सकारात्मकतेने टिकवला संसार

Written by

 

आज पंचवीस वर्षे झाली संसाराला. दोन तप तशी पूर्ण केलीच की…लग्न करून या घरात आले आणि पहिल्या दोन तीन वर्षांत जे काही उतार चढाव आले त्यावरून बिलकुल वाटलं नव्हतं की पंचवीस वर्षे हा संसार चालेल. लग्न झालं त्यावेळी काही स्वप्नं मी ही उराशी बाळगून गृहप्रवेश केला. हळूहळू घरातील माणसं, नातेवाईक यांना समजू लागले. कोणाच्या आवडी निवडी वेगळया… कोणाचे स्वभाव तऱ्हेवाईक …सगळ्यांच्या अपेक्षाच ओझं डोक्यालाही पेलत नव्हतं एवढं होत. यात मी एकटी कुठेतरी गुरफटूनच गेलेले…नवरा होता सोबतीला पण त्याला शंभर टक्के माझ्याच सोबत राहून कसं चालेल. ‘बायकोचा बैल’ या शब्दाचा डाग त्याच्या माथी लागला तर पुसला जाणारच नव्हता कधी हे त्याला ठाऊक होतं आणि त्या शब्दाशी त्याच वैर होत.

सासूबाई प्रेमळ आणि तशा कडक पण. नणंद कॉलेजला जात होती…तिचा तोरा तसा कधी कधी काही वेगळाच असायचा…सासरे मूळतःच कडक…त्यांच्याकडून कौतुकाची अपेक्षा करणं म्हणजे व्यर्थच. तसे स्वभावाने चांगले पण पूर्ण घरावर फक्त माझाच अंमल आणि मी बोलेन तीच पूर्व दिशा या विचारांचे. नवीन असताना सारचं काही गोड असतं तसच होतं… हळूहळू स्वभावातले फरक उमटू लागले…बऱ्याच गोष्टींत घरातली सून म्हणून मला हे जमायलाच हवं आणि हिने हे करायलाच हव असा अट्टहास. खूपशा अपेक्षा फक्त माझ्याकडूनच. माझ्याही काही अपेक्षा,मत असू शकतात याकडे दुर्लक्षच. मी स्वतंत्र विचारसरणीत वाढलेले..जिथे चर्चा म्हणजे फक्त चर्चा व्हायची..वाद नाही उदभवायचे. एकमेकांच्या मतांचा आदर व्हायचा…माझंच का नाही ऐकलं म्हणून टोकाची भूमिका कोणी घेत नव्हत. इथे मात्र माझ्याही सहनशक्तीचा कधीतरी कडेलोट व्हायचा आणि मग मनातली धुसफूस तोंडावर यायची. त्याने वाद चिघळत जायचे. माघार मीच का घेऊ…माझाही स्वाभिमान आहे म्हणून मी ही टोकाची भूमिका कधी गाठायला लागले कळलंच नाही. लग्न झाल्यावर घरोघरी जे मतभेद होतात तसे आपल्यात होऊ द्यायचे  नाहीत असंच ठरवणारी मी कधी बदलत गेले कळलंच नाही.

संसाराबद्दल, सासरबद्दल एकूण लग्नव्यवस्थेबद्दलच मी इतकी नकारात्मक झाले की एकटेपण हवंहवंसं वाटू लागलं.

सगळ्याच लोकांबद्दल चीड येऊ लागली. काही दिवस सगळ्यांपासून लांब माहेरी आले. परत सासरी जाईन का हे माझं मलाच माहित नव्हतं. माझ्या स्वभावात झालेला बदल आईपासून लपला नाही..स्पष्ट तिला काही न सांगताही कुठेतरी पाणी मुरलय हे कळायला तिला वेळ लागला नाही.

लग्न झालं की आपण फक्त आपण स्वतःचे राहत नाही तर पूर्ण कुटुंब आपलं होत. कुटुंब म्हंटल की विविध तऱ्हेच्या व्यक्ती आल्या आणि सोबत व्यक्ती तितक्या प्रवृत्तीही आल्या. इथेच खरा कस लागतो नव्या सुनेचा. इथेच तिच्या संस्कारांची परीक्षा असते…लग्न करून माप ओलांडून घरात जातानाच आपला ‘मी’ पणा बाहेरच ठेवून जावं. अहं पणाच्या भावाला तिलांजली त्याचक्षणी द्यावी. माहेरची माणसं जशी आपली असतात तितक्याच आत्मीयतेने सासर आपलंच मानायचं मग प्रत्येकाच्या स्वभावात कितीही दोष असले तरी आपलेपणाने ते बदलता येतात किंवा काही स्वीकारताही येतात. सासर म्हणजे वाईटच किंवा तिथे थोडाफार द्वेष,मत्सर…मलाच कमी लेखणार या अशा नकारात्मक विचारांनी आपल्यासोबत गृहप्रवेश केला की नात्यात आत्मीयतेला जागा रहात नाही. तू मी, माझं घर..तुझं घर..तुझी माणसं.. माझी माणसं या कलहानेच तिरस्काराचं विष पसरत जातं. कुटुंब, नाती दुरावली जातात आणि खापर सहजच नवीन सुनेवर फुटतं. हे सगळं टाळायचं असेल तर मनात सकारात्मकतेचा दिवा तेवत ठेवणं फार गरजेच आहे हे आईने मला त्यावेळी समजावलं.

संसार टिकेल की नाही किंवा ही माणसं माझी होतील की नाही असे विचार टाळून माझा संसार मी बहरवणारच… ही सगळी माणसं माझीच आहेत या सकारात्मक विचारांनी संसाराला सुरुवात केली की कोडी आपोआप सुटतात. काही स्वभाव आपण बदलू शकत नाही तेव्हा ते तसेच स्वीकारावे…आणि जे काही बदलावं अस वाटतं ते प्रेमाने,गोडी गुलाबीने बदलावं. प्रेमाने जग जिंकता येत पण रागाने नाती हरतातच.

आईने सगळं बोलून माझ्या मनावरचा ताण कमी केला होता. दुसऱ्या दिवशी सासरी गेले ते माझा संसार मी टिकवणारच हा विचार घेऊन. काही नाराजी अजूनही होती पण काळ हे त्यावर उत्तम औषध होत. मी ही हसत, सगळ्यांचा मान राखत नाती सांभाळू लागले. सासू आणि नंदे सोबत गोड बोलून गट्टी जमवली. त्यामुळे कधी सासरे चिडले तरी त्या दोघी सोबत असायच्या.ज्या गोष्टी मला पटत नव्हत्या त्या मी मांडत होते पण त्रागा न करता… साध्या सोप्या भाषेत. हळूहळू परिस्थिती सावरत होती…मतभेद अगदीच नव्हते होत असे नाही पण ते योग्य रीतीने हाताळायचे किंवा सरळ दुर्लक्षच करायचे ही कला मला जमली होती.  काही स्वभावदोष जाता जात नाहीतच तेव्हा प्रतिउत्तर न करणे आणि पुढे जाणे हे आता मी शिकले होते.

त्यामुळे नवरा आणि माझ्या नात्यातही पुन्हा कधी तणाव निर्माण झाले नाही. मोकळेपणाने संवाद साधून नात्यातली अडी दूर होते हे मला तेव्हा पटलं होत.स्वाभिमान मी तेव्हाही जपला नात्यांना सांभाळून आणि अहंकाराला नाकारून.

आईची ती सकारात्मकतेची शिकवण माझ्या संसाराचा भक्कम पाया ठरली. तिच्या विचारांनी पुढे गेली म्हणून आज यशस्वीपणे माझ्या संसाराला पंचवीस वर्षे पूर्ण झाली. थोडं हसत,रडत,कडू,गोड चव चाखत आनंदाने माझा संसार फुलला.

नातं कोणतंही असो..सासरचे,माहेरच,मैत्रीचं,प्रेमाचं ते टिकवायला सकारात्मक दृष्टिकोन असण खूप महत्त्वाचं असत. नकारात्मक विचार नकारात्मक दिशेनेच पावलं टाकतात तर सकारात्मक विचार प्रगतीच्या दिशेने पावलं टाकतात…नात्यांचा सोहळा मी आज आनंदाने साजरा करते तेही सकारात्मकतेने.

लेख आवडल्यास नक्की लाईक,कंमेंट्स करा आणि शेअर करा फक्त नावासहितच.

©सरिता सावंत भोसले

Article Categories:
प्रेम

प्रतिक्रिया व्यक्त करा