संक्रांतीचं अनोखं वाण

Written by

आला सण संक्रांतीचा

आनंदोत्सव हर्षाचा

तिळगूळातील गोडव्याचा

ठेवा मधुर नात्याचा

नवीन वर्षातील मोठा सण म्हणजे मकरसंक्रात. स्त्रियांचा साडी पासून वाणाच्या खरेदीपर्यंत दांडगा उत्साह असतो मकरसंक्रातीला.

मग मैत्रिणींनो तुम्हीही संक्रातीची तयारी जोरदार चालू केली असेल…इतर वेळी काळा रंग शुभ कामात नको पण यावेळी मात्र हौसेने काळ्याभोर रंगाची भरजरी काठाची पैठणी, नथ, झुमके,बांगड्या,पैंजण,चंद्रकोर, हलव्याचे दागिने सगळं घेतलं असेलच ना तुम्ही…आणि सर्वात महत्वाचं संक्रातीच हळदीकुंकू आणि वाण काय द्यायचं हा दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी मोठा प्रश्न तुम्हाला पडलाच असेल.

 

चला मग यावेळी काहीसं वेगळं संक्रातीच अनोखं वाण म्हणून देऊया ना..

 

संक्रांतीला स्त्रिया एकत्र येतात, वस्तूंची म्हणजे वाणाची देचं घेवाण होते सोबत सुख दुःखेही वाटली जातात. किती ठरवलं किंवा म्हंटल की हळदीकुंक समारंभ अस नाव न देता तिळगुळ समारंभ वगैरे नाव देऊन आनंद लुटा पण पूर्वापार हळदीकुंकु याच नावाने हा समारंभ साजरा होत आलाय जो कदाचित पिढ्यानपिढ्या तसाच पुढे जात राहील पण काही गोष्टी आपण आपल्या सद्सद्विवेक बुद्धीने यात नक्कीच बदलू शकतो. तस तर हळदीकुंकुवर मुलीपासून सर्व स्त्रीपर्यंत सगळ्यांचाच हक्क असतो. पण आपल्या रूढी,परंपरा काही स्त्रियांवर याबाबतीत अन्याय करताना दिसून येतात.

प्रत्येक स्त्री नवऱ्याच्या हातात हात देऊन वादळवाऱ्यात त्याच्या सोबत उभं राहून ती संसार पुढे नेत असते पण काही स्त्रिया पतीच्या निधनानंतरही तितक्याच खंबीरतेने,  सक्षमतेने, कर्तृत्वाने, समाजाच्या बऱ्यावाईट मानसिकतेचा सामना करत आपल्या मुलांना घडवतात, संसाराचा भार एकटीच्या खांद्यावर यशस्वीपणे पेलतात. अशा स्त्रियांचाही हक्क आहेच ना या हळदीकुंकूवर…म्हणून यावर्षीपासून या लढवय्या रणरागिणी स्त्रियांनाही हळदीकुंकूचा मान देऊन सौभाग्याचं वाण त्यांच्यासोबत लुटुया.

 

संक्रांत प्रत्येक घरात आनंदाने साजरी केली जाते. अशावेळी आपल्या घरी कामाला येणाऱ्या मावशीना, फार कमी वयात परिस्थिती मुळे ज्यांच्यावर काबाड कष्ट करायची वेळ येते अशा स्त्रियां सोबत त्यांच्या मुलींना तिळगुळ समारंभाला  बोलावून त्यांच्या मनात असणाऱ्या मासिक पाळी संबंधी अंधश्रद्धा, गैरसमज, शंका दूर करून त्यांच्या निरोगी आयुष्यासाठी ‘सॅनिटरी नॅपकीन’ वाण म्हणून देऊया. या विषयावर मनमोकळे पणाने बोलून, अडगळीत लपवुन ठेवल्या जाणाऱ्या या वस्तूला उघडपणे स्वीकारण्याची,मागण्याची नवीन ताकद देऊया.

 

आजकाल मोबाईल वापरामुळे जग फार जवळ आलं अस आपण म्हणतो पण प्रत्येक व्यक्ती आता मोबाईल मध्येच डोकं खुपसून असते. तेच डोकं थोडंस पुस्तकात डोकवाव, नवीन जून साहित्य वाचून आपल्या ज्ञानात भर पाडून घ्यावी…आपल्यासोबत आपल्या  मुलांनाही पुस्तक वाचनाची आवड निर्माण व्हावी यासाठी आपल्या मैत्रिणींना एखादे छानसे पुस्तक मग ते कादंबरी,कथा पुस्तक, अगदी पाककृती पुस्तक, आजी बाईचा बटवा अशी पूर्ण कुटुंबाला उपयुक्त होतील अशी पुस्तकं वाण म्हणून देऊया. ‘वाचाल तर वाचाल’ लक्षात ठेवा😊.

 

सध्या प्लास्टिक आणि त्यामुळे होणारं प्रदूषण जगजाहीर आहे. आपल्या स्त्रियांना दैनंदिन आयुष्यात भाजी आणण्यापासून ते नोकरीवर भाजीपोळीचा डबा घेऊन जाईपर्यंत कितीतरी गोष्टीत प्लास्टीक पिशव्यांची गरज भासते. कुठे ना कुठे आपण या प्रदूषणाला जबाबदार आहोतच तेव्हा प्लास्टिकमुक्त मोहिमेत आपणच सक्रिय होऊया. यावर्षी हळदी कुंकूला येणाऱ्या स्त्रियांना कापडी पिशव्या वाण म्हणून देऊन प्लॅस्टिक प्रदूषण कस टाळता येईल याबद्दल थोडं मार्गदर्शनही करूया. चला मग आपला भाग,आपला परिसर प्लास्टिक प्रदूषण मुक्त होण्यासाठी खारीचा वाटा आपणही उचलूया.

 

हल्ली शहर असो वा गाव निसर्गाची देणं असलेली झाडं फार विरळ होत चाललीयेत. आधुनिकतेच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात वृक्षतोडही चालू आहे.  आधुनिकतेच्या जगात घरोघरी मणिप्लान्ट दिसेल पण तुळस मात्र दुर्मिळ होत चाललीये. तेव्हा यावर्षी बहुगुणी तुळस किंवा कोरफड,गवती चहा सारखी इतर औषधी वनस्पती वाण म्हणून भेट देऊया. आयुर्वेदिक वनस्पतींच महत्व पटवून देऊन निसर्ग संवर्धनात थोडासा हातभार आपणही लावूया.

 

संक्रांत म्हणजे स्त्रियांचा सण. खरतर आपण स्त्रिया हळदीकुंकुवाच्या निमित्ताने एकत्र येऊन नारीशक्तीचाच सन्मान करतो.यावर्षी आपण सर्व नारीशक्तींनी शक्य होईल तेवढे रुपये/रक्कम (अगदी दहा रुपये सुद्धा) जमवून ही देणगी निधीच्या स्वरूपात कोणत्यातरी NGO ला, गरजू किंवा आजारी व्यक्तीला,वृद्धाश्रमाला, गरीब मुलांच्या शिक्षणासाठी दान करून सौख्याच वाण लुटुया. समाजाप्रती आपण चांगलं कार्य केले म्हणून आपल्यालाही समाधान होईल आणि गरजू व्यक्तीच्या चेहऱ्यावर हास्याचे क्षणही उमटतील.

तर मग मैत्रिणी यावर्षीपासून अनोखं वाण देऊन आपल्यासमवेत सगळ्यांचीच संक्रांत गोड करणार ना😊.तुमची काही वेगळी मतं असतील तर नक्की जाणून घ्यायला आवडेल..कॉमेंट्स मध्ये नक्की सांगा. मकरसंक्रातीच्या हार्दिक शुभेच्छा😊🙏.

 

©सरिता सावंत भोसले

Article Categories:
सामाजिक

Comments are closed.