श्रावणात घननिळा बरसला..

Written by

श्रावणात घननिळा बरसला..

श्रावण हा शब्द येताच प्रथम ‘श्रावणात घननिळा बरसला..’ हे लता दीदीचे गाणे सहजच आपल्याला आठवते.

निसर्गचक्र आणि परंपरा या दोन्ही दृष्टीने श्रावणाला महत्व आहे. चार्तुमासातील श्रेष्ठ महिना म्हणून श्रावणाचे वर्णन केले जाते. आषाढी अमावस्या , दीपपूजन तथा दिव्याची आवस झाली की व्रतवैकल्यांना सुरुवात होते आणि वातावरणही बदलते. ऊन-पावसाचा खेळ सुरू होतो.

श्रावण हा ऋतूच आपल्याला प्रेमाचा गोड संदेश देत असतो. निसर्गाची किमया म्हणावी तर सर्वत्र त्याची उधळण करत असतो. सारा निसर्ग जणू नवचैतन्याने न्हाऊन गेलेला असतो. ह्यात नैसर्गिक सृष्टीचा आस्वाद घेताना अगदी दृष्टी कमी पडते असा काहीसा भास होतो.

श्रावणात भूमी हिरवाकंच शालू नेसून अगदी नव्या नवरीसारखी नटलेली असते. झालेल्या पावसाने नद्या-नाले वाहत असतात. धबधबे बघायला जायची मजा तर काही औरच असते . शेतकरी कामात अगदी गढून गेलेला असतो आणि या काळात त्याला आनंद देण्याचे काम हा श्रावण करत असतो. श्रावणात पडणारा पाऊस हा आपल्याला आपला जणू जिवलग वाटणारा सखा असतो.

ये रे येरे पावसा , तुला देतो पैसा
पैसा झाला खोटा, पाऊस आला मोठा..!

म्हणतं लहान मुले ह्या दिवसांचे स्वागत करण्यास तत्पर असतात. पावसाच्या सरी बरसल्या की त्यांच्या चेहरऱ्यावर चा आनंद ओसंडून वाहत असतो. आजही आठवतं ,पहिला श्रावणी सोमवार म्हणून दोन तास आधी सुट्टी मिळाली की आम्ही देखील घरी जाऊन कॅलेंडर पाहून सुट्टयांच्या तारखांची नोंद करायचो. सकाळी उठल्यावर ‘सोमवार कोण धरणार आहे ?’ असा आईचा प्रश्न असायचा.उपवासाच्या निमित्याने पदार्थांची मजा घेणे काही औरच होते.

तारुणाईच्या मनातला श्रावन हा एक वेगळी अनुभूती घेऊन येतो. त्याच्या येण्याने तरुणांच्या मनाची चलबिचल अफाट असते. मैत्री, प्रेम, ओढ, जिव्हाळा, विरह अशा अनेक भावनांना गुरफटून टाकण्याचे काम हा श्रावण करीत असतो. जेव्हा नवविवाहित असलेल्या स्त्रीला सणवारासाठी सासरी , माहेरी जाते तेव्हा नवयुगलांच्या मनात एकमेकांबद्दल असलेली ओढ या श्रावण सरीत अगदी प्रकर्षाने दिसून येते.

मेघा रे मेघा रे…मत परदेस जाके..
आज तू प्रेम का संदेश बरसा रे…

असे ह्या विरह गीताचा सुद्धा आधार ह्याच दिवसात घेतला जातो.

महिन्याभराच्या या आनंदोत्सवाची सुरूवात होते शिवामूठच्या व्रताने. सोमवार सारखाच मंगळवारही महिलांसाठी विशेष. नववधूसाठी तर खासच. संसारातील सौख्य-प्रेम कायम राहावं या भावनेनं या दिवशी मंगळागौरीचं व्रत करतात. पहिल्या मंगळागौरीच्या व्रताला परिसरातील महिलांना आमंत्रण द्यायचं, मंगळागौरीची पुजा, त्यानंतर ओव्या..उखाणे…हळदकुंकू…ओटी भरणं…त्यानिमित्ताने महिलेच्या जीवनात माहेर आणि सासर दोन्हीकडचं प्रेम अनुभवायला मिळतं…

शुक्ल पक्षातील पंचमीला नागपंचमीचा सण येतो. नाग बिळातील उंदरांना नष्ट करणारा असल्याने तो शेतकऱ्यांचा मित्र असतो. म्हणून त्याची पुजा करतात.महिला या दिवसाला ‘झोकापंचमी’ म्हणूनही संबोधतात .

शुक्ल पक्षातील श्रावणी पौर्णिमेला ‘नारळी पौर्णिमा’ म्हणून ओळखले जाते. समुद्र किनारी राहणाऱ्या कोळी बांधवांसाठी हा खास सण असतो . ज्याच्यावर संपूर्ण कुटुंबाचे जीवन अवलंबून आहे अशा ‘समिंदराला’ या दिवशी प्रेमाने नारळ अर्पण केला जातो. रंगबेरंगी पारंपरिक पोशाखाने समुद्र किनारा फुलतो. भारतीय संस्कृतीत भाऊ-बहिणीच्या नात्याचं असलेलं महत्व ” रक्षाबंधन ” म्हणून अधोरेखित करणारा हा दिवस. भावाला राखी बांधल्यावर त्याच्याकडून मिळणारी ओवाळणी बहिणीला लाखमोलाची असते.

“गोविंदा आला रे आला..” चा जल्लोष करत श्रावण वद्य अष्टमीला श्रीकृष्ण जन्माच्या पुढच्या दिवशी ” गोकुळ अष्टमी ” येते. विविध मंडळांची महिना भर आधि पासून तयारी केलेली दहीहंडीची धमाल आणि सोबतीला बच्चेकंपनीला दहीकाल्याच्या प्रसादाची चंगळ, गोविंदा पथकाचा दहीहंडीचा पराक्रम आणि ह्या सगळ्यात पावसाने आपली हजेरी लावली तर आनंदाला नुसते उधाण येते.

 

ह्या सगळ्यांच्या मध्ये सण येतो तो आपल्या देशाचा , अर्थात “स्वातंत्र्य दिन ” . आपल्या भारत मातेला इंग्रजांच्या ताब्यातून स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी ज्या शूर-वीर जवानांनी आपली प्राणांची आहुती दिली त्यांना मनापासून अभिवादन करण्याचा हाच तो महत्वाचा दिवस.!

श्रावण संपताना आता शेत हिरवेगार होऊन बहरू लागत. पीकाची राखण सुरू झालेली असते. मातृदिन आणि वृषभपूजन- पोळा या उत्सवांनी श्रावण संपतो. परंतु तो मानवाला निसर्गप्रेमाची शिकवण देवून जातो. साऱ्या सृष्टीला तृप्त करतो. संतुष्ट करतो. श्रावण हा सृजनशील आहे. आणि आपल्या लाडक्या गौरी गणपती बाप्पाची प्रतिक्षा सुरू होते. वेगवेगळे सण आणि उत्सव याचसाठी असतात. ते माणसांना एक सुत्रात बांधतात. विविधरंगाने नटलेला श्रावणही हाच संदेश सगळ्यांना देऊ बघत असतो.

यंदाचा घडीला श्रावणाने असंख्य लोकांना बेघर केले, पुराच्या पाण्यात वाहून नेले , पिकांची नासाडी केली, शेतकऱ्यांना जीवन मरणाची परिस्थिती निर्माण करुन दिली. पूर्ण देशात पाण्याने हाहाकार माजला आहे. प्रश्न बिकट आहे पण ह्या आलेल्या वेळेला तोंड देण्यास लोक सज्ज झाले आहेत. हजारो लोकांनी तन , मन, धनाने आपले सहकार्य देण्यासाठी पुढाकार दाखविला आहे. अशा संकटसमयी श्रावण महिना बळिराजाला जसा प्रिय आहे तसाच तो अगदी सर्वाना हवाहवासा वाटतो. असा हा श्रावण महिना मनातील दु:ख दूर करून मन आनंदित रहायची शिकवण देत येणाऱ्या संकटांना तोंड देण्यासाठी शक्ती प्रदान करीत असतो…!

©नेहा खेडकर❤✍

Article Categories:
मनोरंजन

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत