संघर्ष करण्याची प्रेरणा

Written by

एका ऑफिसच्या कामानिमित्त ठाणे येथे आलो होतो. पहाटे पाच वाजता जाग आली तेव्हा पासूनच पाऊस धो-धो कोसळत होता.
ऑफिसचे काम उरकून परत पुण्याला यायचे होते.
काम उरकल्यानंतर मी ऑनलाईन माझी प्रगती एक्सप्रेस ची (4.55 pm) कम्फर्म तिकीट बुक केली आणि लवकरच स्टेशनला पोहोचलो. पावसाच्या बरसण्यात थोडा देखील बदल झाला नव्हता तो पहाटे प्रमाणेच अजूनही धो-धो च कोसळत होता.
गाडीला अजून एक दीड तास वेळ बाकी होता. त्यामुळे मी स्टेशन वरच फेरफटका मारत होतो. या प्लेटफाॅर्म वरून त्या प्लेटफाॅर्म वर करत एक तास वेळ घालवला. 4.40 च्या आसपास माझ्या गाडीची अनाउन्समेंट झाली.
मी ठाणे स्टेशन चे प्लेटफाॅर्म नंबर 5 गाठले आणि माझ्या नजरेस वरील फोटोतील बाबा पडले. एका हातात ब्लाईन्ड केन (लाल पांढर्या रंगाची अंध व्यक्ती साठी असलेली विशेष अशी काठी) व रंगीबेरंगी वेगवेगळे पाकिटे गळ्यात अडकवलेले. दुसर्या हाताच्या खांद्यावर काही शिट्या व काही लहान मुलांची एकाच प्रकारची खेळणी अडकवलेली होती.(खादीम सय्यद ©)
साहजिकच दिसत नसल्यामुळे ते प्लेटफाॅर्म वर अंदाज घेत हळूहळू चालत होते. मी एक क्षण स्तब्ध होउन त्यांच्या कडे बघतच राहिलो. तितक्यात पलीकडच्या प्लेटफाॅर्म वरील रेल्वेचा हॉर्न वाजला, त्या हॉर्नच्या कर्कश आवाजामुळे मी स्तब्ध मुद्रेतून बाहेर पडलो आणि माझ्या लक्षात आलं की ते बाबा प्लेटफाॅर्म वर असलेल्या पिवळ्या लक्ष्मणरेषेच्या ( प्लॅटफॉर्म वर उभे राहण्यासाठी निश्चित केलेली हद्द दाखवण्यासाठी असलेली पिवळी पट्टी ) पलीकडील बाजूने चालत होते. मी लागलीच त्यांच्या दिशेने पुढे सरसावलो व त्यांचा हात माझ्या हातात घेत त्यांना बोललो ” बाबा तुम्ही रेषेच्या पलीकडील बाजूने चालत आहात जर ट्रेन आली तर…? या अलीकडे ह्या बाजूने चला थोडं अलीकडंन….”
ते अलीकडील बाजूस आले व बोलले ” बाळा मला कुठं रे दिसते ती रेष, मी आपला चालत असतो जमेल त्या दिशेने …”
मला वाटले बाबांना काही तरी द्यावे मदत म्हणून पण ते असंच घेणार नाहीत ह्याची खात्री होती. कारण त्यांचा स्वतः बद्दल असणारा स्वाभिमान स्पष्ट त्यांच्या चेहर्यावर दिसत होता. एकीकडे अपंग नसलेली लोकं अनेक ठिकाणी अपंगत्वाच नाटक करून ह्याच मुंबई भीक मागत बसलेली अनेक वेळा आपल्याला दिसतात. तर दुसरीकडे या बाबां सारखे कितीतरी लोक काहीतरी छोट्या-मोठ्या वस्तू स्टेशन वर ट्रेन मध्ये विकून स्वाभिमानाने स्वतःच्या पोटापाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी संघर्ष करतात.(खादीम सय्यद ©)
बाबांना मी विचारले ” बाबा सर्वात मोठ फोल्डर कोणतं आहे तुमच्याकडे ? ” स्मित हास्य करत ते उत्तरले ” माझ्याकडे ए.टी.एम ठेवण्यापासुन ए फोर च कागद ठेवण्या पर्यंत फोल्डर आहेत. तुम्हाला कुठलं देऊ ? ”
खरं तर मला कोणतं फोल्डर हवय ते माहीतच नव्हते कारण मला विशेष अशी गरजच नव्हती. पण बाबांना मदत करायची होती. मी त्यांना ” ए फोर साईज च द्या.. ” बोलत खिशातून शंभरची नोट काढली .. बाबां म्हणाले ” 70 रुपायच हाय चालल का ? ” मी ” हो ” म्हणालो त्यांनी मला सगळ्यात खाली लटकवलेल्या फोल्डर पैकी आवडेल तो फोल्डर घेण्यास सांगितले मी म्हणालो ” द्या कोणते पण ” त्यांनी मला केसरी रंगाचं एक सुंदर फोल्डर काढून दिले. मी त्यांना शंभर ची नोट दिली. नोट हातात घेताच त्यांनी विचारले ” 100 रुपये हायत ना ? ” मी ” हो ” म्हणालो त्यांनी खिशातून काही पैसे काढले व माझ्या समोर पकडत म्हणाले ” तीस रुपये परत घ्या या मधून ..” खर तर नको राहू द्या हा शब्द माझ्या ओठांपर्यंत पोहोचला होता. पण प्रश्न बाबांच्या स्वाभिमानाचा असल्यामुळे मी गुपचुप माझे तीस रुपये मोजून परत घेतले. बाबांची परवानगी घेऊन त्यांच्या सोबत फोटो घेतला व ते पुढे निघून गेले.
एखाद्याच आयुष्य आपल्या पेक्षा किती खडतर आणि संघर्षमय असु शकतो ह्याची नकळत जाणीव झाली. जेव्हा केव्हा अशी काही माणसे नजरेस पडतील तेव्हा त्यांच्या कडून गरज नसतानाही वस्तू विकत घेतल्या पाहिजेत. कारण ते पैसे कमावण्यासाठी नव्हे तर जगण्यासाठी संघर्ष करत असतात. दिवस भर संघर्ष करून जो काही मोबदला मिळतो त्यातून ते आपल्या मुलभुत गरजापुर्ण करत असतात. शिवाय घेतलेल्या वस्तू नेहमी आपल्याला जीवनात संघर्ष करत राहण्यास प्रेरीत करत राहतात.(स्वनुभव)
बाबां कडून घेतलेले फोल्डर जो पर्यंत माझ्याकडे राहील तो पर्यंत ते मला संघर्ष करण्याची नक्कीच प्रेरणा देत राहील.
(खादीम सय्यद ©)

Article Tags:
Article Categories:
सामाजिक

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत