संधिप्रकाश .. corporate च्या अंगणातला..

Written by

meeting संपल्यावर सहज खिडकीतून पाहिलं निघायच्या आधी.. काही पाऊस वगैरे नाही ना.. तर मस्त संधिप्रकाश पडलेला.. एकदम प्रफुल्लित, टवटवीत वाटलं.. खाली उतरून स्टेशन च्या दिशेनी जाताना campus नव्याने भेटला..
वातावरण सोनसरी पिवळसर.. सोनसरी रंग म्हणजे कसा तर pure च्या पाटल्यांसारखा one gram च्या गोठासारखा नाही.. सूर्याने लगबगीने जाता जाता color pallete ला दिलेला धक्का आणि निळ्या सावळ्या कॅनव्हास वर अस्ताव्यस्त विखुरलेले रंग.. एकमेकात मिसळूनही आपले स्वतंत्र अस्तित्व टिकवून असलेले.. गोलाकार buildings च्या मधोमध हिरवेगार landscape आणि त्यात फ़वारलेले तुषार सिंचन.. त्याच्या कडेनी प्रदूषण कमी करण्यासाठी लावलेले snake plant.. building नंबर ४ आणि ५ च्या मध्ये असलेले रातराणीचे झाड आभाळभर घमघमत होतं.. तिथून जाताना नकळत रेंगाळणारी काही पावलं बघून वाटलं आहे आहे.. मगाशी पडलेल्या पावसाचा ओलावा रुजला आहे थोडासा अजून इथल्याही मातीमध्ये.. बिल्डिंग ११ च्या बाहेर असलेल्या वडाच्या पारंब्या मातीत रुजलेल्या.. त्या सांगून गेल्या कि, तुम्ही यायच्या काही वर्षांपूर्वी अशी दिसत होती ही वास्तू, जंगलासारखी.. जाता जाता मस्त एखादा cutting चहा मारावा असा विचार करत बाहेर पडले campus च्या..
टपरी वरचे दृश्य बघून मात्र चहा प्यायची तीव्र इच्छा विरून गेली.. हवेत विरत चाललेल्या संधिप्रकाशासारखी.. काचेच्या मोठ्या मोठ्या बिल्डिंग आणि त्याच्या बाहेरच्या चहा आणि पानटपऱ्या.. सिगारेट च्या वलयामागे हरवलेले formal shoes आणि high heels.. तुमच्या माझ्या वयाचेच.. धुरातून छेदत हा संधिप्रकाश पोचला असेल का यांच्या पर्यंत.. मागे वळून आपल्याच बिल्डिंग कडे बघताना जाणवलं.. हो, ही काचेची बिल्डिंग आहे..!!
संधिप्रकाश अनुभवणं क्षणिक.. दिवस मावळताना मिळालेले बोनस क्षण.. म्हणजे inning संपली वाटताना शेवटचा बॉल “no ball” पडावा.. त्यावर sixer जावी आणि परत हातचा एक बॉल मिळावा तसं काहीसं.. शेवटी निसर्ग काय सगळ्यांना सारखंच देत असतो.. तो क्षण टिपता आला तर आपला नाहीतर नंतर आहेच मिटत जाणारा दिवस..
ट्रेन मध्ये हेच सगळे विचार करत होते.. एकीकडे लिहून काढत होते.. पण काही प्रश्नांची उत्तरं तशीच अपूर्ण अजूनही.. आणि उतरले तोपर्यंत आकाश काळेभोर.. black board वर duster मारून साफ करावे तसे.. स्टेशन च्या बाहेर पडताना एक काकू आकाशात पाहून म्हणाल्या आज चंद्र फार छान दिसतोय ना.. मन प्रसन्न झालं.. आपल्या भोवतीचे खळे तो फार दिमाखात मिरवत होता.. सगळे प्रश्न पुसत निर्व्याज पांढऱ्याशुभ्र प्रकाशातून द्वादशीचा चंद्र हसला थोडासा..

या आधी तुम्ही कधी रेंगाळला होतात निवांत संधी प्रकाशामध्ये.. comments मध्ये नक्की सांगा.. मॉल मधल्यासारखा “गारठा” नाही मिळाला तरी थोडासा “गारवा” नक्की मिळेल.. बघा जमतंय का… !!!

— Avani Gokhale – Tekale

Follow posts on FaceBook also for regular updates –
https://www.facebook.com/goavanee

Follow on blogger also for regular updates –
https://avanigokhale.blogspot.com/

Article Categories:
मनोरंजन

प्रतिक्रिया व्यक्त करा