सांगड नव्याची

Written by

सांगडनव्याची

वेणूने व्हाट्सएपच्या ग्रुपवर मेसेज टाकला प्लीज अर्जेन्ट भेटा. सगळ्या जणींना काही कळेना…. संध्याकाळी नेहमीच्या ठिकाणी चहाला सगळ्या हजर…. कधी नव्हे ते सीमा पण आली… तिला सारखी करणं मिळतात, न येण्यासाठी , असो मुद्दा काय आहे वेणू, राणीने विचारले…  एक नवीन कल्पना आहे गं, म्हणजे जरा वेगळी , हटके, युनिक का काय ते वाली गं, आता बोलतेस का देऊ फटके….  मुग्धा म्हणाली, अग   सांगते ना….. वेणू बोलली….. मला सांगा आपण किती वर्ष  एकमेकींना ओळखतो ? ए बाई , तू सांगणार आहेस की आम्ही निघू…. चहा संपवून घरी स्वैपाक बाकी आहे! इथे उगाच इंटरव्ह्यू नकोत कधी, कुठे, कसं, कशाला, याचे?इति सारा….. बरं बरं पटकन सांगते वेणू म्हणाली….  मी या चिट्स आणल्या आहेत आपल्या नांवाच्या ,एकेकीने एक एक उचला …. एकमेकींची नाव असतील त्यात पण आता नाव बोलू नका….  झालं सगळयांनी चिट्स उचलल्या …डोळयांनी खाणाखुणा करणार एवढ्यात वेणू ओरडली…. नो चिटिंग म्हणून…..  आता या महिन्यात संक्रांत येणार तर आपण जे हळदीकुंकू करतो त्या साठी हा नवा प्रकार आहे…. जिचं नाव आलं आहे तिला आपण किती ओळखतो, तिच्या आवडीनिवडी महिती आहेत का? हे सांगणारा उपक्रम म्हणा हवं तर….  मी एक रक्कम सांगते त्यात बसणारीच एक वस्तू नाव आलेल्या आपल्या मैत्रिणीला द्यायची , कळलं का? इतकावेळ शांत बसलेल्या इराला मुग्धा म्हणाली, अग ए, इरे, कळलं का की नाही ? नंतर घरी गेल्यावर फोन करशील मग काय म्हणाली ग वेणू म्हणून….. ‘कळलं गं, मी गिफ्ट काय आणू त्याचा विचार करतेय?… इरा. ‘वेणे कामाला लावलायला पटाईत आहे हां , सारा म्हणाली … सगळ्या जणी हसायला लागल्या. चला निघा आता …. नाहीतर माझ्या नावाने शंख कराल…..
वेणू पण निघाली…..  काहीतरी नवीन सुचलं या आनंदात…  गाडीवर येताना तिच्या डोळयासमोर सगळया पहिल्यादा भेटल्या ते आठवलं…. मुलांच्या शाळेत … मुलं आत आणि या बाहेर… तेवढ्याच कावरयाबवऱ्या…. एकमेकींना धीर देत थांबलेल्या… त्यातूनच छान मैत्री झाली… ती आतापर्यंत…. चाळीशी पार झाली … इतक्या वर्षात अनेक हळदीकुंकू पार पडले…  जमेल तेव्हा एकमेकीकडे जायच्या पण नंतर नंतर जमायचं नाही मग भिशीच्याच वेळी वस्तूची देवाणघेवाण व्हायची…. मग सारख्या वस्तू, वेगळया शेप च्या डब्या,चमचे, गाळणी, यांचीच गर्दी…. संक्रांतीच्या दिवशी घरी येतील त्यांना मग भिशीला वेगळं असं व्हायचं….हल्ली तर खरंच सगळ्याकडे खुप वस्तू असतात , प्लॅटिकचा वापर कमी हवा असं  सगळं असताना पण  हळदीकुंकू करायचे तर नक्की…. त्यातूनच वेणूला ही कल्पना सुचली …. “सिक्रेट संक्रांत”
तुम्ही बरोबर ओळखलं आहे सिक्रेट सांता सारखाचं….  आपण विदेशी लोकांचे इतक्या बाबतीत अनुकरण करतो पण काही वेळा त्याचा आपल्या संस्कृतीशी मेळ घातला तर त्यातूनच नाविन्य सादर होत… नाही का?
त्या महिन्यात भिशीला सगळ्या भेटल्या… आतुरतेने… आपल्याला काय गिफ्ट मिळणार या विचारात … कोणाला आवडीचे पुस्तक, फुलझाडांची रोपे, डेकोरेटिव्ह शोपीस, अशा अनेक नवीन नवीन गोष्टी एकमेकींना दिल्या अगदी आनंदाने, गमतीत, आणि आठवणीत राहणाऱ्या….
आता यातपण काहीतरी खुसपट काढणाऱ्या काहीजणी असतीलच पण ज्यांना नवीन गोष्टीची हौस आहे त्यांनी एकदा ट्राय करायला काय हरकत आहे नाही का?

नेहा बोरकर देशपांडे
१०-१-२०२०

Comments are closed.