं म्हणून त्या दोघांनी पैसे बाजूला ठेवले होते.

रोज सकाळी त्याचा माऊलीचा गजर सुरु व्हायचा अन् तो त्या गजरात न्हाऊन निघायचा.

आज मात्र गन्याला झोपच लागली नव्हती. तो तळमळत होता कारण दुस-या दिवशी एकादशी होती. आपल्या हातून कुठलच कर्म झालं नाही ह्याची त्याला बोच होती रडून त्याचे डोळे सुजले होते.

अन्  अचानक अर्ध्या रात्रीच्यावेळी गन्याच्या झोपडीवर कोणाचीतरी थाप पडली. गन्या अन् लक्ष्मी उठून बसले. कोण असेल दरवाजात आणि ते ही आपल्या झोपडीत कसं काय आलं असेल? ह्या विचारांच्या चक्राने त्यांनी दरवाजा उघडला.

दरवाजात एक आठ दहा वर्षाचं पोर पावसात भिजून गारठलेल्या अवस्थेत होतं.

“माय ग् ! भाकर मिळंल का?  भुकेनं पोट कालवलय…. कोन बी मला जवळ उभं करंना…. माय-बाप न्हाई अन् माझ्यामुळं विटाळ झालं म्हनत्यात अन् म्हनूनच मला मारुन हाकलून लावलंय,  पन मला काय त्यातलं कळंना… ‘लय भुक लागलीये ग् माय’….. लय दुरून चालून आलोय कालपासून दाना न्हाई पोटात” ….म्हणत पोरगं काकुळतीला आलं होतं.

त्याला बघताच लक्ष्मीचा अन् गन्याचा जीव हेलकावला. लागलीच त्याला आत घेत लक्ष्मीने घरात होते ते कपडे त्याला दिले अन् चुल पेटवली चुलीच्या ऊबेने त्याला तरतरी आली आणि लक्ष्मी थापत असलेल्या भाकरीला पहात लाळ गाळत त्याची भुक अजुनच वाढत होती. कालवण अन् भाकरी होताच पोरगं त्यावर तुटून पडलं. अन् त्याला बघत गन्या अन् लक्ष्मीचा उर भरुन आला. इतक्या वर्षात असं दृष्य त्यांनी कधी पाहिलच नव्हतं.

मटक-मटक आवाज करत भुकेल्याला खाऊ घालण्यात त्यांचं मन आता शांत झालं होतं. एव्हाना अर्धी रात्र संपून पहाट झाली होती. पोरगं आता झोपायला आलं होतं. अर्धवट झोपेत असलेल्या त्या पोराला गन्यानं नाव विचारलं अन् पोरगं ‘सावळ्या’ म्हणत झोपी गेलं.

एकादशीची सकाळ झाली. गन्या आवरून अभंग गाऊ लागला तल्लीन होत नाचू लागला, लक्ष्मी पण सोबतीला बेभान होत नाचू लागली. गावातून अभंगाचे, टाळ,मृदंगाचे बोल कानात घुमु लागले. दोघं विठूरायाच्या चरणी लीन होत गेले.अन् सावळ्या त्यांना बघत तो ही त्यांच्या सोबत आंनदात नाचू लागला.

कसला आनंद झाला असेल गन्या अन् लक्ष्मीला?…. आतापर्यंतची सगळी दु:ख का विसरली गेली होती त्यांना? ….एकादशीला त्यांना खरा पांडुरंग तर नव्हता सापडला ना?  ‘सावळ्याच्या रुपात’? ……

“एकादशीच्या उपवासात भुकेल्याला खाऊ घालण्यात त्यांना जगण्याचा खरा मंत्र तर सापडला नव्हता ना”? …. काय घडलं असावं नक्की?….

ती दोघं बेभान होत नाचू लागली स्वतःच्याच तंद्रीत सावळ्या विठूरायाला आज ख-या अर्थाने मनापासून भेटत होती.अभंगाच्या सुरांमधे अाता एक वेगळाच सुर मिसळत होता अाणि तोच सुर आता नखशिखांत भरला होता.

  • भेटतो देव का पूजनी, अर्चनी
  • पुण्य का लाभते दानधर्मांतुनी
  • शोध रे दिव्यता आपुल्या जीवनी
  • आंधळा खेळ हा खेळशी कुठवरी
  • शोधिसी मानवा राऊळी, मंदिरी
  • नांदतो देव हा आपुल्या अंतरी
  • शोधिसी मानवा राऊळी, मंदिरी

©Sunita Choudhari.

(मित्र-मैत्रीणींनो आणि माझ्या वाचकांनो नमस्कार. भगवंताची सेवा आणि मनातला देव हा एक ज्याच्यात्याच्या श्रध्देचा भाग आहे म्हणूनच ह्या कथेने कोणाच्याही भावना दुखावल्या गेल्या असतील तर क्षमा असावी. आजच्या ह्या कथेतल्या एकादशीचा सोहळा तुम्हाला कसा वाटला मला आवर्जून सांगाल. धन्यवाद )

Article Categories:
प्रेम

प्रतिक्रिया व्यक्त करा