सवत…. एक वेगळी प्रेम कथा…

Written by

@अर्चना अनंत धवड ✍️

सपनानी आज कपाट आवरायला घेतल. नुकतेच हिना चे लग्न झाले होते. सर्व पाहुणे मंडळी गेल्यावर तिने घर आवरले अणि आता कपाट आवरत होती. साफसफाई करताना कपाटाच्या कोपऱ्यातून एक कागद खाली पडला. तिनी  तो उचलला… ते मैरेज सर्टिफिकेट होते…. सपना चौधरी विथ …………………… आपलंच नाव सपना होत हे ही ती  विसरली होती . तिच्या डोळ्यासमोर भूतकाळ आला. तीला गतकाळातील गोष्टी आठवू लागल्या.

मी  आई वडीलाची किती लाडकी होती…आईची तर फारच !कुठली वस्तू मागितली आणि ती मिळाली नाही असं कधी होत नसे….  बाबा नेहमी म्हणायचे, अग इतका लाड बरा नव्हे… तुझ्या लाडाने ती वाया जायची. पण आईच आपल नेहमीच… अहो लहान आहे ती.आईला आई नव्हती म्हणुन तिच्या इच्छा पूर्ण झाल्या नव्हत्या म्हणुन ती ती माझ्या बाबतीत खुप हळवी होती…

वडील सरकारी नोकरीत.त्यामुळे परिस्तिथी बऱ्यापैकी होती….एक मध्यम वर्गीय कुटुंब होते परंतु माझे लाड मात्र श्रीमंतांच्या मुलीसारखे होते…

मी दिसायला सुंदर……….. सजन्या नटण्याची भारी हौस.नवनवीन ड्रेसेस, मॅचिंग याची खुप हौस…  कधीही बघा एकदम तयार अस वाटायच कुठे फिरायला चालली की काय. त्यासाठी खास मी ब्युटी पार्लर चा कोर्स करुन घेतला होता.
माझी मावशी माझ्याच एरियात राहत होती. मी मावशीकडे नेहमी जायची. तिथे माझ्या मावसभावाचा एक मित्र यायचा. तो दिसायला रुबाबदार होता . मी त्याला भैय्या म्हणायची. नेहमी आमची थट्टा मस्करी सुरू राहण्याची. मी तेव्हा दहावीला होती. मला तो आवडू लागला होता. प्रेम होत की आकर्षण हे कळायचे ते वय नव्हते. पण त्याला एकदिवस जरी भेटले नाही तर अस्वस्थ वाटायच. जवळच त्याच दुकान होतं. या ना त्या निमित्ताने त्याच्या दुकानात जाऊ लागली. वस्तु देण्याच्या बहाण्याने तो स्पर्श करू लागला. मला तो स्पर्श हवा हवा सा वाटू लागला. आमच्या गाठीभेटी वाढल्या.मी नेहमी त्याला भेटायला मावशीकडे जायची….. आणि त्याला भैया म्हणायची त्यामुळे कुणाला आमच्या प्रेमाबद्दल शंका आली नाही….  मी त्याच्या साठी वेडी झाली होती. त्याच्या सोबत फिरायला जाऊ लागली. तो माझ्यावर लग्नासाठी दवाब आणू लागला. जातिव्यवस्थेच्या फेऱ्यात अडकडकलेल्या माझ्या आईवडलीलाकडून लग्नाला  संमती मिळणे शक्यच नव्हते….. त्यामुळे लग्न करायचे तर घरून पळून जाणे हाच एक मार्ग होता…  जशी अठरा वर्षांची झाली तशी मी त्याच्या सोबत पळून गेले आणि त्याच्या दोन चार मित्राच्या उपस्थितीत लग्न केले.

त्याच्या च्या घरी तो सगळ्यात मोठा होता. त्याला आठ भावंडे, आई अणि बाबा ….घर तसे मोठे होते पण एवढ्या लोकांना कमीच पडत. माहेरच्या पेक्षा वातावरण फार वेगळे होते. दोन दिवसाआड नॉनवेज……. घरीच कोंबडी कापणे ……. बकरी कापणे ……

मला मळमळायला व्हायचे. कधी अंडी न पाहिलेली मी… रोज मटण बनवाव लागे….. रांधा वाढा उष्टी काढा एवढेच माझे जीवन झाले होते. बाहेर निघणे बंदच झाले होते. तो मला कधीच कुठे बाहेर नेत नव्हता . पिंजर्‍यात बंदिस्त झाल्यासारखं वाटतं होत. कीचन ते बेडरूम एवढाच माझा वावर होता. हॉलमध्ये यायला पण मनाई होती.. तो दिवसभर बाहेर रहायचा. रात्री उशीरा घरी यायचा. आता तो गरजेपुरता जवळ येत होता. मनात यायच की हाच तो आहे का? ज्याचा वर आपण प्रेम केले होते. अस वाटायच इथून पळून जाव पण जाणार कोठे माहेरची दरवाजे कायमची बंद झाली होती. शिक्षण अर्धवट सोडले होते त्यामुळे काही काम मिळणे कठीण. बाहेरच्या जगात एकट्या निराश्रित त्यातल्या त्यात पळून गेलेल्या मुलीचा निभाव लागणे कठीण होते. आत्महत्येचे विचार मानत यायचे पण तेव्हढी हिम्मत होत नव्हती. आलिया भोगासी असावे सादर अशी माझी अवस्था झाली होती

त्याचा माझ्या मधील इंटरेस्ट संपला होता. आता त्याची वेगवेगळी प्रेमप्रकरणे कानावर येऊ लागली. एका विलक्षण दडपणाखाली मी जगत होते. आणि त्याला काही विचारायची सोय नव्हती. विचारायचा प्रयत्न केला तर तो म्हणायचा तुला सर्व मिळत ना मग तुला माझ्या इतर गोष्टीत नाक खुपसायची गरज नाही. त्याला म्हणावस वाटे खायला प्यायला मिळत नव्हते म्हणुन तुझ्यासोबत आले का. अन्न वस्त्र निवारा याव्यतिरिक्त ही माणसाच्या काही गरजा असतात. त्याला मात्रा आपण काही चुकीचे वागतो अस बिलकुल वाटत नव्हतं. आपण हिच्या गरजा पूर्ण करतो म्हणजे नवऱ्याचे कर्तव्य संपले. तुरुंगातील कैद्यासारखी माझी अवस्था झाली होती. कैद्यांची तरी सुटका होण्याची शक्यता असते. पण मला तर आजीवन तुरुंगवासाची शिक्षा झाली होती. कारण माझा गुन्हा ही तसाच गंभीर होता. मी एका चुकीच्या माणसावर आंधळ प्रेम केल होत. जिवापाड प्रेम करणार्‍या आई बाबांना दुखावल होत.

आणि अचानक एक दिवस……………
………… तो एका मुलीला घेऊन आला. म्हणाला ये मेरी छोटी बीबी तुम दोनों बहनों के समान रहो. मी त्या मुलीकडे पाहिल….. अरे ही तर रश्मी … त्याची मानलेली बहीण. मागच्या रक्षाबंधनला राखी बांधायला आलेली. मला रश्मीचा खुप राग आला. अस भावाशी पण कुणी लग्न करतात का? मनात विचार आला की मी पण तर तेच केले. मी पण त्याला भैयाच म्हणायचे. थोड्या वेळात राग नाहीसा झाला. मला तीची दया आली आणि फार वाईट वाटले. मी प्रेम केले तेव्हा मी खूप लहान होते. प्रेम आणि शारीरिक आकर्षण यातील फरक कळत नव्हता. अस वाटल की रश्मीच्या दोन थोबाडीत द्याव्या. ज्या चुकीची शिक्षा मी भोगत होती तीच चूक परत रश्मीने केली होती. मला कळत नव्हते की या एवढ्या मैच्योर मुलींनी अशा बायको असलेल्या माणसाशी का लग्न कराव. तो होताच तसा… बोलन इतक गोड की कुणीही मुलगी त्याच्या जाळ्यात सहजपणे अडकायची…तेव्हा पण त्याचा वर किती मुली प्रेम करायच्या . अणि तो आपल्यावर प्रेम करतो म्हणजे आपण किती खास… अस मला वाटायचं. रश्मी अप्रतिम सुंदर…. ग्रेजुएट…… एका श्रीमंत घरातील मुलगी होती. रश्मी चे लग्न एका श्रीमंत घरातील इंजीनियर मुलाशी जुळले होते. अणि ही अशी याच्या सोबत पळून आली. भीकेचे डोहाळे म्हणतात ते यालाच. हिच्या आई वडीलांची काय अवस्था झाली असेल. मला माझे आई बाबा आठवले. मी पळून आल्यावर माझी आई आजारी पडली होती आणि वडीलांनी दोन महिने  सुट्टी घेतली होती. कारण त्यांना समाजात तोंड दाखवायला जागा नव्हती. रश्मी याच्या चक्रात कशी अडकली हे मात्र शेवटापर्यंत कळले नाही. तिला कधी विचारले तर डोळ्यात पाणी आणून म्हणतेय जाने दो ना दीदी. यही मेरा नसीब था.

रश्मीची प्रेमाची नवलाई नऊ दिवसात संपली. रश्मी एका श्रीमंत घरातील मुलगी होती तिला त्याच्या कुटुंबात जुळवून घेणे फार अवघड जात होते . तिने एकदिवस झोपेच्या गोळ्या खाऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यातून ती वाचली. तिला मी भेटायला गेली ती माझ्या कुशीत खूप रडली म्हणाली ताई मला नाहीं जागायच……. मी तिला थोपटले अणि म्हटले हे बघ रश्मी आपण दोघींनी पण आयुष्यात खूप मोठी चूक केली. त्याची शिक्षा आपण भोगतो आहे. जीव देने त्यावर उपाय नाही तेव्हा यानंतर असा विचार देखील मनात त आणायचा नाही. आजपासून तू माझी सवत नसुन छोटी बहीण आहे. आपण दोघी मैत्रिणी सारखं वागु. आपण दोघी मिळून आपल जीवन चांगले जगण्याचा प्रयत्न करु. आपण आपलं जीवन आपल्या पद्धतीने जगू…. या घरात तुझं आणि माझं कुणीही नाही… ज्याच्यासाठी आपण आपल घर सोडलं तोही आज आपला नाही…. तेव्हा आपण एकमेकींसाठी जगायचं….. देशील ना मला साथ…..

हो, ताई… रश्मीने तीला रडत मिठी मारली…
आता मी मनात निर्धार केला होता…. चूक आपण केली तर दुरुस्तही आपणच करायची… आपल आयुष्य पूर्ववत होणार नाही परंतु थोडंफार चांगल आयुष्य नक्कीच जगू शकतो… त्यासाठी आधी स्वावलंबी होणे आवश्यक आहे… पण कसे… काय कराव… आणि अचानक आठवलं आपण अत्याधुनिक ब्युटीपार्लर चा क्लास केलेला आहे….
मी हा विचार रश्मीला बोलून दाखविला…
ताई, एकदम बरोबर… मी तुला मदत करेन
अग, पण एक प्रॉब्लेम आहे… आपल्याला त्यासाठी पैसे लागेल… आणि मला वाटत नाही आपल्याला हा मदत करेल….
ताई, माझ्याकडे काही दागिने आहेत… जे मी माहेरून आणले आहेत.. त्यातून आपण साहित्य खरेदी करू…
अग, पण ते तुझं स्त्री धन आहे….
ताई…. आपण हे सगळं आपल्या भविष्यासाठी करतोय ना… मग आता तुझं माझं नसून आपल म्हणू या…
आता माझा पैशाचा प्रश्न सुटला होता…
मी त्याला सांगितले की मला घरीच ब्युटीपार्लर काढायचे आहे त्याच्या समोर ब्र काढू शकणारी मी आज एवढी हिम्मत दाखवली होती. पाठीमागे रश्मी उभी होती. ती म्हणाली हो आम्ही दोघी मिळून पार्लर चालवू. आमचा निर्धार बघून तो काही न बोलता निघून गेला. त्याच्या होकाराची वाट न बघता दोघी मिळून आम्ही घरीच पार्लर सुरू केले. लग्नाचे मेकअप…. मेहदी ऑर्डर…. अशी ऑर्डर मिळू लागली. काही दिवसात आमचा आमच्या व्यवसायात चांगला जम बसला. आता आम्ही आर्थिक दृष्ट्या पण सक्षम झालो होतो. काही वर्षांनी आम्ही वर घर बांधुन घेतले. आता आम्ही दोघी मुला सोबत वेगळ्या रहात होतो. रश्मी ने एका खोलीत शीकवणी वर्ग सुरू केले. आम्ही दोघींनी एकमेकीसाठी जगायचे ठरवले. आमची मुले अणि आम्ही दोघी. एकमेकींच्या बाळांतपणापासुन ते आजारपणापर्यत आम्ही एकमेकींचे सर्व केले. आता हिना चे लग्न झाले. हिना म्हणजे माझी मुलगी. रश्मी ने सर्व जबाबदारी स्वतः वर घेतली. अगदी स्वतः च्या मुलीसारखं सगळं केलं…
आजही त्याची अनेक प्रेमप्रकरणे कानावर येतात. . . पण आता आम्ही त्याच वाईट वाटून घेत नाही. कारण त्याला आता आमच्या जीवनात काही स्थान नाही. माझ्या मुलांना मी नेहमी सांगते की प्रेम करा पण डोळे उघडे ठेवून. जाती धर्मा पलीकडे जाऊन माणूस ओळखला शिका. प्रेम आहे की आकर्षण हे आधी तपासा. आई वडीलांच्या मताचा आदर करा. चुकीच्या व्यक्तीशी प्रेम आणि लग्न केल्यास पच्छाताप करण्याशिवाय काहीच हाती राहत नाही. आणि मी माझ्या मुलीला सांगितले की तुला भविष्यात काहीही अडचण आल्यास माझ्या घराचे दरवाजे तूझ्या साठी उघडे आहेत. मी अक्षम्य गुन्हा केला होता पण तरी मला आई वडील माफ करतील असा थोडा जरी विश्वास असता तर या नरकयातनातून सुटका करून घेऊ शकली असती.
दुसरी बायको केल्यावर कुण्याही स्त्रीला वाईटच वाटेल. मलाही वाटले होते पण आता वाटतय रश्मी नसती तर मी जगु शकले असते? अणि मी नसती तर रश्मी ? . नक्कीच नाही.

रश्मी मला आवाज देत होती दीदी क्या कर रही हो. मैं कबसे आवाज दे रही हू. ओ कस्टमर आयी है. मी पार्लर मध्ये गेली

माझा लेख आवडला असल्यास प्लीज मला फॉलो, लाइक  अणि कमेंट करा

©अर्चना अनंत धवड
सदर कथेच्या प्रकाशनाचे व वितरणाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव.कथेत अथवा लेखिकेच्या नावात कुठलाही बदल केल्यास तो काॅपीराईट कायद्याचा भंग असेल,ह्याची कृपया नोंद घ्यावी.
कथा जशी आहे तशी शेअर करण्यास हरकत नाही.
अशा घटना आजूबाजूला बऱ्याचदा आपण बघायचो…. आता शहरी भागात आंतरजातीय विवाह सहजतेने स्वीकारतात परंतु ग्रामीण भागात आजही परिस्थिती फारशी बदललेली नाही…..
कशी वाटली कथा? काय अनुभव आहे तुमचा ?नक्की कळवा खाली दिलेल्या कमेन्ट बाॅक्समधे.

****,,, *****,, *****,, *****,, *****,,

Article Categories:
मनोरंजन

प्रतिक्रिया व्यक्त करा