सखे तुझी आठव

Written by

#सखे_तुझी_आठव

येता तुझी आठव
डोळ्या सुटतो पाझर
रुमालाची घडी मग
हळूवार पुसते आसवं

सुरेल तुझं गाणं होतं
केसावरुन न्हाणं होतं
माझ्या विश्वात तुझं
विश्व सामावलं होतं

प्राजक्ताच्या देठापरी ओठ
पाकळ्यांपरी गौर काया
टपोऱ्या डोळ्यांत तुझ्या
दाटून यायची माया

तुझा लाडीक अनुराग
अन् लटकी भांडणं
माझ्या कुशीत निजणं
मी तुला कुरवाळणं

तुझ्या हातचा स्वैंपाक
चव अजुनही जीभेवर
तुझ्या पैंजणांची रुणझुण
घुमतेय सखे घरभर

तुझ्या वेणीतला केशरी चाफा
जपून ठेवलाय मी वहीत
सुगंध तुझ्या कुंतलांचा
मिरवतोय पठ्ठ्या चिरकाळ

तुझं खुदकन हसणं
जसं बकुळफुलांची रिमझिम
अन् हलकेच लाजणं
जणू लाजाळूचं अलगद मिटणं

तुझ्या साऱ्या आठवणी
जपल्यात मी काळजात
त्यावरच करणार आहे मी
सखे पुढचा जीवनप्रवास

———गीता गजानन गरुड.

Article Categories:
मनोरंजन

Comments are closed.