संकटकाळी देव धावून येतो….

Written by

मागील काही दिवसांपासून पावसाने तिच्या गावात थैमान घातला होता. संपूर्ण गाव पाण्याखाली होतं. सर्व गावकऱ्यांना गावातून बाहेर पडणं अशक्य झालेले. कोणाशी संपर्क होणे शक्य नव्हते. प्रत्येक घरात शिरलेलं पाणी गावाची अस्ताव्यस्त अवस्था पाहून तिचं मन हळहळ व्यक्त करत होतं. गावातल्या प्रत्येकाच्या आसपास पाणीच पाणी होतं, डोळ्यातलं पाणी मात्र असून नसल्यासारखं.
लहानाची मोठी होईपर्यंत तिला शिकवण्यात आलं होते. संकटकाळा मध्ये आपण देवाला हाक दिली की तो धावून येतो. (© खादीम सय्यद)
आज मात्र परिस्थिती वेगळी होती. संकट खूप मोठं होतं. अक्षरशः इतक मोठं की त्याने देवाला सुद्धा आपल्या कवेत घेतलेले, म्हणजेच पाण्याखाली बुडवलं होतं. ज्या देवाचा धावा करावा, ज्या देवाला साकडे घालावे त्यालाही साद घालने मात्र अशक्य असल्यासारखं
जिथपर्यंत पहावे तिथपर्यंत तिला पाणीच पाणी दिसत होते. काही वेळाने दूर अंतरावर एक हालचाल नजरेस पडली. काहीतरी आपल्या दिशेने येत आहे असे जाणवले. थोड्यावेळाने ती अंधुक दिसणारी आकृती स्पष्ट होताच. तिला ती बचावकार्य पथकाची बोट असल्याचे समजले. तिला व तिच्या सोबत अडकलेल्या सर्वांना वाचवण्यासाठी ते आलेले. (© खादीम सय्यद)
त्यानी सर्वांना तेथून बाहेर काढण्यासाठी बोटीमध्ये बसवण्यास सुरूवात केली. तिलाही बोटीमध्ये बसवण्यात आले. ती बोटीमध्ये असताना मात्र तिच्या डोक्यात एकच गोष्ट फिरत होती संकटकाळी देव धावून येतो. तिने आसपास शोध घेतला व तिला बाजूला उभे असलेल्या वर्दीतल्या माणसांचे पाय दिसले. तिने क्षणाचाही विलंब न करता ते पाय पकडले व आशिर्वाद घेतले. कारण देव त्या वर्दीतल्या माणसांच्या रूपात तिला दिसला होता.
( सदरील पोस्ट ही कल्पनेतून मांडण्यात आली असून वास्तव याहीपेक्षा विदारक आहे. © खादीम सय्यद )

Article Categories:
सामाजिक

प्रतिक्रिया व्यक्त करा