श्यूsss कुणीतरी काहीतरी बोलतंय तिथं !!

Written by

“अडक फग्वबक वाकगवतंज जुबगवेएवम घटपदबुजईडक जफजिऊ वडगड गडफुगूसुत”

नाहीss हं नाहीss हे चुकून नाही टाईप झालं. मी मुद्दाम केलंय.

काय कळतय का बघा बरं??

नाही ना, तुम्हालाच काय मलाही नाही कळत.

मात्र गेली काही वर्ष मी हे शोधण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतेय.

कारण ही अशीच कोणतीतरी भाषा आमच्या घरातली एक नमुनी झोपेत बोलत असते.

कित्येक वेळा केवळ कुतूहलापोटी मी माझी झोप सोडून तिच्याकडे कान लावून बसते. पण श्या, काडीचं काय समजतच नाही.

अन्डु, गुन्डु, पान्डु काय ते तिचं तिलाच माहीत.

आणि मी जणू ती भाषा शोधायचा विडा उचलल्याप्रमाणे ती बोलताना कानात प्राण आणून ऐकत असते अगदी.
तिच्या तोंडाजवळ कान नेऊन नेऊन कानाच्या गुदगुल्या जोमाने वाढल्यात, बाकी भाषेचा शोध काही लागला नाही.

चेहऱ्यावर वेगवेगळी एक्सप्रेशन्स, कधी कुणाशी भांडण, कधी मोठ्याने हसणं, कधी गणिताचे प्रॉब्लेम्स, तर कधी कुठलं गंभीर डिस्कशन बरेच उद्योग चालतात तिचे झोपेतल्या झोपेत, खुश्शाल दुसऱ्यांच्या झोपा उडवून!!

कधी अशी ओरडते की मीच दचकून घाबरून जाते.
असं वाटतं, कुणी पछाडलं की काय??

त्यात ती कुठली भाषा पकडलेली, अन्डु, गुन्डु, पान्डुवाली, भीती वाटणारच ना! बघा जरा कल्पना करून, रात्रीच्या काळ्याकुट्ट अंधारात आपल्या बाजूला झोपलेलं माणूस कुठल्या तरी भलत्याच भाषेत बडबडत बसलंय.

ही हिची मागच्या जन्मातली भाषा तर नाही ना?, हा विचार सर्वात पहिले येऊन घाबरवतो.

आणि नंतर उगाच भुताच्या पिक्चरमधले, सिरीयलमधले सीन मला राहून राहून आठवायला लागतात. झोप कसली येतीये मग,आणि आलीच तर स्वप्नात एखादी हडळ गॅरेंटेड हजेरी लावणार!

तसं हल्ली कधीमधी मराठी, हिंदी पण कानावर यायला लागलय जरा, मग मी जागेपणी आणि आमची नमुनी झोपेत अशा गप्पा चालतात आमच्या. मज्जा येते मला खूप.

काय बोलेल त्याला हो हो, नाही नाही, हो का, अस्सं का, अरे बापरे! करत बसायचं…..मला एकदम थ्रिल वाटतं असं झोपेतल्या माणसाशी बोलायला. फक्त बेणं काय बोलतंय ते जरा तरी कळलं पाहिजे, अन्डु, गुन्डु, पान्डुवर काय कप्पाळ बोलणार!!

एकच नाही, असे टोटल तीन नमुने आहेत आमच्याकडे!

दुसरा नमुना मला दिवसभर ऑफिसमध्ये काय काय झालं हे झोपेत सांगत असतो, निद्रावस्थेत सुध्दा डोक्यात ऑफिसमधली कामचं घुमत असतात त्याच्या. कधी कोणाला कोटेशन द्यायला सांगतो, तर कधी मेल करायला.

नाहीतर मग माझी झोप खाsडकन उडेल, अशा मोठ्या मोठ्या लाखां-लाखांच्या गोष्टी करतो. आप दस लाख का चेक दे दो, पंधरा लाख का RTGS करो!!

अशावेळी मी आपली हे एवढे पैसे कुणी माझ्या अकाऊंटला ट्रान्सफर केले तर किती मज्जा येईल, मी काय काय करेन याची सुखस्वप्न बघत झोपी जाते. पण स्वप्नातसुद्धा चुकूनही एवढया पैशाचा आनंद लुटताना दिसले नाही कधी! हाडळी मेल्या बरोब्बर येतात!!

आता राहिला तिसरा नमुना, आमचा छोटा मंक्या. त्याला तर झोपेत सुद्धा झोपायचं नसतं.

वरच्या दोन नमुन्यांच्या गप्पागोष्टी झाल्यावर जरा डोळा लागतोय न लागतोय तोच, हा अतरंगी मला हलवायला लागतो, मम्मी उठ सकाळ झाली. बरेचदा झोपेतल्या झोपेत सकाळ झाली म्हणून उठून बसतो. कधी डायरेक्ट उठून घरात फिरायला लागतो आणि त्याला त्याच्या स्वप्नात सकाळ झाली असेल; खरी नाही हे कितीही सांगून कळत नाही. किंवा कळूनही तो न कळल्याचं सोंग करत असावा.

कारण हा नमुना स्वतःच्या तर स्वतःच्या, वरून माझ्याही झोपेचा त्याच्या जन्मापासून पक्का वैरी बनून बसलाय.

झोप या शब्दाशीच सक्त म्हणजे सक्त नफरत है उसको!!

काय मग, पाहिलंत ना कशी नमुनेदार मंडळी जमलीयेत आमच्या घरात एकेक!

झोपेत सुद्धा यांचं जग चालूच असतं, आणि मी आपली स्वतःच्या झोपेला तिलांजली देऊन त्यांचं झोपेतलं जग अनुभवत असते. भारी रोमांचकारी वाटतं मला ते सगळं!!

तुमच्याकडे आहेत का असे नमुने झोपेत बोलणारे, चालणारे, उगाच हातवारे करणारे, असतील तर मलाही कळू दे की जरा!!

©️स्नेहल अखिला अन्वित

लेख आवडल्यास लाईक, कमेंट, फॉलो नक्की करा,

आणि शेअर करावासा वाटल्यास नाव न उडवता करा?

Article Categories:
मनोरंजन

प्रतिक्रिया व्यक्त करा