संध्याकाळ

Written by

आली संध्याकाळ…रोजरोज येते…नको असली तरी..हवी असली तरी…सूर्याभोवती पृथ्वी कि पृथ्वीभोवती सूर्य फिरतो..सूर्य डुबतो किंवा आपल्याला डुबल्यासारखा वाटतो..तो दुसरीकडे उगवतो…तिथं सकाळ होते,दुसरीकडं रात्र होते पण मध्येच हि संध्याकाळ येते…
मला सकाळ आणि रात्रीशी काही घेणंदेणं नाहीये. त्या खूप सहज येतात आणि नकळत निघूनपण जातात…
माझा प्रॉब्लेम आहे ती ‘संध्याकाळ’.
खरंतरं काहीच काम नाहीये या ‘संध्याकाळचं’ , दुपार आणि रात्र यांना जोडायचं काम करते फक्त ती. दुपार संपल्यावर थेट रात्र येऊ शकत नाही म्हणून मधला वेळ घालवायलाच देवानं हि ‘संध्याकाळ’ तयार केलीये..हि ‘दुपार’ ‘रात्री’ची वाट बघत असते आणि म्हणून ‘संध्याकाळ’ होते..
हिचं वैशिष्ठ्य म्हणजे हि इतकी मंद असते कि सरता सरत नाही…
त्यातून तुम्हाला काहीच काम नसेल तर जीव हैराण करून सोडते…
कवी आणि लेखक मंडळी बऱ्यापैकी याच वेळेत काहीतरी तयार करतात…
Creative गोष्टींसाठी उत्तम असते म्हणतात…
या वेळेवर कलाकार खूप प्रेम करतात…

कुणी ‘कहीं दूर जब दिन ढल जाये,सांज कि दुल्हन बदन चुराये छुपकेसे आये’ लिहितो तर कुणी ‘ये शाम मस्तानी मदहोश किये जाय’ लिहितो.
हि वेळ तुमच्या ‘मूड’ नुसार तुम्हाला भासते..तुम्ही खरंच आनंदी असाल तर तुमचा आनंद ‘समाधानात’ बदलतो…

जर थोडेसे नाराज असाल तर तुमची नाराजी आणखी गहिरी,बोचरी होत जाते..
तुम्ही शाळेत जाणारे असाल तर तुम्हाला ‘खेळ’ संपवून गपचूप घरी येणं भाग असतं (बाहेर खेळायला जात असाल तर) तुम्ही कॉलेजात जात असाल आणि तुमची विकेट पडलेली असेल तर तुम्हाला ‘विकेटटेकर’ ची जास्तीत जास्त आठवण याच वेळी येते…

नोकरीला असाल तर तुम्हाला घरी येऊन ‘शांत’ बसायचं असतं…
आणि जर तुमचं वय झालेलं असेल तर तुमचं आख्खं आयुष्य आठवून देण्याची ताकद या वेळेत असते..
या वेळेत प्रत्त्येकाला आपला असा सोबती असावा लागतो..कुणी रफी,मुकेश आणि लतादीदींना सोबती बनवतो,कुणी एखादा छान चित्रपट बघतो,कुणी एखाद्या जाडजूड पुस्तकात रमतो…कुणी दिवसभराचा थकवा घालवण्यासाठी एखादं मद्यालय जवळ करतो तर कुणी घरीच ‘शाही मैफिल’ रंगवतो…

आता या वेळेत बऱ्याच घरात ‘मालिका’ सुरु असतात..काही घरात आजही देवापुढं,तुळशीपुढं दिवा लावून ‘शुभंकरोती’ म्हणली जाते.. घरातले आजोबा-आज्जी रेडिओवरच्या ७ च्या बातम्या, एखादा कीर्तनाचा कार्यक्रम ऐकत त्यासोबत हि वेळ घालवतात..

मला वाटतं कि हि वेळ खूप चमत्कारिक असते…
या वेळी तुमचा आत्मविश्वास खूप वाढलेला असतो कारण एक दिवस संपलेला असतो आणि दुसरा सुरु व्हायला अजून वेळ असतो आणि हाच वेळ तुम्हाला उद्याच्या तयारीचं बळ देत असतो…
पण ‘याच’ वेळेत तुम्ही सगळ्यात जास्त हरलेले असता किंवा तुम्ही हरल्याची जाणीव याच वेळेत सगळ्यात जास्त होत असते..
कारण एक संपूर्ण दिवस तुमच्या हातून निसटलेला असतो…आणि तो संपल्याचं तुम्हाला त्यावेळी समजतं..हि हार तुमच्या त्या दिवसाची असेल किंवा आयुष्यातली असेल…
.
प्रत्त्येकाची ‘हार’ वेगळी असते..
आपण खूप ‘उत्सवप्रिय’ आहोत त्यामुळं आपल्याकडं प्रत्त्येक सणाची ‘संध्याकाळ’ सोबत काही खास आणत असते..
दिवाळीची संध्याकाळ पणत्या,फटाके,ओवाळण्या आणि फराळ आणते तर ‘तिळगुळ’ घेऊन मकरसंक्रातीची संध्याकाळ येते..
गुढी उतरवताना पाडव्याची संध्याकाळ येते तर पेटत्या निखाऱ्यांसोबत होळीची संध्याकाळ येते…

‘आठवण’ काढण्यासाठी यासारखी ‘वेळ’ शोधून सापडणार नाही…मग ती आठवण कायमचं सोडून गेलेल्या व्यक्तीची असुदे…अस्तित्वात असली तरी तुमच्यासोबत नसलेल्या कुणाचीतरी असुदे..
तुमच्या लहानपणाची असुदे,तरुणपणाची असुदे आणि अगदी कुणाचीही असुदे…
या ‘संध्याकाळ’ च्या वेळेत ते कसबच असतं या आपल्या आठवणी दाट,घट्ट आणि गहिऱ्या करण्याचं…
हि संध्याकाळ कुणाचीच फिकीर करत नाही..ती फक्त स्वतःच काम करते..तुमच्यासोबत,तुमच्या मनस्थितीसोबत राहायचं काम…
ती तुमच्या मनातल्या चित्रातले ‘रंग’ आणखी ‘गहिरे’ करण्याचं काम करते…
खरंतरं यात दोष तिचा नसतोच,आपलाच असतो..ती फक्त आपल्याला ‘साथ’ देत असते..

Article Tags:
Article Categories:
मनोरंजन

प्रतिक्रिया व्यक्त करा