संताप आणि ती …

Written by

तडकाफडकी अनुजा माझ्या घरी आली, अतिशय चिडलेली होती…तिच्या नवरा तिचे सगळे पैसे काढून घेई आणि यावरून जेव्हा ती त्याला बोलली तेव्हा त्याने आदळआपट करून तमाशा केला, अनुजा सुद्धा संतापली आणि माझ्याकडे आली… माझ्या आजीने अनुजा ला शांत केलं, “सहन कर” असा मूक सल्ला देऊन परत पाठवलं… काही वेळाने तिचा नवरा आला,आपल्याला किती बदनाम केलं गेलं या धाकाने…आला तसा संताप दाखवायला लागला, माझ्या आजीने त्याला शांत केलं, “अनुजा ला मी समजावलंय” असं सांगून परत पाठवलं… किती विचार करायला लावणारी गोष्ट, स्त्रीच्या संतापाला सहन करण्याचा सल्ला आणि पुरुषाच्या संतापाला समोरच्याला गप्प केलंय त्यामुळे शांत व्हायचा सल्ला… स्त्री असो वा पुरुष, भावना दोघांनाही सारख्याच असतात, संताप दोघांनाही सारखाच येत असतो, पण त्याला वाट कशी दिली जाते? हा समाज जणू सांगतो आहे…

“तू स्त्री आहेस, सहन केलं नाहीस, बंड पुकारलंस, प्रतिकार केला तर तुझ्या वाट्याला बदनामी, तिरस्कार आणि एकटेपणा येईल.. संताप करायचा तुला अधिकार नाही, अधिकार आहे तो फक्त निमूटपणे सहन करण्याचा आणि अन्यायाला वाचा न फोडण्याचा…. पुरुष मात्र कधीही, कुठेही संताप करू शकतील, अगदी वेळ काळेचं भान न ठेवता… तेव्हा मात्र स्त्री ने खाली मान घालावी, पुरुषाने संताप केला तरी त्याचा या वागण्याला स्त्रीच जबाबदार असते, “ती घरात लक्ष देत नसेल तर काय करणार बिचारा माणूस”, “तीच जीव लावत नसेल म्हणुन चिडचिड होते माझ्या लेकराची”….

अशी सहज सोपी कारणं पुरुषाच्या संतापाला दिले जातात…”

विचार केला तर संताप ही एक नैसर्गिक भावना आहे, पण त्यावर नियंत्रण ठेवायला फक्त स्त्री लाच शिकवलं जातं.. वैज्ञानिक दृष्ट्या पाहिलं तर मासिक पाळी, गर्भारपण या काळातही सततच्या हार्मोनल बदलांमुळे स्त्री ला अनपेक्षित अशा चिडचिडेपणा ला सामोरं जावं लागतं..पण अशा नैसर्गिक भावनेलाही वाट करून देणं अशक्य होतं… स्त्री मधल्या या हार्मोनल बदलांना समजावून घेऊन, स्त्री च्या चिडचिडेपणा ला वाट करून देण्याइतपत आपला समाज, खास करून सासर प्रगत झालय का? या नैसर्गिक आलेल्या चिडचिडेपणा मुळे समजा 2 शब्द बोललीच गेली, तर त्याचं रूपांतर भांडणं आणि घटस्फोटा पर्यंत गेलेली उदाहरणं मी पहिली आहेत.. एखादी स्त्री चिडतेय, संताप करतेय, या मागे तिच्या पाठी लागलेलं अपेक्षांचं ओझं असेल, किंवा तिचा स्वाभिमान दुखावला गेला असेल, किंवा तिच्या अस्तित्वावरच आघात झाला असेल, किंवा मासिक पाळीमुळे मानसिक चिडचिड होत असेल, गर्भावस्थेत मूड स्विंग होत असतील..अशी कारणं असू शकतात हे कोण्या पुरुषाच्या मनात आलं तरी आपला समाज सुधारला असं म्हणता येईल…

मासिक पाळीचा त्रास, त्यात होणारी धावपळ आणि सासरच्या मंडळींचा जबरदस्त जाच, यामुळे रडकुंडीला आलेली अनुजा..असह्य होऊन तिने नवऱ्यासमोर हातातले भांडे आपटले…या परिस्थितीचं भान त्या नवऱ्याने ठेवावं की नाही? शांत असणारी अनुजा आज इतकी तीव्र झाली यामागे काहीतरी कारण असेल, तिला शांत करावं असा विचार कुठल्याही नवऱ्याने (ज्यात माणुसकी शिल्लक असेल त्याने) करायला हवा.. पण झाले काय? अनुजा च असं रूप पहिल्यांदा त्याने पाहिलं आणि “हिला माज आलाय, लायकी तरी आहे का हिची, लाज वाटते का हिला असं करायला”  असं म्हणून नवऱ्याने तिच्या डोक्यात स्टूल आपटला… पुढे काही सांगायचीही माझी इच्छा नाही… जगातले किती पुरुष स्त्री च्या संतापाला मोकळी वाट करून देतात? ती परिस्थिती शांतपणे हाताळत नंतर समजूतदारपणे मार्ग अवलंबतात? (सुदैवाने माझे मिस्टर तसं करतात) एकच करा, जास्तीत जास्त पुरुष मंडळींना हे वाचायला लावा, 

एकदा तरी अश्या विषयावर एक चिंतन झालंच पाहिजे..

असेच सुंदर लेख वाचण्यासाठी खालील फेसबुक पेज ला लाईक करा

https://www.facebook.com/irablogs

Article Categories:
मनोरंजन

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत