सखे तू लिहीत राहावे.

Written by

सखे तू लिहीत राहावे 

शब्द शब्दात न्हाऊन निघावे,
अव्यक्त भाव व्यक्त व्हावे…
हृदय आणि मनाची सांगड घालत,
सखे तू लिहीत राहावे…

नाही खंत, नाही परवा कुणाची,
मनातील भाव पटलावर उतरावे….
आनंद आणि समाधानाची सांगड घालत,
सखे तू लिहीत राहावे…

जाणीव असू दे मर्मबंधाची,
त्यांना कधीही न दूर सारावे…
मान आणि आपुलकीची सांगड घालत,
सखे तू लिहीत राहावे…

दुहेरी ही तलवार शब्दांची,
वार ही जरा जपून करावे….
प्रेम आणि मायेची सांगड घालत,
सखे तू लिहीत राहावे…

भावना ही गुज मनीची,
प्रतिबिंब तुझ्या हृदयाचे असावे….
सत्य आणि असत्याची सांगड घालत,
सखे तू लिहीत राहावे…

सखे तू लिहीत राहावे….
©®✍️जयश्री कन्हेरे -सातपुते

Article Categories:
कविता

प्रतिक्रिया व्यक्त करा