सप्तरंगी पालकत्व

Written by

आई,हे ‘व्हिस्पर’म्हणजे काय असतं गं? टीव्ही वरची जाहिरात बघून माझ्या पाचवीतल्या मुलीने मला विचारलेला प्रश्न.’एवढं हातातला काम झालं की सांगते हां’. अस वेळ मारून नेण्यासाठीच माझं नेहमीच वाक्य.

झालं……आधीच पालक म्हणून कमी होते प्रश्न त्यात अजून भर. लगेच डोक्यात चक्र सुरू . वाचनालयात जाउन या विषयावरची पुस्तकं आणायला हवीत,सासूबाईंशी,आईशी बोलायला हवं की या प्रश्नांना समोरं कस जायचं ?

एक पालक म्हणून आपल्या मुलीला सगळ नीट सांगता येईल ना?तिला शारीरिक आणि मानसिक बदलांना सामोरं जातांना आपल्याला तिला आधार देता येइल ना? असे अनेक प्रश्न मनात घोंघावायला लागले.

आत्ता पर्यंत लहान आहे म्हणून वेगळे प्रश्न होते आता मोठी व्हायला लागली की वेगळे प्रश्न असतील. हे प्रश्न कधी संपतील की नाही??? की पालक म्हणून कायमच या प्रश्नांना सामोरं जावं लागणार?

‘हो’.पालक म्हणून आपले आपल्या मुलांच्या बाबतीत असलेले प्रश्न कधीही संपत नाहीत,त्यांच्या बद्दल असलेली काळजीही कधी संपत नाही.आपलयाच बाबतीत बघा,आपण पालक झालो तरी आपले आई वडील अजूनही पालकांच्या भूमिकेत आहेतच. एखादं संकट,प्रश्न निर्माण झाला की अजूनही आपली पहिली धाव आपल्या आई वडिलांकडेच असते. आणि आई वडील म्हणून त्यांनाही आपली काळजी नेहमीच असते. बरोबर ना?

कारण पालन पोषण करणारे म्हणजे ‘ पालक’ आणि मुलांच्या शिक्षणासाठी पैसे पुरवणे आणि त्यांच्या प्रगती पुस्तकावर सही करणे म्हणजे ‘ पालकत्व’. इतक्या सोप्प्या व्याख्या नाहीत ना?

पालकत्व म्हणजे कायमस्वरूपी चालणारी शाळा आहे. जिथे सगळे पालक कायम विद्यार्थीच असतात,राहतात.

बदलत्या काळानुसार पालकांची जबाबदारी वाढते आहे. त्यामुळे पालकत्व हा विषय खुप सखोल आणि चर्चेचा झालाय.या विषयाला खूप कंगोरे आहेत.अनेक दृष्टिकोन आहेत.सारांश एवढाच की आजच्या काळात पालकत्व निभावणं अवघडं आणि आव्हानात्मक आहे. आपल्या घरट्या बाहेरच्या जगात आपल्या पिलांसाठी खूप स्पर्धा आहे त्या स्पर्धेत आपलं मुलं टिकाव म्हणून आपण अपेक्षांची ओझी त्याच्यावर लादत असतो .बाहेरच्या जगात वाईट प्रलोभन आहेत,असुरक्षितता आहे आणि या सगळ्यापासुन आपल्याला आपल्या मुलांना सुरक्षित ठेवायचय.

असं हे थोडंस अवघड आणि थोडंस मजेमजेचं पालकत्व आम्हीही निभावयोय.दोन गोंडस मुली आहेत आम्हाला. दोघींच्या वयामध्ये सव्वादोन वर्षाचं अंतर. त्यामुळे हा प्रवास थोडा अवघड जातोय कारण हिच्या कडे आधी बघू की तीच्याकडे? हिचा अभ्यास आधी की तिचा? हिला आधी झोपवु की तिला? अशी सगळी तारांबळ. आता मोठी मुलगी पाचवीत आणि धाकटी तिसरीत आहे.पण मुली जेव्हा अजूनच लहान होत्या तेव्हा खुपचं कसरत असायची. पण या कसरतीमध्ये नवऱ्याची उत्तम साथ लाभली.तरीही या कसरतीत ‘मोठया’ मुलांवर थोडाफार अन्यायचं होत असतो. आणि ‘पालक’ म्हणून चुकतोय असा सल मनात कायमचा राहतो.असो,हा विषय अजूनच निराळा.पण,नवऱ्याची उत्तम साथ महत्वाची असते. कारण पालक म्हणजे फक्त आई नव्हे.स्त्री अनंत काळची माता असते तसाच पुरुषही अनंत काळचा पिता असतोच.त्यालाही मुलांच्या बाबतीत अनेक कर्तव्य ,जबाबदाऱ्या पार पडायच्या असतातच ,त्यालाही मुलांच्या भविष्याची चिंता असतेच, तोही त्याच्या परीने मुलांना शिस्त लावण्याचा,संस्कार करण्याचा प्रयत्न करतच असतो.

मुलांना सांभाळणं ,शिस्त लावणं ही फक्त आई वडिलांची जबाबदारी राहत नाही जेंव्हा आपण एका समंजस आणि विचारी एकत्र कुटुंबाचा एक भाग असतो.समंजस आणि विचारी या करिता म्हटलं कारण नुसतं एकत्र कुटुंब असून उपयोग असतोच अस नाही,तर त्यातली माणसही विचारी हवीत.(या विषयावर एक वेगळाच लेख होईल कारण पालकत्व हा विषयच एवढा मोठा आहे की त्यातल्या  सगळ्याच मुद्द्यांवर बोलणं इथे शक्य नाही) माझ्या सुदैवाने मी अशा एकत्र कुटुंबाचा एक भाग आहे .एकत्र कुटुंबामुळे’शेअरिंग’ ,एकमेकांच्या मतांचा आदर करणे,मोठ्यांचा आदर करणे इ. अनेक गोष्टींचे संस्कार अगदी अलगद होतायत. आणि मलाही वेळोवेळी मोठयांच्या मार्गदर्शनाचा लाभ होतो.पण आई वडील दोन मुलं किंवा एक मुल अस चौकोनी किंवा त्रिकोणी कुटुंब आणि आई वडील दोघंही नोकरीला अशा परिस्थितीत आई वडिलांची खरी कसोटी असते कारण सगळ्या जबाबदाऱ्या दोघांनाच निभावायच्या असतात.मुलांना वाढवणं,त्यांना शिस्त लावणं,संस्कार करणं.त्यांना पूरेसा वेळही देणं.या सगळ्या कसरती पार पाडताना पालकांची दमछाक होतेय.आणि एवढ करूनही कुठल्याच पातळीवर पुरे न पडण्याचा सल उरतोच.अशा वेळी आपल्या वडीलधाऱ्या मंडळींनी काय केलं असेल? त्यांनाही पाल्याच्या बाबतीतल्या अनेक प्रश्नांना सामोरं जावं लागलं असेलच की.

आपण जेव्हा ‘ पालकत्वाच्या’ बाबती तले प्रश्न आपल्या पालकांसमोर उपस्थित करतो तेंव्हा त्यांचं एक ठरलेलं वाक्य असतं. तुम्ही हल्लीची मुलं जरा अतीचं करता.

खरचं काही वेळा आपण जरा अतीच करतो ना?

व.पु.काळें च्या पुस्तकातलं एक वाक्य आहे,’अती विचाराने कृतीतील सहजता निघून जाते’.

खरच किती लागू पडतं हे वाक्य आपल्याला.

खरंच काही वेळा आपला अती अट्टहास असतो,आपण पालक म्हणून हे केलचं पाहिजे आणि आपल्या पाल्याला हे आलाचं पाहिजे असा.कधी जास्त शिस्तीचा अट्टाहास तर कधी आम्हाला मिळालं नाही मुलांना मिळुदे अस म्हणून आपणच केलेलं  फाजील लाड,दिलेली अति मोकळीक .या सगळ्या ‘अति’चे परिणाम म्हणून या पालक-पाल्याच्या नात्यातील ‘कडक उन्हाची ‘ बाजूचं स्वतःअनुभवतोय आणि आपला पाल्यही. आणि सुखद सरींचा अनुभवापासून दुरावतोय.

चला तर मग नविन वर्षाचा संकल्प करू.अट्टाहास करण बंद करू.आई वडील म्हणून चांगलें विचार,आचार,संस्कार द्यायचेच पण ओझं न बाळगता आणि न लादता.

तरच पालकत्वाच्या या ऊन पावसाच्या खेळातल्या सप्तरंगी इंद्रधनुष्याचा आनंद घेता येईल आपल्या पाल्याच्या संगतीने.

Article Categories:
मनोरंजन

प्रतिक्रिया व्यक्त करा