समर्पणाचे फळ…(एक कथा)

Written by

नंदिनी…

मुलगी म्हणून जन्माला आली आणि सुरू झाला स्त्रीत्वाचा प्रवास. शाळेत अत्यंत हुशार, खेळण्यात अग्रेसर, अनेक बक्षीसे मिळायची, कालांतराने शिक्षण घेऊन चांगल्या पदावर नोकरीला रुजू झाली..भरपूर पगार…मग एक स्थळ चालून आलं… कमी श्रीमंत पण मनाची श्रीमंती पाहून लग्न केलं…

सासरी 8 मंडळी, सगळ्यांचे अगदी आनंदाने केलं…मग कसरत होऊ लागली नोकरी आणि घर संभाळतांना… त्यातच तिचं प्रोमोशन होऊन दुप्पट पगार मिळणार म्हणून तिला मेल आला…आता निर्णय तिला घ्यायचा होता…

खूप विचार करून तिने नोकरीवर पाणी सोडलं.. आता संपूर्ण वेळ तिच्या कुटूंबासाठी दिला…सासरे आजारी पडले, त्यांचं अगदी मल काढण्याचेही काम तिने पाहिले, सर्वांना वेळेवर जेवण मिळावं म्हणून पुरेपूर प्रयत्न असायचा… इकडे सगळ्यांचे हाल होऊ नये म्हणुन माहेरीही कमी वेळा जायची…

नंदिनी ला 2 मुलं झाली, त्यांचाही भार आनंदाने उचलला… मुलांची लग्न झाली, सुना घरात आल्या, नातवंड आले…नंदिनी म्हणजे सुनांना अगदी सख्या आई समान..मुलांना चांगले संस्कार दिले..त्यांचा पायावर उभं केलं… घर सवरतांना कितीदा आजारी पडली, पण आजारपणातही उभं राहून स्वतः कधी आराम केला नाही, अंगावर सगळं काढत गेली…

पण तिच्या पतीने तिने हे करावं असं गृहीतच धरलं होतं, कधी कौतुकाचे 2 शब्द नाही की कधी कृतज्ञतेचा भाव नाही…उलट कधी काही चुकलं तर बोलायला मागेपुढे पाहत नसे…

नंदिनी आता 50 वर्षाची प्रौढा झाली होती..

तिचे सासरे आणि वडील, नेमके एकाच वेळी आजारी पडले, सासऱ्यांना किडनी चा आजार झालेला ..वडिलांचा bp high झालेला…दोघांनाही नंदीनी ची गरज होती..त्यात नंदिनी चे पती बाहेरगावी गेले होते…

नंदिनी च्या पतीला आजारपणाचं समजलं, 7 दिवसांनी ते परत आले…बघतो तर काय, नंदिनी ला ऍडमिट केलेले …

सगळी माहिती काढल्यावर त्याला समजले की नंदिनी तिच्या वडिलांसोबत होती आणि त्याच दवाखान्यात तिला ऍडमिट केले..त्याचा वडिलांसोबत त्याचे भाऊ आणि आई होते…

नंदिनी ला कायम गृहीत धरणाऱ्या तिच्या पतीला राग अनावर झाला,

तश्या अवस्थेत तो नंदिनी ला बोलू लागला…

“तुला काही वाटत सुद्धा नाहीये का?, इथे माझे वडील आजारी असताना त्यांची काळजी घेणं सोडुन तुझ्या वडिलांसोबत तू जाऊन बसलीस?? तुला कायम आपलं माहेरच प्रिय, या घराला आपलं कधी मानलच नाहीस, लाज वाटते अशी बायको केली म्हणून, माझ्या अनुपस्थितीत तुझी मजल इथपर्यंत जाऊ शकते माहीत नव्हतं…कधीच माझ्या घरासाठी इतकं केलं नसशील तेवढं तुझ्या बापासाठी केलंस आणि म्हणून पडली असशील आजारी” नंदिनी सुन्न होऊन ऐकत होती, आजवर घरासाठी केलेला त्याग, समर्पण सगळं तिच्या डोळ्यासमोरून गेलं, 50 वर्षाच्या प्रौढेला या वयात हे ऐकावं लागलं.. आयुष्याची कितीतरी वर्ष सासर जपण्यात आणि त्यांचा सेवेत, मग मुलांमध्ये आणि आता नातवांसाठी समर्पण.. कधी स्वतःसाठी एखादा आवडीचा पदार्थ केला नाही की कधी आवडीची साडी घेतली नाही… आयुष्य वाहून दिलेलं या सगळयात… आणि इतक्या मोठया तपाचं फळ तिला आज हे मिळालं…

तेवढ्यात डॉक्टर आले..त्यांच्याकडे नंदिनीची चौकशी न करता तो रागारागात बाजूला झाला…

“मावशी कसं वाटतंय? खरंच तुमच्यासारखी हट्टी बाई मी पहिली नाही, जीवाला धोका असताना सुद्धा सासऱ्यांना तुमची एक किडनी काढून दिलीत, आणि नंतर मग इकडे वडिलांकडे येऊन त्यांची चौकशी करून मगच सलाईन लावलीत… आता तुम्हाला आरामाची गरज आहे, सगळ्या टेस्ट केल्या होत्या तुमच्या, कुठलीच टेस्ट नॉर्मल नाहीये, कसकाय काढलं एवढं प्रचंड दुखणं अंगावर?? Bp, शुगर, बोन्स, थायरॉईड काहीच नॉर्मल नाही..आता फक्त आराम करायचा” 

नंदिनी चा नवरा खजील होऊन तिथेच थबकला, नंदिनी ने त्याच्याकडे न बघता डोळे मिटून झोपून घेतलं….

____________________________________________

असेच सुंदर सुंदर लेख वाचण्यासाठी आमच्या खालील फेसबुक पेज ला लाईक करा

https://www.facebook.com/irablogs

Article Categories:
नारीवादी

प्रतिक्रिया व्यक्त करा