सण व अडचण

Written by

#सण_व_अडचण

वसूला सकाळीच सकाळी नणंदेचा फोन आला.
“काय मग झाली का तयारी फराळाची?”मेधाने विचारलं

“नाही ओ ताई.निवडणुकीची ड्युटी होती नं.आजच सुटका झाली त्यातून.महिनाभर सेंट्रल पोलिंग स्टेशनला ड्युटी होती.कालच संध्याकाळी सामान आणलं.आज संध्याकाळी ऑफिसातून आल्यावर करते सुरू.”

“अगं बाई,हो का.आणि पाळी कधी आहे ग तुझी.माझी बाई गेली येऊन.मोकळी झाले ग मी सणाला.मला तर बाई टेंशनच आलेलं.”

” माझी आज सकाळीच आली.अंमळ चार दिवस आधीच आली हो.कामाची धावपळ होती नं त्यामुळे लवकर आली असणार.”

“अगं वसू,वेडी आहेस का तू? पाळी आली म्हणतेस अन् फराळाचं करायला घेतेस.अगं देवाला दाखवायचा असतो नैवेद्य.कसं कळत नाही तुला?”

” मग वनसं असं करता का,यावेळचा आमचाही फराळ तुम्हीच करा.यांच्याकडे सामान पाठवून देते हं.”

” नाही गं बाई.माझंच मला जड झालंय करायला.त्यात तुमचं केलं तर मग मी दिवाळीला उठणारच नाही.आई काय म्हणतेय?

“आईंना झेपत नाही ओ आताशा, मणक्यात गेप पडलाय.त्याने जास्तवेळ बसता येत नाही.”

“मग बाई विकतच आण.दिवाळी झाली की मात्र तुझ्या हातच्या किलोभर चकल्या न् अर्धा किलो चिवडा पाठवून दे हं.आमच्या ह्यांना फार आवडतात तुझ्या हातच्या चकल्या.”

वसूने सर्व फराळ शेवटी बाहेरुन विकत आणला.तिचा गुड्डू म्हणाला,”आई,ही कसली चकली.किती जाड.तू का नाही बनवत?प्लीज बनवनं.”

तेवढ्यात सासुबाई डीश घेऊन आल्या.”सुनबाई,धर गं बाई हा चिवडा.जहाल तिखट.कानातून धूर बाहेर पडला माझ्या.”

फराळ देवाला दाखवला तेवढाच.बाकी कोणी हात लावायला मागेना.

लक्ष्मीपुजनादिवशी सासुबाईंनी स्वतः पूजा केली.वसूचा तिसरा दिवस असल्याने तिला किचनमध्ये प्रवेश दिला नाही.सगळं नैवेद्याचं करायचं होतं ना.

तिसऱ्या दिवशी भाऊबीज..वसूने भावजयीला फोन करून सांगितले की डेट असल्यामुळे ती ओवाळू शकणार नाही.भाऊही नाराज झाला व त्यांचं येणं रद्द झालं. .वसूच्या तर पुऱ्या दिवाळीचा विचका झाला.एवढी रांगोळी काढायची हौस तिला पण सासुबाईंनी सांगितले,”यादिवसात काढू नको हं रांगोळी.”

रात्री सासऱ्यांच्या छातीत अचानक दुखू लागलं.ते घामाघूम झाले.वसू कोणाचीही पर्वा न करता सासऱ्यांकडे गेली.त्यांच्या शर्टाची बटणं उघडी केली.त्यांना जोरजोरात खोकायला लावलं.ते मुर्छित होत आहेत हे पहाताच लगेच एम्बुलन्सला फोन लावला. तिने दोन्ही हाताच्या पंजांनी सासऱ्यांच्या छातीवर दाब द्यायला सुरुवात केली.तेवढ्यात एम्बूलन्स आली. सासऱ्यांबरोबर वसुही सासूला घेऊन इस्पितळात गेली कारण नवरा तर बाहेरगावी होता.नणंद तिच्या घरी.

डॉक्टरांनी ताबडतोब उपचार सुरु केले.डॉक्टरांनी बाहेर येताच वसूचे अभिनंदन केले.तिच्या प्रसंगावधानाने सासऱ्यांचे प्राण वाचले होते.धोका टळला
होता.

सासुबाईंनी वसूपुढे हात जोडले,म्हणाल्या,”खरंच आज लक्ष्मीच्या रुपाने माझं सौभाग्य वाचवलंस पोरी.अन् मी मात्र तुला भाऊबीजेपासून अव्हेरलं.आत्ता नाही असं पुन्हा करणार मी.देवानेच शिक्षा केली मला.माझ्या सुनेला फराळ करू दिला नाही म्हणून.”

वसूने सासुबाईंना मिठी मारली.ती सासूसुनेची मिठी फार काही बोलून गेली.तेवढ्यात मेधाही आली.मेधातर रडूच लागली.मग वसू व तिच्या आईने तिला सावरलं

लक्ष्मीरुपाने आलेल्या दिवाळीने वसुच्या नणंदेचे व सासुबाईचे डोळे उघडले.✍️
———–गीता गजानन गरुड.आंब्रड,मोगरणेवाडी.

Article Categories:
मनोरंजन

प्रतिक्रिया व्यक्त करा